Tuesday, August 18, 2026

२१ ऑगस्ट रोजी #जलसंधारण दिनानिमित्त आयोजित #महावाकेथॉन मध्ये विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले आहे. जलसंधारणाचा #संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे त्यांनी सांगितले.

जलसंधारण दिन विशेष लेख

सुजलाम… सुफलाम… भारतासाठी जलसंधारण…!
पाणी अर्थात जल आणि आपल्या जगण्यासाठी अत्यावश्यक असणारा एक घटक म्हणून याला जीवन देखील आपण म्हणतो. प्रत्येकासाठी पाणी आवश्यक आहे. आपण सर्वच जगात विकसित संस्कृतीचा अभ्यास केल्यास आपणांस जाणवतं की, वनांमधून आणि टोळ्यांमधून जगणारा मानव प्राणी ज्यावेळी सामाजिक व्यवस्था उभारणीसह शेती व्यवसायाला लागला, त्यावेळी सर्वांचा अधिवास नद्या आणि पाण्यांचे साठे आणि पाण्यावरच अवलंबून आहे.
मानवी जीवनात पाणी हे प्राण व्यवस्था आहे. तसेच विकासाचा भाग म्हणून आपण इतर क्षेत्रांकडे बघतो. त्यावेळी कृषी सह उद्योग व्यवसासाठी देखील पाण्याचे तितकेच महत्त्व राहिलेले आहे. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर नव्या उद्योगांमध्ये पाण्याचा वापर अधिक वाढत गेला.
आज विचार करायचा तर पाण्याबाबत प्रथम आकडेवारी बघायला हवी. जगात असणाऱ्या समुद्रांमधील पाणीसाठा एकूण पाणीसाठ्याच्या 97% इतका आहे आणि हे पाणी क्षार युक्त आहे. अर्थात पिण्यायोग्य पाणी नाही. जे 3 टक्के पाणी पिण्यायोग्य म्हणता येईल, अशा स्थितीत आहे. त्यातील 68 ते 70 टक्के पाणी ग्लेशियर अर्थात हिमनग आणि हिमनद्यांच्या स्वरूपात आहे. तर त्यानंतर शिल्लक राहणाऱ्या शुद्ध जलापैकी 30 टक्के पाणी हे भूजल (जमिनीखालील स्तरात) आहे. उर्वरित पाणी पावसाद्वारे जमिनीवर येते आणि नद्या, सरोवरे आणि भूतलावर येते. यात पावसाने पडणारे पाणी नद्यांमध्ये आले तरी त्यावर प्रक्रिया केल्याशिवाय ते जल उपलब्ध होत नाही, ही परिस्थिती आहे.
पृथ्वीची एकूण लोकसंख्या विभिन्न खंडांमध्ये विस्तारलेले आहे. त्या प्रत्येक ठिकाणी पावसाचे प्रमाण वेगवेगळे आहे. अशा स्थिती सोबत पाण्याची वाढती मागणी आणि उपलब्ध पाणी यांचा समतोल बिघडत असल्याचे आपणास दिसते आणि त्यावर उपाय अर्थात पाणी साठवणे आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे हाच आहे.
आपला भारत देश त्यातही मौसमी हवामान प्रदेशात आहे, त्यामुळे देशात चार महिन्यात पडणाऱ्या पावसावर 12 महिन्यांचे नियोजन करावे लागते. आपला देश मुख्यत्वेकरून कृषी प्रधान देश आहे आणि हे शेतीचे काम पाण्यावर आधारित असे आहे. पडणारा पाऊस कुठे आणि किती पडेल, याचा अंदाज वर्तवण्याचे तंत्र अवगत झाले असले तरी आपण लहरी अशा निसर्गावर निर्भर आहोत. यामुळे देशात पडणाऱ्या प्रत्येक पाण्याच्या/पावसाच्या थेंबाला आपण वापरणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
पाणी अडवणे जमिनीत जिरवून त्याचे साठे निर्माण करणे, तलावांच्या माध्यमातून अधिकाधिक पाणी साठवणे आदी पद्धतीने आपण पाण्याचा अधिक सुयोग्य वापर करू शकतो.
शेतीला लागणाऱ्या पाण्याची व्यवस्था शेतीतच असायला हवी. काही दशकांपूर्वी यांत्रिक क्षमता नव्हती, त्यावेळी शेतीत विहीर खोदून त्यातील भूजलावर शेती आपल्या देशात होत होती. परंतु यांत्रिकीकरण झाले आणि आम्ही भूजल साठा गतिमान पद्धतीने उपसा करायला लागलो आणि भूजल पातळीत झपाट्याने घट होत गेली.
नद्यांचे पाणी अडवून धरणे बांधणे पाटांच्या मदतीने शेतीस सिंचन व्यवस्था तयार करण्याचे धोरण स्वीकारण्यात आले. मात्र ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक अशीच आहे. एका बाजूला आपण धरणं बांधत असतांना, दुसऱ्या बाजूने औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यात देखील झपाट्याने वाढ झाली. या सर्वात पिण्याच्या पाण्यास प्राधान्य असल्याने आधी पेयजल नंतर उद्योग आणि मग कृषी सिंचन या क्रमाने वापर करण्याची वेळ आल्याने धरणं भरली तरी इतर सुविधांच्या आभावी पाण्याचे संकट वाढत आहे. यासाठी आता जलसंधारणाचे महत्त्व देखील तितकेच वाढलेले आहे.
जलसंधारण क्षेत्रात राज्यात मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. मात्र याला अधिक बळकटी देण्याची गरज आहे. जलसंधारण केवळ याचा पहिला भाग ठरतो. सोबतच अधिक महत्त्व आहे ते मृदसंधारण अर्थात माती टिकवून ठेवणं देखील तितकच महत्त्वाचं ठरतं. ज्यावेळी पावसाचे प्रमाण अधिक असतं, त्यावेळी सुपीक जमीन पाण्यासोबत वाहून जाते. अनेकदा अतिवृष्टीने पाण्यासोबत जमीन खरडून जाते. परिणामस्वरूप जमिनीचा पोत कमी होऊन उत्पादकता कमी होण्यास सुरुवात होते.
जल आणि मृदसंधारण एकत्रित विचार केल्यास आपणास डोंगर माथा ते जमीन असा पाणलोट विस्तार करण्यासोबत शेततळे, पाण्याचे भूगर्भात फेरभरण व्हावे यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग आदी पर्याय आहे.
भविष्यात आपल्या येणाऱ्या पिढीला उत्तम पर्यावरण आणि पाणीपुरवठा सुरळीत राखायचा असेल तर आजच्या पिढीची मोठी जबाबदारी हा महत्त्वाचा संदेश घराघरात आणि मनामनात पोहोचला तरच याबाबतीत सकारात्मक काम होईल आणि तसे सकारात्मक परिणाम, बदल आगामी काळात आपणास दिसतील. मी समाजाचा एक घटक आहे आणि ही माझी जबाबदारी आहे, असे म्हणत प्रत्येक नागरिक यात सहभागी झाला तरच आगामी काळात चांगली स्थिती पुन्हा निर्माण होऊ शकते.
कधी काळी पाण्याचे दुर्भिक्ष्य असणाऱ्या मध्य प्रदेशातील देवास मधील रेनवॉटर हार्वेस्टिंगने जलसंधारणाचा वस्तुपाठ घालून दिलेला आहे तर दुसऱ्या बाजूला लातूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातून पाणी आणून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याची दुर्दैवी वेळ आपण अनुभवलेली आहे.
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे हे 150 वे वर्ष आहे. यातील प्रथम ओळींमध्ये सुजलाम, सुफलाम…! शब्दांचा वापर याच अर्थाने आहे. त्यामुळे आताच कामाला लागूया… पडणारा प्रत्येक थेंब जिरावला तर भारत पुन्हा सुजलाम व्हायला वेळ लागणार नाही.
प्रशांत दैठणकर
9823199466
********


 महा वॉकेथॉनमधून जलसंधारणाचा संदेश घराघरात पोहोचविणार

 ‘ महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी

 मोठ्या संख्येने सहभागी व्हावे

 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई, दि. १८ : माजी मुख्यमंत्री दिवंगत सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिनसाजरा करण्यात येणार आहे. जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच त्याला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये  या दिवशी महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटरचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

मृद व जलसंधारण विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाची संकल्पना सेव्ह सॉईल, सेव्ह वॉटर, सिक्युअर टूमॉरोअशी असून पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवाहा संदेश देण्यात येणार आहे. २१ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यात तीन किलोमीटर अंतराची वॉकेथॉन आयोजित केली जाणार असून त्यानंतर सहभागी नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात येणार आहे.

लोकप्रतिनिधी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग

राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई येथील बिंदु महादेव चौक प्रवेशद्वार, प्रोमोनेड वरळी समुद्र किनारा येथे होणार असून जिल्हास्तरावरील कार्यक्रम सर्व जिल्ह्यांचे मुख्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी, निमशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, युवक, खेळाडू, डॉक्टर, कलाकार, उद्योजक, स्वयंसेवी संस्था, विविध सामाजिक व क्रीडा संघटना, महिला, उद्योग-व्यापारी संघटना तसेच सर्वसामान्य नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले आहे.

महा वॉकेथॉनसाठी क्यूआर कोडद्वारे ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. सहभागी प्रत्येक व्यक्तीस ई-प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा सहभागींना सन्मानचिन्ह देण्यात येणार असून प्रायोजकांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकासाठी २५ हजार, द्वितीय क्रमांकासाठी १५ हजार आणि तृतीय क्रमांकासाठी १० हजार रुपये व गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. तसेच प्रत्यक्ष सहभागींपैकी ईश्वरी चिठ्ठीद्वारे सात जणांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत.

 

युवकांसाठी रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशन

जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने १५ ते ३० वयोगटातील युवक-युवतींसाठी रील फॉर सॉईल अँड वॉटर कन्झर्वेशनही राज्यव्यापी रील स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यापक जनतेपर्यंत पोहोचविणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे. स्पर्धकांनी ३० ते ६० सेकंदांची रील तयार करून स्वतःच्या सार्वजनिक इन्स्टाग्राम खात्यावर प्रसिद्ध करावी. रीलमध्ये स्वतःचे नाव, जिल्ह्याचे नाव आणि रीलचा उद्देश नमूद करणे तसेच मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत इन्स्टाग्राम खात्याला टॅग करणे आवश्यक आहे.

माती संवर्धन, पाणी बचत, मृदसंधारण, जलसंधारण, पावसाचे पाणी संकलन, शेततळे, बंधारे, पाणलोट विकास, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, पारंपरिक जलसंधारण पद्धती आणि नाविन्यपूर्ण संवर्धनाच्या कल्पना या विषयांवर रील तयार करता येणार आहे. रील स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १९ ऑगस्ट २०२६ आहे.

प्रत्येक जिल्ह्यातून किमान २५० आणि राज्यभरातून १० हजार रील्स तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार व १० हजार रुपये आणि गौरवचिन्ह देण्यात येणार आहे. पात्र सहभागींना ई-प्रमाणपत्र देण्यात येईल, तर विजेत्यांचा युवा-जलदूतम्हणून गौरव करण्यात येणार आहे.

 

 मृद व जलसंधारण सप्ताह, जलसंधारण अभियान आणि महा वॉकेथॉनच्या माध्यमातून माती व पाण्याच्या संवर्धनाचा संदेश राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचवून जलसंधारणाला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. या उपक्रमाच्या प्रचारासाठी #MahaWalkathon, #WalkForWater आणि #SaveSoilSaveWater हे हॅशटॅग वापरण्याचे आवाहन मंत्री संजय राठोड यांनी केले आहे.

000

गजानन पाटील/विसंअ



वृत्त क्रमांक भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्सचा राज्यव्यापी संवाद • सहा विभागांना याच महिन्यात भेटी  • विद्यार्थी, उमेद...