Wednesday, June 3, 2020


शेतकऱ्यांनी बियाणे, खते, किटकनाशके
अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करुन पावती घ्यावी
नांदेड (जिमाका) दि. 3 :- शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे, खते, किटकनाशके खरेदी करुन न विसरता पावती घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी माधुरी उदावंत व विश्वास अधापुरे कृषी अधिकारी पंचायत समिती धर्माबाद यांनी केले आहे.
बनावट / भेसळ युक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडून पावतीसह खरेदी करा. खरेदी केलेल्या बियाण्याचे वेस्टन किंवा पिशवी, टॅग खरेदीची पावती व त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकीट सीलबंद / मोहर बंद असल्याची खात्री करा. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पाकिटावरील अंतिम मुदत पाहून घ्या. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. किटकनाशके अंतिम मुदतीच्या आतील असल्याची खात्री करा. कृषी निविष्ठा विषयी असलेल्या अडचणी तक्रारी सोडवण्यासाठी मार्गदर्शनासाठी कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषि अधिकारी धर्माबाद यांनी केले आहे.
00000


जिल्ह्यात रुग्णांची संख्या 23 ने वाढली
सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सतत हात धुणे अत्यावश्यक
नांदेड (जिमाका) दि. 3 :- कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत आज तब्बल 23 रुग्ण संख्येची वाढ झाली असून नागरिकांनी काटेकोर दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णात नांदेड येथील देगलूर नाका व शिवाजीनगर परिसरातील 21 व्यक्ती, देगलूर तालुक्यातील आमदापूर व मुखेड तालुक्यातील भेंडेगाव येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे. या 23 रुग्णांपैकी 20 वर्षाखालील 12 व्यक्ती तर उरलेले 11 व्यक्ती हे 35 वर्षाच्या आतील आहेत. जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता 175 वर पोहचली आहे. यापैकी बरे झालेली रुग्ण संख्या 124 आहे.  
वाढत्या संख्येला अधिक घाबरुन न जाता जनतेने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळून सतत हात धुणे व मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येक व्यक्तींने आपल्या वर्तनात बदल करुन स्वत: सुरक्षितेची अधिक काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे. रोजच्या जीवनात आपण ज्या काही वस्तू बाहेरुन आणतो त्याची योग्य ती स्वच्छता केली पाहिजे. भाजीपाला घेतल्यास तो स्वच्छ करुन किमान 12 तास न वापरता स्वच्छ जागी ठेवून आपल्या आहाराप्रतीही अधिक सजग राहिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
जिल्ह्यात बुधवार 3 जून रोजी सायं. 5 वा. प्राप्त झालेल्या 238 अहवालापैकी 193 निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. नवीन 23 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील एकुण रुग्ण संख्या आता 175 झाली आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथील 1 व पंजाब भवन यात्री निवास येथील 2 रुग्ण असे एकुण 3 रुग्ण आज बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत रुग्णालयात 43 रुग्णांवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली औषधोपचार सुरु आहेत. त्यातील 3 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात 52 65 वर्षांच्या दोन स्त्री रुग्ण तर 38 वर्षाचा एक पुरुष रुग्ण आहे.
आतापर्यंत एकूण 175 रुग्णांपैकी 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून 124 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उर्वरित 43 रुग्णांपैकी डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 8 रुग्ण, एनआरआय यात्री निवास कोविड केअर सेंटर येथे 30 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे 3 रुग्ण, उपजिल्हा रुग्णालय देगलूर आणि मुंबई येथे संदर्भित करण्यात आलेला प्रत्येकी एक रुग्ण आहे.
कोरोना विषयी जिल्ह्याची संक्षीप्त माहिती पुढील प्रमाणे आहे. सर्वेक्षण- 1 लाख 41 हजार 434, घेतलेले स्वॅब 4 हजार 264, निगेटिव्ह स्वॅब 3 हजार 739, आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या 23, एकुण पॉझिटिव्ह रुग्ण 175, स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या 164, स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या 51, मृत्यू संख्या 8, रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या 124, रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण 43, स्वॅब तपासणी चालू रुग्ण संख्या 130 एवढी आहे.
दिनांक 2 जून रोजी प्रलंबित असलेल्या 267 स्वॅब तपासणी अहवालापैकी 238 तपासणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित 19 अहवाल आज रात्री उशिरापर्यंत प्राप्त होतील. 3 जून रोजी 111 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहेत. त्यांचे अहवाल उद्या सायंकाळी पर्यंत प्राप्त होतील.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन नांदेडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
00000

रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणीचे प्रात्यक्षिक



नांदेड (जिमाका) दि. 3 :- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत गंगाबेट गावाची सन 2020-21 साठी निवड करण्यात आली. गंगाबेट गावामध्ये प्रक्षेत्रावर रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणीचा प्रात्यक्षिक कार्यक्रम आज आयोजीत करण्यात आला होता.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्या मार्गदर्शनाखाली गावांमध्ये या प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन असून त्याचाच एक भाग म्हणून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
     यावेळी नांदेड उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी.  सुखदेव यांनी शेतकऱ्यांना रुंद सरी वरंबा पद्धतीद्वारे पेरणी केल्याने एकरी आठ ते दहा किलो बियाण्याची बचत होते. जमिनीतील अतिरिक्त पाण्याचा सरी मधून निचरा होतो. अवर्षण प्रवण कालावधीत पिकांस ओलावा उपलब्ध होतो. सोयाबीन पिकांची वाढ झाल्यास फवारत असताना सापा पासून संरक्षण मिळते असे सांगितले.
नांदेड तालुका कृषी अधिकारी बी. एस. शिंगाडे यांनी ट्रॅक्टरवरील बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध नसताना तिफणीने तीन ते चार ओळीनंतर एक सरी पाडावी. बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असे सांगितले.
नांदेड तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी आनंदराव तिडके यांनी प्रत्यक्ष ट्रॅक्टरवर बीबीएफद्वारे (रुंद सरी वरंबा) पेरणीचे प्रात्यक्षिक करुन दाखवले. शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करुन पेरणी करावी. बीज प्रक्रिया मुळे बुरशीजन्य रोगांचा प्रार्दुभाव कमी होतो. उगवण चांगली होते असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
या कार्यक्रमाचे आयोजन मंडळ कृषी अधिकारी एस. एम. सावंत, गंगाबेटचे कृषी सहायक वसंत जारीकोटे, समूह सहायक बेग ए. एम. यांचेकडून शेतकरी वीरभद्र अडगावकर यांच्या शेतावर करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमास कृषी सहायक भंडारे चंद्रकांत, गंगाबेटचे सरपंच संभाजी गोडबोले, पोलीस पाटील शिवाजी सोनटक्के, उपसरपंच बसवेश्वर मुक्तापुरे, तंटामुक्ती अध्यक्ष कोंडीबा सोनटक्के, वीरभद्र अडगावकर, लहूसोनटक्के, बळीराम सोनटक्के, राधाकिशन गोडबोले, महेश सोनटक्के, सदाशिव सोनटक्के, गजानन मोरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत जारीकोटे यांनी केले तर आभार समूह सहायक बेग यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बसवेश्वर मुक्तपुरे, लहू सोनटक्के, वीरभद्र अडगावकर आदींनी प्रयत्न केले.
00000

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...