Tuesday, September 28, 2021

 अन्न व्यावसायिकांना नोंदणी  प्रमाणपत्र घेण्यासाठी विशेष मोहिम 

नांदेड (जिमाका) दि. 28 : अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत अन्न व्यवसायिकांना परवाना नोंदणी प्रमाणपत्र घेण्याकरिता दिनांक 1 ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहिम राबविण्यात येत असून  ऑनलाईन पध्दतीने www.foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याचे आवाहन केले आहे.

कलम 31 नुसार अन्न व्यवसायिकांनी अन्नपदार्थ उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल रेस्टॉरंट, हातगाडी  विक्रेते, भाजी व फळे विक्रेते, ज्यूस  सेंटर, चिकन, मटन, अंडे विक्रेते, मिठाई विक्रेते, बेकरी व्यावसायिकांना व्यवसाय सुरु करण्यापूर्वी परवाना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.सदर कायद्यानुसार विनापरवाना व्यवसाय करणे हा फौजदारी गुन्हा असून यामध्ये सहा महिने शिक्षा व 5 लाखापर्यंत दंड आहे. 2011 मध्ये नमूद असलेल्या परवाना अट क्रमांक 14 नुसार प्रत्येक अन्नपदार्थ उत्पादक, वितरक व आयातदार यांनी केवळ परवानाधारक/नोंदणी धारक अन्न व्यवसायाकडून अन्नपदार्थाची खरेदी करणे व परवाना व नोंदणी असलेल्या व्यावसायिकाकडून अन्नपदार्थाची विक्री करणे बंधनकारक आहे. सदर अटीचे उल्लंघन केल्यास कलम 58 नुसार दोन लाखापर्यंत दंड होवू शकतो. ज्या व्यावसायिकांचे वार्षिक उलाढाल 12 लाख रुपये पर्यंत आहे त्यांना परवाना घेणे बधनकारक आहे.जिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांना तात्काळ परवाना/ नोंदणी करुन घेणे आवश्यक आहे. विनापरवाना व्यवसाय करताना आढळून आल्यास त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन परवाना प्राधिकारी सहायक आयुक्त नारायण सरकटे यांनी केले  आहे.

*****

 गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

नांदेड (जिमाका) दि. 28 :- विष्णुपूरी प्रकल्पातून सोडलेल्या विसर्गामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने नदीकाठच्या पैनगंगा, पूर्णा, मांजरा या नदीकाठच्या गावातील सर्व नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

विष्णपुरी प्रकल्पाच्या 10 दरव्याजातून 1,37,018 क्युसेक  विसर्ग सुरु आहे.  निम्न दुधना प्रकल्पातून  30,324 क्युसेक विसर्ग पूर्णा नदीपात्रात सुरु आहे. माजलगाव प्रकल्पातून 80,534 क्युसेक विसर्ग सुरु आहे. पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर  पाणलोट क्षेत्रात पूर्णा नदीत 23,300 क्युसेक  विसर्ग सुरु आहे. सिद्धेश्वर धरण परिसरात  मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पूर्णा ब्रीज जवळ 71,600 क्युसेक विसर्ग सुरु आहे. जुन्या पुलाजवळ पाणी पातळी 351.00 मी. एवढी आहे. इशारा पाणी पातळी 351.00 मी. तर धोका पातळी 354.00 मी. इतकी वाढली आहे. गोदावरी नदीतून विष्णुपूरी बंधाऱ्यात मागील प्रकल्पातून 3,00,000 क्युसेक विसर्ग टप्या टप्याने प्रवाहीत होणार आहे. त्यामुळे जुन्या पुलावरील धोक्याची पाणी पातळी 354.00 मी. ने वाढण्याची शक्यता आहे. इशारा पातळीचा विसर्ग 2,13,000 क्युसेक व धोका पातळीचा विसर्ग 3,09,774 क्युसेक आहे. 

उर्ध्व पैनगंगा धरण 100 टक्के भरल्याने धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने तेथील 11 दरवाजे उघडून 18,791 क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता बी.के.शेटे यांनी दिली आहे.

*****

 नांदेड जिल्ह्यात 2 व्यक्ती कोरोना बाधित तर 2 कोरोना बाधित झाले बरे

नांदेड (जिमाका) दि. 28 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 548 अहवालापैकी 2 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 2 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 318 एवढी झाली असून यातील 87 हजार 652 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 15 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 651 एवढी आहे. आजच्या बाधितामध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1, उमरी 1 असे एकुण 2  बाधित आढळले.

 

आज जिल्ह्यातील 2 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात माहूर तालुक्यांतर्गत 1, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृह विलगीकरण 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

 

आज 15 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 5,  नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 8, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 2, व्यक्ती उपचार घेत आहेत.

  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 31 हजार 642

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 28 हजार 293

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 318

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 652

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 651

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.4 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-02

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-15

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-4

00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...