Friday, March 23, 2018


अमरावती, वाशीम, अकोला, नांदेड जिल्हयांचा सन्मान
स्वच्छतेची शाश्वतता टिकवण्यासाठी
प्रबोधनपर चळवळ राबविणे गरजेचे
- बबनराव लोणीकर
मुंबई. दि. 23. कोणत्याही चांगल्या कामाची सुरूवात स्वत:पासून करणे गरजेचे असते, त्यामुळे स्वच्छतेची सुरूवात प्रत्येकाने स्वत:पासून करणे गरजेचे आहे. राज्यात सध्या स्वच्छता अभियान मोठया प्रमाणावर राबविले जात आहे, त्या अनुषंगाने आजतागायत 25 जिल्हे हागणदारीमुक्त झाले आहे परंतु जिल्हे हागणदारीमुक्त करून चालणार नाही तर स्वच्छतेची शाश्वतता टिकवण्यासाठी राज्यात प्रबोधन पर चळवळ राबविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागामार्फत हागणदारीमुक्त झालेल्या चार जिल्ह्यांचा श्री. लोणीकर यांच्या हस्ते मंत्रालयीन दालनात सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी अपर मुख्य सचिव श्याम लाल गोयल तसेच अमरावती, अकोला, वाशीम, नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
श्री. लोणीकर पुढे म्हणाले, स्वच्छता ही चळवळ आज उदयास आली नसुन ही चळवळ पुर्वीपासुनच चालत आलेली आहे. यासाठी संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराजांनी स्वच्छतेसाठी आपले जीवन व्यतीत केले. त्यांचेच हे मोलाचे कार्य आपण पुढे नेत आहोत. अगदी अल्पशा कालावधीमध्येच स्वच्छतेसाठी सर्वानी मोठे बहुमोलाचे योगदान देऊन राज्य हगणदारीमुक्तीच्या अंतिम टप्प्यात आहे. राहिलेले जिल्हे ही लवकरच हागणदारीमुक्त होतील, अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सध्या देशातील महाराष्ट्र राज्य हे क्रमांक एक वर असणे हे कौतुकास्पद असुन स्वच्छतेची शाश्वतता टिकवण्यासाठी सर्वानी पुढाकार घेणे आवश्यक आहे, यासाठी प्रबोधनपर जनजागृतीकरणे गरजेचे आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील अमरावती अकोला, वाशीम, नांदेड हे जिल्हे दि. 23 मार्च 2018 रोजी हागणदारीमुक्त जाहीर करण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने आयोजित केलेल्या सत्कार समारंभास अमरावती जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगळे, प्रकल्प व्यवस्थापक प्रशांत सातव तसेच अकोला जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राममुर्ती, जि.प. अध्यक्षा संध्या वाघोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम मानकर, गटविकास अधिकारी संदीप भंडारे, ग्रामसेवक रवि कोट, व वाशिम जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस.व्ही. इस्कापे, गटविकास अधिकारी डी.बी.पवार, ग्रामसेवक एस.पी. राउत तसेच नांदेड जि.प चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकरी  यांच्यासह पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी चारही जिल्ह्यातील हागणदारीमुक्त करण्याच्या चळवळीमध्ये सहभागी झालेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्यासह प्रतिनिधींचा स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
००००


शांतता समितीची बैठक संपन्न
सण-उत्सवातून सलोखा वृद्धींगत व्हावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 23 :- आगामी काळातील सण-उत्सव सजगपणे आणि समन्वयातून शांतता अबाधित राहील तसेच सलोखा वृद्धींगत होईल अशारितीने साजरे करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय शांतता समितीचे अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. रामनवमी उत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे नांदेड जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षस्थेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.    
 बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शिलाताई भवरे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, तहसिलदार किरण अंबेकर, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक ठाणसिंघ यांच्यासह नांदेड शहर आणि जिल्ह्यातील शांतता समितीचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.  
रामनवमी उत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हा प्रशानाच्यावतीने चोख बंदोबस्त तसेच काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करावेत. सार्वजनिक शांततेचे भान बाळगून उत्सव साजरे करावेत. याकाळात शांतता व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा कायम रहावा, असेही आवाहन केले.   
या बैठकीत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गैरप्रकारांवरील कारवाईबाबत सज्जतेची माहिती दिली. मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी मनपातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. तसेच शहरात स्वच्छतेविषयक तत्पर सुविधा व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सांगितले.  
बैठकीस उपस्थित विविध समाज घटकांचे प्रतिनिधी आदीनी मत मांडून महत्वपूर्ण सूचना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी या बैठकीचे संयोजन केले. तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी मानले.                               
00000




दारु दुकाने रविवारी बंद  
नांदेड, दि. 23 :- जिल्ह्यात श्री रामनवमी उत्सव रविवार 25 मार्च 2018 रोजी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात मद्य विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिले आहे.
या उत्सवादरम्यान जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये जिल्हाधिकारी नांदेड यांनी रविवार 25 मार्च रोजी रामनवमी निमित्त जिल्ह्यातील सर्व सीएल-3, एफएल-2, एफएल-3 ( परवाना कक्ष ), एफएल-4 व एफएल / बिआर-2 अनुज्ञप्त्याचे अंतर्गत व्यवहार पुर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
000000


कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांना
31 मार्चपर्यंत अर्ज करण्याची संधी ;
एकवेळ समझोता योजनेचा लाभ घ्यावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे 
नांदेड, दि. 23 :- छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत अर्ज करण्यापासून वंचित शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर किंवा https://csmssy.mahaonline.gov.in पोर्टलवर शनिवार 31 मार्च 2018 पर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी. तसेच दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या पात्र शेतकऱ्यांनी एकवेळ समझोता योजनेंतर्गत हिश्याची दीड लाखावरील रक्कम शनिवार 31 मार्च 2018 पूर्वी बॅंकेत जमा करुन या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे.  
या योजनेंतर्गत जे शेतकरी वैयक्तिक कारणाने किंवा तांत्रिक अडचणीमुळे कर्जमाफी योजनेत सहभागी होऊ शकले नाहीत त्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यानुसार 31 मार्च 2018 पर्यंत आपले सरकार पोर्टलवर किंवा शेतकऱ्यांनी स्वत: मोबाईल ओटीपीद्वारे केल्यानंतरच संबंधीत अर्ज अपलोड करण्यात येणार आहे.  आपले सरकार पोर्टलवर माहिती भरुन ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा नि:शुल्क आहे. किंवा https://csmssy.mahaonline.gov.in या पोर्टलवर स्वत:  नोंदणी करुन युजर आयडी व पासवर्डच्या आधारे ऑनलाईन अर्ज करावीत, असेही आवाहन करण्यात आले आहे. 
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...