Thursday, November 16, 2023

 अब सुमीरन करले मना हरी सो नाम

बंदिशीने दिवाळी पहाट-2023 ची सांगता

 

·   श्वेता देशपांडे यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध           

 

नांदेड (जिमाका) दि.  16 :- स्थानिक जिल्हा प्रशासन, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरूद्वारा बोर्ड व नागरी सांस्कृतिक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने साकारलेल्या दिवाळी पहाट-2023 या कार्यक्रमाची सुरेल सांगता 15 नोव्हेंबर रोजी झाली. कबीर वाणी या कार्यक्रमाद्वारे जीवनाचा आशय संपन्न करणाऱ्या एकाहून एक सरच रचना श्वेता देशपांडे यांनी सादर केल्या. भाटियार रागाने त्यांनी सकाळच्या प्रसन्न वातावरणात अधिक गोडवा निर्माण केला. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सर्व कलाकारांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

 

शास्त्रीय, उपशास्त्रीय संगितासमवेत दादरा गीत शैलीत कबीरांची भजने भेटीला दिली. कबीरासमवेत संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली यांची अभंग त्यांनी सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांना संवादिनीवर ज्ञानेश्व सोनावणे आणि तबल्यावर मणी भारद्वाज यांनी साथ संगत दिली. पंकज शिरभाते यांनी व्हायोलीनवर साथ देऊन रंगत चढवली. श्रीकांत उमरीकर यांनी कार्यक्रमाचे बहारदार निवेदन केले. सायंकाळी प्रसिद्ध कथक नृत्यांगना सृष्टी जुन्नरकर यांनी सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.

00000





छायाचित्र : महेश होकर्णे, नांदेड



वृत्त

आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांकडून

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सत्रासाठी प्रवेश अर्ज मागविले


नांदेड (जिमाका) दि. 16 :- आदिवासी उमेदवारांकरीता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या प्रशिक्षण केंद्रात दिनांक 1 डिसेंबर 2023 पासून सुरु होणाऱ्या 107 व्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांकरीता, विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करीता प्रवेश देण्यासाठी दिनांक 28 नोव्हेंबर 2023 तत्पूर्वी या कार्यालयास पोहोचतील अशा बेताने आदिवासी ( अनुसुचित जमाती) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसुचित जमाती पैकी ( एस.टी ) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्हयातील व इतर जिल्हयातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उत्तीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: राहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी तीन महिने पंधरा दिवस असुन शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधरांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा-उमेदवारांचे वय दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधीत प्रशिक्षणार्थीचे बँक खातेमध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थीचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापूर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही.


प्रशिक्षण सत्रात नौकऱ्यासाठी द्याव्या लागणाऱ्या विविध स्पर्धा परिक्षेची तयारी करून घेण्यात येते तसेच आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या ईतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले जाते. पात्र इच्छुक उमेदवारांनी दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत शैक्षणिक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्यविकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन अधिकारी, किनवट, आदिवासी उमेदवारांकरीता, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय तंत्र प्रशाला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजुस गोकुंदा (संपर्क दुरध्वनी क्रमांक 7219709633,7620304096,02469-221801) ता. किनवट जि. नांदेड पिन कोड-431811 यांनी केले आहे.

0000

 विशेष लेख,

दि. 16 नोव्हेंबर 2023

 

जागा व भांडवल नसतानाही

प्रविण चव्हाण असा झाला उद्योजक

 

सर्वच युवक शासकीय सेवेसाठी अथवा इतर नोकऱ्यासाठी पात्र ठरतीलच असे नाही. आपल्या वयाचा विचार करुन नोकरीसाठी प्रयत्नांसमवेत सेवा क्षेत्रात उपलब्ध असलेल्या स्वयंरोजगाराला गवसणी घालावी असा विचार ठेवणारे युवक हे आता खऱ्या अर्थाने स्वयंरोजगारातले नायक ठरत आहेत. नायगाव सारख्या तालुक्यात अवघे 7 एकर कोरडवाहू क्षेत्र असलेल्या कुटूंबातून प्रविण चव्हाण या युवकाने आपल्या शिक्षणाला सुरु ठेवत पार्टटाईम म्हणून सुरु केलेल्या उद्योगातून महिना 50 हजार रुपयांपर्यत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण केले आहे.

 

प्रविणने अभ्यासात प्राविण्य मिळवूनही केवळ शिक्षणात वाढत्या वयाला वाहते करण्यापेक्षा स्वयंरोजगाराला अधिक जबाबतदारीवर स्वत:ला आणून ठेवले. नांदेड येथील यशवंत महाविद्यालयातून कामर्समध्ये पदव्युत्तर पदवीला त्याने चांगल्या गुणाने गवसणी घातली. शिक्षणातच आपले भविष्य घडवता येईल या उद्देशाने नीट परीक्षेतही त्याने उत्तम यश संपादन केले. यासमवेत सीएच्या अंतिम वर्षापर्यत त्याने आता मजल गाठली आहे. भविष्यात सीए व्हायचे याची खुणगाठ बांधून आपल्या वाढत्या वयाकडे लक्ष देवून प्रविणने अभ्यासाला व्यावसायिक उपक्रमाची एखादी जोड देता येईल का याची चाचपणी सुरु ठेवली होती.

 

शिक्षणासाठी वयाची 26 वर्षे उचलण्यासमवेत आपल्याला एखाद्या लहान मोठया व्यवसायाला जवळ केले पाहिजे असा विचार प्रविणला अस्वस्थ करत होता. एका बाजूला शिक्षणात अभ्यासक्रमाची तयारी तर दुसऱ्या बाजूला या अस्वस्थेतून आपल्याला नेमके काय करता येईल त्या उद्योग व्यवसायाच्या निवडीचाही त्याने अभ्यास सुरु ठेवला. या चाचपणीत नांदेड येथील शिक्षण क्षेत्रात दडलेल्या व्यवसायाने प्रविणला खुणावले.  कोणत्याही व्यवसायाला सुरु करण्यापूर्वी आपण हाच व्यवसाय का निवडावा याची उत्तरे शोधली पाहिजेत हे त्याला मनोमन पटल्याने जे करायचे ते अभ्यासूनच याचा त्याने विसर पडू दिला नाही.

 

व्यवसाय तर निवडला पण यासाठी ना स्वत:ची जागा न स्वत:चे भांडवल. या दोन्ही गोष्टीची चाचपणी त्याने सुरु केली. कर्जासाठी बँकाना ज्या अटीची पूर्तता करावी लागते ते लक्षात घेवून त्याने अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ यांच्याशी संपर्क साधला. महामंडळातील अधिकाऱ्यांनी तत्परता दर्शवीत त्याला संपूर्ण सहकार्य देवून केले. भागभांडवलासाठी लागणाऱ्या 9 लाख रुपयांची तरतूद अशा रितीने पूर्ण करता आली. जो व्यवसाय निवडला तो होता वातानुकुलित अभ्यासिकेचा !

 

अभ्यासिकासाठी चांगल्या खुर्च्याटेबलआल्हाददायक वातावरण आणि प्रशस्त जागा ही या व्यवसायाची अट त्याने पडताळून घेतली. नांदेड येथील शैक्षणिक हब लक्षात घेवून मी हा व्यवसाय निवडल्याचे त्याने सांगितले. जी कर्जाची रक्कम होती त्याची परतफेड करण्यासाठी किमान 7 वर्षाचा कालावधी आवश्यक आहे हे माझ्या लक्षात आले होते. ते लक्षात घेवूनच मी जागा मालकाशी 7 वर्षाचा भाडेकरार करुनच निर्णय घेतल्याचे गुपित प्रविण चव्हाण याने सांगितले.

 

कोणत्याही व्यवसायात आव्हाने असतात. तशी आव्हाने मला या व्यवसायातही आली. माझ्याकडे आजच्या घडीला सुमारे 150 विद्यार्थी अभ्यासिकेत येतात. यातील वयोगट हा माझ्यासाठी आव्हानात्मक भाग होता. एका बाजूला अकरावीबारावीची लहान मुले तर दुसऱ्या बाजूला पदव्युत्तर व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी 30 वय वर्षे पर्यतची मुले यांच्या मानसिकतेचा मोठा भाग होता. त्याच्यांशी दररोज चर्चा करुन नेमके प्रत्येकाला योग्य असे अभ्यासाचे वातावरण व अभ्यासिकेतील शिस्त काटेकोर पाळणे शक्य झाल्याचे प्रवीणने सांगितले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामुळे जे कर्ज मिळाले त्यातून 6 टन क्षमतेचे एसीटेबलखुर्च्या व इतर अत्यावश्यक फर्निचर करता आले.  महिन्याला जवळपास यातून 1 लाख रुपयांवरती जास्त उलाढाल होत असून यातील मुख्य खर्च हा विद्युत बिल व जागेचे भाडे असल्याचे माझ्या लक्षात आले. सर्व खर्च वजा जाता महिना किमान 50 हजार रुपये हे उत्पन्न सुरु झाल्याबद्दल प्रविण चव्हाण याने सांगितले.

 

माझ्या समवेतची अनेक मुले अभ्यासातच चाचपडत आहेत. अनेकजण स्पर्धा परीक्षेसाठी वेळ घालवित आहेत. अनेकजणांना क्लासचालक स्पष्ट न सांगता वयाची मर्यादा पूर्ण होईपर्यत त्यांना केवळ आशा दाखवित आहेत. सर्वजण बाजूनी सुरु असलेले शोषण या स्वप्नाच्या नावाखाली होत आहे हे युवकांनी ओळखले पाहिजे. आपल्याला साधे घरातले लाईटचे बटन बदलता येत नाही. घरात फ्रीज असेल त्याचे काही कळत नाही. मोबाईलला काही झाले ते समजत नाही. शेतीतल्या विहीरीतील पंपात काही बिघाड झाला ते कळत नाही. दुचाकी वाहनातले समजत नाही. नेमके आपण कुठे आहोत हे युवकांनी ओळखून अगोदर कामाची लाज बाजूला सारून स्वत: ला कोणत्याही कामाकडे वळविले पाहिजे असा मोलाचा सल्ला प्रविण चव्हाण यांनी दिला. विशेष म्हणजे अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेच्या नावाखाली दाखल झालेली अनेक मुले केवळ पालकांची हौस म्हणून दाखल तर होत नाही ना हे ही एकदा पालकांनी तपासून घेतले पाहिजे असे स्पष्ट करायला त्याने कमी केले नाही.

 

विनोद रापतवार

जिल्हा माहिती अधिकारीनांदेड  

0000

 वृत्त

 वृत्त 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करुन

देशी मद्य निर्मिती कारखाना आणला उघडकीस

 

• कारवाईत 12 लाख 90 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

नांदेड, (जिमाका) दि.16 :- राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सुर्यवंशी यांच्या निर्देशान्वये व संचालक (अंवद) सुनील चव्हाण तसेच विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क श्रीमती उषा राजेंद्र वर्मा यांचे मार्गदर्शनानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांना मिळालेल्या गुप्त माहीतीनुसार छापा टाकून बनावट देशी मद्य निर्मिती कारखाना उघडकीस आणला.

 

नांदेड विभागाच्या या पथकाने औसा धाराशिव या रोडवर लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील मौ. शिवली येथे चार चाकी वाहनाने बनावट देशी मद्य वाहतूकीची खात्रीलायक बातमी मिळाली. त्यानुसार 8 नोव्हेंबर रोजी निरीक्षक एस.एस.खंडेराय पथकाने सापळा रचुन एक महिद्रा कंपनी निर्मित बोलेरो पिकअॅप चार चाकी वाहन क्र. एमएच 25-पी-2405 व 10 बॉक्स बनावट देशी मद्य (टॅगो पंच) व दोन ॲन्ड्रॉईड मोबाईल जप्त केले. आरोपी बाळासाहेब घेडीबा जाधव रा.जातेगाव ता.गेवराई, जि.बीड, सोहेल मुख्तार पठाण रा.फकिरा नगर वैरागनाका धाराशीव यांना अटक केली.

 

तपासात आरोपीस विचारणा केली असता धाराशिव जिल्ह्यातील मौ.पिपरी येथील जुना कत्तल खाना धाराशिव येथे जाऊन प्रो. गुन्ह्याकामी छापा मारला असता तेथे बनावट मद्य बाटलीत भरण्यासाठी वापरण्यात आलेली मशीन, बनावट मद्य भरलेल्या बाटल्या व बुच (कॅप) बनावट लेबले सिलबंद करण्यासाठी वापरण्यात आलेली मशीन, 180 मी. लि. क्षमतेच्या 4 हजार 600 रिकाम्या बाटल्या, बनावट देशी मद्याचे रिकामे कागदी खोके (कार्टून्स), तिन अँन्ड्रॉईड मोबाईल व इतर साहित्याचा मुद्देमाल मिळून आला.

 

राहुल कुमार मेहता रा.अल्लीनगर जि.पूर्णिया बिहार, ह.मु.धाराशिव, बाबुचन राजेंद्र कुमार रा.रोसका कोसका जि.पूर्णिया बिहार ह.मु.धाराशिव,गौतम कपिलदेव कुमार रा. काजा जि.पूर्णिया बिहार ह.मु. धाराशिव, सोनु कुमार रा. बनियापटी जि.पुर्णिया बिहार ह.मु.धाराशिव, सुभाष कुमार रा.बनियापटी जि.पुर्णिया बिहार ह.मु.धाराशिव यांना अटक करण्यात आली आहे. बनावट देशी मद्य (टॅगो पंच) व मद्य निर्मिती करण्यासाठी लागणारे साहित्य पुरविणारा आरोपी नामे रोहित राजु चव्हाण रा. नाथनगर जि.बीड यास अटक केली. शशी गायकवाड रा. आंबेओहळ हा आरोपी फरार आहे.

 

या दोन्ही ठिकाणहून एक चार चाकी वाहन व बनावट देशी मद्य (टॅगो पंच) व मद्य निर्मिती करण्यासाठी लागणारे साहित्य, मशीन व इतर असा एकुण 12 लाख 90 हजार 400 रुपये इतका किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्यात आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. फरार आरोपीचा शोध चालु आहे.

 

दुय्यम-निरीक्षक के.जी.पुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निरीक्षक एस.एस.खंडेराय विभागीय भरारी पथक नांदेड यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम ६५,८०,८१,८३,९०,१०८ तसेच भा.द.वि. कलम ३२८ अन्वये गुन्हा नोदविला आहे. या गुन्हयातील आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्याना तीन दिवसाची एक्साईज कोठडी मंजुर झाली आहे. या कारवाईत निरीक्षक एस.एम.पठाण, दुय्यम-निरीक्षक एस.डी.राजगुरु, ए. एन.पिकले, स्वनील स.दु.नि बालाजी पवार, जवान पि.एस.नांदुसेकर, जी. डी. रनके. निवास दासरवार, दिलीप नारखेडे, रावसाहेब बोदमवाड यांचा सहभाग आहे. पुढील तपास निरीक्षक एस.एस.खंडेराय हे करीत आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतुक या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास या विभागाच्या टोल क्र.१८००८३३३३३३ व व्हॉटस अॅप क्र. ८४२२००११३३ तसेच दुरध्वनी क्र. ०२४६२२८७६१६ वर संपर्क करावा असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

00000

 वृत्त 

जागतिक मधुमेह दिनानिमित्त

जिल्हा रुग्णालयात कार्यक्रम संपन्न 

नांदेड (जिमाका) दि.  16 :- जागतिक मधुमेह दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय नांदेड येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. आय. भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. यावेळी उपस्थित रुग्ण त्यांच्या नातेवाईकांना ज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले. 

शारीरिक कष्टाची कामे दिवसेंदिवस कमी होत आहेत. त्यामुळे मधुमेहासारख्या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान अर्धा तास तरी शारीरिक व्यायाम करावा. आहारात मिठ आणि साखरेचे प्रमाण कमी ठेवावे. संतुलित आहार घ्यावा. जेणेकरून रुग्णांना मधुमेह सारखा आजार नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .एन. आय. भोसीकर यांनी अध्यक्षीय समारोपात सांगितले. 

सर्वप्रथम मधुमेह तज्ञ  डॉ. दत्तात्रय इंदुरकर यांनी प्रास्ताविकेच्या माध्यमातून मधुमेहा संदर्भात रुग्णांना मार्गदर्शन केले. त्यानंतर  डॉ. विखारुनिसा खान यांनी उपस्थित रुग्णांना मधुमेह म्हणजे काय, तो कसा होतो, त्याची करणे कोणती, मधुमेह झालेल्या रुग्णांनी आहार कोणता घ्यावा. इत्यादी संदर्भात मार्गदर्शन केले. डॉ. तजमुल पटेल यांनीही उपस्थित रुग्णांना मार्गदर्शन केले. यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.स.) डॉ. विद्या झिने, डॉ. हनुमंत पाटील, डॉ. अभय अनुरकर डॉ.एच.के.साखरे, डॉ. कांतीलाल इंगळे, डॉ. तजमुल पटेल, डॉ. विजय पवार, डॉ. उमेश मुंडे तसेच रुग्ण व त्यांची नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मानसशास्त्रज्ञ प्रकाश आहेर, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव यांनी परिश्रम घेतले.

00000




 

 वृत्त 

विठ्ठल नामाच्या जयघोषात गोदा परिसर दुमदुमला  

 नांदेड (जिमाका) दि.  16 :- आनंदी विकास यांचा 'गोदाकाठी विठ्ठलमेळा' रंगला - 'तू माझी माऊली', 'कानडा राजा पंढरीचा', 'विठू माऊली तू माऊली जगाची', 'शरण शरण न सोडी हे चरण', 'तू वेडा कुंभार', 'नाही पुण्याची मोजणी', 'चिंबाडल्या रानी', 'नादश्रुती माय' अशा एक ना अनेक विठ्ठलभक्तीच्या रचनांनी नांदेडच्या गोदावरीचा परिसर दुमदुमून गेला. निमित्त होते नांदेड जिल्हा प्रशासन नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका गुरुद्वारा बोर्ड नागरी सांस्कृतिक समिती यांच्यावतीने आयोजित दिवाळी सांज या कार्यक्रमाचे. 

या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केलेल्या भक्तीगीतांचा 'गोदाकाठी विठ्ठल मेळा' हा कार्यक्रम सादर झाला. रसिकांच्या प्रचंड गर्दीने फुलून गेलेल्या गोदावरीच्या बंदा घाटावर झालेल्या या कार्यक्रमात गायक संगीतकार आनंदी विकास, विश्वास अंबेकर, शुभम कांबळे, अपूर्वा कुलकर्णी, मिताली सातोनकर, तानाजी मेटकर तर वादक कलावंत विकास देशमुख, वेदांत कुलकर्णी, राघव जोशी, अमोल लाकडे, विठ्ठल चुनाळे, हावगी पन्नासे आदी वाद्यवृंदाने सुरेख साथ संगत केली. प्रसिद्ध कवी देविदास फुलारी व पद्माकर कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले.

0000000

  

चिमुकली पोरगी माझीखुबीने 

आवरे सारे घराचे खांब झुकतांना

 

·   हास्य कवी संमेलनाने केली आनंदाची लय लूट 

 

नांदेड (जिमाका) दि.  16 :- दिवाळी पहाट 2023 उपक्रमांतर्गत दिनांक 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सांज दिवाळी हास्यफराळ या बंदाघाट येथे पार पडलेल्या हास्य फराळ कवी संमेलनाचा रसिकांनी मनमुराद आनंद घेतला. हास्य हे जीवनाचे अविभाज्य अंग असले तरी हास्याला कुठेतरी कारुण्याची झालर असते याचा प्रत्यय या कवी संमेलनाने रसिकांना दिला.  

 

कवी संमेलनाची सुरुवात शंकर राठोड यांच्या सखे तू लईच हुशार पण मला काहीच येईना तर अनिल दीक्षित यांच्या हो उरात होतय धडधड या कवितेने मजा आणली. कवी अरुण पवार यांच्या भेगाळलेली भुई आणि झाली पानगळसोशिते रे साऱ्या यातनांची कळा!!अशी काळोखाच्या राती माय चांदणं वेचिते, वायली राहिली मुलं दोघांची वाटणी! परसात बाप गोठ्याचा धनी!! या कवितेने रसिकांना सुन्न केले. कवी केशव खटिंग यांच्यामह्या बापाचं नावं काढायचं नाहीअसं असं लेक चवताळून म्हणू शकते, जलमाच्या सोबत्याला बी ही कविता सादर करून वास्तव मांडताना रसिकांना प्रखर सत्याची जाणीव करून दिली.

 

संतोष नारायणकर यांनी जरा न राहो पेला रिकामा टाक भरुनी काठोकाठपेल्यामधून उसळो मदिरा जशी उसळते सागर लाट आणि मामाला माझ्या दोन होत्या पोरी, एक होती काळी एक होती गोरी! मामा तर म्हणला कोणती बी कर जमलंच तुला तर दोन्ही बी कर, म्हणताच प्रचंड हशा पिकला. गझलकार बापू दासरी यांनी अतिशय खुसखुशीत विनोदी किस्से सांगून बहारदार आणि प्रभावी सूत्रसंचालन केले.

 

एकाच थेंबाने शहारले अंग कसा हा प्रसंग जीवघेणा या कवितेद्वारे मानवाचा जन्म थेंबातून होऊन थेंबातून कसा संपतो हे स्पष्ट करून त्यांनी कवी संमेलनाचा समारोप त्यांच्या, अताशा भासते मोठी चिमुकली पोरगी माझीखुबीने आवरे सारे घराचे खांब झुकतांना या शेराने आजकाल कमावत्या मुली कसं घर सावरतात हे वास्तव मांडले. रसिक प्रेक्षकांचे डोळे या कवितेने पाणावले. खचाखच भरलेला बंदाघाट आणि प्रेक्षकांनी दिलेली मनमुक्त दाद हे या कवी संमेलनाचे वैशिष्ट्य होते.

0000000





  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...