मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत
शेतकऱ्यांसाठी शेततळे !
· ‘शासन आपल्या दारी’ महत्वाकांक्षी अभियान
आज शेतकरी पारंपारिक पद्धतीने शेती करण्याऐवजी तो आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर जास्त भर देताना दिसत आहे. दिवसेंदिवस नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन कमी क्षेत्रात जास्तीत जास्त नवनवीन उत्पादन घेण्यावर शेतकरी भर देत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांसाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. शेतीला पाण्याची उत्तम जोड मिळाली तर उत्पादन वाढीवर हमखास चांगला परिणाम होतो. काही शेतकऱ्यांच्या शेतात विहिर, बोअरवेल, नदी, कॅनाल यासारखे स्त्रोत उपलब्ध असले तरी काही ठिकाणी यापैकी एकही स्त्रोत उपलब्ध नसतो. अशा ठिकाणची कोरडवाहू शेती ही शंभर टक्के पावसावर अवंलबून असते. या शेतकऱ्यांकरीता शासनाने सिंचनासाठी मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेअंतर्गत शेततळे ही योजना सुरु केली आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेवून आपल्या शेतात सिंचनाची सोय करुन उत्पादन वाढीवर भर दिला आहे.
लाभार्थी पात्रता
अर्जदार शेतकऱ्यांकडे स्वत:च्या नावावर किमान 0.60 हेक्टर क्षेत्र असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांची जमीन शेततळे खोदण्यास तांत्रिकदृष्टया योग्य असणे आवश्यक आहे. अर्जदार शेतकऱ्यांनी यापूर्वी मागेल त्याला शेततळे, सामुहिक शेततळे अथवा भात खाचरातील बोडी किंवा इतर, कुठल्याही शासकीय योजनेतून शेततळे या घटकासाठी शासनाच्या अनुदानाचा लाभ घेतलेला नसावा.
लाभार्थ्यांची निवड
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकासाठी उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात संगणकीय प्रणालीतून होणाऱ्या सोडती नुसार लाभ देण्यात येईल.
अर्ज करण्याची पध्दत
महाडीबीटी पोर्टलचे http:/mahadbtmahiti.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावा. शेतकरी स्वत:चा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र सीएससी ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र सारख्या माध्यमातून संकेतस्थळावर अर्ज करु शकतील.
शेततळ्यासाठी आकारमान
मुख्यमंत्री शाश्वत कृषि सिंचन योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल मर्यादा 75 हजार रुपये फक्त रकमेच्या मर्यादेपर्यंत अनुदान देय राहील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
सर्वसामान्यांची कामे सुलभ व स्थानिक पातळीवर व्हावीत. नागरिकांना जलद, कमी कागदपत्रे व शासकीय निर्धारित शुल्कात योजनेचा लाभ मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने ‘शासन आपल्या दारी’ हे महत्वाकांक्षी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियान अंतर्गत शासनाच्या विविध विभागाच्यावतीने विकासात्मक योजनाचा लाभ गरजुंना देण्यात येत आहे. शासन आपल्या दारी उपक्रमात सर्व योजनाची माहिती त्या विभागाच्यावतीने नागरिकांना देण्यात येणार आहे.
अलका पाटील,
उपसंपादक,
जिल्हा माहिती कार्यालय, नांदेड
00000