Monday, March 11, 2019


लोकसभा निवडणूक
विविध बाबींवर निर्बंध आदेश
नांदेड दि. 11 :- भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च 2019 रोजी लोकसभेचा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता अंमलात आली असून या काळात निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून तसेच निवडणूकीचे कामे हाताळतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये  विविध निर्बंधाबाबत आज आदेश निर्गमीत केले आहेत.
कार्यालय / विश्रामगृह  परिसरात
मिरवणूका, घोषणा, सभा घेण्यास निर्बंध                                  
            जिल्‍हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसिल कार्यालये आणि शासकीय कार्यालय व विश्रामगृह या ठिकाणी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक / मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने आदी प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 11 मार्च ते 19 एप्रिल 2019 पर्यंत अंमलात राहील.
ध्‍वनीक्षेपकाचा वापर  
            जिल्ह्यात कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था पक्ष कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपकाचा लाऊडस्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्‍या पुर्व परवानगीशीवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असतांना त्‍यावरील ध्‍वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी 6 वाजे पुर्वी व रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही. हा आदेश 11 मार्च ते 19 एप्रिल 2019 पर्यंत अंमलात राहील.
वाहनाचा वापर, पक्ष कार्यालये,
सार्वजनिक मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध
            जिल्ह्यात कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने वापरण्‍यास, जिल्‍ह्यातील धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणाच्‍या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापीत करता येणार नाही. तसेच संबंधीत पक्षांचे चित्रे / चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे, शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास निर्बंध घालण्‍यात आला आहे, हा आदेश 11 मार्च ते 19 एप्रिल 2019 पर्यंत अंमलात राहील.
मतदानाच्या दिवशी 
मतदान केंद्र परिसरात 144 कलम लागू    
जिल्‍ह्यात ज्या मतदान केंद्रावर मतदान होणार आहे त्‍याठिकाणी 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हेंचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्‍यात आले आहे. हा आदेश 18 एप्रिल 2019 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासुन मतदान होईपर्यंत अंमलात राहील.

उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतांना
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्‍या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास तसेच वाहनाच्‍या ताफ्यामध्‍ये 3 पेक्षा जास्‍त वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्‍या 100 मिटरचे परिसरात आणण्यास तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या दालनात नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍यासाठी पाच व्‍यक्‍ती पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना उपस्थित राहण्‍यास प्रतिबंध घालण्‍यात आले आहे. हा आदेश नांदेड जिल्‍ह्यासाठी 11 मार्च ते 29 मार्च 2019 पर्यंत अंमलात राहील.
0000


विशेष लेख                                                                                 दि.11-3-2019
आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्वे
- यशवंत भंडारे
लोकसंभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. 10 मार्च 2019 पासून या निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली आहे. सर्वत्र लोकसभा निवडणुकीची तयारी वेगाने सुरु आहे. या निवडणूक काळात नेमके काय करावे आणि काय करु नये याबाबत निवडणूक आयोगाने निश्चित केलेली कामे याबाबत माहिती देणारा हा लेख

       निडणुकीच्या आचार संहिता काळात काय करावे याबाबत आयोगाने म्हटले आहे की, चालू असेलेले कार्यक्रम पुढे सुरु ठेवता येतील.ज्या विषयी शंका निर्माण होईल अशा बाबींच्या संबंधात भारत निवडणूक आयेाग / राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडून स्पष्टीकरण  / मान्यता प्राप्त करण्यात यावे.पूर, अवर्षण, साथीचे रोग किंवा अन्य नैसर्गिक आपत्ती यामुळे बाधित झालेल्या क्षेत्रातील जनेतेसाठी सहाय्यकारी आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना चालू करता येतील त्यापूढे सुरु ठेवता येतील. पण त्यासाठी निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी.मरणासन्न किंवा गंभीररित्या आजारी असलेल्या व्यक्तींना रेाख रक्कम किंवा वैद्यकीय सवलती देण्याचे समुचित मान्यतेने पुढे चालू ठेवता येईल.मैदानासारख्या सार्वजनिक जागा सर्व पक्षांना, निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना निवडणूक सभा घेण्यासाठी नि:पक्षपातीपणे उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत. त्याच प्रमाणे सर्व पक्षांना / निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांना हेलिपॅडचा वापर नि:पक्षपातीपणे उपलब्ध करुन दिला पाहिजे.विश्रामगृहे, डाकबंगले इतर शासकीय निवासस्थाने केवळ झेड त्यावरील सुरक्षा असलेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना समानतेच्या तत्वावर उपलब्ध करुन देण्यात यावेत.
इतर राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर करण्यात येणारी टीका, त्यांची धोरणे, कार्यक्रम, पूर्वीची कामगिरी, पार पाडलेली कामे केवळ या बाबीशी संबंधित असावी.शांततामय उपद्रवरहीत गृहस्थ जीवन जगण्याच्या प्रत्येक व्यक्तींच्या अधिकाराचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. इतर पक्षांनी आयेाजित केलेल्या सभा मिरवणुकीमध्ये कोणतेही अडथळे निर्माण करण्यात येऊ नयेत. प्रस्तावित सभेच्या जागी निर्बंधात्मक प्रतिबंधक आदेश जारी केलेले असल्यास त्यांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. सभेची जागा वेळेची पूर्व परवानगी घ्यावी. प्रस्ताविक सभेमध्ये ध्वनिवर्धक  कोणत्याही इतर अशा सवलीतीचा वापर करण्यासाठी परवानगी मिळविली पाहिजे. सभेमध्ये अडथळे आणणाऱ्या किंवा अन्यथा अव्यवस्था निर्माण करणाऱ्या व्यक्तीबरोबर व्यवहार करण्यासाठी पोलीसांचे सहाय्य मिळविण्यात यावे. कोणत्याही रॅलीच्या प्रारंभीचे वेळ आणि जागा, रॅली ज्या मार्गाने जाईल तो मार्ग तसेच मोर्चाची अखेर होईल अशी वेळ, स्थान ही बाब आगाऊ स्वरुपात निश्चितपणे ठरविण्यात यावी. पोलीस प्राधिकाऱ्याकडून त्यासाठी आगाऊ अनुपालन करण्यात यावे.
 रॅली ज्या वस्तीमधून जावयाची असेल त्या वस्त्यांबाबत कोणतेही निर्बंधात्मक आदेश जारी केलेले असल्यास त्याविषयी खात्री करुन त्याचे पूर्ण अनुपालन करण्यात यावे. त्याचप्रमाणे सर्व वाहतूक नियमांचे अन्य निर्बंधाचे परवानगी घेण्यात यावी.  रॅली मुळे वाहतुकीत कोणताही अडथळा निर्माण होऊ देऊ नये. ज्यांचा शस्त्रे किंवा हत्यारे म्हणून गैरवापर होऊ शकेल. अशा कोणत्याही वस्तू रॅलीत सहभागी असलेल्या व्यक्तींनी बाळगू नयेत. मतदानाचे काम शांतता सुव्यवस्थेने पार पाडावे यासाठी सर्व वेळी सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना सहकार्य द्यावे. बिल्ले ओळखपत्र निवडणुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीनी ठळकपणे लावली पाहिजेत. मतदारांना देण्यात येणाऱ्या ओळखचिठया या साध्या पांढऱ्या कागदावर देण्यात येतील आणि त्यावर कोणतेही चिन्हे, उमेदवाराचे किंवा पक्षाचे चिन्ह याचा निर्देश असणार नाही.
मतदानांच्या दिवशी वाहनांच्या वापरावरील निर्बंधाचे पूर्णपणे पालन करण्यात यावे. निवडणूक आयोगाने वैध प्राधिकारपत्र असल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही वेळेस मतदान कक्षात प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तींना (उदा.मुख्यमंत्री, संसद सदस्य, विधानसभा सदस्य यांनाही) यातून सुट देण्यात आलेली नाही. निवडणूक पार पाडण्याच्या संबंधितील कोणतीही तक्रार किंवा समस्या निवडणूक निर्णय अधिकारी, क्षेत्र, प्रभाग, दंडाधिकारी यांच्या किंवा भारत निवडणूक आयेाग यांनी नियुक्त केलेल्या  निरीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. निवडणूक आयेाग, निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे निवडणुकीच्या विविध पैलूंच्या संबंधातील सर्व बाबी विषयीचे निर्देश, आदेश, अनुदेश यांचे पालन करण्यात येईल.
या निवडणुकीच्या आचार संहिता काळात काय करु नये याबाबत माहिती अशी- कृपया शासकीय वाहने किंवा कर्मचारी वर्ग किंवा यंत्रणा याचा निवडणूक प्रचारविषयक कामासाठी वापर करण्यात येऊ नये. शासकीय वाहनांत पुढील कार्यालयाच्या वाहनांचा समावेश असेल. 1) केंद्र शासन. 2) राज्य शासन. 3) केंद्र राज्य शासनाचे सार्वजनिक उपक्रम  4) केद्र राज्य शासनाच्या संयुक्त क्षेत्रातील उपक्रम  5) स्थानिक संस्था 6)महानगरपालिका 7) नगरपालिका 8)पणन मंडळे (कोणत्याही नावांची) 9) सहकारी संस्था 10) स्वायत जिल्हा परिषदा किंवा  11) ज्यामध्ये सार्वजनिक निधी मग तो एकूण निधीच्या हिश्यातील कितीही अल्पांशाने असो गुंतविण्यात आला आहे. अशी कोणतीही संस्था आणि तसेच 12) संरक्षण मंत्रालयाच्या मालकीची तसेच गृह मंत्रालयाच्या राज्य शासनाने यांच्या पोलीस संघटनेच्या मालकीची असलेली पुढील वाहने ) मालमोटारी ) लॉरी ) टेम्पो )जीपगाडया ) मोटारगाडया )ऑटो रिक्षा बसगाडया )विमाने आय.हेलिकॉप्टरने )जहाजे के.बोटी ) हॉवर क्राप्ट इतर वाहने.
सत्तेमध्ये असलेला पक्ष, शासन यांनी साध्य केलेल्या उदिष्टांबाबत सरकारी कोषागाराच्या खर्चाने कृपया कोणतीही जाहिरात देण्यात येऊ नये. कोणत्याही वित्तीय अनुदानाची घोषणा करणे, कोनशिला बसविणे, नवीन रस्ते बांधण्याचे वचन देणे . गोष्टी करु नयेत. शासन/सार्वजनिक उपक्रम यांच्या सेवेत कोणत्याही तदर्थ नियुक्या करु नयेत. कोणताही मंत्री तो उमेदवार असल्याखेरीज किंवा प्राधिकृत प्रतिनिधी असल्याखेरीज किंवा मतदानासाठी मतदार या नात्याने असेल त्या खेरीज मतदान कक्षामध्ये किंवा मतमोजणीच्या जागी प्रवेश करणार नाही. निवडणूक मोहिम/प्रचार यांच्या जोडीने कोणतेही सरकारी काम पार पाडण्यात येऊ नये. मतदारास आर्थिक किंवा अन्य प्रकारची कोणतेही प्रलोभन दाखविण्यात येऊ नये. मतदारांच्या जातीय भावनांना आवाहन करण्यात येऊ नये. विभिन्न जातीजमाती यांच्यातील किंवा भाषिक गटातील सध्याचे मतभेद ज्यामुळे अधिक तीव्र होतील किंवा परस्परातील वैमनस्य वाढेल किंवा त्यांच्यात तणाव निर्माण होईल अशी कोणतीही कृती करण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये.
 इतर पक्षांचे कोणतेही नेते किंवा कार्यकर्ते यांच्या सार्वजनिक कार्याशी संबंधित नसेल अशा त्यांच्या खाजगी जीवनातील कोणत्याही पैलूवर टीका करण्याची परवानगी देण्यात येऊ नये. ज्याचा खरे खोटेपणा पडताळून पाहिलेला नाही, असे आरोप करुन किंवा विकृत स्वरुपात देऊन इतर पक्ष यांच्यात टीका करु नये. निवडणूक प्रचार तसेच भाषणे, निवडणूक प्रचाराचे फलक, संगीत इत्यादीसाठी देऊळे, मशिदी, चर्च, गुरुद्वारा किंवा कोणत्याही प्रार्थनास्थळाचा वापर करु नये. लाच देणे, अवाजवी प्रभाव टाकणे, मतदारांना धाकदपटशा दाखविणे, खोटया नावाने मतदान करणे, मतदान कक्षापासून 100 मीटरच्या आत कक्षापर्यंत प्रचार करणे, मतदानाची वेळ समाप्त होण्याच्या वेळेबरोबर संपणाऱ्या 48 तासाच्या कालावधीत सार्वजनिक सभा घेणे, मतदारांना मतदान कक्षापर्यंत पोहोचविणे तेथून परत येणे यासारख्या भ्रष्ट किंवा निववडणुक विषय अपराध करण्यास प्रतिबंध आहे.
व्यक्तीची मते किंवा कृत्य याविरुध्द निषेध व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरासमोर निदर्शने किंवा धरणे धरण्यात येऊ नयेत. कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणत्याही व्यक्तीची जमीन, इमारत, आवार, भिंत . चा वापर त्याच्या परवानगीखेरीज ध्वजदंड उभारणे , कापडी फलक लावणे, नोटीस चिकटविणे किंवा घोषणा लिहिणे यासाठी करता येणार नाही. यामध्ये खाजगी किंवा सार्वजनिक जागांचा समावेश असेल. इतर राजकीय पक्षांच्या किंवा उमेदवारांच्या सार्वजनिक सभांमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण करण्यात येऊ नये. एका पक्षाची जेथे सभा चालू असेल अशा जागी दुसऱ्या पक्षाद्वारे मोर्चा काढण्यात येऊ नये. दुसऱ्या पक्षाने किंवा उमेदवाराने काढलेली प्रचार पत्रके काढून टाकण्यात येऊ नये.
मतदानाच्या दिवशी ओळखचिठया वितरीत करण्याच्या जागी किंवा मतदान कक्षानिकट प्रचारपत्रके , पक्षाची ध्वजचिन्हे किंवा प्रचारसाहित्याचे प्रदर्शन करु नये. ध्वनिवर्धकाचा मग ते एकाच जागी लावलेले असोत किंवा फिरत्या वाहनांवर बसविलेले असोत, सकाळी सहा वाजण्यापूर्वी किंवा रात्री दहा वाजल्यानंतर आणि संबंधित प्राधिकाऱ्याच्या पूर्व परवानगी घेतली असल्याखेरीज वापर करु नये. आदर्श आचारसंहितेची ही सूची केवळ वानगी दाखल आहे. सर्वसमावेशक अधिक माहितीसाठी जिल्हा निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधता येईल. ही निवडणूक मोकळया, निर्भय वातावरणात पार पाडता यावी; यासाठी निवडणुकीशी संबंधित सर्वांनी या आदर्श आचार संहितेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा लोकप्रतिनिधी कायदा 1951 मधील तरतुदी नुसार कारवाई होऊ शकते.
                                                                                                                                   
                                                                                 यशवंत भंडारे                                                                                                                               
                                                                      प्र.संचालक (माहिती)
                                                                                    औरंगाबाद

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...