Friday, March 23, 2018


शांतता समितीची बैठक संपन्न
सण-उत्सवातून सलोखा वृद्धींगत व्हावा
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 23 :- आगामी काळातील सण-उत्सव सजगपणे आणि समन्वयातून शांतता अबाधित राहील तसेच सलोखा वृद्धींगत होईल अशारितीने साजरे करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय शांतता समितीचे अध्यक्ष तथा  जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. रामनवमी उत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे नांदेड जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षस्थेखाली संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते.    
 बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार, महापौर शिलाताई भवरे, मनपा आयुक्त गणेश देशमुख, पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मिना, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, तहसिलदार किरण अंबेकर, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक ठाणसिंघ यांच्यासह नांदेड शहर आणि जिल्ह्यातील शांतता समितीचे मान्यवर सदस्य उपस्थित होते.  
रामनवमी उत्सव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जिल्हा प्रशानाच्यावतीने चोख बंदोबस्त तसेच काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे सांगून जिल्हाधिकारी डोंगरे म्हणाले, अप्रिय घटना टाळण्यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करावेत. सार्वजनिक शांततेचे भान बाळगून उत्सव साजरे करावेत. याकाळात शांतता व सुव्यवस्था तसेच सामाजिक सलोखा कायम रहावा, असेही आवाहन केले.   
या बैठकीत पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी गैरप्रकारांवरील कारवाईबाबत सज्जतेची माहिती दिली. मनपा आयुक्त गणेश देशमुख यांनी मनपातर्फे देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती दिली. तसेच शहरात स्वच्छतेविषयक तत्पर सुविधा व उपाययोजना करण्यात येणार असल्याचेही सांगितले.  
बैठकीस उपस्थित विविध समाज घटकांचे प्रतिनिधी आदीनी मत मांडून महत्वपूर्ण सूचना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी यांनी या बैठकीचे संयोजन केले. तर आभार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी मानले.                               
00000



No comments:

Post a Comment

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...