Thursday, January 6, 2022

 पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारी पर्यंत बंद

वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हादंडाधिकाऱ्यांचे आदेश

नांदेड (जिमाका) 6 :- नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व विभागांचा आढावा घेऊन शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी इयत्ता पहिली ते आठवीचे वर्ग 30 जानेवारी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमीत केले आहेत. तथापि विद्यार्थी जर घरीच बसून ऑनलाईन माध्यमाद्वारे शिक्षण घेत असेल तर त्याला व्यत्यय असणार नाही. इयत्ता 9 वी ते 12 वी वर्ग कोरोना विषयक नियमांचे पालन करुन प्रत्यक्ष सुरू राहतील. कोविड-19 विषयक सर्व नियमांचे व मार्गदर्शक सूचनांचे पालन शाळा व्यवस्थापनाने करणे बंधनकारक आहे. एखादा रुग्ण जर आढळून आला तर शाळा तात्काळ बंद करुन आवश्यक त्या उपाय योजना करण्याचे ही निर्देश या आदेशात देण्यात आले आहेत. शिक्षकांनी कोविड काळात शाळेत उपस्थित राहून ऑनलाईन शिक्षण विषयक कामकाज व कोविड प्रतिबंधक विषयक जिल्हा प्रशासनाने दिलेली सर्व जबाबदारी पार पाडावी असे या आदेशात स्पष्ट केले आहे. सदर आदेश दि. 10 ते 30 जानेवारी, 2022 पर्यंत नांदेड जिल्हा क्षेत्रात लागू राहतील.   

00000 

 प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने

सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणी 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- प्रादेशिक परिवहन कार्यालय नांदेडच्यावतीने शनिवार 8, 15 29 जानेवारी 2022 या सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरासाठी 7 जानेवारी 2022 रोजी कार्यालयीन वेळेत अपॉईन्टमेंट निर्गमीत करण्यात येतील. इच्छूक अर्जदारांनी उपलब्ध अपॉईन्टमेट घेऊन कोरोना लस घेतल्याचे प्रमाणपत्रासह पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठी दिलेल्या वेळेवर उपस्थित रहावे. दिवशी आपत्कालीक परिस्थिती निर्माण झाल्यास शिबिराच्या तारखेबदल होऊ शकतो, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

00000

 नांदेड जिल्ह्यात 36 व्यक्ती कोरोना बाधित

तर दोन कोरोना बाधित झाले बरे

 नांदेड (जिमाका) दि. 6 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 928 अहवालापैकी 36 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 28 तर अँटिजेन तपासणीद्वारे 8 अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 682 एवढी झाली असून यातील 87 हजार 890 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 137 रुग्ण उपचार घेत असून 5 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 655 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 12, नांदेड ग्रामीण 1, बिलोली तालुक्यांतर्गत 1, माहूर 1, मुदखेड 6, नायगाव 1, चंद्रपूर 1, हिंगोली 3, परभणी 1, पुणे 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 2, किनवट 4, मुदखेड 1, कंधार 1 असे एकुण 36 कोरोना बाधित आढळले आहे. आज जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, खाजगी रुग्णालयातील एका कोरोना बाधिताला औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली.  

 

आज 137 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी 7, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 15, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरण 108,  खाजगी रुग्णालय 5 अशा एकुण 137 व्यक्ती उपचार घेत आहेत.

  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 8 लाख 2 हजार 52

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 97 हजार 770

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 682

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 890

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 655

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.92 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-9

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-137

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-5

 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश   

नांदेड (जिमाका) दि. 6 :- नांदेड जिल्ह्यात दिनांक 18 जानेवारी 2022 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.   

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 4 ते 18 जानेवारी 2022 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

 

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 शासकीय तंत्रनिकेतन येथे योगासन शिबीर संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- शरीराला तंदुरूस्थ ठेवण्यासाठी योग अत्यंत प्रभावी असून नियमित योग केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य वाढते, असे प्रतिपादन शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांनी केले. 

शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील विद्युत विभागातर्फे नववर्षानिमित्त संस्थेतील सर्व अधिव्याख्याता आणि कर्मचाऱ्यांसाठी योगासन शिबिराचे नुकतेच आयोजन केले होते. नववर्षाच्या पहिल्या दिवशी प्राचार्य डॉ. गोरक्ष गर्जे यांच्यासह विभागाच्या अधिव्याख्याता आणि कर्मचाऱ्यांनी योगासन केले. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे प्राचार्य डॉ. गर्जे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. 

सध्याच्या जीवनशैलीत मानसिक आणि शारीरिक ताणतणावाला सर्वच वयोगटातील व्यक्तींना सामोरे जावे लागत आहे. स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या आयुष्यात प्रत्येकाला स्वतःकडे पाहण्यासाठी मात्र पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे शरीर आणि मनाच्या व्याधींच्या तक्रारीत वाढ होऊ लागल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे सहजतेने पाहण्याचा दृष्टिकोन तयार होत आहे. अगदी कमी वेळात योग करून आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य दिले जात आहे. 

या शिबिरामध्ये योग प्रशिक्षिका श्रीमती शारदा येम्मेवार यांनी योगासनाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केले. मुख्य समन्वयक व्ही. व्ही. सर्वज्ञ आणि समन्वयक अधिव्याख्याता श्रीमती ए. ए.सायर आणि अधिव्याख्याता श्रीमती पी. बी. खेडकर यांनी हे शिबीर आयोजीत केले. सूत्रसंचालन अधिव्याख्याता पी. के. विनकरे यांनी केले. प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख श्री. मुधोळकर, अधिव्याख्याता एफ. एच. अब्दुल, अधिव्याख्याता पी. एस. लिंगे, अधिव्याख्याता ओ. एस. चव्हाण, अधिव्याख्याता वाय. एस. कटके या सर्वांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.

0000



 

 शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथे

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन साजरी करण्यात आली. शासकीय तंत्रनिकेतन नांदेड येथील कर्मशाळा विभागातर्फे कॉन्फरन्स हॉल येथे नुकतेच सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्राचार्य डॉक्टर जी. व्ही. गर्जे होते. 

यावेळी संस्थेतील महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माता सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्र व महान कार्याचे वर्णन करुन मनोगत व्यक्त केले. प्राचार्य गर्जे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर सविस्तर मार्गदर्शन करून महिलांचा सन्मान केला पाहिजे तसेच सध्याची परिस्थिती विषयी माहिती सांगून मार्गदर्शन केले. श्रीमती देवशी, श्रीमती जाधव, श्रीमती प्रा. भोकरे, श्रीमती प्रा. साळुंखे, श्रीमती प्रा. सायर, श्री. सरोदे प्र.शा.स. या सर्वांनी सावित्रीबाई फुले व सध्याची परिस्थिती यावर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रबंधक श्रीमती कदम यांनी महिलांची सध्याची परिस्थिती, त्यावरील उपाय व त्यांच्या प्रश्नांविषयाची माहिती दिली. यावेळी संस्थेतील महिला कर्मचाऱ्यांनी स्त्रीशिक्षण जनजागृती व सबलीकरण करण्याचा संकल्प घेतला. सूत्रसंचालन निदेशक डी. आर. सरकटे यांनी केले. कर्मशाळा अधीक्षक डी. जे. चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

00000



 टीकात्मक विश्लेषणासह माध्यमामध्ये

चांगल्या घटनांचेही प्रतिबिंब हवे

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

·         अमृतासम पवित्र होण्याचे ध्येय बाळगा - लता अहेमद सानी 

नांदेड (जिमाका) दि. 6:- उच्च तंत्रज्ञानाच्या नवनवीन आविष्काराने माध्यमाची परिभाषा व माध्यमात काम करणाऱ्या सर्वांचीच जबाबदारी अधिक पटीने वाढली आहे. ज्या विश्वासार्हतेवर माध्यमे उभी आहेत, ते मुल्य व विश्वासार्हता वृद्धींगत होण्यासाठी टिकात्मक विश्लेषणासह प्रत्येक विषयाची दुसरी बाजू व समाजात घडणाऱ्या चांगल्या घटनाचे प्रतिबिंबही तेवढ्या सक्षमपणे स्विकारण्याकडे वाचकांचा अधिक कल असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन करण्यासाठी दर्पण दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात आज कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, पोलीस विभागाचे जनसंपर्क अधिकारी लष्करे, संपादक लता अहेमद सानी, संपादक शंतनु डोईफोडे, सामनाचे प्रतिनिधी विजय जोशी, ज्येष्ठ पत्रकार अनिकेत कुलकर्णी, डीजीटल मिडीयाचे योगेश लाठकर, अंकुश सोनसळे तसेच माध्यमातील मान्यवर पत्रकार उपस्थित होते. 

सर्वच क्षेत्रात स्पर्धात्मकता वाढली असून या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी विश्वासार्हता पाहिजे. जे-जे नवीन तंत्रज्ञान येत आहे ते शिकून आत्मसात केल्याशिवाय पर्याय नाही. हा काळ माध्यम आणि पत्रकारांच्यादृष्टीने आव्हानात्मक जरी असला तरी यात सत्य आणि विश्वासार्हता जपणारी माध्यमे अधिक उजळून निघतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला. 

पत्रकारिता हे क्षेत्र विश्वासार्हतेचे आहे. यात अमृतासारखे पवित्र राहण्याची मनिषा विविध माध्यमात काम करणाऱ्या पत्रकारांनी जपली पाहिजे. आपली भूमिका ही लोकशाहीच्या मजबुतीसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन संपादक अलताफ सानी यांनी केले. ज्या मुल्यांवर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेचा भक्कम पाया उभा केला, त्याला वृध्दींगत करण्याचे काम अनंत भालेराव, सुधाकरराव डोईफोडे यांच्या सारख्या अनेक संपादकांनी केले. समाजातील जे वाईट आहे ते नष्ट होऊन जे चांगले त्यावर समाज घडावा याचा आग्रह बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्या लेखनीद्वारे धरला. हे आपण लक्षात घ्यायला हवे. प्रशासन आणि पत्रकारिता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चांगल्या प्रशासनासाठी शासकीय योजना लोकापर्यत पोहचल्या पाहिजेत. ते पोहचविण्याचे काम माध्यम करतात. ही महत्वाची जबाबदारी पार पाडतांना कोरोनाच्या सावटाखाली पत्रकारांनी सोसलेले आव्हान हे कोरोना योद्धा सारखेच असल्याचे संपादक शंतनु डोईफोडे यांनी स्पष्ट केले. 

कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने अनेक गुणवत्तापूर्वक कामे केली आहेत.  कोरोना कालावधीत मृत्यू झालेल्या बाधितांच्या कुटूंबियांना मदत मिळवून देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दाखवलेली तत्परता दखल घेण्यासारखी आहे, असे सामनाचे प्रतिनिधी विजय जोशी यांनी सांगितले. जिल्ह्यातील दुर्गम भागातही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात उत्कृष्ट झाले आहे, असेही त्यांनी सांगितले. 

सध्या शहरात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आदेशासोबत कडक अंमलबजावणी करावी जेणेकरुन कोरोना संसर्ग वाढीला आळा बसेल असे अंकुश सोनसळे यांनी सांगितले. सध्याच्या कालावधीत वृत्तपत्र चालविणे कठीण जरी असले तरी प्रत्येकाला मर्यादीत राहून काम करावे लागते, असे योगेश लाठकर यांनी सांगितले. शेवटी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

0000









  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...