Thursday, June 3, 2021

सुधारित वृत्त

 

जागतिक पर्यावरण दिनापासून

लोकसहभागातून वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा शुभारंभ 

नांदेड, दि. (जिमाका) 3 :- दिवसेंदिवस वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा झालेला ऱ्हास हा आता सर्वांच्या लक्षात यायला लागलेला आहे. मागील काही वर्षांपासून पर्यावरण जनजागृती आणि वृक्षलागवड यासाठी अनेक सेवाभावी संस्था शासनासमवेत पुढे आले आहेत. तथापि वृक्षलागवडीची चळवळ ही आता कोविड-19 पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन सारख्या प्रश्नापासून नव्या भूमिकेतून पुढे जाणे गरजेचे आहे. बदलते संदर्भ लक्षात घेत औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत वृक्ष लागवड मोहिमेची चळवळ ही अधिकाधिक लोकसहभागातून प्रत्येकाच्या श्वासाशी निगडीत व्हावी यादृष्टिने येत्या 5 जून पासून संपूर्ण मराठवाडाभर राबविली जात आहे. अर्थात 5 जून जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक नागरिकाने किमान 3 वृक्ष लावून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन मराठवाडा विभागाचे आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी केले आहे. 

पर्यावरण संतूलनात लहान झूडपापासून मोठ्या वृक्षापर्यंत असलेली जैव विविधता, नदि, छोटे नाले, ओहोळ अर्थात नदिची परिसंस्था व या सर्वांचे तेवढेच महत्व असते. कोविड-19 च्या प्रादुर्भावानंतर ऑक्सिजनची निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता पुन्हा एकदा या आजाराने अप्रत्यक्ष प्रत्येक मानव जातीला निसर्गाकडे जबाबदारीने पाहण्याची व निसर्गाला आपल्याकडून पुन्हा काही वापस करण्याची संधी दिली आहे. मागील वर्षाच्या 30 जानेवारी पासून ते आतापर्यंत आपल्या देशात जवळपास 2.3 कोटी लोकांना बाधा होऊन गेली. यात 2.22 लाख लोकांना आपल्या प्राणास मुकावे लागले. अजूनही 34 लाख 78 हजार लोकांवर उपचार सुरु आहेत. यातील कित्येकजण मृत्यूशी झूंज देत आहेत. 

हा आजार आपल्या श्वसनयंत्रणेवर, शरिरातल्या ऑक्सिजनवर घाला घालणारा ठरल्यामुळे पुन्हा एकदा प्राणवायुचे मोल व त्याची किंमत आपल्या लक्षात आली आहे. पहिल्या लाटेत देशाला 28 हजार मे. टन कृत्रिम प्राण वायुची गरज प्रतिदिन पर्यंत पोहचली होती. दुसऱ्या लाटेत हीच गरज 5 हजार मेट्रीक टनपर्यंत पोहचली. 

कृत्रिम वायु हा जो हवेत उपलब्ध आहे तोच गोळा केला जातो, निर्माण केला जातो. काही प्रमाणात ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर वापर करुन स्थानिक पातळीवर थोडी बहुत गरज भागविली गेली. तथापि कृत्रिम माध्यमातून ऑक्सिजन निर्मिती ही अप्रत्यक्ष खर्चिक व न परवडणारी आहे हे लक्षात आले. निसर्गात निर्माण होणारे ऑक्सीजन / प्राणवायु हा वृक्षाच्याच माध्यमातून होतो. झाड केवळ शोभा देत नाही तर निसर्गातील प्रदुर्षण शोषून घेवून हवेमध्ये प्राणवायु सोडण्याचे काम करतो. एका व्यक्तीला वर्षभरात जेवढा प्राणवायू लागतो तेवढा 7 ते 8 वृक्षांच्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. 

निसर्गाची ही देण लक्षात घेता प्रत्येक नागरिकांनी वृक्ष लागवडीसाठी उर्त्स्फूत सहभाग घेवून येत्या 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या औचित्याने वृक्ष लागवडीच्या या महालोक सहभाग चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

00000

 

मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात कलम 144

नांदेड, दि. (जिमाका) 3 :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नदी पात्र परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत रहावी यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नदी पात्रातील परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून 20 मे 2021 पासून घोषित करण्यात आले आहे. त्याबाबत जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने आदेश निर्गमीत केले आहेत. 

फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करुन चतु:सिमा पुर्वेस वाजेगाव कोल्हापुरी बंधारा, पश्चिमेस नांदेड ते देगलूरकडे जाणाऱ्या रोडवरील जुना पूल, दक्षिणेस गोदावरीचे नदीचे पात्र आणि उत्तरेस चिल्ला / दर्गाची संरक्षण भिंत यामधील जागा 20 मे 2021 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते 19 जून 2021 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 प्रमाणे प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जिल्हादंडाधिकारी यांनी घोषित केले आहे. 

हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी, एक खिडकी पथकातील अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेल्या भाविकांना तसेच ज्यांना जिल्हाधिकारी नांदेड व पोलीस अधीक्षक नांदेड यांनी परवानगी दिली अशा व्यक्तींना लागू राहणार नाही.

00000

 

 

विहिरीचे पुनर्भरण संकल्पना आणि

तंत्रज्ञान या विषयावर वेबिनार संपन्न

नांदेड, दि. 3 (जिमाका) :- भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षे 2021 निमित्त विहिरीचे पुनर्भरण संकल्पना आणि तंत्रज्ञान या विषयावर वेबिनारचे आयोजन नुकतेच येथील भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्यावतीने करण्यात आले होते, अशी माहिती भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एस. बी. गायकवाड यांनी दिली.  

या व्याख्यानात भूजल पूनर्भरण विहीर व विंधन विहीर, छतावरील पाऊस पाणी संकलन व पूनर्भरण, नांदेड जिल्ह्याची संक्षिप्त माहिती व जलचक्र, पाणी तपासणी व पाणी गुणवत्ता, जलसंधारण उपाययोजना पारंपारिक व अपारंपारिक उपाययोजना, पाण्याचा ताळेबंद, पाणी टंचाई अहवाल, पाणी पुरवठा उद्भव सर्वेक्षण, भूजल मुल्यांकन व निरीक्षण विहीर व विंधन विहीर या विषयाचा समावेश होता. 

या वेबिनारमध्ये जिल्हा परिषदेचे उपमुख्य  कार्यकारी अधिकारी (रोहयो) व्ही. आर. पाटील, जिल्हा नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी श्रीमती चंदा रावळकर, मानवधिकार स्वयंसेवी संस्थेचे ॲड विष्णु गोडबोले, जिल्ह्यातील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रोहयो, रोजगार सहाय्यक तसेच विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.

00000

 

कोविड रुग्णालयाच्या प्राणवायू नलिका प्रणाली

तपासणी शासकिय तंत्रनिकेतनकडून पूर्ण

नांदेड, दि. (जिमाका) 3 :- राज्यातील कोविड हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या प्राणवायू नलिका व प्रणाली तपासून त्याबाबत त्रुटी आढळू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्देश दिले होते. या निर्देशानुसार राज्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. नांदेड जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालयातील तपासणी करुन घेण्याची जबाबदारी शासकिय तंत्रनिकेतन यांच्याकडे सोपवून तसा अहवाल देण्याचे निर्देश दिले होते. 

यानुसार नांदेड जिल्ह्यांतर्गत संपूर्ण कोविड हॉस्पिटलच्या तपासणीची जबाबदारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी येथील शासकिय तंत्रनिकेतनकडे ही जबाबदारी दिली. सदर काम चोख पार पाडण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली श्री गुरुगोविंद सिंघजी आभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्थेचे संचालक डॉ. यशवंत जोशी, शासकिय तंत्रनिकेतन, आयटीआयचे प्राचार्य यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीच्या मार्गदर्शनाखाली डॉ. एस. एस. चौधरी, डॉ. डी. जी. कोल्हटकर, डॉ. एस. व्ही. बेट्टेगिरी, व्ही. बी. उश्केवार, ए. बी. दमकोंडवार, पी. एस. लिंगे, जी. एम. बरबडे, बी. एस. फुलवळे, एस. ए. कुलकर्णी, डी. जी. चव्हाण, आर. डी. गेडेकर, एम. एम. मेश्राम यांच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात 59 शासकीय व खाजगी कोविड रुग्णालयातील प्राणवायु नलिका व यंत्रणेची तपासणी केली.

00000




 

नांदेड जिल्ह्यात 132 व्यक्ती कोरोना बाधित

तर 340 कोरोना बाधित झाले बरे  

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 66 अहवालापैकी  132 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 67 तर अँटिजेन तपासणीद्वारे 65अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 89 हजार 986 एवढी झाली असून यातील 86 हजार 800 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 799 रुग्ण उपचार घेत असून 25 बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 890 एवढी आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 27, हिमायतनगर 3, माहूर 1, परभणी 2, नांदेड ग्रामीण 16, कंधार 1, लोहा 2, किनवट 3, अर्धापूर 2, मुखेड 3, मुदखेड 1, हदगाव 2, नायगाव 1, हिंगोली 3 तर ॲन्टिजेन तपासणीमध्ये नांदेड मनपा क्षेत्रात 35, किनवट 2, लातूर 1, नांदेड ग्रामीण 11, मुदखेड 2, पुणे 1, हदगाव 2 , मुखेड 2, यवतमाळ 2, कंधार 2, नायगाव 2, हिंगोली 3 असे एकूण 132 बाधित आढळले. 

आज जिल्ह्यातील 340 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 5,  मुखेड कोविड रुग्णालय 8, लोहा कोविड रुग्णालय 1, हिमायतनगर तालुक्यातर्गंत 7, देगलूर कोविड रुग्णालय 2, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 4, किनवट कोविड रुग्णालय 2, भोकर तालुकयातर्गंत 1, उमरी तालुक्यातर्गंत 1, अर्धापूर तालुक्यातर्गंत 6, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 262, कंधार तालुक्यातर्गत 1, धर्माबाद तालुक्यातर्गत 1, खाजगी रुग्णालय 39 या व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 799 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी  13, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 3, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 37, माहूर कोविड केअर सेंटर 17, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 25, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर  8, देगलूर कोविड रुग्णालय 8,  नायगाव कोविड केअर सेंटर 1, उमरी कोविड केअर सेंटर 1,  हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 4, लोहा कोविड रुग्णालय 6,  भोकर कोविड केअर सेंटर 1,  देगलूर कोविड रुगणालय 7, बिलोली कोविड केअर सेंअर 6नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 381, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 216, खाजगी रुग्णालय 73 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

आज रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 122, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 118 खाटा उपलब्ध आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 5 लाख 49 हजार 844

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 48 हजार 643

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 89 हजार 986

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 86 हजार 800

एकुण मृत्यू संख्या-1 हजार 890

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.45 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-23

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-183

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 799

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-25

00000

 

लसीकरणासाठी दोन्ही गटातील व्यक्तींना

उपलब्धतेप्रमाणे मिळणार लस

जिल्ह्यातील 90 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण

 

नांदेड (जिमाका) दि. 3 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 90 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. कोव्हॅक्सीनची लस ही 18 ते 44 व 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींना दुसऱ्या डोससाठी देण्यात येणार आहे. दिनांक 4 जून रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे.

 

मनपा क्षेत्रात मोडणाऱ्या 7 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. या केंद्रात श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी व कौठा या 7 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस याठिकाणी 45 वर्षावरील व्यक्तींना दुसरा डोस प्राधान्याने दिला जाईल.

 

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 15 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. हे डोस प्राधान्याने 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दिले जातील.

 

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, हिमायतनगर, मांडवी, माहूर, मुदखेड, उमरी या 8 केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन देण्यात आले असून हे डोस दोन्ही वयोगटातील व्यक्तींसाठी आहेत. याचबरोबर ग्रामीण रुग्णालय नायगाव, कंधार, लोहा व उपजिल्हा रुग्णालय हदगाव या केंद्रावर कोव्हॅक्सीनचे अनुक्रमे 90,30,10 व 60 डोस उपलब्ध असून हे सुद्धा दोन्ही वयोगटातील व्यक्तींच्या दुसऱ्या डोसाठीच दिले जातील. जिल्ह्यात ग्रामीण भागातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध असून ही लस 45 वर्षावरील वयोगटातील व्यक्तींसाठी प्राधान्याने दिली जाईल. 

 

जिल्ह्यात 1 जून पर्यंत एकुण 4 लाख 36 हजार 819 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 3 जून पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 4 लाख 2 हजार 630 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 19 हजार 940 डोस याप्रमाणे एकुण 5 लाख 22 हजार 570 डोस प्राप्त झाले आहेत. कोविशील्डचे डोस 45 वर्षावरील व्यक्तींसाठी दुसऱ्या लसीकरणाला दिले आहेत. तर कोव्हॅक्सीनचे डोस हे 18 ते 44 वयोगट व 45 वर्षावरील (दुसरा डोस) वयोगटासाठी उपलब्ध आहे.

 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्याच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. मनपा कार्यक्षेत्रातील 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोव्हॅक्सिन या लसीच्या दुसऱ्या डोसकरीता cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. तसेच Appointment Session Site Confirm झाल्यानंतरच लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले. 

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...