Tuesday, October 29, 2024

 वृत्त क्र. 1004

आज उमेदवारी अर्जांची छाननी

4 नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याचे अखेरची तारीख
 
नांदेड दि. 29 ऑक्टोबर :- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार उद्या 30 ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या अर्जांची छाननी होणार आहे. उद्या सकाळी 11 वा. छाननीला सुरूवात होईल. छाननी प्रक्रियेनंतर उमेदवारांना 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.

भारत निवडणूक आयोगाने निर्धारीत केलेल्या वेळापत्रकानुसार उद्या बुधवार 30 ऑक्टोबर रोजी छाननी केली जाणार आहे. छाननीचे काम लोकसभेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तर विधानसभेसाठी त्या-त्या स्तरावरील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात होणार आहे.  त्यानंतर अर्ज मागे घेतला जाऊ शकते. त्यामुळे छाननी नंतर व 31 ऑक्टोबरला अर्ज परत घेतल्या जाऊ शकतात.

येणाऱ्या काळात शासकीय सुट्ट्या असल्यामुळे उद्या छाननी झाल्यापासून तर 31 ऑक्टोबरला पूर्ण दिवस व  4 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज परत घेता येणार आहेत. 4 नोव्हेंबरला दुपारी 3 पर्यंतच अर्ज परत घेता येणार आहे.  

20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबरला लोकसभा पोटनिवडणुकीतील 6 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठात तर जिल्ह्यातील लोहा, हदगाव, किनवट या मतदारसंघातील मतमोजणी त्या-त्या ठिकाणी होणार आहे. लोहा विधानसभेसाठी महसूल हॉल तहसिल कार्यालय लोहा येथे तर हदगाव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी समाज कल्याण भवन येथे अनुसूचित जाती मुलींचे शासकीय वसतिगृह तामसा रोड हदगाव येथे होणार आहे. किनवट विधानसभेसाठी येथील आयटीआय कॉलेज येथे मतमोजणी होणार आहे.  
0000

 वृत्त क्र. 1003

20 नोव्हेंबरच्‍या लोकशाहीच्‍या एसटीमध्‍ये सर्वांनी स्‍वार व्‍हा !

·         बसस्‍थानकावर सीईओ करनवालांची उद्घोषणा

·         नांदेड बसस्‍थानकावर स्‍वीपअंतर्गत जनजागृती

नांदेड, दि. 29 ऑक्टोंबर : प्रवाशांनो इकडे लक्ष द्या, बसस्‍थानकावरील फलाट क्रमांक 1 वर ई-20 लोकशाहीची गाडी लागली आहे. आपण सर्वांनी या लोकशाही गाडीमध्ये बसून प्रवास करावा. येत्या 20 नोव्‍हेंबर 2024 रोजी मतदानाचा हक्क बजवावा अशी उद्घोषणा नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्वीपच्या प्रमुख मीनल करनवाल यांनी नांदेड बस स्थानकावर केली. 

गाडी अमूक या गावाला जाणार असल्‍याची नेहमीची सूचना ऐकण्‍याची सवय असणाऱ्या प्रवाशांना आज  वेगळ्या आवाजात वेगळी सूचना ऐकायला मिळाली. सूचना होतीलोकशाहीच्‍या बसमध्‍ये बसताना मतदानाची तिकिट काढण्‍यासाठी, आपल्‍या पसंतीच्‍या उमेदवाराला 20 नोव्हेंबरला मतदान करण्‍यासाठी विसरु नका ! असे आवाहन केले. 

यावेळी लोकशाही जनजागृतीच्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटनही मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रवाशांना गुलाब पुष्प देऊन मतदान करण्याचे आवाहन केले. नांदेड जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित राऊत यांच्‍या मार्गदर्शनात लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान जनजागृतीचे वेगवेगळे उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. त्‍याला उत्‍तम प्रतिसाद मिळत आहे. 

आजच्‍या बसस्‍थानकावरील उपक्रमामध्‍ये एसटी महामंडळाचे आगार व्यवस्थापक अनिकेत बल्लाळ, बसस्थानक प्रमुख यासीन खान, शंकरराव नांदेडकर, कृष्णा उमरीकर, शिक्षणाधिकारी  माधव सलगर, शिक्षणाधिकारी योजना दिलीप बनसोडे, रामचंद्र पाचंगे, महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी व्यंकटेश चौधरी, गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांच्‍यासह मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार, प्रलोभ कुलकणी, हनुमंत पोकळे, सुनील मुत्‍तेपवार, अवधूत गंजेवार, माणिक भोसले, संभाजी पोकळे, सुनील दाचावार संजय भालके आदींचा समावेश होता.

०००००








नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांचे छायाचित्र...


















 

वृत्त क्र. 1002

विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल 

लोकसभा पोट निवडणुकीसाठी 56 अर्ज दाखल 

·         मंगळवारी शेवटच्या दिवशी विधानसभेसाठी 288 इच्छुकांचे 388 अर्ज दाखल

नांदेड दि. 29 ऑक्टोबर :- नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत. तर विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 9 विधानसभा क्षेत्रामध्ये आतापर्यंत 6 दिवसात 515 इच्छुकांचे एकूण 667 अर्ज दाखल झाले आहेत. 

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक

16-नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 27 इच्छुकांनी 34 अर्ज दाखल केले असून आत्तापर्यंत 41 इच्छुकांनी 56 अर्ज दाखल केले आहेत.      

नऊ विधानसभा क्षेत्रापैकी

किनवटमध्ये आज 10 इच्छुकांनी 16 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 31 इच्छुकांनी 45 अर्ज दाखल केले.

84-हदगावमध्ये 33 इच्छुकांनी आज 48 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 66 इच्छुकांनी 88 अर्ज दाखल केले.

85-भोकरमध्ये 76 इच्छुकांनी आज 93 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 144 इच्छुकांनी 167 अर्ज दाखल केले.

86-नांदेड उत्तरमध्ये 53 इच्छुकांनी आज 65 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 81 इच्छुकांनी 97 अर्ज दाखल केले.

87-नांदेड दक्षिणमध्ये 38 इच्छुकांनी आज 50 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 56 इच्छुकांनी 73 अर्ज दाखल केले.

88-लोहामध्ये 19 इच्छुकांनी आज 31 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 35 इच्छुकांनी 54 अर्ज दाखल केले.

89-नायगावमध्ये 18 इच्छुकांनी आज 27 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 35 इच्छुकांनी 48 अर्ज दाखल केले.

90-देगलूरमध्ये 28 इच्छुकांनी आज 39 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 43 इच्छुकांनी 60 अर्ज दाखल केले.

तर 91-मुखेडमध्ये 13 इच्छुकांनी आज 19 अर्ज दाखल केले असून आतापर्यंत 24 इच्छुकांनी 35 अर्ज दाखल केले.

नांदेड जिल्ह्यातील एकूण 9 विधानसभेसाठी एकूण 288 इच्छुकांनी आज 388 अर्ज दाखल केले तर आतापर्यंत एकूण 515 इच्छुकांनी 667 अर्ज दाखल केले आहेत.

0000

वृत्त क्र. 1001

सावधान ! उमेदवारांच्या सोशल मिडीया खात्यांची तपासणी होणार

·         कोणत्याही परिस्थितीत आचारसंहितेचा भंग होऊ देऊ नका

·         आक्षेपार्ह पोस्टस, फेकन्यूज, अफवा पसरविणाऱ्यांवर करडी नजर

नांदेड दि. 29 ऑक्टोबर :- नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीला गती आली असून आता उद्या 30 ऑक्टोबर रोजी छाननी व 4 नोव्हेंबर पर्यंत अर्ज परत घेतले जाणार आहेत. या उमेदवारांना अर्ज दाखल करतांना त्यांचे कोणते समाज माध्यम आहेत हे देखील नमूद करावे लागते. या सर्व समाज माध्यमांची दररोज तपासणी एमसीएमसीच्या समाज माध्यम शाखेकडून होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत एकदा उमेदवार निश्चित झाल्यानंतर उमेदवारांची जबाबदारी वाढणार आहे. भारत निवडणूक आयोगाने खर्च, प्रसिद्धी, प्रचार, सभा, रॅली, प्रचाराचा कालावधी, वृत्तपत्रात द्यावयाच्या जाहिराती, समाज माध्यमांवरील जाहिराती तसेच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत कडक नियम केले आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे अन्य बाबींप्रमाणेच आपले सोशल मिडिया हॅन्डल ज्यामध्ये फेसबूक, टिव्टर, इन्स्ट्राग्राम, युट्यूब, व्हॉटसॲप या सर्व खात्यांना हाताळतांना अतिशय जबाबदार लोकांची नेमणूक करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

जिल्ह्यामध्ये मोठ्याप्रमाणात उमेदवार विधानसभा निवडणूक व लोकसभा पोटनिवडणुकीत सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर यासंदर्भातील प्रशासनाचे आवाहन महत्व्ीपूर्ण ठरले आहे. कोणतीही सार्वत्रिक पोस्ट टाकायची असल्यास व्हिडिओ ऑनलाइन पाठवायचा असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती अर्थात एमसीएमसी समितीची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. उमेदवाराने  नेमलेल्या अधिकृत प्रतिनिधीमार्फत ही परवानगी घेता येईल. त्यामुळे परवानगी घेऊन पोस्ट करा. व्यक्तीगत पोस्ट करतांना परवानगीची गरज नाही. मात्र आचारसंहितेचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिकांसाठी सूचना

याशिवाय या काळामध्ये सामान्य नागरिकांनी देखील अतिशय सजगतेने समाज माध्यमांचा वापर करावा. गेल्या निवडणुकीत जवळपास 26 गुन्हे दाखल झालेले आहेत.  समाज माध्यमांवरील पोस्ट हेच प्रथमदर्शनी पुरावे असल्यामुळे यामध्ये गंभीर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे निवडणुकासंदर्भात व्यक्त होतांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

00000


वृत्त क्र. 1000

खर्च व सामान्य निरीक्षकासह पोलीस विभागाचे निरीक्षक नांदेडमध्ये दाखल 

निवडणुकीसंदर्भात तक्रारी असल्यास नागरिक साधू शकतात संपर्क


नांदेड दि. 29 ऑक्टोबर : भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य, खर्च, पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकासह सामान्य व पोलीस विभागाचे निरीक्षक दाखल झाले आहे. नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती किंवा तक्रार असेल तर कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.


सामान्य निवडणूक निरीक्षक


सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (भाप्रसे) यांची 83-किनवट व 84- हदगाव या विधानसभा क्षेत्रासाठी तर 85-भोकर व 86-नांदेड उत्तर मतदारसंघासाठी बी. बाला माया देवी (भाप्रसे) यांची तर 87-नांदेड दक्षिण- व 88-लोहा मतदार क्षेत्रासाठी श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) यांची तर 89-नायगाव, 90-देगलूर व 91-मुखेड मतदारसंघासाठी रण विजय यादव (भाप्रसे) यांची सामान्य निरीक्षक म्हणून दाखल झाले आहेत. हे सामान्य निवडणूक निरीक्षक शासकीय विश्रामगृहात निवडणूक काळात कार्यालयीन वेळेमध्ये सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतील.

 

निवडणूक निरीक्षक कालु राम रावत


विधानसभा निवडणुकीसाठी राजस्थान कॅडरचे 2008 तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी कालु राम रावत हे नांदेड येथे दाखल झाले आहेत. कालुराम रावत शासकीय विश्रामगृहावर निवडणूक काळात कार्यालयीन वेळेमध्ये सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतील. त्यांचा निवडणूक काळातील स्थानिक संपर्क क्रमांक 8180830699 आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराडे ( 88888921OO)त्यांच्यासोबत असतील. नागरिकांना नांदेड विश्रामगृहातील व्हीआयपी सूट क्रमांक एक मध्ये त्यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.


*मयंक पांडे किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर व दक्षिणसाठी निरीक्षक *


गुजरात कॅडरचे 2009 बॅचचे आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे हे सुरत येथे आयकर विभागात अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. मयंक पांडे यांचा संपर्क क्र. 08483845220 आहे. तर त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषदचे मुख्य लेखापाल शिवप्रकाश चन्ना (मो.नं. 9011000921) आहेत.  नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती द्यायची असेल तक्रार असेल तर कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.


ए गोविंदराज लोहा, नायगाव, देगलूर, मुखेडसाठी खर्च निरीक्षक


तामिळनाडू कॅडरचे चेन्नई येथील ए गोविंदराज यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नायगाव, देगलूर, मुखेड, लोहा या विधानसभा क्षेत्राच्या खर्च निरीक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. कार्यालयीन वेळेमध्ये त्यांच्याशी नागरिकांना संपर्क साधता येईल.


ए. गोविंदराज यांचा स्थानिक संपर्क क्रमांक 7249048040 आहे. त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गंगथडे (मोबाईल क्रमांक 9850485332) आहेत. कार्यालयीन कालावधीत त्यांना नागरिकांना भेटता येईल. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे लेंडी कक्ष येथे ते निवडणूक काळात निवासी आहेत.

00000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...