Thursday, June 18, 2020

सुधारीत विशेष वृत्त क्र. 548


जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांची
पॉझिटिव्ह बाधितांशी विचारपूस
कोविड डेडिकेटेड वार्डात जाऊन प्रत्यक्ष पाहणी  
नांदेड (जिमाका) दि. 18 :- वेळ दुपारी तीनची. पावसाची रीमझीम जोर धरुन सुरु झालेली. अशा या वातावरणात जिल्हाधिकारी डॉ. विपीन हे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोविड डेडिकेटेड सेंटरला पोहचतात. अगोदर सर्व बाहेरील परिस्थितीची पाहणी करतात. त्यांच्या समवेत अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, वैद्यकीय अधीक्षक वाय. एच. चव्हाण, बालरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. अरविंद चव्हाण, औषध वैद्यक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. भुरके, सहयोगी प्राध्यापक डॉ. शितल राठोड हेही असतात. संपूर्ण परिसराची पाहणी करुन ते एका-एका गोष्टीचा आढावा घेतात. याठिकाणी पाणी पुरवठ्याची सुविधा अधिक परिपूर्ण व्हावी यासाठी महानगरपालिकाअंतर्गत स्वतंत्र पाईपलाईनची व्यवस्था तात्काळ कशी करता येईल याचे नियोजन सुरु असते. याच नियोजनात प्रत्यक्ष विष्णुपुरी प्रकल्पाला जावून तेथील प्रत्यक्ष पाहणी करण्याचे त्यांचे नियोजन होते.
तथापि कोविड डेडिकेटेड सेंटरला आपण आलोच आहोत तर प्रत्यक्ष बाधित पेशंट यांच्याशी चर्चा केल्यास नेमकी माहिती आपल्याला मिळेल म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन त्यांना भेटण्याचा निर्णय घेतात. त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टरांची काळजीवजा धांदल उडते. पीपीईकीट घालून सुरक्षिततेचे जे नियम आहेत त्याचे पालन करुन ते सरळ कोविड डेडिकेटेड वार्डात जाऊन पॉझिटिव्ह पेशंटशी चर्चा करतात. या वार्डात असलेल्या सर्व 17 बाधितांबरोबर ते मनमोकळ्या गप्पा मारतात. स्वत: जिल्हाधिकारी येथे येवून प्रत्यक्ष पाहणी करुन सुविधा कशा मिळतात याची सहानुभूतीने चौकशी करीत असल्याने काही पेशंटचे हात नकळत जोडले जातात. इथल्या सुविधा तुम्हाला चांगल्या वाटतात का ? काही अडचणी आहेत का ? आहार चांगला मिळतो का ? अशी ते पेशंटला सरळ विचारणी करतात. उपलब्ध असलेल्या सर्व सुविधा उत्तम असल्याचे सांगत कोविड पेशंट आपला कृतज्ञता भाव व्यक्त करतात. घाबरु नका, यातून तुम्ही शंभर टक्के बरे व्हाल असा विश्वास डॉ. विपीन प्रत्येकाच्या मनात पेरत सरळ शौचालयाच्या पाहणीसाठी वळतात. सोबत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुचना देवून जिल्हाधिकारी डॉ. विपीन विष्णुपुरी प्रकल्पाच्या पाहणीसाठी रवाना होतात.
0000


वृत्त क्र. 549   
तपासणी मोहिमेत पाचशे
वाहनधारकांवर कारवाई
नांदेड, दि. 18:- जिल्ह्यात वाहनांची तपासणी मोहिम राबविण्यात येत असून तीन पथकामार्फत सोमवार 15 जून पर्यत पाचशे वाहनधारकांवर परवानगी पेक्षा जास्त व्यक्तीची वाहतूक केल्याने त्यांच्या विरुध्द दंडात्मक कारवाई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने करण्यात आली आहे. परवानगीपेक्षा जास्त व्यक्तीची वाहतूक केल्यास ही दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी केले आहे. 
नांदेड जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्व सार्वजनिक खाजगी वाहतुकीस अटी व नियमाच्या अधिन राहून मुभा देण्यात आली आहे. दोन चाकी वाहनावर एक व्यक्ती, तीन चाकी वाहनात  एक अधिक दोन व्यक्ती, चार चाकी वाहनामध्ये एक अधिक तीन व्यक्तींना प्रवास करण्यास परवानगी दिली आहे. सार्वजनिक ठिकाणी चेहऱ्यावर मास्क लावावे. सार्वजनिक वाहतूकीच्या वेळी सामाजिक अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत 21 मे रोजी निर्गमीत केलेल्या आदेशानुसार दिलेल्या सुचनाचे काटेकोरपणे पालन करावे. जनतेने कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये. कोणत्याही प्रकारची शंका, भिती न बाळगता सुरक्षिततेची अधिक काळजी घ्यावी. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडता घरी सुरक्षित रहावे, असेही आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
00000



वृत्त क्र. 548    
कोरोनाचे नवीन दहा पॉझिटिव्ह व्यक्ती
मुखेडचा एक बाधित व्यक्ती बरा
नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात आज सायं. 5 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या 226 अहवालापैकी 198 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले तर दहा पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती आढळल्यामुळे जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 296 एवढी झाली आहे. औरंगाबाद व हिंगोली जिल्ह्यातील दोन नवीन बाधितांचा यात समावेश आहे. मुखेड उपजिल्हा रुग्णालय कोविड केअर सेंटर येथील एक बाधित व्यक्ती बरा झाल्याने त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत एकुण 181 बाधित रुग्ण बरे झाली आहेत.
नवीन दहा पॉझिटिव्ह व्यक्तींमध्ये 5 पुरुष व 5 महिलांचा यात समावेश आहे. पुरुषांमध्ये सोमेश कॉलनी येथील 75 वर्षाचा एक, परिमलनगर येथील 47 वर्षाचा एक, चैतन्यनगर येथील 43 वर्षाचा एक, भगतसिंघ रोड येथील 24 वर्षेचा एक, औरंगाबाद येथील 33 वर्षाचा एका पुरुषांचा यात समावेश आहे. महिलांमध्ये कामठा बु येथील 2 महिला वय 19 व 22 वर्ष, गजानन कॉलनी तरोडा बु. येथील 42 वर्षाची एक महिला, विठ्ठल मंदिर मुखेड येथील 55 वर्षाची एक महिला तसेच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील 55 वर्षाची एक महिला बाधित व्यक्तीचा यात समावेश आहे.
आतापर्यंत 296 बाधितांपैकी 181 बाधितांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर उर्वरित 102 बाधितांवर औषधोपचार चालू असून त्यातील 3 बाधितांमध्ये 52 वर्षाची एक महिला आणि 52 54 वर्षांच्या दोन पुरुषांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या 13 झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात 102 बाधित व्यक्तींमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 18, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे 66, मुखेड उपजिल्हा रुग्णालय येथे 13 बाधित व्यक्ती उपचारासाठी दाखल असून 5 बाधित व्यक्ती औरंगाबाद येथे संदर्भित झाले आहेत. गुरुवार 18 जून रोजी 45 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यांचा अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होईल.
जिल्ह्याची कोरोना विषयी संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे.
सर्वेक्षण- 1 लाख 45 हजार 683,
घेतलेले स्वॅब- 5 हजार 514,
निगेटिव्ह स्वॅब- 4 हजार 841,
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- 10,
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 296,
स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या- 232,
स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- 91,
मृत्यू संख्या- 13,
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 181,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 102,
स्वॅब तपासणी चालू व्यक्तींची 45 एवढी संख्या आहे.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावे जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल असे डॉ. निळकंठ भोसीकर यांनी स्पष्ट करुन प्रशासनास जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...