Monday, March 6, 2023

 आदिवासी सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी प्रशिक्षण  

नांदेड (जिमाका) दि. 6 :- आदिवासी उमेदवारांसाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र किनवट या  प्रशिक्षण केंद्रात 1 एप्रिल 2023 पासून विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांना प्रवेश देण्यात येणार आहेत. या प्रशिक्षण सत्रात नोकऱ्यांसाठी विविध स्पर्धा परिक्षांची तयारी करून घेण्यात येते. पात्र इच्छुक आदिवासी (अनुसूचित जमातीचे) उमेदवारांनी मंगळवार 28 मार्च 2023  पर्यंत शैक्षणीक व जातीचे प्रमाणपत्राच्या सत्यप्रतीसह अर्ज करावेत, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी किनवट यांनी केले आहे. 

 

आदिवासी उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या इतर खात्याच्या स्वयंरोजगार योजनांची माहिती देवून मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षण केंद्रात 1 एप्रिल 2023 पासून सुरू होणाऱ्या 105 च्या प्रशिक्षण सत्रात आदिवासी सुशिक्षीत बेरोजगार उमेदवारांना विविध स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी प्रवेश देण्यासाठी उमेदवारांनी 28 मार्च 2023 तत्पुर्वी या कार्यालयास पोहचतील अशा बेताने आदिवासी (अनुसूचीत जमातीचे) उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी या पत्त्यावर आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या बाजुला शासकीय तंत्र प्रशाला केंद्र गोकुंदा ता. किनवट जि. नांदेड संपर्क दुरध्वनी क्रमांक 02469-221801/ 9881524643 / 7620304096 संपर्क करावा, असेही कळविले आहे. 

 

या प्रवेशाच्या अटी पुढीलप्रमाणे आहेत. उमेदवार अनुसूचित जमाती पैकी (एस.टी.) प्रवर्गातील असावेत. नांदेड जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील उमेदवारांचाही प्रवेशासाठी विचार करण्यात येईल. उमेदवार कमीत कमी शालांत परीक्षा उतीर्ण असावेत. उच्च शैक्षणिक पात्रतेस प्राधान्य देण्यात येईल. उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालयात नाव नोंदणी केलेली असावी. उमेदवारांनी किनवट येथे स्वत: रहाण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चाने करावी लागेल. प्रशिक्षण कालावधी 3 महीने 15 दिवस असून शालांत परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना तसेच पदवीधारकांना दरमहा 1 हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. वयोमर्यादा - उमेदवाराचे वय 31 मार्च 2023 रोजी 18 वर्ष पुर्ण असावे व 35 वर्षापेक्षा जास्त नसावे. प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन संबंधित प्रशिक्षणार्थीचे बँक खात्यामध्ये दरमहा जमा करण्यात येणार असल्यामुळे प्रशिक्षणार्थींचे बँक खाते चालू असणे आवश्यक आहे. आपण यापुर्वी अशाप्रकारचे प्रशिक्षण घेतलेले असल्यास किंवा सदर प्रशिक्षण सत्र अर्ध्यातुन सोडलेले असल्यास प्रवेश देण्यात येणार नाही, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

 नांदेड जिल्हा कृषी महोत्सवास उदंड प्रतिसाद

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- राज्य शासनाचा कृषी विभाग, आत्मा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने नांदेड येथे दिनांक 1 ते 5 मार्च 2023 रोजी भव्य असा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात जवळपास 300 स्टॉल धारकांनी सहभाग घेतला. यामध्ये विशेषतः कृषी निविष्ठाधारक, ठिबक/तुषार कंपनीचे तसेच शेतीसाठी आवश्यक औजारे, मशिनरीचे स्टॉल व इतर कृषी संलग्न विभागांचे स्टॉल लावण्यात आले होते. रविवार 5 मार्च रोजी या कार्यक्रमाला समारोपीय समारंभासाठी आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार  मोहनअण्णा हंबर्डे  यांची उपस्थिती होती.

 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सहभागी शेतकरी स्टॉल धारक, महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी यांना प्रमाणपत्राचे वितरण करून त्यांचा गौरव करण्यात आला. समारोपीय कार्यक्रमात आमदार राम पाटील रातोळीकर यांनी शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान माहिती होण्याकरिता या महोत्सवाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त केले. आमदार मोहनआण्णा हंबर्डे यांनी शेतकऱ्यांना विक्री करता कायमस्वरूपी शेतकरी मॉल उभारण्याची संकल्पना मांडली व त्याकरिता पाठपुरावा करून निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. उत्कृष्ट आयोजनाबाबत सर्व मान्यवरांनी कृषि विभागाचे कौतुक करून अशा पद्धतीचा कृषी महोत्सव भविष्यात सतत व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

 

महोत्सवात आपला शेतमाल विक्री करता शेतकरी महिला बचतगट, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरीगट यांनी आणला होता. यामधून सुमारे एक कोटी रुपये किंमतीची उलाढाल झाली असून जवळपास 20 लाख किंमतीचा शेतमालाचे ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे. सलग पाच दिवस चाललेल्या  महोत्सवामध्ये  विविध विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. याकरिता उत्कृष्ट मान्यवर वक्ते मार्गदर्शनांसाठी लाभले असून शेतकरी व महिलांचा  चांगला प्रतिसाद दिसून आला. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे औचित्य साधून पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 70 उत्सुक महिलांनी आपला सहभाग नोंदवून आपली पाककला सादर केली.

00000



 हैद्राबाद मुक्ती लढ्याच्या अमृत महोत्सवानिमित्त

जिल्ह्यातील ऐतिहासिक गावांमध्ये विशेष उपक्रम

-    खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर

 

·   एप्रिल महिन्यापासून वंदेमातरम् चळवळीने होईल उपक्रमांचा शुभारंभ

·   जिल्हा नियोजन सभागृहात खासदार चिखलीकरांच्या अध्यक्षतेखाली

समितीतील सदस्यांची व्यापक बैठक

·  युवापिढी पर्यंत हैद्राबाद मुक्तीचा इतिहास पोहचविण्यावर असेल भर

 

नांदेड (जिमाका) दि. 6 :- मराठवाडा मुक्तीचा लढा हा निजामाच्या बेबंदशाहीतून मुक्तीचा लढा होता. हा लढा स्वातंत्र्यासाठीचा लढा होता. या लढ्याला धार्मिक, पक्षीय भेद नव्हते. आपल्या हजारो माय-माऊलीनीही मराठवाड्याच्या मुक्तीसाठी यात स्वत: झोकून दिले. जो लोकसहभाग त्यावेळी सर्व जात, धर्म, पंथ यातील भेदाभेद विसरुन लोकांनी दिला त्याला तोड नाही. त्यांच्या योगदानाला अधोरखित करण्यासाठी, स्वातंत्र्य सैनिक, ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी जिल्ह्यातील ऐतिहासिक गावांमध्ये विशेष उपक्रम घेतले जातील, अशी घोषणा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केली.

 

येथील जिल्हा नियोजन सभागृहात मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवच्या नियोजन समितीची बैठक खासदार चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता राजपुत, उपवनसंरक्षक वाबळे, प्रभारी उपजिल्हाधिकारी कोलगणे, प्रविण साले, व्यंकटराव गोजेगावकर, समितीतील सदस्य संपादक शंतनू डोईफोडे, पत्रकार विजय जोशी, चारुदत्त चौधरी, प्रल्हाद उमाटे, ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मण संगेवार, सान्वी जेठवाणी, संजय जोशी, रत्नाकर अपस्तंभ, प्रा. कौसल्ये, शाहीर रमेश गिरी, गोडबोले आदी मान्यवर उपस्थित होते.  

 

मराठवाडा मुक्तीचा हा अमृत महोत्सव अधिक लोकाभिमुख व्हावा, लोकसहभाग अधिकाधिक व्हावा या उद्देशाने आजच्या बैठकीत एक उपसमिती गठन करण्यात आली. या समितीच्या समन्वयकपदी जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे इतर सदस्यांसमवेत काम पाहतील. एप्रिल महिन्यात वंदेमातरम् चळवळीची मुर्हतमेढ रोवली गेली होती. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ यांनी निजामाच्या अत्याचाराला धुडकावून टाकण्यासाठी वंदेमातरम् सामुहिकरीत्या औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात हॉस्टेलमध्ये गायले. याची गाथा नव्यापिढीपर्यंत पोहचावी यासाठी विविध उपक्रम मार्च-एप्रिल पासून प्रस्तावित करण्याचे ठरले.

समितीतील सदस्यांनी हा अमृत महोत्सव अधिक सर्वसमावेशक व्हावा यासाठी स्वत:हून पुढे यावे व वेळ द्यावा, असे आवाहन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले.

 

मानव विकास निर्देशांकानुसार कारखानदारी, सेवाक्षेत्र, पंतप्रधान आवास योजना आणि शाळांची उपलब्धता यात गुणांच्या आधारावर नांदेड लोकसत्ता जिल्हा निर्देशांक पुरस्कार जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना मिळाल्याबद्दल त्यांचा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पत्रकार विजय जोशी यांनी बैठकीत याबाबत सुचना मांडली होती.

0000 







  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...