Thursday, October 28, 2021

 नांदेड जिल्ह्यात 6 व्यक्ती कोरोना बाधित तर 3 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 796 अहवालापैकी 6 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 6 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 394 एवढी झाली असून यातील 87 हजार 712 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 30 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 4, धर्माबाद 1, नायगाव 1 असे एकुण 6  बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 3 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1, किनवट कोविड रुग्णालय 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 30 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 6, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 14, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 6, खाजगी रुग्णालय 4 अशा एकुण 30 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 52 हजार 735

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 49 हजार 102

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 314

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 712

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-30

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 अवैद्य सावकारी व्यवसाय केल्याबद्दल योगेश चौधरी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :-  धर्माबाद येथे अवैध सावकारी  व्यवसाय केल्याबदल योगेश पांडुरंग चौधरी यांच्या विरूध्द धर्माबाद पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. अवैध सावकारी व्यवसाय करीत असल्याचे लक्षात येताच सहायक निबंधक कार्यालयाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 16  अन्वये पथक नियुक्त करून त्यांच्या घराची झडती घेतली.

4 ऑक्टोबर 2021 रोजी घेतलेल्या झडतीमध्ये 2008 ते 2021 या कालावधीतील शेकडा 3 ते 5 टक्के व्याज  दराने रक्कमा दिल्याच्या नोंदी असलेल्या वह्या हिशोबाच्या चिट्टया आणि प्रामोसरी नोट इत्यादी कागदपत्रे आढळुन आले. महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 अन्वये वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारीचा व्यवसाय करत असेल त्या व्यक्तीला कारावासाची किंवा द्रव्यदंडाची दोन्ही शिक्षा करण्यात येतील अशी तरतूद आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, विभागीय सहकारी संस्थेचे सहनिबंधक सचिन रावळ यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 7 जून 2021 च्या प्राप्त अर्जानुसार करण्यात आली आहे.

000000

 सरदार वल्लभाई पटेल यांची जयंती 31 ऑक्टोबर रोजी 

नांदेड, (जिमाका) दि. 28 :- सरदार वल्लभाई पटेल यांच्या जयंती दिनानिमित्त राष्ट्रीय एकता दिवस 31 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्याबाबतच्या सूचना निर्गमित केल्या आहे. 

रविवार 31 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यांच्या मुख्यालयाच्या ठिकाणी व शासकीय व निमशासकीय कार्यालयामध्ये घ्यावयाच्या कार्यक्रमाबाबत केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रसार रोखण्याबाबत आवश्यक ती खबरदारी घेवून कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना पत्रकाव्दारे देण्यात आल्या आहे.

00000

 कार्यालयांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक

मास्क न वापरणाऱ्यांना हजार रूपयांचा होईल दंड  

नांदेड, (जिमाका) दि. 28 :- जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी व आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. तसेच शासकीय व निमशासकीय, खाजगी कार्यालयातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत. 

जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांनी करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या  लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आरोग्य विभागाच्या समन्वयाने आयोजित करून लसीकरण पूर्ण करण्याची  जबाबदारी कार्यालय प्रमुखांवर देण्यात आली आहे. 

सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजा दरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशित करतील. 

सर्व कार्यालय व कार्यालयाचा आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत आहे. विनामास्क वावरणाऱ्या व्यक्तीना 1 हजार रुपये दंड आकारण्याचा अधिकार हा सक्षम प्राधिकारी यांचा राहील. या दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी  महसूल जम (सी) इतर करा व्यतिरिक्त महसूल (एक) सर्वसाधारण सेवा ००७०-इतर प्रशासनिक सेवा ८०० इतर जमा रक्कम (Revenue Receipt (c) Other non-Tax Revenue, (1) General services0070-Other, Administrative Services 800 Other Receipts) या लेखाशीर्षाखालील असलेल्या जमा सांकेतांक खाली भरणा करतील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

0000

 31 ऑक्टोंबर राष्ट्रीय संकल्प दिवस साजरा करण्याच्या सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 28 :- दरवर्षीप्रमाणे स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त 31 ऑक्टोंबर हा दिवस राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून पाळण्यात यावा असे निर्देश शासनाने दिले आहेत.   

जिल्ह्यात राष्ट्रीय संकल्प दिनानिमित्त मेळावे/रॅलीज स्थानिक प्रशासनाने आयोजित करावे. या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय गीत, देशभक्तीपर गीत, भाषण, स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या भाषणातील उतारे वाचने, तसेच सर्व धर्मीय लोकांचा, सर्व राजकीय पक्षांचा आणि युवक नेत्यांचा सहभाग असावा. जिल्ह्यात 90-देगलूर विधानसभा पोट निवडणूकीची आचारसंहिता लागू असल्याने या कार्यक्रमामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही यांची दक्षता घेण्यात यावी असेही उपजिल्हाधिकारी नांदेड यांनी कळविले आहे. सर्व कार्यालयानी कोविड-19 चा प्रादुर्भावामूळे शासनामार्फत वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी, असेही प्रसिद्धीपत्रकान्वये कळविले आहे.

0000

मूग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 28:- चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबिन या पिकाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी पिकपेरा नोंद असलेला सातबारा उतारा, आधारकार्ड व राष्ट्रीयकृत बँक खाते असलेला पासबुक प्रत (खाते क्रमांक हस्तलिखित नसावा) इ. कागदपत्रे शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देवून नोंदणी करावी, असे आवाहन  जिल्हा पणन अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे. 

किमान आधारभूत किंमत खरेदी अंतर्गत हंगाम 2021-22 मध्ये हमीभावाने मूग, उडीद, सोयाबिन खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, लोहा, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, जाहुर (ता. मुखेड), गणेशपूर (ता. किनवट) या ठिकाणी मार्केटींग फेडरेशन मार्फत मूग, उडीद, सोयाबिन ऑनलाईन शेतकरी नोंदणी 15 ऑक्टोंबर 2021 पासून सुरु करण्यात आली आहे. 28 ऑक्टोंबर 2021 ते 25 जानेवारी 2022 या कालावधीत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची मूग, उडीद, सोयाबीन खरेदीला सुरवात होणार आहे. हंगाम 2021-22 साठी मूग-7 हजार 275, उडीद- 6 हजार 300, सोयाबिन-3 हजार 950 प्रती क्विंटल आधारभूत दर राहतील, असेही प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.    

0000


आरोग्यवर्धक दिपावलीसाठी ज्यांनी लस घेतली नाही त्या येणाऱ्या नातेवाईकांसह नांदेडकरांनाही लसीकरणासाठी घ्यावा पुढाकार

- जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर 

नांदेड, (जिमाका) 28 :- जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शासनातर्फे लसीकरणावर मोठ्या प्रमाणात भर दिला असून जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणा यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. येत्या काळात सर्वांच्या मनात आनंद पेरणारा दिवाळी व इतर सण असल्याने स्वाभाविकच इतर ठिकाणावरून नातेवाईक येण्याची शक्यता अधिक आहे. अशा स्थितीत नांदेड जिल्ह्यातील रहिवासीयांनी सर्वांची दिवाळी आरोग्यवर्धक होण्यासाठी जर लसीकरण करून घेतले नसेल तर त्यासाठी पुढे येऊन लसीकरण करुन घेणे अधिक हिताचे आहे. याचबरोबर येणाऱ्या नातेवाईकांचे जर लसीकरण झाले नसेल तर त्यांनाही लसीकरण करुन घेणे बंधनकारक असल्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी स्पष्ट करुन आवाहन केले आहे. 

बाहेरील गावावरुन नांदेडमध्ये व जिल्ह्यात येणाऱ्या सर्व नांदेडकरांनी याबद्दल अधिक दक्षता घेतली पाहिजे. ज्यांना नांदेड सोडून बाहेरगावी जायचे आहे त्यांनीही लसीकरण करुनच बाहेर गेले पाहिजे, असेही शासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, स्त्री रुग्णालय, मनपा रुग्णालय, नगरपालिका रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, नागरी दवाखाणे, आयुर्वेद व युनानी दवाखाणे, ग्रामपंचायत कार्यालय, अंगणवाडी केंद्र या ठिकाणी दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत 24 तास लसीकरण सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिली आहे. हे लसीकरण दिवसभर चालू राहिल, असे स्पष्ट करुन त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन करण्यासमवेत कायदेशीर ताकीदही दिली आहे.

0000


  वृत्त क्र.  432   नविन   पाच   इंटरसेप्टर वाहनांद्वारे   रस्ता सुरक्षा  विषयी  प्रबोधन   ·       रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी होणार मद...