Thursday, October 7, 2021

 खेळाडूसाठी जलतरण तलाव सुरु करण्याबाबत मार्गदर्शक सूचना 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- ब्रेक द चेन- राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी जलतरण तलाव सुरु करण्याबाबत मार्गदर्शन सूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केल्या आहेत. 

जलतरण तलावातील जलतरणासाठी मुभा देण्यात आलेले 18 वर्षावरील खेळाडू आणि व्यवस्थापन व कर्मचारी वृंद यांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्र घेऊन 14 दिवस पूर्ण झालेले असणे आवश्यक आहे. 18 वर्षाखालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरु न झाल्याने 18 वर्षाखालील वयोगटातील खेळाडूंच्या सरावासाठी संबंधित खेळाडूच्या पालकांचे संमतीपत्र व वयाचा पुरावा आधार कार्ड, आयकर विभागाने निर्गमीत केलेले पॅनकार्ड, वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र सोबत असणे आवश्यक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन आदेशासोबत जोडलेल्या जोडपत्रात नमूद करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तसेच अटी व शर्तीचे पालन करण्याच्या अधिन राहून जलतरण तलाव सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने कोरोनाबाबत निर्गमीत 6.10.2021 रोजीच्या आदेशानुसार नमूद सर्व अटी व शर्तीचे तंतोतंत पालन करावे, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.

000000

 निवडणूक कामासाठी नियुक्त पथक प्रमुखांना

विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक 

नांदेड (जिमाका) दि. 7 :-देगलूर विधानसभा पोटनिवडणूकीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (सन 1974 चा 2) कलम 21 अन्वये देगलूर विधानसभा मतदारसंघात निवडणूकीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या फिरते पथक 12 व स्थायी निगरानी पथक 22 यांच्या प्रमुखांना देगलूर विधानसभा कार्यक्षेत्रात 5 नोव्हेंबर 2021 पर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. या प्रकारे नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना संहितचे कलम 129, 133, 143 व 144 खाली अधिकार प्रदान केले आहे.

000000  

 मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी

शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरू 

नांदेड (जिमाका) दि. 7 :-  हंगाम 2021-22 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योनजेंतर्गत नाफेडच्यावतीने मूग, उडीद, सोयाबीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आली आहे. जिल्ह्यात नांदेड (अर्धापूर), मुखेड, हदगाव, लोहा, किनवट, बिलोली (कासराळी), देगलूर, जाहूर (मुखेड), गणेशपुर (किनवट) याठिकाणी मार्केटिंग फेडरेशनमार्फत मूग, उडीदची ऑनलाईन शेतकरी नोंदणी 5 ऑक्टोबर तर सोयाबीनसाठी ऑनलाईन शेतकरी नोंदणी 15 ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे. 

शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणीसाठी चालू हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन या पिकांचा ऑनलाईन पिकपेरा नोंद असलेला सात/बारा उतारा, आधारकार्ड, बॅकपासबूक आदी कागदपत्रे संबंधित तालुक्यातील खरेदी केंद्रावर देऊन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी नांदेड  यांनी केले आहे.

000000

 

 भोकर शहरातील रस्त्याचा पर्यायी मार्ग 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (भोकर) ते रेल्वे गेट नं 3 पर्यंत व वळण रस्ता हा सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी 12 ऑक्टोंबरच्या मध्यरात्री पर्यंत प्रतिबंध केला आहे. त्याऐवजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक (भोकर) ते बालाजी मंदीर ते लक्ष्मीनारायण हॉस्पिटल व राजलक्ष्मी निवास ते रेल्वेगेट वळण रस्त्याचा पर्यायी मार्ग म्हणून जाण्या-येण्यासाठी वापर करावा. 

या कालावधीत पोलीस विभागाने वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करावे. या आदेशाचे कोणी उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही पात्र राहील, अशी अधिसूचना जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 30 सप्टेंबर रोजी निर्गमीत केली आहे.

000000

नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित

तर 2 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 915 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे 1 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 332 एवढी झाली असून यातील 87 हजार 665 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 15 रुग्ण उपचार घेत असून 1 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 652 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात 1 व ॲटिजेन तपासणीद्वारे हदगाव तालुक्यांतर्गत 1 असे एकूण 2 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यात लोहा तालुक्यांतर्गत 1 व मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण अंतर्गत एका व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. आज 15 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 4, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 10, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरणात 1 व्यक्ती उपचार घेत आहेत. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 38 हजार 429

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 34 हजार 955

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 332

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 665

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 652

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-1

00000


 जिल्ह्यातील 103 केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण 

नांदेड (जिमाका) दि. 7 :- जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील 103 लसीकरण केंद्रावर कोविड-19 चे लसीकरण व्हावे यादृष्टिने उपलब्ध लस सर्वत्र विभागून पाठविली आहे. यात 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील व्यक्तींना कोव्हॅक्सीन व कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस उपलब्ध करुन दिला आहे. शुक्रवार 8 ऑक्टोंबर 2021 रोजी लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेली डोसची संख्या पुढीलप्रमाणे आहे. 

मनपा क्षेत्रातील श्री गुरु गोविंद जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकिय महाविद्यालय, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय, स्त्री रुग्णालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, दशमेश हॉस्पिटल, कौठा, श्रावस्तीनगर (विजयनगर), सिडको, पोर्णिमानगर, सांगवी, करबला, तरोडा, विनायकनगर, अरबगल्ली, खडकपुरा, रेल्वे हॉस्पिटल या 19 केंद्रावर कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत.   

शहरी भागात मोडणाऱ्या लसीकरण केंद्रावर उपलब्ध असलेले डोस पुढीलप्रमाणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय देगलूर, हदगाव, गोकुंदा, मुखेड, ग्रामीण रुग्णालय भोकर, बिलोली, धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, माहूर, मांडवी, लोहा, मुदखेड, बारड, नायगाव, उमरी या 16 केंद्रावर कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध आहेत. तर ग्रामीण भागात 68 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस देण्यात आले आहेत. 

वरील सर्व लसीकरण केंद्रावर 18 ते 44 वयोगटासह 45 वर्षावरील लाभार्थ्यांना कोविड-19 लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन किंवा लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. 

जिल्ह्यात 6 ऑक्टोंबर 2021 पर्यंत एकुण 15 लाख 71 हजार 340 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. नांदेड जिल्ह्यात 6 ऑक्टोंबर 2021 पर्यत कोविड लसींचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 13 लाख 47 हजार 30 डोस, कोव्हॅक्सीनचे 3 लाख 45हजार 120 डोस याप्रमाणे एकुण 16 लाख 92 हजार 150 डोस प्राप्त झाले आहेत. 

केंद्र शासनाच्या सूचनेनुसार कोविशिल्ड लसीचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे त्यांच्या 12 ते 16 आठवडे म्हणजेच सुमारे 84 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. जिल्ह्यातील सर्व कार्यक्षेत्रामध्ये कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस 18 ते 44 वयोगटासाठी व 45 वर्षावरील वयोगटासाठी पहिला व दुसरा डोस उपलब्ध राहील. यासाठी ऑनलाईन व ऑनस्पॉट नोंदणीची सुविधा उपलब्ध राहिल. मनपा कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना कोविशील्ड व कोव्हॅक्सीन लस घेण्यासाठी cowin.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी करणे अनिवार्य आहे. ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांचे संबंधित केंद्रावर लसीकरण करण्यात येईल. ऑनलाईन नोंदणीची वेळ सायंकाळी 6 पासून पुढे सुरु राहील. लसीचा उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभाग याचे नियोजन करेल. नागरिकांनी लसीच्या उपलब्धतेप्रमाणे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी केले.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...