Wednesday, October 28, 2020

 

118 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी  94 कोरोना बाधितांची भर     

 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- बुधवार 28 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30  वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 118 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 94 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 39 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 55 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 722 अहवालापैकी  1 हजार 583 अहवाल निगेटिव्ह आले.  जिल्ह्यात एकुण  बाधितांची संख्या आता 18 हजार 956 एवढी झाली असून यातील  17  हजार 616 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 707 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 36 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात एकाही बाधित रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 504 एवढीच आहे.   

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 4, देगलूर जैनब रुग्णालय कोविड केंअर सेंटर 1, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 1, मुखेड कोविड केंअर सेंटर 2, उमरी कोविड केंअर सेंटर 2, खाजगी रुग्णालय 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 13, भोकर कोविड केंअर सेंटर 5, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 55, किनवट कोविड केंअर सेंटर 6, माहूर कोविड केंअर सेंटर 1, मांडवी कोविड केअर सेंटर 1 असे  118 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.14 टक्के आहे.

 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 34, कंधार 2, बिलोली 2, धर्माबाद 1 असे एकुण 39 बाधित आढळले. 

 

तर अँटिजेन तपासणीद्वारे  नांदेड मनपा क्षेत्र 40, भोकर तालुक्यात 1, अर्धापूर 3, मुखेड 3, नांदेड ग्रामीण 5, देगलूर 1, धर्माबाद 1, औरंगाबाद 1 असे एकूण 55 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 707 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 154, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 215, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड येथे 48, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल  नांदेड (नवी इमारत) येथे 23, हदगाव कोविड केअर सेंटर 5, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 8, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 14, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 21,  मांडवी कोविड केअर सेंटर 2, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 8, लोहा कोविड केअर सेंटर येथे 13, मुदखेड कोविड केअर सेटर 6, माहूर कोविड केअर सेंटर 9, किनवट कोविड केअर सेंटर येथे 29, धर्माबाद कोविड केअर सेंटर 5, उमरी कोविड केअर सेंटर 1, कंधार कोविड केअर सेंटर येथे 7, अर्धापूर कोविड केअर सेंटर 8, भोकर कोविड केअर सेंटर 3,  हिमायतनगर कोविड केअर सेंटर 4, बारड कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 120, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, औरंगाबाद येथे संदर्भीत 1 झाले आहेत. 

बुधवार 28 ऑक्टोंबर 2020 रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 75, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 65 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 10 हजार 48

निगेटिव्ह स्वॅब- 87 हजार 668

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 956

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 17 हजार 616

एकूण मृत्यू संख्या- 504

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 96.14 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 479 

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 707

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले 36. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. 

0000

 

 

शेतकऱ्यांनी पुढील खरीप हंगामासाठी

स्वत:चे सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे

कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्हयातील ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस सुरु झाल्याने सोयाबीन पीक शेतात काढणी अभावी उभे होते. कापणी करण्यात आलेले सोयाबीन मळणी अभावी शेतात उंच जागेवर गंजीच्या स्वरुपात झाकुन ठेवलेले आहे. या सर्व बाबींवरुन पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना घरगुती बियाणे राखुन ठेवण्यात काही अंशी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांनी काढणी व मळणी पावसापुर्वी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे पुढील हंगामासाठी राखुन ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

नांदेड जिल्हयात ऑक्टोबर महिन्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. याबाबत कृषी विभागाने स्थानिक वृत्तपत्रांमधुन याबाबत शेतकऱ्यांना सुचना दिल्याने लवकर येणाऱ्या वाणांची शेतकऱ्यांनी काढणी व मळणी पावसापुर्वी केली आहे. या सोयाबीन बियाणांची प्रत चांगली आहे. मळणी केल्यानंतर बियाणे सरळ पोत्यात न भरता तत्पुर्वी 2 ते 3 दिवस ताडपत्रीवर किंवा स्वच्छ खळे करुन सावलीमध्ये वाळवावे. वाळलेले व स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्युट बारदाण्यामध्ये भरावे. पोत्यामध्ये साधारणपणे 60 किलो पर्यंत बियाणे साठवावे. त्यापेक्षा अधिक बियाणे साठवणूक करण्यात येऊ नये. बियाणे साठवणूक करतेवेळी सोयाबीन बियाण्यांची थप्पी 7 पोत्यापेक्षा उंच जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बियाणे साठवणूक ही दमट व ओलसर जागेच्या ठिकाणी करु नये. बियाणे साठवणूक करण्यापुर्वी जमिनीवर तटटे किंवा लाकडी फळया किंवा जुने पोते इ. अंथरुन त्यावर बियाण्यांची साठवण करावी. शेतकऱ्यांनी स्वत:कडील पेरणी योग्य सोयाबीनची 3 वेळा (साठवणूकी, विक्री दरम्यान,पेरणीपुर्वी) उगवणक्षमता चाचणी करुनच पेरणी करावी. 

शेतकऱ्यांनी आपल्या गावासाठी गावाचे क्षेत्राएवढे (100 हेक्टरसाठी 100 क्विंटल याप्रमाणे) प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी स्वत:कडील चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे. जेणेकरुन खरीप 2021 मध्ये सोयाबीन बियाणे दुकानावरुन खरेदी करावी लागणार नाही. पुढील हंगामाकरीता बियाण्यांची टंचाई भासणार नाही. तसेच सोयाबीन बियाणे उगवणीच्या तक्रारीसुध्दा येणार नाहीत. 

सोयाबीनचे बाजारातील विक्रीचे दर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्री करण्याकडे कल आहे. परंतू आता विक्रीची घाई केल्यास पुढील हंगामाकरीता हेच बियाणे जास्तीच्या दराने बियाणे म्हणुन खरेदी करावे लागेल. याकरीता पावसापुर्वी काढणी, मळणी करुन ठेवलेले सोयाबीन असेल, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता पुढील हंगामासाठी बियाणे राखुन ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

00000

 

कर्नाटक राज्याचे पशुसंवर्धन मंत्री प्रभु बी. चव्हाण यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- कर्नाटक राज्याचे पशुसंवर्धन, हज आणि वक्फ मंत्री प्रभु बी. चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

गुरुवार 29 ऑक्टोंबर 2020 रोजी कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील बोंथी येथून वाहनाने मुखेड तालुक्यातील कांबळेवाडीफाटा येथे दुपारी 12 वा. आगमन.  दुपारी 12 ते 1.30 वाजेपर्यंत कांबळेवाडीफाटा येथे खाजगी कार्यक्रमात सहभाग. कांबळेवाडीफाटा येथून दुपारी 1.30 वा. कांबळेवाडी-मुखेड-बाऱ्हाळी-मुक्रमाबाद-हंगरगा मार्गे वाहनाने बिदर जिल्ह्यातील औराद तालुक्यातील बोंथीकडे प्रयाण करतील.   

00000

 

सहकार, कृषी, सामाजिक न्याय राज्यमंत्री

डॉ. विश्वजीत कदम यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 28 :-  राज्याचे सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत पतंगराव कदम हे गुरुवार 29 ऑक्टोंबर 2020 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

गुरुवार 29 ऑक्टोंबर 2020 रोजी हैद्राबाद विमानतळ येथून ट्रू जेटच्या विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 10 वा. आगमन. सकाळी 10.30 वा. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. देगांव-येळेगाव, लक्ष्मीनगर ता. अर्धापूर येथे आगमन व रौप्यमहोत्सवी गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी सोयीनुसार वाहनाने शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण, आगमन व राखीव. दुपारी 12.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आगमन मंत्रीमंडळ बैठकीस व्हीसीद्वारे उपस्थिती. दुपारी 2.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे पत्रकार परिषदेस उपस्थिती. दुपारी 2.45 वा. नांदेड येथून वाहनाने नांदेड-मालेगाव-वसमत मार्गे परभणीकडे प्रयाण करतील.

00000

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेड दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहिल. 

गुरुवार 29 ऑक्टोंबर 2020 रोजी हैद्राबाद विमानतळ येथून 2T-515 विमानाने नांदेड विमानतळ येथे सकाळी 10 वा. आगमन व मोटारीने भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. युनिट क्र. 1 लक्ष्मीनगर देगाव-येळेगाव ता. अर्धापूरकडे प्रयाण. सकाळी 10.30 वा. भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना लि. युनिट क्र. 1 लक्ष्मीनगर देगाव-येळेगाव ता. अर्धापूर येथे आगमन व गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 12.30 वा. मोटारीने नांदेड निवासस्थानाकडे प्रयाण. दुपारी 1 वा. नांदेड निवासस्थान येथे आगमन व मंत्रिमंडळ बैठकीस व्हीसीद्वारे उपस्थिती. सायंकाळी 7.30 वा. धर्माबाद शिक्षण संस्था धर्माबाद कार्यकारीणी बैठकीस उपस्थिती. स्थळ- शिवाजीनगर नांदेड.

00000

 

केळी पीक संरक्षणासाठी कृषि संदेश

नांदेड (जिमाका) दि. 28 :- केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असुन केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे कृषि संदेश देण्यात आला आहे. 

केळी पिकावरील ठिपके आढळुन आल्यास रोगग्रस्त पाने किंवा पानाचा भाग काढुन टाकावे व बागेबाहेर आणुन नष्ट करावा. बागेत वाळलेली पाने झाडावर लटकणारी काढुन टाकावेत. केळीची बाग स्वच्छ व तणविरहीत ठेवावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर. टी. सुखदेव यांनी केले आहे.

0000

 

 

 

 

 

इन्स्पायर अवार्ड नामांकन भरण्यामध्ये

नांदेड जिल्हा मराठवाड्यात प्रथमस्थानी

-  शिक्षणाधिकारी (मा.) बालासाहेब कुंडगीर 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान विभागाकडून इयत्ता 6 वी ते 10 वी च्या वर्गात शिकत असलेल्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी इन्स्पायर अवार्ड योजना प्रतिवर्षी राबविण्यात येते. राज्यस्तरावर निवड होणाऱ्या विद्यार्थ्यास 10 हजार रुपये शासनाकडून डीबीटीद्वारे संबंधित विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. यावर्षी नांदेड जिल्ह्यात एकूण 886 विद्यार्थ्यांनी नामांकने ऑनलाईन दाखल केलेले असून नामांकने दाखल करण्यात नांदेड जिल्हा मराठवाड्यात प्रथमस्थानी आहे तर राज्यात 13 व्या स्थानी आहे. 

विद्यार्थ्यांची ऑनलाईन नामांकने सादर करण्यात गणित, विज्ञान शिक्षक, प्राचार्य / मुख्याध्यापक केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी  तसेच गटशिक्षणाधिकारी, विज्ञान पर्यवेक्षक माधव बाजगीरे, उपशिक्षणाधिकारी माधव सलगर, श्री मठपती, श्री अमदुरकर, शिक्षणाधिकारी कुंडगीर बी. आर., प्रशांत दिग्रसकर या सर्वांनी या योजनेची परिणामकारक अंमलबजावणी केली आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्याचा मराठवाड्यात प्रथम क्रमांक आला आहे. त्याबद्दल सर्व विद्यार्थी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे शिक्षण सभापती संजय बेळगे, शिक्षणाधिकारी बालासाहेब कुंडगीर यांनी अभिनंदन केले आहे.

00000

 

इयत्ता दहावी, बारावी परीक्षा शुल्क भरणा करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- लातूर, नागपूर, मुंबई विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता 10 वी व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी नोव्हेंबर-डिसेंबर, 2020 साठी आपल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर केल्यानंतर आपल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे परीक्षा शुल्काचे चलन ऑनलाईन तयार होणार असून ते आपण डाउनलोड करुन घ्यावयायचे आहे. परीक्षा शुल्क प्रचलित पद्धतीने बॅक ऑफ इंडियामध्ये भरणा न करता ते एचडीएफसी बँकेत भरणा करण्याबाबतची सुधारीत कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे.

 सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्याकडे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम विहित मुदतीत त्यांच्या त्याच बँकेच्या खात्यामधून एनईएफटी, आरटीजीएसद्वारे चलनावरील नमूद बँक अकाउंट नंबर व आयएफएससी कोड HDFC0000007 (एचडीएफसी सहा वेळा शुन्य सात) प्रमाणे मंडळाकडे वर्ग करावयाची आहे. 

माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी एनईएफटी / आरटीजीएस केलेली रक्कम त्यांच्या खात्यातून वजा झाली आहे किंवा नाही तसेच अकाउंट नंबर व आयएफएससी कोड चुकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली किंवा नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधीत मुख्याध्यापक / प्राचार्य यांची राहील. तसेच माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांचे शुल्क मंडळाकडे जमा झाल्याशिवाय त्यावरील पुढील प्रक्रिया होणार नाही याची दक्षता सर्व मुख्याध्यापक / प्राचार्य यांनी घ्यावयाची आहे, असे आवाहन विभागीय सचिव लातूर विभागीय मंडळ लातूर यांनी केले आहे.

0000000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...