Friday, April 10, 2026

 वृत्त क्रमांक  

लोहा तालुक्यातील कापशी बु. येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' उत्साहात संपन्न

नागरिकांच्या समस्यांचा जागेवरच निपटारा
नांदेड दि. 10 एप्रिल:- महाराष्ट्र शासनाच्या ‘लोककल्याणकारी’ धोरणांतर्गत आणि महसूल प्रशासनाच्या पुढाकाराने लोहा तालुक्यातील तिसरे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान समाधान शिबीर’ आज कापशी बु येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिरच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांचा लाभ आणि प्रलंबित प्रशासकीय कामे एकाच छताखाली पूर्ण झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. या शिबिरात आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या हस्ते यावेळी लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.
सदरील शिबिर हे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या प्रेरणेने व सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कंधार उपविभागीय अधिकारी अनन्या रेड्डी, लोहा तहसिलदार विठ्ठल परळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कापशी बु येथे आयोजित करण्यात आले. शिबिरामध्ये महसूल, कृषी,आरोग्य,पंचायत समिती, भूमी अभिलेख, जि.प.बांधकाम विभाग, दुय्यम निबंधक, पशुधन विकास तसेच शिक्षण विभाग अशा विविध विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या आपापल्या विभागातील विविध योजनांची सविस्तर माहिती देत लाभार्थ्याकडून अर्ज स्वीकारले.
तहसील कार्यालय लोहा यांच्यावतीने शिबिरात महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये ऑनलाईन सातबारा उतारे व आठ-अ उतारे फेरफार उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच 11 पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय सातबारा व फेरफार, 16 नवीन शिधापत्रिका चे वाटप करण्यात आले त्यासोबतच शिधापत्रिका दुरुस्त्या संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले. शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र असे एकूण 30 प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, सातबारा, ८-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य विभाग, भूमिअभिलेख विभाग व पंचायत विभागानेही नागरिकांना विविध सेवा पुरवल्या.
तहसिलदार विठ्ठल परळीकर यांनी प्रास्ताविकातून अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी शिवकांता पवार यांनी केले.
या प्रसंगी महसूल विभागाचे अधिकारी, विविध विभागांचे तालुका प्रमुख आणि कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी, सरपंच आणि कापशी बु परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार प्रतापराव चिखलीकर यांनी शिबिरातील विविध स्टॉलला भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली व लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. कापशी बु च्या मंडळ अधिकारी शिवकांता पवार, ग्राम महसूल अधिकारी स्वाती सुत्रावे, मोतीराम पवार, स्वाती येडे, लाडेकेर, मेहूनकर, गोधने, स्नेहल महानुर तसेच कृषी सहाय्यक, ग्राम सेवक, महसूल सेवक यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले. तसेच ना.तह राजेश पाठक, संदीप हाडगे, पुरवठा निरीक्षण अधिकारी नागार्जुन खैरे, तसेच सर्व कार्यालयीन कर्मचारी ही उपस्थित होते. नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून, अशा प्रकारच्या शिबिरांमुळे ग्रामीण भागातील सामान्य माणसाला मोठा दिलासा मिळत असल्याची भावना व्यक्त केली आहे. “शासन नागरिकांच्या दारी येऊन त्यांच्या समस्या सोडवत आहे. समाधान शिबिरामुळे नागरिकांचा वेळ व पैसे दोन्ही वाचले आहेत,” असे मत उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले.
00000




 वृत्त क्रमांक  

15 एप्रिल रोजी तीसऱ्या विशेष डिजिटल शेती शाळेचे आयोजन 

कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित

नांदेड दि. 10 एप्रिल:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत अभियान स्वरूपात राबविण्यात येणाऱ्या ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान” बाबत कृषि विभाग व पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने एप्रिल 2026 मध्ये चार विशेष डिजिटल शेती शाळा घेण्यात येणार आहेत. यामध्ये पहिली डिजिटल शेतीशाळा 1 एप्रिल तर दुसरी डिजिटल शेतीशाळा 8 एप्रिल रोजी रोजी संपन्न झाली असून तीसरी शेतीशाळा बुधवार 15 एप्रिल रोजी आयोजित केली आहे.  

या डिजिटल शेती शाळांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा.  तसेच प्रत्येक गावातील शेतक-यांनी डिजिटल शेतीशाळेसाठी आपल्या घरातून ऑनलाईन उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

पाणी फाउंडेशन द्वारे संचलित डिजिटल शेती शाळा हे एक ऑनलाईन व्यासपीठ आहे. जिथे तज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त आणि पीक निहाय उत्तम पद्धतींचे मार्गदर्शन झूम आणि युट्युबच्या माध्यमातून दिले जाते.

1 व 8  एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या डिजिटल शेतीशाळेच्या पहिल्या व दुसऱ्या सत्रात शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आता पुढील सत्र भाग ३ मध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM): सापळा पिके, पक्षी थांबे,चिकट सापळे ,मित्र कीटक, लिंबोळी आणि दशपर्णी अर्कचा वापर बाबत नियोजित १५ एप्रिल २०२६ रोजी मार्गदर्शन मिळणार आहे.  

तरी शेतकरी बंधू-भगिनी, शेतकरी गट, FPOs आणि महिला बचत गटांनी या सुवर्णसंधीचा नक्की लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. चला, तर मग हवामान बदलाला सामोरे जात, आपल्या शेतीला अधिक शाश्वत आणि समृद्ध बनवू या.

 सदरील शेतीशाळेस कृषि विभाग अंतर्गत उप कृषी अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, समूह सहाय्यक, कृषी ताई व कृषी सखी तसेच पशुसंवर्धन विभाग अंतर्गत पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुसंवर्धन पर्यवेक्षक व पशुसखी हे उपस्थित राहतील. तसेच प्रत्येक गावात एका मध्यवर्ती ठिकाणी  शेतकरी एकत्रित उपस्थित राहतील असे नियोजित आहे.

शेती शाळा नियोजित बुधवार 15 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात येणार आहेत. तसेच सदर डिजिटल शेतीशाळा खाली दिलेल्या यु ट्यूब चॅनेल द्वारे आपण डिजिटल शेती शाळा बघू शकता- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प- https://www.youtube.com/live/mEgTBeO_yP8?si=0M2ezKHv6OmCUOWf

कृषी विभाग महाराष्ट्र शासन- https://www.youtube.com/live/2JKciiYL0I?si=l21CrYi7oyDEk3Xu  

पाणी फाउंडेशन- https://www.youtube.com/live/nF-20hUunAo?si=iE-MYbPJ21SCCWiH

00000

वृत्त क्रमांक  

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 10 एप्रिल :- नांदेड जिल्ह्यात 12 एप्रिल चे सकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2026 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 12 एप्रिलचे सकाळी 6 वाजेपासून ते 26 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 वृत्त क्रमांक  

छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिरामध्ये महसूल सेवा उत्तम प्रकारे राबवली जात आहे – आमदार आनंदराव बोंढारकर

शिबिरात 702 डिजिटल सातबारा व 669 आठ-अ उताऱ्यांचे वाटप; 10 जणांना संजय गांधी योजनेचा लाभ

नांदेड, दि. 10 एप्रिल :- शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज महास्वराज्य समाधान शिबिर अभियान (टप्पा क्र. १) अंतर्गत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील तिसरे शिबिर विष्णुपुरी येथे उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमास मतदारसंघाचे आमदार आनंदराव बोंढारकर यांनी उपस्थित राहून विविध विभागांच्या स्टॉल्सना भेटी दिल्या. त्यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून संबंधित विभागांना त्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना केल्या. तहसील कार्यालयामार्फत विविध प्रमाणपत्रे विहित मुदतीत दिली जात असल्याबद्दल समाधान व्यक्त करत, एकाच ठिकाणी नागरिकांना उत्तम सेवा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्यामुळे शिबिरास परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे नियोजन करण्यात आले.

या शिबिरामध्ये ग्रामविकास, आरोग्य, कृषी, भूमिअभिलेख (मोजणी), दुय्यम निबंधक, महावितरण आदी विविध शासकीय विभागांनी सहभाग घेतला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना शासनाच्या योजनांची माहिती देत लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारले.

तहसील कार्यालय, नांदेड यांच्यावतीने महसुली सेवांचे मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यात आले. यामध्ये 702 ऑनलाईन सातबारा उतारे व 669 आठ-अ उतारे नागरिकांना देण्यात आले. तसेच 10 पात्र लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ प्रदान करण्यात आला. याशिवाय फेरफार संदर्भातील अर्जही स्वीकारण्यात आले.

शिबिरामध्ये उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, सातबारा, ८-अ उतारे, सातबारा दुरुस्ती, फेरफार नोंदी आदी महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच आरोग्य, भूमिअभिलेख व पंचायत विभागांनीही विविध सेवा पुरवल्या.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. आमदार आनंदराव बोंढारकर यांनी मार्गदर्शन केले.

नायब तहसीलदार स्वप्निल दिगलवार यांनी प्रास्ताविकातून अभियानाची रूपरेषा स्पष्ट केली. नायब तहसीलदार माचेवाड यांनी सूत्रसंचालन केले, तर मंडळ अधिकारी श्रीकृष्ण एलमटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. पुरवठा विभागातील श्रीमती मारतळेकर व श्रीमती पवार यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांचे निराकरण केले.

तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी व तलाठी यांनी उपस्थित राहून अभियानास सहकार्य केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळ अधिकारी श्रीकृष्ण एलमटे, तलाठी रमेश गिरी, मनोज जाधव, मनोज सरपे, माधव भिसे तसेच महसूल सेवक बालाजी सोनटक्के यांनी विशेष योगदान दिले.

शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

00000



वृत्त क्रमांक  

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न 

नांदेड दि. 10 एप्रिल :- भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीच्या निमित्त सामाजिक न्याय विभागाअंतर्गत सामाजिक समता सप्ताह 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. त्या अनुषगांने आज 10 एप्रिल  रोजी  केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत समाज कल्याण कार्यालयात मार्जीन मनी कार्यशाळा संपन्न झाली.  

या कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे आयडीबीआय बँक मॅनेजर रामकिशन बैनवाड यांना समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांच्या हस्ते  पुष्पगुच्छ व भारतीय संविधानाची प्रत देवून सन्मानीत करण्यात  आले.  या कार्यशाळाचे अध्यक्ष समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे होते तर वरीष्ठ समाज कल्याण निरिक्षक माधवी राठोड तसेच लक्ष्मी गायके हे उपस्थित होते. या कार्यशाळेचे प्रास्तावीक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक लक्ष्मी गायके यांनी केले असून त्यांनी नांदेड जिल्हयातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील सहभागी 40 ते 50 लाभार्थ्यांना मनी मर्जीनचे महत्व सांगून मार्गदशन केले. यावेळी त्यांनी समाज कल्याण विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली. बँक मॅनेजर रामकिशन बैनवाड यांनी उपस्थित नवउद्योजक यांना केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजक लाभार्थी यांना 15 टक्के  मार्जीन मनी उपलब्ध करुन देण्यात येते. याबाबत सविस्तर माहिती देवून तळागाळातील उपस्थित नवउद्योजक यांना सखोल माहिती देवून मार्गदर्शन केले.   

केंद्र शासनाच्या स्टँड अप मार्जीन मनी कार्यशाळेअंतर्गत अध्यक्षीय समारोपात समाज कल्याण अधिकारी गजानन नरवाडे यांनी  नवउद्योजकांना केंद्र शासनाच्या स्टँड अप योजनेंअतर्गत अनुसूचित व नवबौध्द घटकांतील नवउद्योजकांना 10 टक्के स्व- हिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँडॲप इंडिया योजनेंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत 15 टक्के मार्जीन मनी राज्य शासनार्फत देण्यात येते अशी महत्वपूर्ण माहिती देवून नवउद्योजकांना मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाचे आभार समाज कल्याण निरिक्षक राणी गडगीळे यांनी तर सुत्र संचालन तालुका समन्वयक अंजली नरवाडे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समाज कल्याण निरीक्षक संजय कदम यांनी व कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्ररिश्रम घेतले. या एक दिवशीय केंद्र शासनाच्या स्टँड अप मार्जीन मनी कार्यशाळा सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

00000






 वृत्त क्रमांक  

सामाजिक समता सप्ताह अंतर्गत पथनाट्य व लघुनाटिकेद्वारे योजनांचा जागर

नांदेड दि. 10 एप्रिल :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय विभागामार्फत 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत सामाजिक समता सप्ताह साजरा करण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत आज 10 एप्रिल रोजी पथनाट्य व लघुनाटिकेद्वारे समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली.

तसेच संत गाडगे महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित स्वच्छतेचा संदेश व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयांवर लघुनाटिकांचे सादरीकरण करण्यात आले.

हा कार्यक्रम हुजूर साहिब रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात समतादूत प्रकल्पांतर्गत मुजाजी कांबळे, दिलीप सोडांरे, ज्योती जाधव, दिगांबर पोतूलवार, शेख इर्शाद, जयश्री गायकवाड, दिपाली हाडोळे, राणी पद्मावती बंडेवार, शारदा माळे, नागनाथ कोलमारे, बालाजी डूमणे यांनी पथनाट्य सादर करून उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले.

सदर कार्यक्रम सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

00000





वृत्त क्रमांक  

सांस्कृतिक कार्य विभागाच्या "सावळ्या विठ्ठला" या कार्यक्रमास नांदेडकरांचा उदंड प्रतिसाद

संगीतकार दशरथ पुजारी यांना नांदेडकरांची मनोभावे मानवंदना

नांदेड, दि.१० एप्रिल:- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर  रचनांचा "सावळ्या विठ्ठला" या विशेष  सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन दि. ९ एप्रिल रोजी कुसुम सभागृह येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमास नांदेडकरांचा प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात भक्तिमय वातावरणाची अनुभूती उपस्थितांना मिळाली.

या कार्यक्रमासाठी उदघाटक म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संगीतकार दशरथ पुजारी यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. 

जगी ज्यास कोणी नाही , देव माझा विठू सावळा , झिम झिम झरती श्रावणधारा ,क्षणभर उघड नयन देवा , अशीच आमुची आई असती , अजून त्या झुडपांच्या मागे ,त्या सावळ्या तनुचे अशी व अजूनही अवीट गोडीची गाणी शेफाली कुलकर्णी ,सागर जाधव आणि वर्षा जोशी यांनी गायली . संवादक म्हणून पद्माकर कुलकर्णी तर होतेच पण संगीतकार दशरथ पुजारी यांच्या शिष्या संगीतकार आनंदी विकास यांनी त्यांच्या काही गाण्यांचे ,पुजारीजी यांच्या सहवासातून अनुभवलेले काही आठवणीतील किस्से सांगून सभागृहात वेगळ्याच आनंद लहरी निर्माण केल्या.

प्रत्येक वादकानी अतिशय कसून आणि अभ्यासपूर्ण अशी साथ गायकाना दिली वादकांच्या मध्ये विकास देशमुख , विवेक कयाळ ,विश्वेश्वर जोशी ,भगवानराव देशमुख , पंकज शिरभाते ,श्रीनिवास ,नईम शेख व इस्माईल शेख साथीला होते.

या कार्यक्रमातून अभंग, भक्तीरचना , भावगीते या सादरीकरणांद्वारे संगीतकार दशरथ पुजारी यांच्या  जीवनकार्याचा व विचारांचा वेध घेण्यात आला. “सावळ्या विठ्ठला” या कार्यक्रमाच्या माध्यमातून अध्यात्म, भक्ती ,भाव  यांचा सुंदर संगम साकारण्यात आला. या प्रसंगी मान्यवरांच्या उपस्थितीत कलावंतांचा सत्कार करण्यात आला आणि सांगीतिक कार्याच्या परंपरेचे महत्त्व दिले गेले. कार्यक्रमाते गायक कलाकारांनी सादर केलेल्या अभंग व भजनांनी , भावगीतांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात रसिक नंतर एवढे मंत्रामुग्ध झाले कि  अनेक दर्जेदार गाणी सादर करणाऱ्या गायक गायिका यांच्या  अभंगावर रसिकांनी ठेका धरत  विठ्ठल विठ्ठल च्या जयघोषणे संपूर्ण सभागृह भक्तीमय झाले.

सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या यांच्या संकल्पनेतून व तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव श्री. डॉ. किरण कुलकर्णी व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.

नांदेड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ रत्नदीप गायकवाड हे कार्यक्रमास पूर्णवेळ उपस्थित होते.

सूंदर सादरीकरण, प्रभावी रंगमंच व्यवस्था, सभागृह परिसरात अध्यात्मिक वातावरण निर्मिती व अचूक नियोजनाच्या या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे नांदेड मध्ये अध्यात्मिक वर्ग, संगीत व सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणारे कलावंत, तरुण वर्ग व इतर सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

oooooo











नव्या भारताची नवी ओळख: महिला सक्षमीकरणातून राष्ट्रनिर्मिती !
गेल्या दशकात केवळ देशच नाही, तर आपल्या महिलांचे संपूर्ण जग बदलले आहे. त्यांच्या स्वप्नांना आता केवळ दिशाच नाही, तर उंच भरारी मिळाली आहे ! शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांमधून 'नारी शक्ती'ला खऱ्या अर्थाने बळ दिले जात आहे
✅ नमो ड्रोन दीदी : मातीशी जोडलेली बोटे आता आकाशातील तंत्रज्ञान कुशलतेने हाताळत आहेत.
✅ जल जीवन मिशन : घरोघरी नळ आल्याने पाण्याची पायपीट थांबली; वाचलेला वेळ आता स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी !
✅ लखपती दीदी : महिला आता केवळ कुटुंब सांभाळत नाहीत, तर वार्षिक ₹१ लाखांहून अधिक उत्पन्न मिळवून 'यशाच्या आदर्श' बनल्या आहेत.
✅ पीएम उज्ज्वला योजना: चुलीच्या धुरापासून मुक्ती; प्रत्येक स्वयंपाकघरात आरोग्याचा आणि आशेचा प्रकाश.
✅ मिशन शक्ती: सुरक्षितता, कायदेशीर हक्क आणि निवारा देऊन प्रत्येक टप्प्यावर महिलांना केले 'निर्भय'.
मुली आता फक्त 'घराची लक्ष्मी' नाहीत, तर त्या 'देशाची शक्ती' आहेत. आता वेळ आहे महिला नेतृत्वाची !
चला, या स्त्री शक्तीच्या प्रगतीत आपणही सहभागी होऊया ! 🇮🇳



 

भारत बदलतोय… आणि बदलाची सूत्रं आता महिलांच्या हातात !

संसद-विधानसभेत ३३% आरक्षण,
‘सुकन्या समृद्धी’त ४.२ कोटी खाती,
‘मिशन पोषण’मुळे आरोग्य सुधारणा,
मुद्रा योजनेत ६८% कर्ज महिलांना,
आणि देशभरात दीड कोटी ‘लखपती दीदी’!
आजची नारी फक्त सक्षम नाही… तर नेतृत्व करतेय!
हीच खरी नारी शक्ती!
रील आवडली तर शेअर करा !



 छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी तत्काळ नोंदवता येणार असून पोलिस यंत्रणेशी थेट जोडणीमुळे तातडीने कारवाई शक्य होणार आहे.

प्रत्येक तक्रारीची ९० दिवसांत चौकशी पूर्ण करण्याची तरतूद असून महिलांच्या सुरक्षेसाठी हे प्रभावी पाऊल ठरणार आहे.

छेडछाडीविरोधात महिलांना आता मिळणार अधिक सक्षम संरक्षण! ‘शी-बॉक्स’ पोर्टलमुळे कामाच्या ठिकाणासह सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या छेडछाडीच्या तक्रारी...