Friday, June 5, 2026

 वृत्त क्रमांक 

लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणेला दिशा मिळणार

आय.आय.पी.ए. व स्वा. रा. ती. म. विद्यापीठ यांच्यात

शैक्षणिक व प्रशासकीय सहकार्यासाठी सामंजस्य करार संपन्न 

नांदेड दि.५ जून:- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनीस्ट्रेशन,नवी दिल्ली ही  भारत सरकारच्या कर्मचारी, लोकतक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत  लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणा विषयी कार्य करणारी लोकप्रशासन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी  तथा IIPA नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली या राष्ट्रीय संस्थेची नांदेड येथे शाखा   स्थापन  करण्यात आली आहे.    लोकप्रशासन विषयात  संशोधन , प्रशिक्षण  व प्रशासकीय सुधारणा या क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनीस्ट्रेशन (IIPA) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्यात सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. 

विद्यापीठाच्या कुलगुरू महोदयांच्या दालनात संपन्न झालेल्या एका कार्यक्रमात IIPA नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  (भा.प्र.से.) व स्वा.रा.ती.म. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी  केली आहे.  यावेळी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, IIPA नांदेड शाखेचे सचिव तथा देगलूर महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख प्रा. डॉ. बी.आर.कतुरवार , विद्यापीठातील नवोपक्रम विभागाचे संचालक डॉ. एस.जे.वाढेर, आयक्यूएसी समन्वयक डॉ.सुरेंद्रनाथ रेडडी, IIPA  कोषाध्यक्ष व प्रतिभा निकेतन महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.दीपक वाघमारे , यशवंत महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.मीरा फड , म.फुले महाविद्यालय मुखेड येथील लोकप्रशासनाचे प्रा.  डॉ.चांदोबा कहाळेकर उपस्थित होते.

या सामंजस्य कराराची प्रमुख उद्दिष्ट्ये लोकप्रशासनाच्या विद्यार्थ्यांना प्रशासकीय व्यवस्थेचे प्रात्यक्षिक ज्ञान देणे, विद्यापीठ  व जिल्हा प्रशासन यांच्यातील संरचित व शाश्वत भागीदारी प्रस्थापित करणे,  लोकप्रशासन व सामाजिक शास्त्रात केल्या जाणा-या संशोधनाचा उपयोग प्रशासकीय सुधारणा व विविध विकासात्मक योजनांची प्रभावीपणे अमलबजावणीसाठी करता यावा, बी.ए.व एम.ए. लोकप्रशासनाच्या विद्यार्थ्यांना जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महानगरपालिका येथे आँन जॉब ट्रेनिंग,  इंटर्नशिप, क्षेत्र भेटी व प्रकल्प  अभ्यासाच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामकाजाचा अनुभव मिळणार आहे. IIPA व विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय अधिकारी,कर्मचारी,  प्राध्यापक,  विद्यार्थी, संशोधक यांच्या  शैक्षणिक,प्रशासकीय  व व्यावसायिक संवर्धनासाठी विशेष व्याख्याने, चर्चासत्र,परिसंवाद कार्यशाळा व मॉक इंटरव्ह्यू आयोजित केले जाणार  आहेत. विद्यार्थ्यांना UPSC/MPSC च्या तयारीसाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.  विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांचा  व शैक्षणिक वातावरणाचा उपयोग लोकप्रशासन व्यवस्थेत संशोधन, प्रशिक्षण, प्रशासकीय सुधारणा व समाज उपयोगी  कार्यासाठी करता येणार आहे.  भविष्यकाळात नांदेड विद्यापीठ व जिल्हा प्रशासन यांच्या सहयोगातून नांदेड प्रशासकीय सुधारणा,  संशोधन व प्रशिक्षणाचे केंद्र म्हणून विकसित होईल. प्रशासन व्यवस्था अधिक गतिमान होण्यासाठी,  प्रभावी सुशासन  विकसित करण्यासाठी  संयुक्त संशोधन प्रकल्प राबवले जाणार आहेत. यातून निघणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे केंद्र व महाराष्ट्र शासनाला धोरणात्मक शिफारशी केल्या जातील. 

याप्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर  म्हणाले, "हा करार केवळ कागदावरचा न राहता, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शासन स्तरावर धोरणनिर्मिती, सुशासन व प्रशासकीय सुधारणा कार्याशी जोडणारा दुवा ठरेल.  व लोकप्रशासन विषयात केल्या जाणाऱ्या संशोधनाच्या उपयोग शासन स्तरावर प्रभावी धोरण निर्मितीसाठी होईल.  IIPA  नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले  (भा.प्र.से.) असे म्हणाले की,  विद्यापीठात केल्या जाणाऱ्या  संशोधन कार्य अथवा प्रकल्प शीर्षक ठरविताना प्रशासकीय अधिकारी वर्गाला येणाऱ्या समस्यांचा अभ्यास विद्यापीठ स्तरावर होणे आवश्यक आहे. तसेच त्यातून निघणारे निष्कर्ष व शिफारशी हे विविध  शासकीय योजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी झाला पाहिजे. नागरिकांना दैनदिन जीवनात विविध प्रमाणपत्र काढताना व शासकीय योजनांचा लाभ घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते त्यासाठी समाजास व शासन प्रशासनास  उपयुक्त असे संशोधन कार्य झाले पाहिजे, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी गुणवत्तासंपन्न व सर्व द्र्ष्टीने परिपूर्ण  बनला  पाहिजे, त्यासाठीच कॉपीमुक्त परीक्षा आयोजनाला महत्व देण्यात आले आहे. आय.आ.पी.ए. व स्वा. रा. ती. म. विद्यापीठ यांच्यातील  सामंजस्य करार हा लोकप्रशासन विषयात केले  जाणारे संशोधन हे प्रशासकीय सुधारणेसाठी व सुशासनाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे. सामंजस्य करार कार्यक्रमाचे प्रास्ताविक आय.आय.पी.ए.चे  सचिव  डॉ.बी.आर.कतुरवार  यांनी केले तर आभार विद्यापीठातील नवोपक्रम विभागाचे संचालक डॉ. एस.जे.वाढेर यांनी मानले.

00000




 वृत्त क्रमांक 

प्रकल्प ‘AI-सारथी’चा शुभारंभ :

जिल्हा परिषद शिक्षकांच्या डिजिटल सक्षमीकरणासाठी एसआरटीएमयूचा अभिनव उपक्रम

नांदेड, दि. ५ जून २०२६: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडच्या गणितशास्त्र संकुल (School of Mathematical Sciences) आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच जिल्हा परिषद, नांदेड यांच्या सहकार्याने आयोजित *“प्रोजेक्ट AI-सारथी : Capacity Building in Digital Pedagogy and Experiential Learning for ZP Educators”या दोन दिवसीय कार्यकारी विकास कार्यक्रमाचा (Executive Development Program) आज एमओओसीज प्रशिक्षण केंद्र, एसआरटीएमयू येथे उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झाला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि जिल्हा परिषद, नांदेड यांच्यात शैक्षणिक सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, शिक्षणाधिकारी सौ. वंदना फुटाणे, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील तसेच इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस (IIL) संचालक डॉ. शैलेश वाधेर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी कार्यक्रमाचे संयोजक *डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी, गणितशास्त्र संकुलाच्या संचालिका व कार्यक्रमाच्या सचिव **प्रा. (डॉ.) रुपाली जैन, सीआयसी संचालक **डॉ. कृष्णचैतन्यतसेच जनसंपर्क अधिकारी *डॉ. अशोक कदमहेही उपस्थित होते.

प्रास्ताविकात IQAC चे संचालक डॉ. बी. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी प्रकल्प AI-सारथीची संकल्पना, उद्दिष्टे आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा मांडली. 

प्रमुख पाहुण्या मा. मेघना कावली, आयएएस यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात शिक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल साधनांच्या प्रभावी वापराद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि स्व-अध्ययनाची क्षमता विकसित करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.  जिल्ह्यातील आदीवासी भागातील वाडी तांड्यावर तंत्रज्ञानाची ज्ञानगंगा वाहीली पाहीजे असे या प्रशिक्षणातून अपेक्षा व्यक्त केली. उपस्थित प्रशिक्षणार्थी शिक्षकानी या प्रशिक्षणातून प्रेरीत होऊन आपल्या शाळेत AI या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्ता वाढवावी असे मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाच्या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मा. वंदना फुटाणे यांनी प्रशिक्षणात दिल्या जाणार्या  AI कंटेंट ची माहीती घेऊन प्रशिक्षण घटक आणि इतर बाबींची माहीती घेऊन जिल्ह्यातील शिक्षकाकडून AI च्या माध्यमातून वर्ष 2026-27 हे AI तंत्रज्ञान च्या वापराने समृध्द होईल आणि जिल्हा परिषद शाळांच्या गुणावत्ता विकासासाठी सदर प्रशिक्षणाची मदत् हॊईल ही अपेक्षा व्यक्त केली. 

अध्यक्षीय समारोपात कुलगुरू मा. डॉ. मनोहर चास्कर यांनी शिक्षणातील डिजिटल परिवर्तन ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षण संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकांचे सातत्यपूर्ण कौशल्यवर्धन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल अध्यापन साधने, आभासी प्रयोगशाळा, गणितीय सॉफ्टवेअर, वेब-आधारित शैक्षणिक संसाधने आणि अनुभवाधारित अध्यापन पद्धतींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. या उपक्रमात जिल्हा परिषद शाळांतील मोठ्या संख्येने स्वंयस्फुर्तीने शिक्षक सहभागी झाले आहेत.

हा उपक्रम शालेय शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल अध्यापन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी तसेच शिक्षकांना भविष्योन्मुख शैक्षणिक कौशल्यांनी सुसज्ज करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असेल, अश्या भावना प्रशिक्षणार्थ्यानी व्यक्त केल्या.

000000



  वृत्त क्रमांक 




 वृत्त क्रमांक 

स्वाधार योजनेसाठी शासकीय वसतिगृहाचा अर्ज भरणे अनिवार्य                                                                

सन 2026-27 साठी अर्ज प्रक्रियेमधील आवश्यक सुधारणा

नांदेड दि. 5 जून:-  अनुसूचित जातीतील जे विद्यार्थी 50 टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत व ज्या विद्यार्थ्यांना समाज कल्याणच्या शासकीय वस्तीगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबवीली जाते.

ही योजना जिल्हास्तर तसेच तालुकास्तरावरती राबविण्यात येत असून जे महाविद्यालय महानगरपालिकेपासून पाच किलोमीटरच्या आतमध्ये व नगरपालिका नगरपरिषद व नगरपंचायत तसेच तालुक्याच्या हद्दीत असलेले महाविद्यालयातील प्रवेशित पात्र विद्यार्थ्यांनी सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात अर्ज करण्यासाठी नियमांनमध्ये समाज कल्याण विभागाने महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत.

नव्या नियमानुसार स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्या अनुषंगााने शासकीय वसतिगृहास प्रवेश न मिळाल्यास विद्यार्थी स्वाधार योजनेसाठी पात्र ठरणार आहेत अशी माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली आहे. 

समाज कल्याण विभागामार्फत विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी शासकीय वसतिगृह प्रवेशाच्या ऑनलाईन पोर्टलवर https://hmas.mahait.org या संकेत स्थळावर अर्ज नोंदविणे आवश्यक आहे. तेंव्हा सदरील अर्ज सादर करण्याकरिता शालेय अभ्यासक्रमासाठी दिनांक 30 जून, 2026 व 11 वी नंतर बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी दि. 15 जुलै,2026 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे.

तसेच गुणवत्तेनुसार अथवा जागेअभावी विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहास प्रवेश न मिळाल्यास स्वाधार योजनेचा अर्ज सादर करता येईल. जे विद्यार्थी शासकीय वसतिगृहासाठी अर्ज करणार नाहीत त्यांना वसतिगृह व स्वाधार या दोन्ही योजनाचा लाभ मिळणार नसल्याचे समाज कल्याण विभागाने स्पष्ट केले आहे. (टिप:- ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतीगृह उपलब्ध नाहीत त्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण नांदेड यांच्या वतीने सर्व पात्र विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षाकरिता विहित वेळेत वसतिगृह प्रवेश प्रक्रियेस अर्ज करण्याबाबतचे आवाहन केले आहे. जेणे करुन भविष्यात स्वाधार योजनेचा लाभ घेताना कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही.

00000

 वृत्त क्रमांक 

२० जूनपर्यंत फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

पी.एम. किसानसह सर्व शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी अनिवार्य

नांदेड दि. 5 जून:- जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांनी २० जून २०२६ पर्यंत आपली Farmer ID (फार्मर आयडी) नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शासनाच्या २०२५ मधील निर्णयानुसार १५ एप्रिल २०२५ पासून पी.एम. किसानसह इतर सर्व शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार शेतकऱ्यांची Farmer ID निर्मिती व अद्ययावतीकरणाचे काम प्राधान्याने सुरू आहे.

जिल्हा प्रशासनाकडून उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण ७ लाख ५४ हजार ५१८ भूधारकांपैकी १ लाख ५१ हजार ३८ भूधारकांनी अद्याप AgriStack मध्ये नोंदणी केलेली नाही. तसेच ३ लाख ६९ हजार ३८४ पी.एम. किसान लाभार्थ्यांपैकी ३२ हजार ५०४ लाभार्थ्यांनीही AgriStack मध्ये नोंदणी केलेली नसल्याचे समोर आले आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी उर्वरित सर्व शेतकऱ्यांची Farmer ID नोंदणी २० जून २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, Farmer ID नोंदणीबाबत जनजागृती करण्यासाठी गावपातळीवर व्यापक प्रचार व प्रसिद्धी मोहीम राबविण्याच्या सूचनाही संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाने शेतकऱ्यांनी या प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद देऊन वेळेत नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 

नांदेड तालुक्यातील एकूण ६५ ग्रामपंचायतींच्या

सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्य पदाच्‍या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर

नांदेड दि. 5 जून :- नांदेड तालुक्यातील एकूण 65 ग्रामपंचायतींच्या मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, यांचे आदेश क्रमांक रानिआ/ग्रापनि२०२५प्र.क्रं.४/ का-८ दि. २५ मे २०२६ आणि पत्र दिनांक २६ मे २०२६ व जिल्हाधिकारी, नांदेड यांचे पत्र 26 मे 2026 अन्‍वये बिगर व अंशतः अनूसुचित क्षेत्रातील सन २०२४, २०२५ मध्ये मुदत संपलेल्या आणि सन २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या व नवनिर्मित ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 

या आरक्षण निश्चितीसाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या कार्यालयांमध्ये दिनांक 9 जून 2026 ते 11 जून 2026 या कालावधीत सकाळी ९ वा. आणि दुपारी ३ वा. विशेष ग्रामसभेचे आयोजन प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उपस्थितीत करण्यात आले आहे. 

ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षण सोडतीच्‍या अनुषंगाने सर्व नागरिकांनी ग्रामसेभेच्‍या पुढीलप्रमाणे दिलेल्‍या तारखेस आप-आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहुन, आरक्षण सोडत क्रार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन नांदेडचे तहसिलदार संजय वारकड यांनी केले आहे.

दिनांक: ०९/०६/२०२६ (मंगळवार) 

सकाळी ९ वाजता : खडकुत/ऐमशेटवाडी , नसरतपुर/हस्सापूर, सोमेश्वर, पुणेगाव, आलेगाव, वडवणा/खडकी खुरगाव,फत्तेपुर/इलीचपूर, बोरगांव तेलंग, नेरली.

दुपारी ३ वाजता :

बोढार तर्फे हवेली ,पुयणी ,नाळेश्वर ,पिंपळगाव मि. ,निळा ,तळणी ,नांदुसा/भालकी ,इंजेगाव ,पिंपळगाव कोरका,चिखली खु.

 दिनांक: १०/०६/२०२६ (बुधवार)

 सकाळी ९ वाजता: 

ब्राम्हणवाडा ,सुगाव बु. ,वाडी बु. ,वाडी पुयड ,भनगी ,पोखर्णी ,चिखली बु. ,पासदगाव/पासदगांव तर्फे काकांडी ,बाभुळगाव ,थुगांव ,राहेगाव.

 दुपारी ३ वाजता: 

त्रिकूट/वाडी झांजी ,सुगांव खु. ,कासारखेडा ,वाजेगाव ,विष्णुपुरी ,ढोकी ,लिंबगाव ,मरळक खु./मरळक बु., गोपाळचावडी ,वानेगाव/वरखेड/भानपूर ,किकि.

दिनांक: ११/०६/२०२६ (गुरुवार)

सकाळी ०९ वाजता:

गाडेगाव ,कामठा खु. ,रहाटी बु. ,वाघी ,वांगी/वाडी करडेल ,खुपसरवाडी ,धानोरा ,धनेगाव/मुजामपेमठ पिंपळगाव नि. ,तुप्पा ,सायाळ ,कांकाडी तर्फे तुप्पा. 

दुपारी ०३ वाजता:

जैतापूर ,कोटतिर्थ ,वडगांव ,गंगाबेट ,वाहेगाव ,धनगरवाडी ,पिंपरी महीपाल ,गुंडेगाव, कल्हाळ, दर्यापूर.

00000

 वृत्त क्रमांक 

नांदेड तालुक्यातील शासकीय डेपोमधील रेतीसाठयाचा 19 जून रोजी जाहिर लिलाव

नांदेड, दि. 5 जून :- जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नांदेड तालुक्यातील शासकीय डेपोमधील शिल्लक रेतीसाठयाचा जाहिर लिलाव शुक्रवार 19 जून 2026 रोजी सकाळी 11 वा. उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिखलवाडी परिसर नांदेड येथील कार्यालयाचे सभागृह येथे करण्यात येणार आहे. या लिलावात भाग घेण्यास इच्छूक व्यक्तींनी ओळखपत्रासह विहीत तारखेस उपस्थित राहावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी  डॉ. सचिन खल्लाळ यांनी केले आहे.  

नांदेड तालुक्यातील शासकीय रेती डेपोमधील शिल्लक रेतीसाठा पुढीलप्रमाणे आहे. मौ. रहाटी जुने वाघी ता. नांदेड 38 हजार 712 उपलब्ध रेतीसाठा असून हातची किंमत 2 हजार 767 रुपये आहे.  याची हातची किंमत 10 कोटी 71 लाख 16 हजार 104 रुपये आहे. तर खुपसरवाडी येथे 1 हजार 5 उपलब्ध रेतीसाठा असून हातची किंमत प्रति ब्रास 2 हजार 767 रुपये आहे. तर 27 लाख  80 हजार  835 रुपये याप्रमाणे आहे.  

लिलावाच्या अटी व शर्ती महसूल व वनविभागाचा 8 एप्रिल 2025 व 15 जुलै 2025 शासन निर्णयाप्रमाणे  राहतील. या जाहिर लिलावाच्या अटी व शर्ती उपविभागीय अधिकारी कार्यालय नांदेड व तहसिल कार्यालय, नांदेड या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेल्या आहेत.

00000

 वृत्त क्रमांक 

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी

'कर्मचारी समाधान शिबिराचे' आयोजन 

कर्मचारी समाधान शिबिरासाठी माहिती तात्काळ सादर करा -जिल्हाधिकारी 

नांदेड, दि.5 जून :- शासन सेवेतील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित सेवाविषयक अडचणी तातडीने आणि कार्यक्षमतेने सोडवण्यासाठी विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून संपूर्ण विभागात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी 'कर्मचारी समाधान शिबीर' आयोजित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. 

यावेळी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व विभाग प्रमुखांनी कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अर्जाची माहिती कर्मचारी समाधान शिबीर विविरणपत्र अ व ब तात्काळ भरुन सादर करण्याचे निर्देश दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, विविध विभागाचे प्रमुख व प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. 

तालुकास्तरावर तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली, जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तर विभागीय स्तरावर  विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावरील अडचणी जिल्हाधिकारी कार्यालयातील तर तालुका स्तरावरील अडचणी हया तहसिल कार्यालयातील आणि विभागीय पातळीवरील अडचणी हया विभागीय आयुक्त कार्यालयातील शिबीरात स्विकारण्यात येणार आहे. अर्जदार अधिकारी / कर्मचारी, संघटनेचे पदाधिकारी यांना शिबीरास उपस्थित राहून कर्मचाऱ्यांना समस्या मांडण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

अनेकदा कर्मचाऱ्यांना वेतन, पदोन्नती, रजा,  निवृत्तीवेतन किंवा सेवापुस्तिका अद्यावत करणे यांसारख्या वैयक्तिक कामांसाठी प्रशासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी विभाग, जिल्हा आणि तालुका पातळीवर या शिबिरांचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. जर पहिल्या शुक्रवारी सुट्टी असेल, तर त्यापुर्वीच्या कामकाजाच्या दिवशी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे.  कार्यालयामध्ये कर्मचारी यांची सेवाविषयक प्रलंबित प्रकरणांची यादी अद्यावत करून तीचा त्या त्या शिबिरात समावेश करण्यात येणार आहे.  

या मोहिमेमुळे कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण होऊन प्रशासकीय कामात गती येईल. सर्व संबंधित विभाग प्रमुखांना या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले असून, कामात दिरंगाई करणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित केली जाणार आहे अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी दिली. 

00000




 वृत्त क्रमांक 

जिल्ह्यात दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी

विजेच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता

प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिनांक 05 जून 2026 रोजी दुपारी 12:38 वाजता दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दि. 05 व 08 जून २०२६ या दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. हे दोन दिवस जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40  किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.                                    

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच  झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

 वृत्त क्रमांक 

नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ विधान परिषद निवडणूक 2026 

मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

नांदेड, दि. 5 जून 2026 : नांदेड स्थानिक प्राधिकारी मतदार संघ विधान परिषद निवडणूक 2026 च्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहुल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनच्या बैठक हॉल येथे आयोजित करण्यात आले होते.

प्रशिक्षण पथकाचे नोडल अधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्या उपस्थितीत रेणुकादास देवणीकर यांनी निवडणूक प्रक्रियेतील विविध बाबी, मतदान केंद्रावरील जबाबदाऱ्या, मतदानाच्या दिवशीचे नियोजन तसेच निवडणूक आयोगाच्या निर्देशांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजकुमार माने हे देखील उपस्थित होते.

या निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती करण्यात आली असून, इतर मतदान अधिकारी म्हणून नायब तहसीलदार, सहाय्यक महसूल अधिकारी तसेच इतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी आवश्यक सूचना व मार्गदर्शन देण्यात आले.

०००००





  वृत्त क्रमांक   लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणेला दिशा मिळणार आय.आय.पी.ए. व स्वा. रा. ती. म. विद्यापीठ यां...