Thursday, December 28, 2017

लोकशाही दिनाचे 1 जानेवारीला आयोजन
नांदेड, दि. 28 :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी ऐकून घेऊन त्या सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्यानुसार सोमवार 1 जानेवारी 2018 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन आयोजित केला आहे. यासाठी अर्ज स्विकारण्याचे व न स्विकारण्याबाबतच्या निकषांचीही नागरिकांनी नोंद घ्यावी. तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. त्यामुळे केवळ वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी, निवेदन, अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्या‍त आले आहे.
या दिवशी महसूल, गृह, ग्रामविकास, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभागाचे जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकूण घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल.
न्याय प्रविष्ट, राजस्व तसेच अपील, सेवाविषयक, आस्थापना विषयक तसेच विहीत नमुन्यात नसलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार असलेले अर्ज, तक्रार निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे नसेल तर असे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. अर्ज स्विकृतीसाठी विहीत नमुन्यात तसेच तक्रार व निवेदन वैयक्तीक स्वरुपाचेच असावे. अर्जदाराने विहीत नमुन्यात 15 दिवस अगोदर दोन प्रतींमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय येथे अर्ज पाठविणे आवश्यक आहे. तालुकास्तरावर अर्ज दिल्यानंतर एक महिन्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय येथे लोकशाही दिनामध्ये अर्ज करता येणार आहे.
लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील ज्या प्रकरणात कालावधी लागणार आहे अशा प्रकरणी पुढील महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या उपक्रमात मागील अर्जावर कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे.
0000
वंचित घटकांना सोई-सवलती
देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड दि. 28 :- वंचित घटकांना विविध प्रकारच्‍या सोई-सवलती देऊन त्‍यांचे जीवनमान उंचवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले. "वंचित घटकांना दिलासा" याबाबत करावयाच्‍या उपाययोजनेची बैठक जिल्‍हाधिकारी अरुण डोंगरे यांचे अध्‍यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांचे निजी कक्षात आज संपन्न झाली.  
यावेळी अपर जिल्‍हाधिकारी संतोष पाटील, जिल्‍हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, सहाय्यक जिल्‍हा पुरवठा अधिकारी संतोषी देवकुळे, सहाय्यक प्रकल्‍प अधिकारी, सहाय्यक नियोजन अधिकारी, महिला  बाल विकास अधिकारी, डीईओ, महिला आर्थिक विकास महामंडळ, समाज कल्‍याण अधिकारी, मॅनेजर, एनडब्‍ल्‍युसीएमसी आदी विभागाचे प्रमुख उपस्थित होते.  
वंचित घटाकांसाठी नांदेड तालुक्यातील सांगवी बु. व लोहा येथील दोन गावांचे सर्वेक्षण करुन वंचितांची यादी तयार करण्‍यात आली आहे. त्यानुसार वंचित घटकातील मुलांना शिक्षणासाठी अंगणवाडीत पाठविणे, आरोग्‍य सुविधा, रोजगार विषयक प्रशिक्षण, ज्‍या कुटुंबाना घर नाही त्‍यांना घरकुल देणे, शिधापत्रिका, जात प्रमाणपत्र, अन्नधान्य आदी सुविधांबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना यावेळी सुचना देण्यात आल्या. जिल्‍हा पुरवठा अधिकारी यांनी अन्‍नधान्‍य उपलब्‍ध करुन देण्‍यात येत असल्‍याचे सांगितले. बाल विकास प्रकल्‍प अधिकारी यांना अंगणवाडीसाठी प्रस्‍ताव सादर करण्याबाबत सुचना देण्यात आली.  

000000
महिला मेळाव्याचे बुधवारी आयोजन ;
बचतगटातील उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री 
नांदेड दि. 28 :- सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचे भव्य प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे आयोजन बुधवार 3 जानेवारी 2018 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह नांदेड येथे दुपारी 12.30 ते 3.30 यावेळेत करण्यात आले आहे, असे माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी चंदनसिंग राठोड यांनी कळविले आहे.
 बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला योग्य बाजारपेठ मिळावे तसेच बाजारपेठेतील आर्थिक व्यवहाराची माहिती मिळावी यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय नांदेड मार्फत राबविण्यात येणाऱ्या तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण योजना, अल्पसंख्याक महिला सक्षमीकरण योजना व राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियानांतर्गत जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 181 गावात 2 हजार 246 महिला बचतगटाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये 25 हजार 935 महिलांचे संघटन करण्यात आले आहे. स्थापन बचत गटातील महिलांना विविध पायाभुत प्रशिक्षण देऊन बँकेमार्फत कर्ज मिळवून देण्यात येते. या मिळालेल्या कर्जाच्या माध्यमातून महिला शेतीवर व बिगर शेतीवर उद्योग करीत आहेत. या कार्यक्रमास ग्रामीण व नागरी भागातून महिला उपस्थित राहणार आहेत, असे माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
000000
तुर, कापुस, हरभरा
पिकाचा कृषि संदेश
नांदेड दि. 28 :- तूर, कापूस, हरभरा पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण या प्रकल्पांतर्गत नांदेड कृषि उपविभागातील नांदेड, मुदखेड, अर्धापूर, लोहा, कंधार या पाच  तालुक्यात काम सुरु आहे. शेतकऱ्यांना पुढीलप्रमाणे किडीपासून संरक्षणासाठी कृषि संदेश दिला आहे.
डिसेंबरमध्ये कपाशीची वेचणी करुन समुळ उच्चाटन करावे. काढणी नंतर पऱ्हाटीची साठवण शेताच्या शेजारी करु नये. शेतातील पिकांचे अवशेष वेचुन जाळुन टाकावेत. तूर- शेंग माशी आणि पिसारी पतंगच्या नियंत्रणासाठी क्युनॉलफॉस 25 इसी 30 मिली किंवा क्लोरॅनट्रनिलप्रोल 20 एस.सी. 3 मिली प्रती 10 लिटर पाणी फवारणी करावी. हरभरा- घाटेअळीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनट्रनिलप्रोल 18.5 एस. सी. 2.5 मिली प्रती 10 लिटर पाणी, फवारणी करावी किंवा एनएसई 5 टक्के फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.
000000
केळी पिकाचा कृषि संदेश
नांदेड दि. 28 :- मुदखेड व अर्धापूर तालुक्यातील केळी पिक संरक्षणासाठी कृषि संदेश पुढील प्रमाणे देण्यात आला आहे. केळी पिकांवर कार्बेन्डॅझिमची दुसरी फवारणी केल्यानंतर पानावरील पिवळ्या ठिपक्यांचा रंग तपकिरी होतो. नंतर प्रोपीकोनेझॉल या किटकनाशकाची 0.1 टक्के 1 ग्रॅम प्रती लिटर पाण्यात 1 मिली स्टीकर टाकून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी डॉ. व्ही. व्ही. भरगंडे यांनी केले आहे.

000000

समाज कल्याण कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन   नांदेड दि. 26 जानेवारी : भारताचा 76 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी रोजी स...