Tuesday, March 31, 2020


  मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19
पालकमंत्री अशोक चव्हाण, आमदार अमर राजूरकर यांच्याकडून
प्रत्येकी 50 लाखांचा धनादेश जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द
नांदेड दि. 31 :- आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी भोकर विधानसभा मतदारसंघात कोव्हिड 19 संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी तातडीच्या उपाय योजना म्हणून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपयाचा धनादेश तसेच आमदार अमर राजुरकर यांनी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघात समान स्वरुपात वाटप करण्यासाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांचा धनादेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सुपूर्द केला आहे.  
माहूरगड श्री दत्तात्रय संस्थांनकडून
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 11 लाख रुपये  
माहूरगड येथील श्री दत्तात्रय संस्थान शिखरचे अध्यक्ष तथा महंत मधुसूदन भारती गुरु अचूत भारती व विश्वस्त मंडळाच्यावतीने 11 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे आज जिल्हाधिकारी कार्यालयात सुपूर्द करण्यात आला.
कोविड  19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. 
सढळ हाताने मदत करा
उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था, धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन केले आहे.
खात्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. 
Chief Minister’s Relief Fund-COVID 19, Savings Bank Account number 39239591720, State Bank of India,Mumbai Main Branch, Fort Mumbai 400023,Branch Code 00300, IFSC CODE- SBIN0000300 .

मराठीत-
मुख्यमंत्री  सहाय्यता निधी-कोविड 19,बँकेचे बचत खाते क्रमांक- 39239591720,स्टेट बँक ऑफ इंडिया, मुंबई मुख्य शाखा, फोर्ट, मुंबई 400023,शाखा कोड 00300,आयएफएससी कोड SBIN0000300
सदर देणग्यांना आयकर अधिनियम 1961 च्या 80 (G) नुसार आयकर कपातीतून 100 टक्के सूट देण्यात येते. 
00000


 कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी
निधीबरोबर अन्नधान्याची मदत करा
           पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन
नांदेड, दि. 31:-  शिधापत्रिका असलेल्या किंवा नसलेल्या गरजूंना धान्याची किट उपलब्ध करुन देण्यात यावी. तसेच कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी निधीबरोबर अन्न धान्याची मदत करावी, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
कोरोना संदर्भात बैठक पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार अमर राजूकर, उपमहापौर सतीश देशमुख-तरोडेकर, स्थायी समितीचे सभापती अमित तहेरा, सभागृह नेता विरेंद्रसिंग गाडीवाले, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी शरद मंडलिक, उपविभागीय अधिकारी लतिफ पठाण, जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, किशोर स्वामी, निलेश पावडे, विलास धबाले, शमीम अब्दुला यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.   
स्वस्त धान्य दुकानावर काळाबाजार होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रत्येक स्वस्त धान्य दुकानाच्या बाहेर उपलब्ध असलेल्या धान्याचे फलक लावावेत. स्वस्त धान्य दुकानदार नागरिकांना अन्नधान्य पुरवठा करीत असतांना त्याठिकाणी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात यावे. स्वस्त धान्य दुकानावर नागरिकांची गर्दी होणार नाही असे दूर अंतरावर (सोशल डिस्टन्स) ठेवण्याबाबतही पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
00000


श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी
2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 31 :- येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी 2 कोटी 90 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते.     
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता चंद्रकांत मस्के, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, डॉ. संजय कदम, डॉ. मानकर,  डॉ.दिपक गोरे, उमेश कोळेकर, डॉ. राम बहिरवाड, डॉ. शशी गायकवाड, श्री खडकीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, इंडियन असोसिएशनच्या अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी समन्वयाने चर्चा करुन सर्व प्रश्न तातडीने सोडवावीत. अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी रहावे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने अत्यावश्यक सेवेचे प्रश्न, अडी-अडचणीबाबत नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याची सुचना दिली. कोरोना विषाणू संदर्भातील आरोग्य विभागातील कंत्राटी पध्दतीची पदे तात्काळ भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. रुग्णालयात रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी. नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहन पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केले.  
तालुकास्तरावर रक्तसाठा उपलब्ध व्हावा यासाठी येत्या काळात सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून मास्क, वेंन्टिलिटर, औषधाची अतिरिक्त मागणी कळवावी. डॉक्टरांना करोना आजारापासून संरक्षण करणाऱ्या किट या उपलब्ध करून देण्यात  याव्यात.
केंद्र सरकारने करोना आजारावर उपचार करणाऱ्या हेल्थ केअर वर्करांसाठी 50 लाख रुपयाचा विमा जाहीर केला आहे. नांदेड इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने आयसीयू मधील व्हेंटिलेटर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची उपलब्धता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय व शासकीय दवाखाना शिवाजी पुतळा नांदेड येथे करण्यात येणाऱ्या आयसीयूमध्ये सल्ल्यासाठी उपलब्धता राहील. त्यांच्या निगराणीखाली या आयसीयूची बांधणी करण्यात येईल. यासाठी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची मदत करण्याचे आयएमए नांदेडतर्फे जिल्हा प्रशासनास व आरोग्य विभागास सांगण्यात आले. कोरोना या आजारावर लढ्यामध्ये जर शासकीय यंत्रणा व त्यातील हेल्थ केअर वर्कर्स यांना आयएमएच्या डॉक्टरांनी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
जनतेला सुरक्षितपणे घरी रहा व अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे आणि साबणाचा वापर हा कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सोपा व स्वस्त असा उपाय आहे. त्याचा जास्तीतजास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे. बाहेरून घरी आल्यानंतर प्रत्येकांनी घरात प्रवेश करण्याअगोदर आपले हात स्वच्छ धुऊन घेणे गरजचे आहे आणि हाताचा चेहऱ्यावर व डोळ्यांना स्पर्श होऊ देवू नये, असेही आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
000000


आपत्कालीन सेवा : अधिकारी,
कर्मचाऱ्यांना ऑनलाईन पासची सुविधा
नांदेड, दि. 31 :-  आपत्कालीन कार्यात सहभागी अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी ऑनलान नोंदणी करु पास घेण्याची सुविधा नांदेड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने केली आहे. https://covid19.mhpolice.in या लिंकवर ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.
ई-पास E Pass ची सुविधा ऑनलान पद्धतीने महाराष्ट्र पोलीस प्रशासनाने
उपलब्ध करुन दिली असून  अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी सदर लिंकवर आपला पासपोर्ट साईजचा फोटो 200 केबी पर्यंत तसेच इतर कागदपत्रे 500 केबी पर्यंत अपलोड करावीत. पास वापरासंदर्भातील नियमावली फॉर्म भरण्यापूर्वी वेब लिंकवर दिसून येते. अर्ज केवळ इंग्रजी भाषेत  स्वीकारला जाणार असून अर्ज भरल्यानंतर मंजूर अर्जाची प्रत डाउनलोड करावी. त्याची ऑनलान प्रत सर्वांना सहज आणि कमी वेळेत उपलब्ध होऊ शकते. आपत्कालीन सेवा देणाऱ्यासाठी ही सुविधा नांदेड जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने उपलब्ध करुन दिली आहे.
00000


महाराष्ट्र लोकसेवा आयोग :
राज्यसेवा (पूर्व) परीक्षेचे प्रशिक्षण रद्द
नांदेड दि. 31 :- राज्‍यसेवा (पूर्व) परीक्षा आयोगाने पुढे ढकलल्‍यामुळे 1 एप्रिल 2020 रोजी राज्‍यसेवा पूर्व परीक्षेच्‍या अनुषंगाने आयोजित प्रशिक्षण रद्द करण्‍यात आले आहे. या परीक्षकामी नियुक्‍त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नोंद घ्‍यावी, अशी सुचना प्रसिद्धी पत्रकाद्वारे जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे.    
नोवेल कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी सुरु असलेल्या प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेच्‍या अनुषंगाने महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने सार्वजनीक हीत लक्षात घेऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या दिनांकात पुढील प्रमाणे बदल केला आहे.  राज्‍यसेवा (पूर्व) परीक्षा 2020 ही रविवार 5 एप्रिल 2020 ऐवजी रविवार 26 एप्रिल 2020 रोजी तर महाराष्‍ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा 2020 ही रविवार 3 मे 2020 ऐवजी रविवार 10 मे 2020 रोजी होईल. त्याअनुषंगाने परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण रद्द करण्यात आले आहे.
000000


बँकेतील गर्दी कमी राहण्यासाठी
ग्राहक सेवा केंद्रांचा वापर करावा
नांदेड दि. 31 :- आर्थिक वर्षाचा शेवट, PMFBY चे दोन हजार रुपये व महिलांसाठी पाचशे रुपये ग्राहकांच्या खात्यावर जमा होणार असून कोरोना (कोव्हिड 19) संसर्ग टाळण्याच्या अनुषंगाने बँकेतील गर्दी कमी करुन ग्राहकांनी बँक ग्राहक सेवा केंद्राचा वापर करावा, असे आवाहन नांदेड जिल्हा अग्रणी बँकचे व्यवस्थापक यांनी केले आहे.  
कोव्हिड 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कलम 144 लागू असल्याने जीवनावश्यक सेवा चालू राहण्यासाठी मुभा दिली आहे. यात ग्राहक सेवा केंद्राचा समावेश करण्यात आलेला आहे. ग्राहक सेवा केंद्रामार्फत 10 हजार रुपये काढणे व 20 हजार रुपये भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. ग्राहक सेवा केंद्राचा वापर केल्यास ग्राहकांची गैरसोय होणार नाही.  
ग्राहक सेवा केंद्रांनी बँक सेवा देतांना शासनाच्या निर्देशाचे योग्य पालन करावे. बँकांनी सीएसपी यांना योग्य ओळखपत्रे तसेच स्टिकर्स दयावीत. बँकांनी लाभार्थ्यांना पैसे वाटप करण्यासाठी स्थानिक संस्था, लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्यावे. लाभार्थ्यांची यादी गावानुसार प्रसिद्ध करुन योग्य लाभार्थ्यांची ओळख पटवून त्यांना सेवेचा लाभ दयावा.
बॅंक ऑफ बडोदानी ग्राहक सेवा केंद्रासाठी 2 हजार रुपये वितरीत केले. जेणेकरुन ग्राहक सेवा केंद्र परिसर स्वच्छ ठेवून शासनाच्या आदेशाचे पालन होईल. ग्राहक सेवा केंद्र चालू राहण्यासाठी प्रोत्साहनपर शंभर रुपये प्रतिदिन देण्यात येणार आहेत. याप्रमाणे इतर बँकांनी ग्राहक सेवा केंद्रांना स्वच्छता व सेवेसाठी योग्य ती तरतूद करुन ग्राहकांची हेळसांड होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन नांदेड जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापन यांनी केले आहे.
00000


कोराना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी
विविध बाबींवरील निर्बंध पुढील आदेशापर्यंत कायम
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचे आदेश
नांदेड दि. 31 :- कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपायोजना करण्यासाठी  विविध विषयानुसार 31 मार्च 2020 पर्यंत घालण्‍यात आलेले निर्बंध (बंदी) पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात कायम ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमीत केले आहेत.  
साथरोग प्रतिबंधात्‍मक कायदा 1897 मधील तरतुदीनुसार अधिसुचनेनुसार प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी ज्‍या उपायोजना करणे आवश्‍यक आहे, त्‍या करण्‍यासाठी सक्षम प्राधिकारी म्‍हणून जिल्हाधिकारी यांना घोषित केले आहे. त्यानुसार नांदेड जिल्‍हयातील नमुद विषयनिहाय बाबींवर 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्‍याचे आदेशित करण्‍यात आले आहे. नांदेड जिल्‍हयात फौजदारी संहिता दंडप्रकियेचे कलम 144 अन्‍वये प्रतिबंधात्‍मक आदेश पारीत करण्‍यात आला आहे. पुढील बाबींनुसार 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्‍यात आलेले आदेश पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.
जिल्ह्यात बंद ठेवण्यात पुढील बाबींचा समावेश आहे. शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्‍था, खाजगी शिकवणी, अभ्‍यासिका केंद्र, शहरी हद्दी लगतच्‍या शैक्षणिक संस्था, जिल्‍हयातील ग्रामीण भागातील सर्व शासकीय व खाजगी शैक्षणिक संस्‍था, महानगरपालिका, सर्व नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी व खाजगी अंगणवाडया, चित्रपटगृहे, तरणतलाव, व्‍यायाम शाळा, नाटयगृह, म्‍युझियम, शॉपिंग मॉल, आठवडी बाजार, जिल्‍हयातील ग्रामीण क्षेत्रातील अंगणवाडया, आधार केंद्र, सर्व बॅंकातून अनुदान व पिक विमा वाटप, सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्‍तनोंदणीची काम यांचा या बंदमध्ये समावेश आहे. तर कार्यालयातील बैठका व अभ्‍यांगतांच्‍या भेटी नियंत्रित राहतील.  
यापूर्वी नांदेड जिल्हाधिकारी यांनी वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश, निर्देश, परिपत्रके हे या आदेशासह अमंलात राहतील. या आदेशाचे उल्‍लंघन केल्‍यास संबंधिताविरुध्‍द भारतीय दंडसंहिता कलम 188 नुसार कार्यवाही करण्‍यात येईल, असेही आदेशात जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.
00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...