Tuesday, February 11, 2025

वृत्त क्रमांक 170

जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार

बारावीच्या परिक्षा केंद्राची घेतली झाडाझडती

तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश 

तीन केंद्र प्रमुख व ८ पर्यवेक्षकांना कारणे दाखवा नोटीस

कॉपी पुरवणाऱ्या आठ जणांवर  पोलीस कारवाई 

                                                                                                                                                                     नांदेड दि. 11 फेब्रुवारी :- जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी रुजू झाल्यानंतर पहिली कारवाई बारावीच्या परिक्षेदरम्यान हलगर्जीपणा दाखविणाऱ्या केंद्र प्रमुखावर,पर्यवेक्षकावर केली आहे. सोबतच परिक्षा केंद्रात अनधिकृतपणे उपस्थित असणाऱ्या तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तर कॉपी पुरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे.

नांदेड जिल्ह्यात कोणत्याही केंद्रावर, कुठेही कॉपी करणाऱ्यांची हयगय करू नये, पोलिसांनी सक्त कारवाई करावी. शिक्षण विभागाने आवश्यक सुविधा पूर्ण कराव्यात अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज कंधार तालुक्यातील विविध परिक्षा केंद्राना भेटी दिल्या. यादरम्यान, परिक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा त्यांना आढळून आल्या नाहीत. या भेटीदरम्यान त्यांच्यासोबत शिक्षणाधिकारी माध्यमिक माधव सलगर उपस्थित होते. त्यांनी याबद्दल गंभीर आक्षेप घेतले असून शिक्षणाधिकाऱ्यांना भेटी दरम्यान तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. नोटीस बजावलेल्या केंद्र संचालकामध्ये भीमशंकर उच्च माध्यमिक विद्यालय, शिराढोण, ता. कंधार, श्री. गोविंदराव पाटील  उच्च माध्यमिक विद्यालय, चिखली ता. कंधार, नेताजी सुभाषचंद्र उच्च माध्यमिक विद्यालय, पानभोसी ता. कंधार यांचा समावेश आहे. 

याशिवाय परिक्षा केंद्रामध्ये कोणतीही जबाबदारी सोपवली नसताना उपस्थित असणाऱ्या तीन शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस, ज्युनियर कॉलेज पानभोसी येथील सहशिक्षक श्रीमती दहीहंडे गवळी, श्रीमती एम.ए. खान, लिपिक ए.यु.शेख यांचा समावेश आहे.

 याशिवाय परीक्षेदरम्यान नकला करण्यास मदत करणाऱ्या बाहेरील व्यक्ती श्रीनिवास अर्जून भुसेवाड, प्रणव अनिल टोम्पे, गणपत जळबा गायकवाड, दस्तगीर खमरोद्दीन, शिवाजी नारायण कदम रा. चिखली यांच्यावर भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 126 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. उस्मान नगर पोलीस ठाण्यात ही कारवाई करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर यांनी यासंदर्भात गुन्हे नोंदविले आहेत.

याशिवाय डी.जी.खरात, एस.एस. नरंगले, सी.डी.सोनटक्के, एस.जी.पाटील, ए.एस. जोगदंड, एम.जी.कांबळे, एस.एम. केंद्रे, एस.बी.गायकवाड या आठ पर्यवेक्षकांनी वर्गामध्ये स्वतः आय कार्ड न वापरणे, बैठक व्यवस्थेकडे दुर्लक्ष करणे, त्यांची आवश्यक तपासणी न करणे, याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत. 

जिल्ह्यामध्ये बारावीच्या परिक्षा सुरु होताना कोणती काळजी घ्यावी याबाबत स्पष्ट दिशा निर्देश असतात. केंद्र प्रमुखांनी विद्यार्थ्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध कराव्यात याबाबतही स्पष्ट सूचना दिल्या असतात. यामध्ये बैठक व्यवस्था उत्तम ठेवावी. संरक्षण भिंत नसलेल्या ठिकाणी चोख व्यवस्था ठेवावी. बाहेरील व्यक्ती आत येणार नाही याची काळजी घ्यावी. परिक्षा केंद्राच्या परिसरात अनधिकृत व्यक्तीची उपस्थिती राहू नये. कॉपी पुरविणाऱ्यांवर सक्त कारवाई करावी. परिक्षा केंद्राच्या ठिकाणचे सीसीटीव्ही सुरु ठेवावे. भरारी पथक व बैठे पथक अधिक सक्रीय असावेत, अशा सूचना दिल्या जातात. मात्र अनेक ठिकाणी गैरव्यवस्था आढळून आली.  त्यामुळे तातडीने आजच्या आज सर्व संबंधितावर कारवाई करण्यात आली आहे.

पुढील पेपरच्या आत व्यवस्था करा

विद्यार्थ्यांनी पेपर देताना त्यांना कोणत्या सुविधा असाव्यात, त्यांच्यासाठी आवश्यक बैठक व्यवस्था, डेस्क बेंचची उपलब्धता, पाणी स्वच्छतागृहांची व्यवस्था, अनावश्यक पक्षांना बंद ठेवण्याची दक्षता, परीक्षा केंद्र बाहेर जमाव राहणार नाही याची काळजी घेणे याबाबत कुठेही दुरावस्था दिसू नये अशी सक्त ताकीद दिली आहे. पुढच्या पेपरच्या वेळी पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी फेरी मारणार असून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.

भरारी पथकांवरच कारवाई करणार

जिल्ह्यामध्ये भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या पथकांची सक्रियता दर्शनी दिसायला हवी केवळ नियुक्तीसाठी ही पथके नसून केलेल्या कारवाईचे तातडीने रिपोर्टिंग झाले पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. अन्यथा पुढच्या पेपरच्या वेळी ज्या भागात अशी गैरव्यवस्था असेल ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे जमाव दिसतील त्या ठिकाणी केंद्रप्रमुख, भरारी पथक, पोलीस, महसूल व तालुक्यातील संबंधित सर्वांवर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

 तसेच पुढच्या पेपर पुर्वी सर्व व्यवस्था चोख ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. नांदेड जिल्ह्यात आजपासून 107 परीक्षा केंद्रावर बारावीची परिक्षा सुरु झाली आहे. आज इंग्रजीच्या पेपरला ४१ हजार८९८ पैकी ४० हजार ९५o विद्याथ्र्यांनी परीक्षा दिली. ९७.५२ टक्के उपस्थिती होती. या पार्श्वभूमीवर जिल्याह्त परीक्षा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे.  

00000




 

पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभिमान योजना



 #सुरक्षितइंटरनेटदिवस





सुशिक्षित बेरोजगारांसाठी #बीजभांडवलयोजना

 

 #बचतगटांना #मिनीट्रॅक्टर व त्याचे उपसाधने पुरवणारी #योजना




 विशेष लेख                                                                                  

अॅग्रीस्टॅक योजना आणि नांदेड जिल्ह्यात योजनेची प्रभावी अंमलबजावणी !

शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कृषी क्षेत्रात डिजिटल क्रांती घडवण्यासाठी शासनाने ‘अॅग्रीस्टॅक’ (AgriStack) ही योजना सुरू केली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना एक शेतकरी ओळखपत्र क्रमांक (फार्मर आयडी) दिला जात आहे. हा क्रमांक मिळाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या माहितीवर आधारीत विविध सरकारी योजनांचा लाभ सहज मिळणार आहे.

नांदेड जिल्ह्यात ‘अॅग्रीस्टॅक’ची प्रभावी अंमलबजावणी

नांदेड जिल्ह्यात कृषीक्षेत्र विस्तृत आहे आणि येथे लाखो शेतकरी विविध पिके घेतात. शासनाने नांदेडमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ची अंमलबजावणी प्रबळपणे सुरू केली आहे. जिल्ह्यातील सीएससी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर शेतकरी नोंदणी होत आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट अनुदाने, आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि शासकीय योजनांचा जलद लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

शेतकरी ओळखपत्र क्रमांकाचे महत्त्व आणि फायदे

थेट सरकारी अनुदान व आर्थिक मदत, पीएम किसान सन्मान निधी दरवर्षी 6 हजार रुपये थेट बँक खात्यात जमा, पीक विमा, कर्ज मंजुरी आणि कृषी अनुदाने  जलद प्रक्रिया, खत, बियाणे व औषधांसाठी अनुदानित दराने सुविधा देण्यात येणार आहेत.

आधुनिक शेती आणि डिजिटल मदत:

हवामान अंदाज आणि पीक सल्ला, मृदा परीक्षण व योग्य खत व्यवस्थापन, बाजारभाव आणि विक्री संधींची माहिती मिळते.

राज्य व केंद्र शासनाच्या कृषी योजनांमध्ये प्राधान्य :

नवीन कृषी यंत्रसामग्री व तंत्रज्ञान, सिंचन योजना, ठिंबक सिंचन, शेततळे, सेंद्रिय शेती प्रकल्प, गटशेती आणि शेतकऱ्यांसाठी विशेष सवलती मिळण्यास मदत होणार आहे.  

शेतकरी ओळखपत्र नोंदणी प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल क्रमांक, सातबारा उतारा (जमिनीचा दाखला) इ.

ही आहेत नोंदणी केंद्रे : सीएससी सेंटर (कॉमन सर्व्हिस सेंटर), आपले सरकार सेवा केंद्र नोंदणी मोफत असून, लवकरात लवकर करा !

नोंदणी पूर्णतः मोफत आहे. त्यामुळे कोणत्याही मध्यस्थाला पैसे देण्याची गरज नाही. अधिकृत केंद्रावर जाऊन आपली नोंदणी करून घेता येईल आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यास मदत होईल.

महत्त्वाची सूचना आपली कागदपत्रे नीट सांभाळा !

शासकीय योजनांचा लाभ घेताना खालील कागदपत्रे अत्यंत महत्त्वाची ठरणार आहेत. त्यामुळे ती वेळच्या वेळी अद्ययावत आणि सुरक्षित ठेवा.

महत्त्वाची कागदपत्रे: आधार कार्ड, पॅनकार्ड, शेतकरी ओळखपत्र क्रमांक, सातबारा उतारा, जात प्रमाणपत्र (जर आवश्यक असेल तर) यापैकी कोणतेही कागदपत्र हरवल्यास किंवा चुकीची माहिती असल्यास, शेतकऱ्यांना वेळेत दुरुस्त करून घ्यावी लागणार आहेत.

शेतकऱ्यांचा विकास – देशाचा विकास !

‘ॲग्रीस्टॅक’मुळे शेतकऱ्यांना अनेक योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. नांदेड जिल्ह्यात या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे हजारो शेतकऱ्यांना अनुदान, आधुनिक शेती माहिती आणि तांत्रिक मदत मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘अॅग्रीस्टॅक’योजनेत नोंदणी करुन फार्मर आयडी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेता येणार असून यामुळे त्यांच्या शेतीचे उत्पादन वाढणार आहे.

शेती समृद्ध झाली, तर देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल !

‘अॅग्रीस्टॅक’योजनेत नांदेड जिल्ह्यात आतापर्यत 87 हजार 377 शेतकऱ्यांची या योजनेत नावनोंदणी झाली आहे.  तर नांदेड जिल्ह्यात आतापर्यत 57 हजार 731 फार्मर आयडी तयार झाले आहेत.  

डॉ. सचिन खल्लाळ

उपविभागीय अधिकारी नांदेड

00000



  वृत्त क्रमांक 169

सेफर इंटरनेट डे - डिजिटल सुरक्षा व जबाबदारीच्या दिशेने एक पाऊल                                                       

नांदेड दि. 11 फेब्रुवारी :- आज सेफर इंटरनेट डे मोठ्या उत्साहात नांदेड येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागात साजरा करण्यात आला.

                                                                                                                                                                      या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित इंटरनेट वापर, सायबर सुरक्षा, आणि जबाबदारीने डिजिटल वर्तन याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. या कार्यक्रमास प्रमुख व्याख्याते म्हणून अति. जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी प्रदीप डुमणे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या सुरक्षित वापराबाबत मार्गदर्शन केले. व्याख्यानात त्यांनी सायबर गुन्हे, फिशिंग हल्ले, ऑनलाइन फसवणूक, सुरक्षित पासवर्ड व्यवस्थापन आणि डिजिटल स्वच्छतेच्या (Digital Hygiene) मूलभूत गोष्टींवर सखोल चर्चा केली. तसेच डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने आणि सुरक्षितपणे उपयोग कसा करावा, याविषयी उपयुक्त माहिती दिली. विद्यार्थ्यांनी या व्याख्यानात मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आपल्या दैनंदिन जीवनातील इंटरनेटच्या वापराबाबत विविध प्रश्न विचारले. त्यांना सायबर सुरक्षेशी संबंधित विविध बाबींबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. 

                                                                                                                                                                      जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथेही सेफर इंटरनेट डे निमित्त जनजागृतीसाठी विशेष डॅशबोर्ड प्रदर्शित करण्यात आला. या डॅशबोर्डद्वारे नागरिकांना डिजिटल सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना, सायबर हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचे मार्ग आणि सुरक्षित इंटरनेट व्यवहार याविषयी माहिती देण्यात आली. डॅशबोर्डवर प्रदर्शित केलेल्या व्हिडिओ आणि प्रतिमा नागरिकांसाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरल्या. यामध्ये डिजिटल साक्षरता, सायबर गुन्ह्यांपासून बचाव, आणि इंटरनेट सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणाऱ्या माहितीपटांचा समावेश होता. या उपक्रमामुळे नागरिकांना फसवणुकीच्या लिंक ओळखण्याचे तंत्र, सुरक्षित संकेतशब्द वापरण्याची गरज आणि ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी यासारख्या महत्त्वाच्या बाबी समजून घेण्यास मदत झाली. 

कार्यक्रमाचे उद्दिष्ट आणि परिणाम:

या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांसह नागरिकांना सायबर सुरक्षेच्या धोरणांबद्दल आणि जबाबदारीने डिजिटल साधने कशी वापरावीत याबद्दल जागरूकता मिळाली. इंटरनेटचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणारे सायबर गुन्हे लक्षात घेता, प्रत्येकाने स्वतःच्या डिजिटल सुरक्षिततेबाबत सजग राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. 

मुख्य उद्दिष्टे: 

इंटरनेट सुरक्षितता : सायबर गुन्हे, फसवणूक, फिशिंग, मालवेअर आदींपासून संरक्षण करण्यासाठी जनजागृती करणे. 

गोपनीयतेचे संरक्षण : वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देणे. 

डिजिटल जबाबदारी : इंटरनेटचा जबाबदारीने वापर करण्यासह योग्य ऑनलाइन वर्तन शिकवणे. 

सायबर धमकी आणि फसवणुकीपासून बचाव: ऑनलाइन छळ आणि फसवणुकीविरोधात जनजागृती करणे. 

तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर : इंटरनेटचा शिक्षण, संशोधन, आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावर भर देणे. 

000000







वृत्त क्रमांक 36 8 मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा नांदेड दौरा  नांदेड, दि. 9 एप्रिल :-  राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे...