Tuesday, October 28, 2025

 वृत्त क्रमांक  1133

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

 नांदेड दि. 28 ऑक्टोबर :- नांदेड जिल्ह्यात 29 ऑक्टोबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 12 नोव्हेंबर 2025 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.  

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 29 ऑक्टोबरच्या सकाळी 6 वाजेपासून ते 12 नोव्हेंबर 2025 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही. 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 वृत्त क्रमांक  1132

28 व 29 ऑक्टोबर या दोन दिवसांसाठी यलो अलर्ट जारी

नांदेड, दि. २८ ऑक्टोबर:- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी 28 ऑक्टोबर रोजी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी 28 व 29 ऑक्टोबर 2025 या दोन दिवसांसाठी यलो (Yellow) अलर्ट जारी केलेला आहे. दिनांक 28 ऑक्टोबर 2025 ह्या दिवशी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार व 29 ऑक्टोबर 2025 रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. खबरदारीची उपाययोजना म्हणून खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

या गोष्टी करा :

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.

आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा.

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.

 पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

या गोष्टी करु नका: 

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका.

विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका.

उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.

धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका.

जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे.

00000

 पत्रकार परिषद निमंत्रण

दि. 28 ऑक्टोबर 2025 

प्रति ,

मा. संपादक / प्रतिनिधी

दैनिक वृत्तपत्र / दूरचित्रवाणी / इलेक्ट्रॉनिक मिडीया    

नांदेड जिल्हा 

महोदय,

भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंती निमित्त “सरदार @ 150 एकता अभियान” अंतर्गत जिल्हास्तरीय पदयात्रेचे आयोजन करण्याबाबत मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल कर्डिले यांची उद्या बुधवार दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वा. मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात पत्रकार परिषद आयोजित केली आहे. 

तरी कृपया, आपण या पत्रकार परिषदेस उपस्थित रहावे, ही विनंती.  

 पत्रकार परिषद दिनांक :-  बुधवार 29 ऑक्टोबर 2025

वेळ                          :-  सकाळी 11 वा.

स्थळ                        :- मा. जिल्हाधिकारी नांदेड यांचे बैठक कक्ष


प्र. जिल्हा माहिती अधिकारी, नांदेड

वृत्त क्रमांक  1131

शेतकऱ्यांनी कृषि समृद्धि योजनेतील विविध घटकांसाठी

अर्ज करावेत-  जिल्हा अधिक्षक कृ‍षी अधिकारी

नांदेड, दि. 28 ऑक्टोबर :  कृषि क्षेत्रात भांडवली गुंतवणुक वाढवून पायाभुत सुविधा निर्माण करणे, उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकता वाढविणे, पिक विविधीकरण, मुल्य साखळी बळकट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कृषि समृध्दी योजना सन 2025-26 पासून जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

 या योजनेअंतर्गत उत्पादकता, शाश्वतता आणि उत्पन्न वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी प्रमुख कृषी गुंतवणूक क्षेत्रांना प्राधान्य देण्यात येत आहे. यामध्ये हवामान अनुकूल बियाणे, पिकांचे वैविध्य, जमिनीची सुपीकता व्यवस्थापन, यांत्रिकीकरण व मजबूत मूल्य साखळी तयार करण्यावर भर दिला जात आहे.

 याशिवाय, डिजीटल शेती, काटेकोर शेती, यंत्रसामुग्री सेवा, कृषि, गोदाम, प्रक्रिया व निर्यात यावर तसेच, शेतकऱ्यांचे निव्वळ उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने योजनांची आखणी व अंमलबजावणी करण्यासाठी विविध योजना व उपक्रमांसाठी शेतकऱ्यांचे अर्ज स्विकारण्यात येत आहेत. निर्यात वृद्धीच्या दृष्टीने गुंतवणुकीस प्रोत्साहन देणेसाठी नियोजन केलेले असुन यासाठी शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभणे अपेक्षीत आहे.

या योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अनुदानीत घटकांसाठी केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या घटकातील देय अनुदान प्रमाण व मर्यादा लागु राहणार असुन प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) देण्यात येणार आहे. ही योजना डीबीटी (थेट लाभ हस्तांतरण) प्रणालीव्दारे राबविण्यात येणार असुन योजनेंतर्गत शेतकरी /महिला गट, उत्पादक कंपन्या यांना प्राधान्य देण्यात येत आहे. अल्प, अत्यल्प भुधाकरक, महिला शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीचे शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी यांना प्राधान्य राहील. या प्राधान्यक्रमाचा महाडिबीटी प्रणालीमध्ये समावेश असल्याने कृषि विभागाच्या https://mahadbt. maharashtra.gov.in/farmer या संकेतस्थळावर शेतकऱ्यांनी अर्ज करावेत.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय, नांदेड अधिनस्त तालुका कृषि अधिकारी यांना कृषि समृद्धी योजनेमध्ये विविध घटकांसाठी लक्षांक प्राप्त झालेला असुन केंद्र व राज्य शासनाकडील सद्स्थितीत असलेल्या योजनांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेमध्ये लाभार्थी निवड तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज करुन ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार केली जाणार आहे. या योजनेमध्ये समाविष्ट घटक म्हणजेच, एकात्मिक खत व्यवस्थापन अंतर्गत प्रोम खते प्रोत्साहन योजना, प्राथमिक प्रक्रिया अंतर्गत बीज प्रक्रिया संच स्थापन करणे, किसान ड्रोन योजना, जैविक निविष्ठा संसाधन केंद्र (बी आर सी ( स्थापन करणे, काढणे पश्चात व्यवस्थापन अंतर्गत गोदाम बांधकाम योजना , शेतमाल विक्रीसाठी फिरते वाहन विक्री केंद्र सुविधा योजना, पीक प्रात्यक्षिक चिया पीक, पीक प्रात्यक्षिक मका पीक, कॉटन श्रेडर इत्यादी घटकांसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करण्यासाठी मागणी करण्यात येत आहे. तरी नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.

00000

 वृत्त क्रमांक  1130

कृषी समृद्धी योजनेअंतर्गत चिया पीक

 प्रात्यक्षिक घटकासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नांदेड, दि. 28 ऑक्टोबर :  मध्यम ते भारी जमीन, सुरुवातीच्या तीन प्रवाही सिंचनाच्या पाळ्या आणि नंतर दोन ते तीन तुषार सिंचन देण्याची सुविधा असलेल्या, सिंचन सुविधा असलेले शेतकरी यांनी कृषी समृद्धी योजनेअंतर्गत चिया पीक प्रात्यक्षिकासाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर करावेत. तसेच प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य यातत्वावर लाभार्थी निवड होणार आहे. तरी यासंधीचा त्वरीत लाभ घ्यावा, अधिक माहितीसाठी गावचे सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

कृषी समृद्धी योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात 3 हजार 125 एकर क्षेत्रावर चिया पीक प्रात्यक्षिक (3 हजार 200 रुपये प्रति एकर प्रमाणे) घेण्यात येणार आहेत. यामध्ये निविष्ठा बियाणे हे शेजारील जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी स्वतः खरेदी करावयाचे आहे. सहाय्यक कृषी अधिकारी यांनी मोका पाहणी केल्यानंतर बियाण्याची रक्कम शेतकऱ्यांचे बँक खात्यावर डीबीटी पध्दतीने जमा करण्यात येईल. 

तसेच इतर निविष्ठा (जैविक संघ,एकात्मिक अन्नद्रव्य/किड व्यवस्थापन, पिकाची माहिती पुस्तिका) कृषी विभागामार्फत पुरवठा करण्यात येणार आहे. निरोगी व पौष्टिक अन्नाच्या वाढत्या मागणीमुळे अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचा चिया लागवडीकडे कल वाढत आहे. नवीन व पौष्टिक तेलबिया पिक प्रात्यक्षिकाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना उच्च पौष्टिक मूल्य असलेल्या आणि बाजारात अधिक दर मिळविणाऱ्या पर्यायी पिकाची ओळख करून देणे हा आहे.

चिया पिकात ओमेगा-3 फॅटी ॲसिड, प्रथिने, तंतू व खनिजांचे प्रमाण जास्त असल्यामुळे याचा वापर आरोग्यदायी आहारासाठी मोठ्या प्रमाणावर होतो. हे पीक कोरडवाहू तसेच सिंचित परिस्थितीत अल्प कालावधीत तयार होते. शेजारच्या वाशिम जिल्ह्यामध्ये मागील मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लागवड केली होती आणि त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळाले तसेच नीमच मध्यप्रदेश येथे याची बाजारपेठ उपलब्ध आहे. तसेच वन्य प्राण्यापासुन या पिकास धोका नाही.

प्रात्यक्षिकांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतावर चिया पिकाची लागवड करून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर, बीज प्रक्रिया, खत व्यवस्थापन, कीड नियंत्रण आणि उत्पादनवाढीच्या उपायांची माहिती देण्यात येईल. तसेच बियाणे उत्पादनानंतर बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन दिले जाईल.

चिया पिकाच्या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना पारंपरिक पिकांपेक्षा अधिक नफा मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, जमिनीची सुपीकता टिकविणे आणि आरोग्यदायी अन्नधान्य उत्पादनाला प्रोत्साहन देणे हे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून नावीन्यपूर्ण पिक नांदेड जिल्ह्यात अंतभुर्त करण्याचा कृषी समृद्धी योजनेच्या माध्यमातून हा प्रयत्न आहे.

00000

 वृत्त क्रमांक  1129

दक्षता जनजागृती सप्ताहनिमित्त विविध उपक्रमांद्वारे जनजागृती

 नांदेड जिल्ह्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने मार्गी लावावेत – उपमुख्यमंत्री अजित पवार

वृत्त क्रमांक 1277   जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीसाठी उपलब्ध   नांदेड (जिमाका) ,  दि .   5 :-   जिल्हा माहिती कार्यालय ,   नांदे...