अल्पसंख्याक
विकास योजना, कामांचा
प्रधान
सचिव तागडे यांच्याकडून सर्वंकष आढावा
नांदेड दि. 20 :- जिल्ह्यातील अल्पसंख्याक विकासाशी निगडीत योजना तसेच कामांबाबत
राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे यांनी नुकताच जिल्हाधिकारी
कार्यालय नांदेड येथे आढावा बैठकीत सर्वंकष आढावा घेतला.
जिल्हाधिकारी यांच्या निजी कक्षात शनिवार 18
फेब्रुवारी रोजी बैठक संपन्न झाली.बैठकीस जिल्हाधिकारी सुरेश
काकाणी, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, मनपा आयुक्त समीर उन्हाळे,
अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी पद्माकर केंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज
कारभारी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव बी. बी. पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी एस. ए.
थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. पी. कदम, जिल्हा अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक विजय उशिर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. सुधीर भातलवंडे, जिल्हा वक्फ अधिकारी महमद
अयुब खान आदींची उपस्थिती होती.
बैठकीत मार्गदर्शन करताना प्रधान सचिव श्री. तागडे
यांनी अल्पसंख्याक विकासाच्या योजना, त्याअंतर्गत कामांना गती देण्याचे निर्देश
दिले. कामांचे काटेकोर नियोजन करावे असेही त्यांनी सांगितले. यावेळी अल्पसंख्यांक समाजातील मुलींसाठी वसतिगृह, ग्रामिण
क्षेत्र विकास योजनेंतर्गत मंजूर कामे, अल्पसंख्यांक शाळांना पायाभूत सुविधा
पुरविणे, डॉ. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण योजना, मराठी भाषा फौंडेशन वर्ग
कार्यक्रम, पोस्टमॅट्रीक शिष्यवृत्ती योजना, पोलीस शिपाई भरती पूर्व परीक्षा
प्रशिक्षण वर्ग कार्यक्रम सन 2016-17, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत
तंत्रकौशल्य वृध्दिसाठी दुसरी पाळी सुरु करणे, एकात्मिक बालविकास सेवांची समान
उपलब्धता,अल्पसंख्यांकांना विविध बॅंकेकडून कर्ज वाटप, नागरी क्षेत्र विकास
योजना, वक्फ बोर्डाच्या जमिनी व त्यांचा वापर याबाबत विस्तृत आढावा घेण्यात आला.
सुरवातीला जिल्हाधिकारी श्री.
काकाणी यांनी प्रधान सचिव श्री. तागडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच
जिल्ह्यातील अल्पसंख्याक विकासाच्या योजनांची कार्यवाही तसेच कामांची माहिती दिली.
जिल्हा नियोजन अधिकारी श्री. थोरात यांनी
योजनानिहाय माहितीचे सादरीकरण केले.
यावेळी झालेल्या चर्चेत उपस्थित अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला.
000000