Tuesday, March 31, 2020


श्री गुरुगोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी
2 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर
-         पालकमंत्री अशोक चव्हाण
नांदेड, दि. 31 :- येथील श्री गुरु गोबिंदसिंघजी स्मारक रुग्णालयासाठी 2 कोटी 90 लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या उपाय योजनांबाबत आढावा पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री अशोक चव्हाण बोलत होते.     
या बैठकीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती मंगाराणी अंबुलगेकर, महापौर दिक्षाताई धबाले, आमदार अमर राजूरकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर, अधिष्ठाता चंद्रकांत मस्के, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुरेश कदम, डॉ. संजय कदम, डॉ. मानकर,  डॉ.दिपक गोरे, उमेश कोळेकर, डॉ. राम बहिरवाड, डॉ. शशी गायकवाड, श्री खडकीकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, इंडियन असोसिएशनच्या अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांच्याशी समन्वयाने चर्चा करुन सर्व प्रश्न तातडीने सोडवावीत. अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी रहावे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्यावतीने अत्यावश्यक सेवेचे प्रश्न, अडी-अडचणीबाबत नांदेड जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याची सुचना दिली. कोरोना विषाणू संदर्भातील आरोग्य विभागातील कंत्राटी पध्दतीची पदे तात्काळ भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. रुग्णालयात रुग्णांना सन्मानपूर्वक वागणूक द्यावी. नागरिकांची गर्दी होणार नाही याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी. नागरिकांनी गर्दी करु नये, असे आवाहन पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी केले.  
तालुकास्तरावर रक्तसाठा उपलब्ध व्हावा यासाठी येत्या काळात सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून मास्क, वेंन्टिलिटर, औषधाची अतिरिक्त मागणी कळवावी. डॉक्टरांना करोना आजारापासून संरक्षण करणाऱ्या किट या उपलब्ध करून देण्यात  याव्यात.
केंद्र सरकारने करोना आजारावर उपचार करणाऱ्या हेल्थ केअर वर्करांसाठी 50 लाख रुपयाचा विमा जाहीर केला आहे. नांदेड इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावतीने आयसीयू मधील व्हेंटिलेटर तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी यांची उपलब्धता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, आयुर्वेदिक महाविद्यालय व शासकीय दवाखाना शिवाजी पुतळा नांदेड येथे करण्यात येणाऱ्या आयसीयूमध्ये सल्ल्यासाठी उपलब्धता राहील. त्यांच्या निगराणीखाली या आयसीयूची बांधणी करण्यात येईल. यासाठी सर्व तज्ज्ञ डॉक्टरांची मदत करण्याचे आयएमए नांदेडतर्फे जिल्हा प्रशासनास व आरोग्य विभागास सांगण्यात आले. कोरोना या आजारावर लढ्यामध्ये जर शासकीय यंत्रणा व त्यातील हेल्थ केअर वर्कर्स यांना आयएमएच्या डॉक्टरांनी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका स्पष्ट केली आहे.
जनतेला सुरक्षितपणे घरी रहा व अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडावे आणि साबणाचा वापर हा कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी अत्यंत सोपा व स्वस्त असा उपाय आहे. त्याचा जास्तीतजास्त वापर करावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे. बाहेरून घरी आल्यानंतर प्रत्येकांनी घरात प्रवेश करण्याअगोदर आपले हात स्वच्छ धुऊन घेणे गरजचे आहे आणि हाताचा चेहऱ्यावर व डोळ्यांना स्पर्श होऊ देवू नये, असेही आवाहन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.
000000

No comments:

Post a Comment

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...