Friday, November 26, 2021

नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 5 कोरोना बाधित झाले बरे

 

नांदेड जिल्ह्यात 3 व्यक्ती कोरोना बाधित तर 5 कोरोना बाधित झाले बरे 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 873 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 476 एवढी झाली असून यातील 87 हजार 801 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 22 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, असे एकुण 3 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 5 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 3, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2  व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 22 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड मनपा अंतर्गंत गृह विलगीकरण 19, खाजगी रुग्णालयात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 72 हजार 328

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 68 हजार 401

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 476

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 801

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-6

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-7

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-22

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

जबाबदार नागरिकत्वाची भूमिका हीच खरी संविधानाची भक्ती - विनोद रापतवार जिल्हा ग्रंथालयात संविधान दिन साजरा

 

जबाबदार नागरिकत्वाची भूमिका हीच खरी संविधानाची भक्ती

- विनोद रापतवार

जिल्हा ग्रंथालयात संविधान दिन साजरा

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :- भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला मूलभूत स्वातंत्र्याचे  अधिकार बहाल केले असून एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीकडून नागरिकत्वाची अपेक्षा ठेवलेली आहे. लोकशाहीच्या प्रगल्भतेसाठी  संविधानाने दिलेले अधिकार व कर्तव्याची परिपूर्ण अमंलबजावणी होणे म्हणजे एक प्रकारे देशाला सक्षक्त  करण्यासारखे आहे असे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी केले .

संविधान दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रताप सुर्यवंशी, सेतू समिती अभ्यासिकेचे ग्रंथपाल  बाळू पावडे, माहिती अधिकारी श्वेता पोटुडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेचे पाटील सर, शिवाजी पवार , संजय पाटील, गजानन कळके, रामतीर्थकर, आणि विद्यार्थी उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त यावेळी स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासावर आधारित जिल्हा ग्रंथालयाने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रगल्भ लोकशाहीसाठी विद्यार्थी, युवक मोठे योगदान देवू शकतात. स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत असताना एक नागरिक म्हणून,युवक म्हणून आपल्याकडूनही देशासाठी काय योगदान देता येईल यासाठी सद्भावना तेवढ्याच मोलाच्या आहेत. विविध आंदोलनातून भारतातील युवकांनी आपली भूमिका व कर्तव्य  वेळोवेळी चोख बजावले आहेत. कोरोनाच्या काळात युवकांनी आरोग्याच्या सुरक्षितेसाठी जे जबाबदार वर्तन ठेवले ते लाख मोलाचे होते असेही  जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार यांनी सांगितले.

प्रारंभी जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी प्रताप सुर्यवंशी  यांनी मान्यवराचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे यावेळी सामूहिक वाचन करण्यात आले. मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन गजानन कळके यांनी केले तर आभार शिवाजी पवार यांनी मानले.

 

 

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

 

सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी

ऑनलाईन वेबिनारचे आयोजन

    

नांदेड (जिमाका) दि. 26 :- जिल्हयात लॉकडाऊननंतर बेरोजगार उमेदवार व युवा युवतींना आरोग्य क्षेत्रातील संधी आणि आव्हाने याबाबत सविस्तर मार्गदर्शनासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे मंगळवार 30 नोव्हेंबर 2021 रोजी सायंकाळी 5 वाजता वेबीनारचे आयोजन केले आहे. या वेबीनार मध्ये नांदेड येथील पवार हॉस्पिटल बोरबन फॅक्ट्री एरीया प्रशिक्षक सूशील कूमार राठोड हे मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्ह्यातील अधिकाधिक उमेदवारांनी / युवा युवतींनी या वेबिनारचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. आधिक माहितीसाठी संपर्क क्र. 02462-251674 वेबिनार  जॉइन करण्यासाठी खालील गुगल मीट लिंक चा उपयोग करावा. https://meet.google.com/cji-ypfj-rwv वेबीनारसाठी आपले रजिस्ट्रेशन/नोंदणी करण्यासाठी खालील लिंकवर जाउन ऑनलाइन फॉर्म भरावेत. https://forms.gle/sJoMbMEuUgTj1rXLA  असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000

 

 

 

 

बेरोजगार सेवा सोसायटयांना कामवाटप समितीमार्फत तीन लाखांच्या कामाचे वाटप

 

बेरोजगार सेवा सोसायटयांना कामवाटप समितीमार्फत तीन लाखांच्या कामाचे वाटप 

 

नांदेड (जिमाका) दि. 26 :-  जिल्हयातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायटयांना रुपये तीन लाखापर्यंतची कामे विना निविदा देणेबाबत काम वाटप समितीची बैठक संपन्न झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे प्रतिनिधी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले यांचे अध्यक्षतेखाली काम वाटप समितीची बैठक संपन्न झाली.      

या कामवाटप समितीच्या बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय देगलुर या कार्यालयात वाहन चालकाचे एक पद. श्री. शंकररावजी चव्हाण,विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र.2 नांदेड येथे वाहन (कार) क्रं. एम एच-22/डी/7181 या वाहनावर वाहन चालकाचे एक पद. श्री.शंकररावजी चव्हाण,विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्र.2 नांदेड येथे वाहन (जीप) क्रं. एम एच-26/आर/307 या वाहनावर वाहनचालक अशा एकुण 3 कामांचे वाटप कामवाटप समितीमार्फत करण्यात आले.

या बैठकीला जिल्हा उपनिबंधक डॉ.मुकेश बारहाते, जी.एम.देशपांडे, उपकार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, विष्णुपुरी प्रकल्प विभाग क्रं. 2 नांदेड, जिल्हा स्वयंरोजगार सहकारी संघ चे अध्यक्ष सदाशिव पवळे उपस्थित होते अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त तथा सदस्य सचिव काम वाटप समिती श्रीमती रेणुका तम्मलवार यांनीप्रसिध्दी पत्रकाद्वारे  दिली.

0000

नाव नोंदणीसाठी 27 व 28 नोव्‍हेंबर रोजी विशेष मतदार नोंदणी मोहिमेचे आयोजन

 

                                  नाव नोंदणीसाठी 27 28 नोव्‍हेंबर रोजी

विशेष मतदार नोंदणी  मोहिमेचे आयोजन

1 जानेवारी 2022 या अर्हता  दिनांकावर विशेष संक्षिप्‍त पुनरिक्षण कार्यक्रम

नांदेड (जिमाका) दि. 26 :-  भारत निवडणूक आयोगाने 1 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुन:रिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर ज्या मतदारांची नावे या यादीत समाविष्ट नाहीत अशा मतदारांना अथवा प्रारुप मतदार यादीमध्ये करण्यात आलेल्या नोंदीबाबत ज्या मतदारांना आक्षेप घ्यावयाचे असतील अशा मतदारांना किंवा त्यामध्ये दुरुस्ती / सुधारणा करावयाची असेल अशा मतदारांना विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करता येतील. सर्व पात्र मतदारांनी प्रारूप मतदार यादीत आपले नाव असल्‍याची खात्री करून नाव नसल्‍यास 27 28 नोव्‍हेंबर रोजी आपल्‍या भागातील मतदान केंद्रावर जाऊन संबंधित मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी  (बीएलओ) यांचेकडे नाव नोंदणीचा अर्ज भरून द्यावा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांनी केले आहे. 

त्‍यासाठी 1 नोव्‍हेबर 2021 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली आहे. या प्रारूप मतदार याद्या सर्व मतदान केंद्रांवर, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी व जिल्‍हा  निवडणुक अधिकारी यांचे कार्यालयात प्रसिध्‍द करण्‍यात आलेल्‍या आहेत. या मतदार यादीमध्‍ये ज्‍या मतदाराची नावे समाविष्‍ट नाहीत अशा मतदारांना नमुना -६ मध्‍ये अर्ज सादर  करून त्‍यांची नावे मतदार यादीत समाविष्‍ट  करता येतील. तसेच अनिवासी भारतीय नागरिकांना नमुना -6अ मध्‍ये अर्ज करुन मतदार यादीत नाव समाविष्‍ट  करता येईल. मतदार यादीत समाविष्‍ट असलेल्‍या नोंदीबाबत आक्षेप असल्‍यास सदर नोंद वगळण्‍यासाठी नमुना -७ मध्‍ये अर्ज सादर करता येतील. तसेच मतदार यादीत असलेल्‍या नोंदीबाबत दुरूस्‍ती करावयाची असल्‍यास नमुना -८ मध्‍ये आणि एका भागातून दुस-या  यादीभागात नोंद स्‍थलांतरीत करावयाची असल्‍यास विहीत नमुना -८अ मध्‍येअर्ज सादर करता येतील.

पात्र मतदारांना नाव नोंदणी /दुरूस्‍ती/वगळणी करण्‍याकरीता येत्‍या दिनांक 27 28 नोव्‍हेंबर 2021 रोजी विशेष मोहिम राबविण्‍यात येणार आहे. या विशेष मोहिमेच्‍या दिवशी  मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बीएलओ) उपस्थित राहुन नागरिकांचे नाव नोंदणी/दुरूस्‍ती बाबतचे अर्ज स्विकारणार आहेत.

1 जानेवारी 2022 रोजी ज्या भारतीय नागरिकाचे वय १८ वर्षापेक्षा कमी नाही जो त्‍या यादी भागातील सर्वसाधारण रहिवासी आहे, अशी व्यक्ती मतदार म्हणून नोंदणीसाठी पात्र राहील. मा. भारत निवडणूक आयोगाने मतदारांच्या सुलभतेसाठी Voter Helpline App व्‍दारे अथवा  www.nvsp.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणीची तसेच यादीतील तपशिलात बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्‍यात आली आहे.अधिक माहितीसाठी www.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळास भेट द्यावी असेही उप जिल्हा निवडणूक अधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.

0000  

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...