Wednesday, October 28, 2020

 

शेतकऱ्यांनी पुढील खरीप हंगामासाठी

स्वत:चे सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे

कृषि विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्हयातील ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस सुरु झाल्याने सोयाबीन पीक शेतात काढणी अभावी उभे होते. कापणी करण्यात आलेले सोयाबीन मळणी अभावी शेतात उंच जागेवर गंजीच्या स्वरुपात झाकुन ठेवलेले आहे. या सर्व बाबींवरुन पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना घरगुती बियाणे राखुन ठेवण्यात काही अंशी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मात्र ज्या शेतकऱ्यांनी काढणी व मळणी पावसापुर्वी केलेली आहे अशा शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे सोयाबीन बियाणे पुढील हंगामासाठी राखुन ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

नांदेड जिल्हयात ऑक्टोबर महिन्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. याबाबत कृषी विभागाने स्थानिक वृत्तपत्रांमधुन याबाबत शेतकऱ्यांना सुचना दिल्याने लवकर येणाऱ्या वाणांची शेतकऱ्यांनी काढणी व मळणी पावसापुर्वी केली आहे. या सोयाबीन बियाणांची प्रत चांगली आहे. मळणी केल्यानंतर बियाणे सरळ पोत्यात न भरता तत्पुर्वी 2 ते 3 दिवस ताडपत्रीवर किंवा स्वच्छ खळे करुन सावलीमध्ये वाळवावे. वाळलेले व स्वच्छ चाळणी केलेले बियाणे ज्युट बारदाण्यामध्ये भरावे. पोत्यामध्ये साधारणपणे 60 किलो पर्यंत बियाणे साठवावे. त्यापेक्षा अधिक बियाणे साठवणूक करण्यात येऊ नये. बियाणे साठवणूक करतेवेळी सोयाबीन बियाण्यांची थप्पी 7 पोत्यापेक्षा उंच जाणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच बियाणे साठवणूक ही दमट व ओलसर जागेच्या ठिकाणी करु नये. बियाणे साठवणूक करण्यापुर्वी जमिनीवर तटटे किंवा लाकडी फळया किंवा जुने पोते इ. अंथरुन त्यावर बियाण्यांची साठवण करावी. शेतकऱ्यांनी स्वत:कडील पेरणी योग्य सोयाबीनची 3 वेळा (साठवणूकी, विक्री दरम्यान,पेरणीपुर्वी) उगवणक्षमता चाचणी करुनच पेरणी करावी. 

शेतकऱ्यांनी आपल्या गावासाठी गावाचे क्षेत्राएवढे (100 हेक्टरसाठी 100 क्विंटल याप्रमाणे) प्रत्येक गावातील शेतकऱ्यांनी स्वत:कडील चांगल्या दर्जाचे सोयाबीन बियाणे राखुन ठेवावे. जेणेकरुन खरीप 2021 मध्ये सोयाबीन बियाणे दुकानावरुन खरेदी करावी लागणार नाही. पुढील हंगामाकरीता बियाण्यांची टंचाई भासणार नाही. तसेच सोयाबीन बियाणे उगवणीच्या तक्रारीसुध्दा येणार नाहीत. 

सोयाबीनचे बाजारातील विक्रीचे दर वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्री करण्याकडे कल आहे. परंतू आता विक्रीची घाई केल्यास पुढील हंगामाकरीता हेच बियाणे जास्तीच्या दराने बियाणे म्हणुन खरेदी करावे लागेल. याकरीता पावसापुर्वी काढणी, मळणी करुन ठेवलेले सोयाबीन असेल, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता पुढील हंगामासाठी बियाणे राखुन ठेवण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  आर. बी. चलवदे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

  वृत्त  क्र.  112 राज्यमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे आज नांदेडमध्ये   जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक   नांदेड दि. 27 जानेवारी :- रा...