Tuesday, July 13, 2021

 

पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा दौरा 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. 

बुधवार 14 जुलै 2021 रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी 9.30 वा. नांदेड विमानतळ येथे आगमन व धनेगावकडे मोटारीने प्रयाण. सकाळी 9.50 वा. कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या समाधी स्थळावर पुष्पांजली अर्पण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- धनेगाव. सकाळी 10.30 वा. नांदेड जिल्हा व शहर काँग्रेस कमिटी व दैनिक लोकमत तर्फे आयोजित रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट स्थळ- भक्ती लॉन्स नांदेड. सकाळी 11.20 वा. कै. डॉ. शंकरराव चव्हाण पुतळ्याला पुष्पांजली अर्पण कार्यक्रमास उपस्थिती स्थळ- डॉ. शंकरराव चव्हाण मेमोरियल नांदेड. सकाळी 11.30 वा. कै. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंती निमित्त दैनिक सत्यप्रभा तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ- कुसूम सभागृह नांदेड. दुपारी 1.30 वा. उर्दू घर इमारतीच्या उद्घाटन सोहळा कार्यक्रमास उपस्थिती स्थळ –उर्दू घर मदिना तुल उलूम शाळेजवळ देगलूर नाका नांदेड. सोईनुसार देगलूर नाका येथून वाहनाने नांदेड निवासस्थानाकडे प्रयाण करतील.

00000

 

जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- नांदेड जिल्ह्यात 28 जुलै 2021 च्या मध्यरात्री पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहणार आहे, अशी माहिती अपर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 14 जुलै रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 28 जुलै 2021 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहिल. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.

अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी, सभा, मिरवणुका, मोर्चा काढणे, ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक नांदेड यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.

0000

 

 

 

नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या उर्दू घर इमारतीचे 14 जुलै रोजी उद्घाटन

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- नांदेडच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या "उर्दू घर" इमारतीचे उद्घाटन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते बुधवार 14 जुलै 2021 रोजी होणार आहे. उर्दू घर मदिना तुल उलूम शाळेजवळ, देगलूर नाका नांदेड येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे अल्पसंख्यांक विकास व औकाफ, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री नवाब मलिक हे असतील.

 

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे सहकार, कृषि, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, खासदार हेमंत पाटील, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार सुधाकर श्रृंगारे यांची उपस्थिती राहील. याचबरोबर विधान परिषद सदस्य आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहनराव हंबर्डे, भिमराव केराम, आमदार माधवराव पाटील-जवळगावकर, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार राजेश पवार, महापौर सौ. मोहिनी येवनकर, अल्पसंख्यांक विकास विभागाचे अपर मुख्य सचिव श्रीमती जयश्री मुखर्जी, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांच्यासह विविध मान्यवर, ऊर्दू साहित्यिक, ऊर्दू प्रेमी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. कोविड-19 प्रादुर्भाव लक्षात घेता या उद्घाटन सोहळ्यास निमंत्रीतांनाच प्रवेश राहिल.  

00000

 

मध केंद्र योजना आणि मधमाशा पालनसाठी     

पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

                        

नांदेड (जिमाका) दि. 13:- महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मध माशापालन) संपुर्ण राज्यात कार्यान्वीत झालेली आहे. यासाठी पात्र व्यक्ती,  संस्थाकडुन पुढील दर्शविल्याप्रमाणे अर्ज मागविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय औद्योगिक वसाहत उद्योग भवन शिवाजीनगर नांदेड 02462-240674 / 9921563053 या कार्यालयास व कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

 

मध उद्योगांचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वारुपात 50 टक्के अनुदान 50 टक्के स्वगुतवणुक शासनाच्या हमी भावाने मध खरेदी/ विशेष छंद प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण संवंर्धनाची जनजागृती करणे हे योजनेचे वैशिष्ट्ये आहेत. अर्जदार साक्षर असावा स्वता:ची शेती असल्यास प्राधान्य वय 18 वर्षापेक्षा जास्त, 10 दिवस प्रशिक्षण घेणे अनिवार्य वैयक्तिक माधपाळ पात्रता आहे.

 

केंद्रचालक प्रगतिश मधपाळ व्यक्ति पात्रतेत किमान 10 वी पास वर्ष 21 पेक्षा जास्त असा व्यक्तिच्या नावे किमान किंवा त्या व्यक्तिच्या कुटुबातील कोणत्याही व्यक्तिच्या नावे किमान 1 एकर शेती जमीन किंवा भांडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशा पालन प्रजनन मध उत्पादन बाबतीत लोकाना प्रशिक्षण देण्याची क्षमता सुविधा असावी.

 

केंद्रचालक संस्था पात्रतेत संस्था नोदणीकृत असावी संस्थेच्या नांवे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान 1 हजार चौ. फुट सुयोग्य इमारत असावी. तसेच 1 एकर शेत जमिन स्वमालकीची, भाडयाने घेतलेली असावी  संस्थेकडे माशा पालन प्रजनन मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण  देण्याची क्षमता असलेले सेवक असावीत. या अटी व शर्तीप्रमाणे लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहुन देणे अनिवार्य राहील. मंडळाने निश्चीत केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

00000

 

महाडीबीटी पोर्टलवर लाभार्थ्यांना कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- ज्या लाभार्थ्यांची लॉटरीद्वारे निवड झालेली आहे. परंतु त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत. अशानी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत. सद्यस्थितीत विभागाने महाडीबीटी फार्मर या नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. याद्वारे कागदपत्रे अपलोड करणे सुलभ झाले आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी.चलवदे यांनी केले आहे. 

कृषि यांत्रिकीकरण घटकातर्गत विविध योजनेतून तसेच सुक्ष्म सिंचन या घटकातर्गत विविध योजनेतून   महाडीबीटी पोर्टलवर जिल्हयातील 9 हजार 722 लाभार्थींची निवड झालेली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांना लघु संदेश पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत फक्त 3 हजार 391 लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली आहेत. उर्वरित लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाहीत. निवड झालेल्या लाभार्थ्यांसाठी यांत्रिकीकरण घटकासाठी  आवश्यक असलेली कागदपत्रे सातबारा उतारा, 8 अ उतारा, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन व तपासणी अहवाल, अनुसूचित जाती,  अनुसूचित जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र आदी कागदपत्रे तसेच सुक्ष्म सिंचन घटकासाठी आवश्यक असलेली असलेली कागदपत्रे सातबारा उतारा, 8 अ उतारा, सिंचनाची स्रोत नोंद, अ.जाती, अ. जमाती प्रवर्गातून निवड झाल्यास वैध जात प्रमाणपत्र इ. कागदपत्रे अपलोड करावीत. 

ज्या लाभार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड केलेली आहेत त्यांना कागदपत्रे तपासून पूर्व संमती देण्यात आलेली आहे. सुक्ष्म सिंचन या घटकातर्गंत ज्या लाभार्थ्यांना पूर्व संमती मिळूनही सुक्ष्म संच कार्यन्वित केले नाहीत. अशा शेतकऱ्यांनी सुक्ष्म संच प्रक्षेत्रावर कार्यान्वित करुनच देयके अपलोड करावीत. मुदत देऊन विहित कालावधीत कागदपत्रे अपलोड न केल्यास असे अर्ज महाडीबीटी पोर्टल मधून अर्ज रद्द होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

00000

सुधारित वृत्त

 

दारातील कोविड लसीकरणामुळे जेव्हा सारे किन्नर भावूक होतात ! 

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची विशेष मोहिम 

नांदेड (जिमाका) दि. 13:- मला जन्म कुणी दिला हे माहित नाही. माझी गुरु सांगते तुला आमच्यापाशी कुणीतरी आणून टाकले. तिचीच सेवा करत मी मोठी झाले. लहानपणी स्वाभाविकच मलाही खेळायचे प्रचंड वेड होते. सोबतची मुले कधी मला गोल्या म्हणायचे, कोणी मामू म्हणायचे तर कोणी खूप काही. मला काही त्यांचे त्यावेळी वाईट वाटायचे नाही. मी त्यांचे कधी वाईट वाटून घेतलेही नाही. माझ्यातल्याच गुरुने मला मोठे केले. माझे नाव विचाराल तर तसे मलाही नक्की सांगता येणार नाही. प्रत्येक माणसाने मला वेगळे नाव दिले आहे. 

मला विविध सणांसह गणपतीची खूप आवड. एक छोटा गणपती मी असाच एका दुकानदाराकडून मागून घेतला. विकत नाही. आम्ही थोडीच काही विकत घेतो ? या गणपतीमुळे मला कुणीतरी गौरी असे नाव दिले. मलाही हे नाव सगळया नावापेक्षा जास्त भावले. तेंव्हापासून मग मी गौरी झाले. कोरोना लसीकरणाच्या निमित्ताने समाज आणि किन्नर यातील एक-एक पदर गौरी उलगडून दाखवत होती. 

माझ्यासारख्या अनेक गौरी आणि त्यांचे दु:ख सारखेच आहे. हे पाहून आम्हाला आता याचे कुणालाच काही वाटत नाही. समाज आम्हाला काही कमी करतो अशातला भाग नाही. आमच्या वेदना घेवून आम्ही जगतो. एकमेकींचे मन आम्ही एकमेकीना बिनधास्त लाखोळी वाहूनही हलके करुन घेतो. समाज जे काही म्हणायचे आहे ते आम्हाला म्हणत राहतो, त्यामूळे आम्ही त्यांची फारशी पर्वाही करत नाही. वारंवार शल्य मात्र एकाच गोष्टीचे राहते ते म्हणजे सरकार दप्तरी आवश्यक असणारी आमची ओळख !

आधार काढायला जावे तर नाव लागेल. नाव सांगायला जावे तर तलाठी किंवा ग्रामपंचायत अशा ठिकाणच्या नोंदी लागतील. वय सांगायला जावे तर जन्माचा दाखला किंवा टीसी लागेल. न आम्ही या कागदात मोडतो न त्या कागदात. आमची ही व्यथा जवळपास सर्वच गावात सारखी आहे. अनेक वर्षे झेललेल्या या व्यथेला आता राज्याच्या सामाजिक न्याय विभागातर्गंत एक अश्वासक चित्र आम्ही पाहत आहोत. इथले जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना या साऱ्या व्यथा आम्ही घेवून भेटलो. राहण्याच्या घरापासून ते स्मशानभूमीपर्यतचे आमचे प्रश्न त्यांनी शांततेत ऐकून घेतले. साधी कोरोनाची लस घ्यावी तर पुन्हा हा सरकारी दप्तरात आवश्यक असणारा ओळखीचा कागद अर्थात आधारकार्ड अथवा इतर ओळखपत्र देणे आवश्यक होते. 

शासनाने तृतीयपंथी तक्रार निवारण समिती नेमल्यामूळे आम्हाला आमच्या भावना मांडता आल्या. याचे अध्यक्ष स्वत: जिल्हाधिकारी असल्याने त्यांच्याशी थेट संपर्क झाला. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी यात अत्यंत प्रगल्भ अशी भूमिका निभावून लसीकरणाचा हा लाभ आमच्या वसतीत येवून दिला. याबद्दल गौरी विशेष आभार मानायला विसरली नाही. 

याचबरोबर समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. सुनिल लहाने, उपायुक्त अजितपालसिंह संधु, आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंघ बिसेन व त्यांची टिम, तत्परतेने पुढे झाल्याबद्दल गौरी शानुर बकश यांनी कृतज्ञतेने आभार मानले. यावेळी किन्नराची वरिष्ठ गुरु शानुर बाबु बकश यांची विशेष उपस्थिती होती. या लसीकरण कॅम्पच्या यशस्वीतेसाठी अर्चना शानूर बकश, रेश्मा बकश, शेजल बकश, दिपा बकश, कमल फाउडेशनचे अध्यक्ष अमरदिप दिगंबर गोधने, समाजकल्याण विभागाचे दिनेश दवणे, कैलास राठोड यांनी प्रयत्न केले.





0000

 

जिल्ह्यातील 62 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 62 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. बुधवार 14 जुलै 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रातील डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयात कोविशील्ड लसीचे 100 डोस तर शहरी दवाखाना हैदरबाग, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 12 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 80 डोस तर शहरी दवाखाना शिवाजीनगर व सिडको 2 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

तर श्री गुरु गोविंद सिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, रेल्वे हॉस्पिटल, पोर्णिमानगर, सांगवी, खडकपुरा, करबला, अरबगल्ली, तरोडा, विनायकनगर या 19 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, उमरी या 8 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर उपजिल्हा रुग्णालय हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर या 4 केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध आहेत.

 

उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.

 

जिल्ह्यात ग्रामीण भागातील 23 प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 100 डोस तर 5 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्ड लसीचे प्रत्येकी 50 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. 

 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

 

जिल्ह्यात 12 जुलै पर्यंत एकुण 6 लाख 89 हजार 836 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 13 जुलै पर्यंत कोविड-19 लसीचा साठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 5 लाख 53 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 79 हजार 360 डोस याप्रमाणे एकुण 7 लाख 32 हजार 390 डोस प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

 

नांदेड जिल्ह्यात 7 व्यक्ती कोरोना बाधित तर 6 कोरोना बाधित झाले बरे                                  

नांदेड (जिमाका) दि. 13 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 1 हजार 728 अहवालापैकी  7 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 5 तर अँटिजेन तपासणीद्वारे 2 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 91 हजार 339 एवढी झाली असून यातील 88 हजार 781 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 54 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 906 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 3, कंधार तालुक्यांतर्गत 2 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 1, नायगाव तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 7 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 6 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात लोहा तालुक्यांतर्गत 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरणातील 4 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 54 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 12,  किनवट कोविड रुग्णालय 1, हदगाव कोविड रुग्णालय 1, मुखेड कोविड रुग्णालय 3, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 22, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 11, खाजगी रुग्णालय 2 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 130, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 136 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 6 लाख 33 हजार 445

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 5 लाख 30 हजार 324

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 91 हजार 339

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 88 हजार 781

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 906

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.19 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-1

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-12

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-71

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-54

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1                       

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...