Tuesday, December 13, 2022

 जिल्ह्यातील 3 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहचेल राष्ट्रप्रेमासह

साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व फतेसिंघजी यांच्या शौर्याची गाथा

- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत  

 

·   वीर बाल दिवसाचे निमित्त येत्या 25 व 26 डिसेंबरला

नांदेड येथे विशेष उपक्रमाचे आयोजन

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :-  साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा बाबा फतेसिंघजी यांच्या शौर्याची गाथा देशातील सर्वांसाठी प्रेरणादायी असून ही गाथा सर्वदूर पोहचण्यासाठी 26 डिसेंबर हा वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. यादृष्टिने नांदेड येथील जगातील सर्व शिखांचे श्रद्धास्थान असलेल्या तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वाराचे महत्व अधोरेखीत करून जिल्ह्यात हा वीर बाल दिवस अधिक व्यापक प्रमाणात येत्या 25 व 26 डिसेंबर रोजी साजरा केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. महाराष्ट्र शासन, पर्यटन विभाग, तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वारा यांच्या  संयुक्त विद्यमाने हा वीर बाल दिवस आपण साजरा केला जात आहे. यानिमित्त गुरूद्वारा येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

 

यावेळी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वाराचे मुख्य प्रशासक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील 3 लाख विद्यार्थ्यांपर्यंत राष्ट्रप्रेमासह साहिब जादा बाबा जोरावरसिंघ व फतेसिंघ यांच्या शौर्याची गाथा पोहचविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व शाळांसाठी निबंध स्पर्धासारखे उपक्रम हाती घेतले आहेत. जिल्ह्यातील सुमारे 3 लाख विद्यार्थ्यांपर्यंत या उपक्रमांच्या माध्यमातून धैर्य आणि साहस याचा संदेश पोहचविला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. या दोन दिवसीय समारंभाच्या निमित्ताने मुख्य समारंभास राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा व वरिष्ठ अधिकारी यांना निमंत्रीत केले जात आहे. याचबरोबर जिल्ह्यातील सर्व सन्माननिय लोकप्रतिनिधींनाही निमंत्रित करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

साहिबजादा बाबा जोरावर सिंघजी व साहिबजादा बाबा फतेसिंघजी यांच्या बलिदानात धैर्य आहे. वीर बालदिवस त्याच निष्ठेने व सद्भावनेने नांदेड जिल्ह्यात व्यापक प्रमाणात साजरा होत असल्याचा आम्हाला अधिक आनंद आहे. गुरूद्वारा बोर्ड शासनाच्यासमवेत अत्यंत आत्मविश्वासाने यात सहभागी होत असून शालेय ‍विद्यार्थ्यांना यातून प्रेरणा मिळेल असे तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरूद्वाराचे मुख्य प्रशासक डॉ. परविंदरसिंघ पसरीचा यांनी सांगितले.

 

असे आहेत उपक्रम   

 शिखांचे दहावे गुरु श्री गुरुगोंविदसिंघजी यांच्या पुत्रानी धैर्य आणि साहस दाखवून जे वीरमरण पत्करलेल्या धैर्याचेसाहसाचे मूल्यसंवेदनाशालेय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यादृष्टीने नियोजन केले आहे.नांदेड जिल्ह्यात सुमारे 2 हजार 197 शाळा आहेत. या शाळामध्ये 2 लाख 87 हजार विद्यार्थी आहेत. निबंध स्पर्धारॅली आदी उपक्रमाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांच्या मनात वीर साहिब जाबा यांनी दाखविलेल्या धैर्याचासंवेदनाचा विचार त्यांच्यापर्यत पोहचावा यादृष्टीने नियोजन केले आहे.

 

दिनांक 25 व 26 डिसेंबर 2022 रोजी दोन दिवस विविध उपक्रमातून शौर्य आणि साहसावर आधारित नांदेड येथे विविध उपक्रम आपण हाती घेतले आहे. महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग आणि गुरुद्वारा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेतलेल्या उपक्रमात पारंपारिक पंजाबी क्रिडा प्रकारगटका खेळ हे आकर्षण असेल. यातील कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे.

 

कार्यक्रमाची रूपरेषा

दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत  वीर बाल दिवसाची प्रासंगिकता विषयावर परिसंवाद. प्रमुख वक्ते संरजीत पातर, प्रसिद्ध लेखक तथा अध्यक्ष पंजाब कला परिषद, डॉ. जसपालसिंघ, माजी कुलगुरू पंजाब विद्यापीठ पटियाला. राजन खन्ना, माजी अध्यक्ष पंजाबी साहित्य अकॅडमी महाराष्ट्र  स्थळ श्री गुरूग्रंथ साहिब भवन, पहिला मजला, नांदेड.  सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजेपर्यंत पंजाबी पारंपारिक क्रीडा गटका / मार्शल आर्ट वीर खालसा दल स्थळ बंदाघाट, नांदेड येथे.  

 

रात्री 8.30 ते 12 वाजेपर्यंत शबद कीर्तन सहभाग भाई रविंदर सिंघ, भाई बलविंदर सिंघ, भाई तेजिंदर सिंघ, बाबा बंता सिंघजी मुंडा पिंड वाले, कथा वाचक. स्थळ श्री गुरूग्रंथ साहिब भवन, नांदेड. रात्री 8  ते 8.50 वाजेपर्यंत शीख इतिहासावर आधारीत लेझर शो, स्थळ गोबिंदबाग नांदेड.


 दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत सुमारे 3 हजार विद्यार्थ्यांची भव्य रॅलीचे आयोजन स्थळ आयटीआय ते श्री गुरूद्वारा नांदेड. प्रमुख आकर्षण जबलपुर येथील बँड पथक सकाळी 9 ते 11 वाजेपर्यंत वीर बाल दिवस विशेष समारंभ, जिल्हास्तरीय वकृत्त्व स्पर्धा बक्षिस वितरण उद्घाटन व रक्तदान शिबीर. स्थळ  श्री गुरूग्रंथ साहिब भवन जवळ नांदेड.  सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजेपर्यंत पंजाबी पारंपारिक क्रीडा गटका / मार्शल आर्ट वीर खालसा दल स्थळ बंदाघाट, नांदेड येथे.  रात्री 8.30 ते 12 वाजेपर्यंत शबद कीर्तन सहभाग भाई रविंदर सिंघ, भाई बलविंदर सिंघ, भाई तेजिंदर सिंघ, बाबा बंता सिंघजी मुंडा पिंड वाले, कथा वाचक स्थळ  श्री गुरूग्रंथ साहिब भवन, नांदेड येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

00000

नदी साक्षरतेसाठी सर्व संबंधित विभाग

नदीगटांसमवेत मिशन मोडवर घेतील सहभाग   

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

   चला जाणूया नदीला अभियानाची आढावा बैठक संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- चला जाणूया नदीला अभियान नदीसाक्षरतेच्या दृष्टिकोणातून अत्यंत महत्वाचे आहे. नदीची मालकी ही प्रत्येकाची असून जिल्ह्यातील मांजरा, लेंडीमन्याडआसनापैनगंगासिताकयाधू या नदीवर पूर्वीपासून अनेक अनुभवी संस्था काम करत आहेत. या संस्थासमवेत कृषिसिंचनमृदसंधारणसामाजिक वनिकरणतहसिलपंचायत समिती आदी तालुका पातळीवरील कार्यालय प्रमुखांनी मिशनमोडवर यात आपला सहभाग दिला पाहिजे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.

 

चला जाणुया नदीला अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीची आढावा बैठक आज त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी उपवनसंरक्षक अधिकारी केशव वाबळे, सगरोळी येथील संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुखजयाजी पाईकरावबालासाहेब शेंबोलीकर, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळेनांदेड पाटबंधारे विभाग (दक्षिण) चे कार्यकारी अभियंता अशिष चौगलेलेंडी प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता वि. पा. तिडके, कार्यकारी अभियंता अभय जगताप, भूजल संरक्षण विकास यंत्रणाचे शिवकिरण धाडेसहयोगी प्राध्यापक डॉ. एन. एच. कुलकर्णीमांजरा नदी समन्वयक दिपक मोरताळे, कयाधु नदी समन्वयक दयानंद कदम, यादव बोरगावकर, कैलाश येसगे, वसंत रावणगावकर, शिवाजी देशपांडे, आसना नदी समन्वयक प्रा. डॉ. परमेश्वर पौळ आदी मान्यवर उपस्थित होते.

 

लोकांच्या मनात आपल्या गाव कुसातून वाहणाऱ्या नदीप्रती नेमक्या कोणत्या भावना आहेत हे या अभियानाच्या निमित्ताने जाणून घेतले पाहिजे. याचबरोबर नदीच्या स्वास्थाबाबत व पर्यावरण संतुलनाबाबत ते कोणत्या पद्धतीने आवडीनुसार मदत करण्यास तत्पर आहेत हेही जाणुन घेणे महत्वाचे आहे. प्रत्येक नागरिकांच्या मनात आपल्या गावशिवारात असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्ती विषयी जो पर्यंत आस्था निर्माण होणार नाही तो पर्यंत त्यांचा कृतीशील सहभाग यात घेता येणार नाहीअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले.

 

चला जाणुया नदीला या अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीच्या मदतीला व कार्याला सहकार्य व्हावे या उद्देशाने त्या-त्या नदी गटाप्रमाणे तालुकास्तरीय वेगळी उपसमिती नेमून त्यात तालुकास्तरीय अधिकाऱ्यांसह शैक्षणिकसामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना सहभागी करून घेतले जाईलअसे त्यांनी स्पष्ट केले. हे अभियान जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शालेय पातळीवर निबंध स्पर्धाएनएसएसएनसीसीस्काउट आदी विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाईल. विद्यार्थ्यांच्या मनातही नदीचे नेमके आरोग्य कसे आहे याची उकल व्हावी व शालेय शिक्षणापासूनच नदीप्रती आस्था निर्माण व्हावी यादृष्टिने नदी सहलींचे आयोजन करण्याबाबत संबंधित शैक्षणिक संस्थांना निर्देश दिले जातीलअसे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सांगितले.

 

यावेळी आसना नदीचे समन्वयक  डॉ. परमेश्वर पौळ यांनी सचित्र सादरीकरण करून आसना नदीगटाने केलेल्या कामाचा आढावा सादर केला. अधिकाधिक लोकसहभाग घेण्यासाठी आध्यात्मिक व लोकांच्या भावनांशी जुळलेल्या माध्यमातून पोहचण्याचे नियोजन त्यांनी सादर केले. वसंत रावणगावकर यांनी लेंडी नदीबाबत तर मन्याड नदीबाबत शिवाजी देशपांडे यांनी अभ्यासपूर्ण सादरीकरण केले. दिपक मोरताळे यांनी नदी प्रदुषणावर सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

00000 









 साहस आणि धैर्यासमवेत युवकांनी व्यक्तीमत्व

जडण-घडणावर अधिक लक्ष देण्याची गरज

-         जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

 

·         राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक कॅम्पचा समारोप  

 

नांदेड (जिमाका) दि. 13  :- राष्ट्रीय छात्रसेना ही एकता आण‍ि अनुशासन या ब्रिदवाक्याला अनुसरून शालेय शिक्षणापासून युवकांसाठी मोलाचे कार्य करत आहे. विद्यार्थ्यांच्या मनात देशाच्या सुरक्षिततेसंदर्भात जबाबदारीची भावना निर्माण करणे, सैन्यदलाविषयी आवड निर्माण करणे, देशाप्रती आदर, निष्ठा, प्रेम असलेले सहासी युवक तयार करण्यात राष्ट्रीय छात्रसेनेचा गौरवपूर्ण उल्लेख करावा लागेल. साहस आणि धैर्यासमवेत व्यक्तीगत पातळीवर आपल्या व्यक्तीमत्वाची जडणघडण यात होत असल्याने अधिकाधिक युवकांनी नागरिक म्हणून आपली जबाबदार भुमिका निभावण्यासाठी अधिक तत्पर व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

 

मुगट येथे माता साहिब गुरूद्वारा परिसरात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रशिक्षण कॉम्पच्या समारोप समारंभात ते बोलत होते. यावेळी 20 महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेनेचे प्रमुख कर्नल एम. रंगाराव यांची उपस्थिती होती.

 

राष्ट्रीय छात्रसेना लष्करा सारखा कडक युनिफॉर्म, कडक शिस्त, धाडसीवृत्ती व युद्ध प्रसंगी रणमैदानात उतरण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळून देते. 26 नोव्हेंबर 1948 ला विशेष कायदा मंजूर करून एनसीसीची स्थापना करण्यात आली आहे. सन 1965 आणि 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धात एनसीसीच्या छात्रांपैकी अनेकांनी प्रत्यक्ष युद्धातही सहभाग घेतला असल्याची माहिती कर्नल एम. रंगाराव यांनी दिली.

 

या वार्षिक प्रशिक्षण कॅम्पमध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी संदीप निमसे, बालाजी जाधव यांनी रस्ता सुरक्षा संदर्भात विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले. याचबरोबर पर्यावरण व इतर सामाजिक विषयावर लेफ्टनंन प्रशांत सराफ, अशो‍क शिंदे, सोपान साबळे, सुनिल भोसीकर, सुखदा नवशिंदे, देविदास ढवळे, मनिष कुलकर्णी आदींनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास गुजराथी हायस्कूल नांदेडचे मुख्याध्यापक रवी सुमठानकर, दामशेठ यांची उपस्थिती होती.

00000




 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बेरोजगार

उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

नांदेड (जिमाका) दि. 13 :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मागदर्शन केंद्राच्यावतीने नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी गुरुवार 15 डिसेंबर 2022 रोजी महास्वयंम या संकेतस्थळावरून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.  नामांकित कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना या मेळाव्यात रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. किमान शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी व कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या रोजगार मेळाव्यास जास्तीत जास्त ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या  http://mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर रोजगार इच्छुक उमेदवारांना जॉब सिकर या लिंकवर नोंदणी करावी. जॉब सिकर ऑप्शन या लिंकवर क्लिक करुन आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे. रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून फिल्टर या बटणावर क्लिक करावे. नांदेड जिल्हा पंडित दीनदयाल उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा दिसेल. त्यातील Action या पर्यायाखाली दोन बटणापैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल. तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास एक संदेश येइ्रल. सदर संदेश काळजीपूर्वक वाचा व I Agree बटणावर क्लिक करावे व मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे  (पदाचे नावशैक्षणिक अर्हताआवश्यक कौशल्यअनुभववयोमर्यादाआरक्षण )दिसतील. आपल्या शैक्षणिक पात्रतावयोमर्यादाअनुभवकौशल्ये यानुसार पदाची निवड करावी व  अप्लाय बटणावर क्लिक करावे. आपल्याला एक संदेश दिसेलसदर संदेश काळजीपुर्वक वाचा व ओके बटणावर क्लिक करावे. आपला रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसेल. कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप, व्हॉटसॲप फोन ई. व्दारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील. अधिक माहितीसाठी रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचा  दुरध्वनी क्रमांक 02462-251674 किंवा nandeddrojgar@gmail.com वर संपर्क साधावा, असेही आवाहन रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

000000

 राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन व सप्ताह साजरा करण्याचे निर्देश 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन 14 डिसेंबर आणि ऊर्जा संवर्धन सप्ताह 14 ते 20 डिसेंबर या कालावधीत साजरा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व कार्यालयाना दिले आहेत.


ऊर्जा संवर्धन दिन व सप्ताह साजरा करतांना ऊर्जा संवर्धनाची प्रतिज्ञा द्यावी. तसेच विविध प्रसिध्दीमाध्यमातून जनजागृती, शालेय स्तरावर ऊर्जा संवर्धन विषयांतर्गत निबंध, चित्रकला स्पर्धेचे आयोजन करावे. ऊर्जा संवर्धन कायद्यातर्गंत उद्योगक्षेत्रातील पथनिर्देशित ग्राहकांकडून हा आठवडा साजरा करण्यात येणार आहे. तसेच या आठवड्या दरम्यान विविध क्षेत्रासाठी जनजागृतीपर कार्यक्रमांचे उपक्रम राबवून ऊर्जा दिन व सप्ताह साजरा करण्याच्याही सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने दिल्या आहेत.

0000

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य कृषि प्रदर्शनाचे आयोजन


कृषि विभागामार्फत कृषिनिष्ठ पुरस्काराचे होणार वितरण

नांदेड (जिमाका) दि. 13 :- श्रीक्षेत्र माळेगांव यात्रेनिमीत्त जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत माळेगांव येथे कृषि प्रदर्शन, फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे. तसेच सन 2021-22 व 2022-23 या वर्षामध्ये कृषि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे सन 2021-22 चे 16 व 2022-23 चे 16 असे एकूण 32 शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून साडीचोळी, शॉल, फेटा, मोमेन्टो देऊन करण्यात येणार आहे, असे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी डॉ.टी.जी. चिमणशेट्टे यांनी कळविले आहे.

जिल्हा परिषदेच्या कृषि विभागामार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी, विविध कृषि औजारे, ट्रॅक्टर, यंत्रे, सुक्ष्म सिंचन, कृषी विज्ञान केंद्रामार्फत माती परिक्षण प्रयोगशाळा, कृषि विद्यापीठ, कृषि विभाग, सेंद्रीय शेती, देशी वाण, किटकनाशके वापराबाबत मार्गदर्शन इत्यादी बाबतचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये बियाणे कंपन्याकडून विविध पिकांचे लाईव्ह सॅम्पल ठेवण्यात येणार आहे. यात्रेचा कालावघी 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2022 आहे. 22 डिसेंबर 2022 रोजी मान्यवरांच्या हस्ते कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन होणार असून कृषिनिष्ठ पुरस्काराचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. स्टॉल सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील. या दरम्यान बहुतांश यात्रेकरू व शेतकरी स्टॉलला मोठया प्रमाणात भेटी देतात. उत्पादनाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याची व सुधारीत तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसिध्दी करण्याची संधी या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

कृषि विभागामार्फत जिल्हास्तरीय फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच फळे,मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शनाचा स्टॉल उभारण्यात येतो. या प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे व भाजीपाला पिकविणारे शेतकरी भाजीपाला व फळे पिकांचे उत्कृष्ट नमुने प्रर्दशनात ठेवतील. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्यांच्या नमुन्यातून प्रत्येक वाणातुन उत्कृष्ट नमुन्यास प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येईल. विजेत्या शेतकऱ्यांना रोख बक्षिस व प्रमाणपत्रही देण्यात येईल.

जिल्हास्तरीय फळे,भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून त्यात प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना अनुक्रमे 4 हजार रुपये, 3 हजार रुपये व 2 हजार रुपये याप्रमाणे बक्षीस देण्याचे नियोजन आहे. स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर मोहीम अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात कृषि विद्यापीठ प्रतिनिधी, तालुका कृषि अधिकारी लोहा, तंत्र अधिकारी, कृषि अधिकारी पंचायत समिती लोहा यांचा समावेश आहे. सोमवार 26 डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते कृषि प्रदर्शनात भाग घेतलेल्या विविध कंपन्यापैकी प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक प्राप्त करणाऱ्या कंपन्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात येणार आहे असेही कृषि विभागाच्यावतीने कळविले आहे.

0000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...