Tuesday, January 12, 2021

 

निवडणूक प्रक्रियेत गैरहजर 46

कर्मचाऱ्यांवर पोलीस गुन्हा होणार दाखल

नांदेड (जिमाका) दि. 12 :- लोहा तालुक्यातील 77 ग्रामपंचायतसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कर्मचाऱ्यांची नियुक्ती व त्यांना दोन प्रशिक्षण देण्यात आले पण या दोन्ही प्रशिक्षणासाठी नियुक्ती आदेश दिलेले 46 कर्मचारी गैरहजर राहिले. त्यांना आज बुधवार दुपारी 3 वाजेपर्यंत संधी देण्यात आली आहे. यावेळेत ते तहसील कार्यालयात उपस्थित झाले नाही तर त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध पोलीस गुन्हा नोंदविण्यात येईल, अशी माहिती तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिली. 

लोहा तालुक्यातील 77 ग्रामपंचायतसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी मुंबई ग्रामपंचायत निवडणूक अधिनियम 1959 चे नियम (6) अन्वये उपरोक्त दिनांकास होणाऱ्या निवडणुकीसाठी तहसीलदार यांनी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी 1, 2 व 3 अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यांना पहिले प्रशिक्षण 26 डिसेंबर व दुसरे प्रशिक्षण 7 जानेवारी रोजी तहसील कार्यालयाच्या प्रांगणात देण्यात आले. या प्रशिक्षणात राज्य निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या निर्देशानुसार मतदान प्रक्रिया पूर्ण व्हावी त्यासाठीचे प्रशिक्षण तहसीलदार विठ्ठल परळीकर व टीमने दिले. 

ज्या कर्मचाऱ्यांची या निवडणुकीसाठी नियुक्ती करण्यात आली होती त्यात केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी असे 46 जण दोन्ही प्रशिक्षणास गैरहजर राहिले. त्यांना तहसील कार्यालयाने रीतसर नोटीस बजावली तरीही त्यांनी त्या नोटीसीला उत्तर दिले नाही व ते कर्मचारी निवडणूक कर्तव्यावर हजर झाले नाहीत. 

तहसीलदार परळीकर यांनी यासर्व गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांना आज बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत हजर राहावे अन्यथा लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 134 अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल यांची संबंधित गैरहजर असलेल्या कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी, असे आदेश तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी दिले आहेत. निवडणूक प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या व अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात तहसीलदार यांनी कायद्याचा 'बडगा" उगारला आहे.

00000

 

37 कोरोना बाधितांची भर तर

34 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

नांदेड (जिमाका) दि. 12 :- मंगळवार 12 जानेवारी 2021 रोजी सायं. 5 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार 37 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 21 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 16 बाधित आले. याचबरोबर उपचार घेत असलेल्या 34 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.  

आजच्या 621 अहवालापैकी 576 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 21 हजार 903 एवढी झाली असून यातील 20 हजार 767 बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 357 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 8 बाधितांची प्रकृती अतीगंभीर स्वरुपाची आहे. आजपर्यंत कोविड-19 मुळे जिल्ह्यातील 578 व्यक्तींना आपले प्राण गमवावे लागले आहेत.     

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 6, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 15, देगलूर कोविड रुग्णालय 1, लोहा तालुक्यांतर्गत 3, बिलोली तालुक्यांतर्गत 1, खाजगी रुग्णालय 8 असे एकूण 34 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.81 टक्के आहे.   

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 13, हदगाव तालुक्यात 2, परभणी 1, लोहा 1, मुदखेड 2, हिंगोली 2 असे एकुण 21 बाधित आढळले. तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 8, माहूर 2, लोहा 1, निजामाबाद 1, नांदेड ग्रामीण 1, देगलूर 1, यवतमाळ 2  असे एकुण 16 बाधित आढळले.   

जिल्ह्यात 357 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 22, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 20, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 25, मुखेड कोविड रुग्णालय 17, हदगाव कोविड रुग्णालय 4, महसूल कोविड केअर सेंटर 21, देगलूर कोविड रुग्णालय 13, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 140, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 55, हैद्राबाद येथे संदर्भीत 2, खाजगी रुग्णालय 38 आहेत.   

मंगळवार 12 जानेवारी 2021 रोजी 5 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 166, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 65 एवढी आहे.   

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 91 हजार 805

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 1 लाख 65 हजार 824

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 21 हजार 903

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 20 हजार 767

एकुण मृत्यू संख्या-578

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 94.81 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-7

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1 

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-397

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-357

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-8. 

00000

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश   

नांदेड (जिमाका) दि. 29 :- जिल्ह्यात गुरुवार 14 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजेपासून ते गुरुवार 28 जानेवारी 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात गुरुवार 14 जानेवारी 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते गुरुवार 28 जानेवारी 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.



अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

00000

 

ग्रामपंचायत मतदान, मतमोजणी केंद्र

परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात 1 हजार 15 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी शुक्रवार 15 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील मतदान केंद्र परिसर तसेच सोमवार 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया कलम 144 लागू करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत. 

या निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत रहावी यादृष्टीने 15 जानेवारी रोजी जिल्ह्यात ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत मतदान होणार आहे अशा मतदान केंद्राच्या हद्दीपासून तर 18 जानेवारी रोजी मतमोजणी केंद्रापासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे, निवडणुकीच्या कामाव्यतीरिक्त खाजगी वाहन, चिन्हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्या कामव्यतिरिक्त व्यक्तींस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. 

हा आदेश नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ज्या ग्रामपंचायतीचे मतदान होणार आहे अशा मतदान केंद्रावर 15 जानेवारी 2021 रोजी मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत अंमलात राहील. तसेच मतमोजणी केंद्राच्या हद्दीपर्यंत 18 जानेवारी 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत हा आदेश लागू राहील, असे आदेशात नमूद केले आहे.

000000

 

बर्ड फ्लू उपाययोजनांतर्गत

जिल्ह्यात 32 शिघ्र कृतीदल स्थापन

-         जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लूचा धोका संभवू नये यासाठी पशुसंवर्धन विभागातर्फे 16 तालुक्यांमध्ये 32 शिघ्रकृतीदल स्थापन करण्यात आले आहेत. या कृतिदलात सहाय्यक आयुक्त, पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, परिचर यांचा समावेश असून एका पथकात 5 सदस्य आहेत. आरोग्याच्यादृष्टिने योग्य ती खबरदारी घेण्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेशी आम्ही समन्वय साधून असून जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे प्रतिपादन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले. 

शासनाने याबाबत अनेक निर्देश दिले आहेत. यात प्रामुख्याने जिल्ह्यातील 112 पानथळ जागा / जलाशय विचारात घेतली आहेत. या जलाशयांवर शिघ्रकृतीदलातील सदस्‍य स्वत: पाहणी करुन विस्थापित होणाऱ्या पक्षांकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. नांदेड जिल्ह्यात जवळपास 165 पोल्ट्री फार्म असून यात अंदाजित 45 हजार पक्षी आहेत. या पोल्ट्री फार्मच्या संपर्कात पशुवैद्यकीय विभागाचे शिघ्रकृतीदलातील सदस्य असून त्यांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचेही डॉ. रत्नपारखी यांनी सांगितले. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यात बर्ड फ्लूची कोणतेही घटना / प्रकरण निदर्शनास आले नसून नागरिकांनी घाबरुन जाऊ नये व लोकांनीही अफवा पसरू नये असे आवाहन त्यांनी केले.

00000




 

 जिल्ह्यात आगी घटना टाळण्यासाठी

कार्यालय प्रमुखभोगवाटाधारकांनी दक्षता घ्यावी

-         जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

 

नांदेड (जिमाका) दि. 12 :- शासकिय कार्यालयमोठ्या इमारती व इतर सार्वजनिक ठिकाणी आगी सारख्या घडणाऱ्या घटना विशेष काळजी घेतील तर निश्चित टाळण्यासारख्या असतात. अशा घटना टाळण्यासाठी त्या-त्या कार्यालय प्रमुखांनीइमारतीच्या मालकांनी अथवा भोगवाटादार यांनी वेळीच अग्नीशम प्रतिबंधक उपाय योजनेंतर्गत असलेल्या निर्देशाचे पालन करुन दरवर्षी नित्यनियमाने ॲडिट करुन घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भात 6 डिसेंबर 2008 पासून महाराष्ट्र आग प्रतिबंधात्मक आणि जीवसंरक्षक उपाय योजना अधिनियम2006 याची अंमलबजावणी निश्चित केली आहे. या अधिनियमानुसार दिलेल्या निर्देशाचे सर्व कार्यालय प्रमुख व सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोठ्या इमारतीसार्वजनिक उपक्रम ज्या ठिकाणी होतात त्या इमारतींच्या मालकांनीभोगवाटाधारकांनी पालन करुन कोणत्याही अपघाताबाबत त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आज केले.

 

अग्निशमन सुरक्षा आणि महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम 2006  बाबत आज बचत भवन येथे नांदेड जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाकारी प्रदिप कुलकर्णीउपजिल्हाधिकारी (रोहयो) अनुराधा ढालकरीजिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुलकर्णीजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदेमनपाचे अग्निशमन विभागाचे प्रमुख रईश पाशा व इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

 

प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील विद्युत उपकरणांची सुरक्षितता व महाराष्ट्र आग प्रतिबंध व जीवरक्षक उपाय योजना अधिनियम 2006 व नियम 2009 अंतर्गत दिलेल्या निर्देशाचे पालन व उपाय योजना करुन घेतल्या पाहिजेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने एकदा इमारत बांधून संबंधित विभागांना ती इमारत हस्तांतरीत केल्यास त्याच्या संपूर्ण देखभालदुरुस्ती आणि सुरक्षिततेची जबाबदारी ही संबंधित कार्यालय प्रमुखाची असते हे लक्षात घ्या असेही जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट केले. या बैठकीत रईश पाशा यांनी अधिनियमातील तरतुदीबाबत सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती दिली.

00000



  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...