Thursday, October 28, 2021

 कार्यालयांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक

मास्क न वापरणाऱ्यांना हजार रूपयांचा होईल दंड  

नांदेड, (जिमाका) दि. 28 :- जिल्हास्तरावरुन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी व आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. तसेच शासकीय व निमशासकीय, खाजगी कार्यालयातील कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत  जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी आदेश निर्गमित केले आहेत. 

जिल्ह्यातील सर्व शासकीय-निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुखांनी करून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या  लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करुन कार्यालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आरोग्य विभागाच्या समन्वयाने आयोजित करून लसीकरण पूर्ण करण्याची  जबाबदारी कार्यालय प्रमुखांवर देण्यात आली आहे. 

सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजा दरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करुन घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधित विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशित करतील. 

सर्व कार्यालय व कार्यालयाचा आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत आहे. विनामास्क वावरणाऱ्या व्यक्तीना 1 हजार रुपये दंड आकारण्याचा अधिकार हा सक्षम प्राधिकारी यांचा राहील. या दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाचे आहरण व संवितरण अधिकारी  महसूल जम (सी) इतर करा व्यतिरिक्त महसूल (एक) सर्वसाधारण सेवा ००७०-इतर प्रशासनिक सेवा ८०० इतर जमा रक्कम (Revenue Receipt (c) Other non-Tax Revenue, (1) General services0070-Other, Administrative Services 800 Other Receipts) या लेखाशीर्षाखालील असलेल्या जमा सांकेतांक खाली भरणा करतील, असेही आदेशात स्पष्ट केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...