Monday, April 20, 2020


कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आपत्कालीन शेतीचे नियोजन
    COVID-19 च्या उद्रेक व प्रसार कालावधीत रब्बी पिके परिपक्वतेच्या अवस्थेत आहेत. बाजारपेठेतील हालचालींसह उत्पादनाची काढणी व हाताळणी करणे अपरिहार्य आहे कारण शेतीची कामे वेळेवर झाली पाहिजेत. तसेच किड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच सामाजिक स्वच्छता व सुरक्षितेच्या खबरदारीच्या उपाययोजनांचे पालन केले पाहिजे. या उपायांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे, साबणाने हात स्वच्छ धुवून वैयक्तिक स्वच्छता राखणे, फेस मास्क परिधान करणे, संरक्षक कपडे आणि उपकरणे व यंत्रसामग्री स्वच्छ करणे या बाबींचा समावेश होतो. शेतावर काम करणाऱ्या लोकांसोबतच सर्वांनी covid-19 चा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर काळजी घेणे महत्वाचे आहे.
गहू
1)  उशिरा गव्हाची पेरणी केली असेल व गहू पीक शेतात सध्या उभे तर कंबाईन हारवेस्टरच्या सहाय्याने काढणी करुन घ्यावी.
2)  कंबाईन हारवेस्टरची उपलब्धता नसल्यास मजुरांमध्ये योग्य ते अंतर ठेवून शक्य तितक्या कमी मजुरांच्या सहाय्याने गव्हाची कापणी व मळणी करुन घ्यावी.
3)  कृषि उत्पन्न बाजार समिती बंद असल्यास गव्हाची योग्य पद्धतीने वाळवणी करुन सेल्फास वापरुन गोदामात साठवणूक करावी.
4)  काढणी पश्चात गव्हाचे काड न जाळता, जमिनीची नांगरणी करुन शेत पुढील हंगामासाठी तयार ठेवावे.
5)      -याच भागात गहू पिकाची काढणी जवळपास पूर्ण होत आली असून त्यासाठी मोठे गहू कापणीयंत्र  राज्यामध्ये तसेच आजूबाजूच्या राज्यात वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. सदर यंत्रांची  दुरुस्ती,देखभाल करण्याऱ्या व हाताळणाऱ्या कामगारांनी तसेच शेतकरी/शेतमंजुर व त्याचे कुटुबातील सदस्य Covid-19 चा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी व काळजी घेणे आवश्यक आहे.
ऊस
1)   सुरु उसाची लागण झालेल्या क्षेत्रात पिक 4 महिण्याचे होईपर्यंत खुरपणी व कोळपणी करुन तण विरहित ठेवावे.
2)   उन्हाळा चालू झाल्याने उसाला योग्य वेळेच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. ऊस पिकास पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर करावा.
3)   पाणी कमी असल्यास सरी वरंबा पद्धतीमध्ये एक आड एक सरीस पाणी द्यावे.
4)   सुरु हंगामी लागवड केलेल्या उस पिकाच्या लागणीस 6 ते 8 आठवडे झाले असल्यास नत्र खताचा दुसरा हप्ता 100 किलो नत्र (युरिया 217 किलो) प्रती हेक्टरी या प्रमाणात द्यावा.
ऊन्हाळी भुईमुग
1)            ऊन्हाळी भुईमुगाच्या आ-या जमिनीत जाण्यास सुरवात झाल्यावर आंतरमशागत करु नये.
2)            ऊन्हाळी भुईमुगाच्या आ-या जमिनीत जाण्याच्या वेळी ते शेंगा पोसण्याच्या कालावधीस पिकास पाण्याचा ताण पडणार नाही याची दक्षता घ्यावी.
3)            भुईमुगास शक्य असल्यास स्प्रिंकलर पद्धतीने पाणी द्यावे.
4)            उशिरा भुईमुग पेरणी झाली असल्यास झाडांना माती लावावी.
5)            भुईमुग पिकावर टिक्का रोग येऊ नये म्हणुन कार्बेन्डाझीम 4 मिली प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
6)            पाने खाणा-या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफास 20 मिली 10 लिटर पाण्यात पाण्यात मिसळून फवारणी करावी.
7)            शेंगा तयार होत असताना जास्तीत जास्त शेंगा तयार होण्यासाठी 70 ग्रॅम 00:52:34 , 50 ग्रॅम मल्टीमायक्रोन्युट्रीयंट /15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला -
1)      सततच्या वाढत्या तापमानामुळे सर्व भाजीपाला पिकात पाण्याचे योग्य नियोजन करावे.
2)      कांदा काढणीस आला असल्यास काढणी करुन शेतात 3 ते 4 दिवस सुकवावा नंतर पात कापुन 3 आठवडे सावलीत सुकवावा तद्नंतर प्रतवारी करुन साठवणूक करावी.
3)      लसूण काढणी झाल्यानंतर पातीचा रंग परतल्यानंतर जुड्या बांधून हवेशीर ठेवावा.
4)      गवार पिकाची तोडणी वेळोवेळी करावी
5)      भेंडी पिकावरील रस शोषण करणा-या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमिथोएट 30 .सी. 15 मिली प्रति लिटर पाण्यातून फवारणी करावी.
6)      भाजीपाला पिकातील तण काढून घ्यावे त्यामुळे की व रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.
7)      वेल वर्गीय पिकामध्ये रस शोषून घेणा-या किडींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डायमिथोएट 30 .सी. किंवा इमिड्क्लोरिड 17.8 % एस एल 5 मिली व डायथेन एम-45 (25 ग्रॅम) ची फवारणी प्रति 10 लिटर पाण्यातून हातपंपाने करावी.
8)      भेंडी,भोपळा,वांगी इत्यादी भाजीपाला पिकावरील रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी 5% निंबोळी अर्काची किंवा फिप्रोनिल 25 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच भाजीपाला पिकावरील कोळींच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन 30% .सी., 5 मिली किंवा डायकोफाल 18.5% .सी., 20मिली प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.
डाळींब -
1)      डाळींबाचा आंबे बहार घेतला असल्यास ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन करावे. खत व्यवस्थापनासाठी फर्टीगेशन तंत्राचा वापर करावा.
2)      ब्लोअरच्या सहाय्याने कीटक /रोग नाशकाची फवारणी करावी.
3)      बागेत दोन ओळीत गवत वाढले असल्यास ट्रॅक्टरच्या सहाय्याने फणनी किंवा रोटावेटरच्या सहाय्याने तण काढावे.
4)      उन्हापासून फळांचे संरक्षण होण्यासाठी फळांना कागदी पिशव्या अथवा जुन्या कापडी पिशव्या च्व आच्छादन करावे.
5)      तेलकट डाग रोग नियंत्रणासाठी झाडांची नैसर्गिकरित्या पानगळ होईपर्यंत ताण द्यावा त्यामुळे काड्यांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने तसेच उच्च तापमानामुळे डोळ्यांजवळ असणारे जिवाणू मरुन जातील व पुढिल बहारामध्ये रोगाचे प्रमाण कमी होईल.
6)      बहार छाटणी करतेवेळी शेंड्याकडील 10 ते 15 से.मी. लांबीचा भाग छाटून काढावा तसेच शिफारशीत खतांची मात्रा देऊन नियमित पाणीपुरवठा करावा.
7)      सुत्रकृमींचा प्रादुर्भाव आढळून आल्यास 135 किलो कार्बोफुराऍन 3 जी प्रति हेक्टरी झाडांभोवती रिंग पद्धतीने पुरेसा ओलावा असताना टाकून झाकावे.
द्राक्ष
1)  फळाच्या काढणीस अडथळा आल्या कारणाने आपले नूकसान टाळण्याकरीता सध्याचा झाडावरील द्राक्षमाल बेदाण्यामध्ये परिवर्तित करण्यासाठी उपाययोजना करावी.
2)  पुर्ण काढणी झाली असल्यास व पुढील 10 दिवसांनी खरड छाटणी करण्याचे नियोजन असेल तर तत्पुर्वी जमीन व पाण्याची अन्नद्रव्य व खतांच्या नियोजनासाठी तपासणी करुन घ्यावी.
3)    द्राक्ष घडांची काढणी सकाळी किंवा सायंकाळी करावी.
4)    काढणी केल्यांनतर घड जास्तवेळ शेतात/बागेत ठेवू नयेत.
5)    घड वायूविजन असलेल्या सीएफबी पेटयांमध्ये भरुन पेटया बंद कराव्यात.
6)    पेटया थंड तापमाणास ठेवून पूर्व शीतकरण करावे व लगेचच 0 ते 2 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आद्र्रता असलेल्या शीतगृहात (कोल्डस्टोरेज) दोन महिन्यापर्यंत ठेवता येतात.
7)    द्राक्षापासून उत्तम प्रतीचा बेदाणा तयार करता येतो.
8)    थॉम्पसन सिडलेस,तास-ए-गणेश, सोनाक, माणिक चमण इ. जाती बेदाण्यासाठी उत्तम आहेत.
केळी -
1)  केळीच्या बुंद्याजवळ वाढणारी पिल्ले नियमित कापावीत. तसेच केळीवरील जुनी वाळलेली व रोगट पाने कापुन बाग स्वच्छ ठेवावी.
2)  ठिबक सिंचनाद्वारे पाणी व्यवस्थापन करुन बाग वापस्यावर राहील याची काळजी घ्यावी.
3)  केळीचा घड निसवल्यावर केळफूल कापावीत.
4)  केळीच्या घडाचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी केळीच्या वाळ्लेल्या पानांची पेंडी करुन केळीचा घड व घडाचा दांडा झाकावा.
5)  केळीचा घड पुर्ण निसवल्यावर त्यावर 0.5 % पोटॅशियम हायड्रोजन फास्फेट +1% युरिया + स्टिकर अथवा 10 पीपीएम 2-4-डी द्रावणाची फवारणी केल्याने केळी घडाच्या आकारमानात व गुणवत्तेत वाढ होईल.
6)  वजनाने मोठ्या असलेल्या घडास बांबूच्या सहाय्याने टेकू द्यावा.
7)  खोडवा पीक घेण्यासाठी मुख्य बागेची 70-75 टक्के निसवन झाल्यावर खोडवा धरावा. त्यासाठी केळी घडाच्या विरुद्ध बाजूचे एकसारख्या उंचीचे तलवारीच्या पात्यासारखी पाने असणारे पिल्ले राखावीत.
8)    केळीला गोलाई येवून लागल्यावर, इजा न करता सकाळी व सायंकाळी काढवीत.
9)    घड सावलीत आणल्यानंतर इजा न करता फण्या वेगळया कराव्यात.
10) फण्या थंड झाल्यावर 6 टक्के मेण अधिक 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.
11) द्रावणातुन काढून द्रावण सुकल्यावर क्रेटमध्ये ठेवून, 14-15 अंश सेल्सीयस तापमानास व 85 टक्के आद्रतेत शीतगृहात तीन आठवडयापर्यंत साठविता येतात.
12) केळीपासून वेफर्स, सुकेळी व पावडर तयार करता येते.
आंबा
1)  नवीन लागवड केलेल्या आंबा कलमांना वा-यापासून संरक्षणासाठी काठीचा आधार द्यावा.
2)  मोठ्या झाडांना फळधारणेनंतर जमिनीचा प्रकार, झाडाचे वय, पाण्याची उपलब्धता इ.विचारात घेऊन योग्य वेळेच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
3)  बाष्पीभवनाचा वेग वाढलेला आहे त्यामुळे जमिनीतील लावा कमी होऊ नये म्हणून फळझाडांच्या खाली वाळलेली पाने, तूर काड्या, उसाचे वाळलेले पाचट इ.चे आच्छादन करावे.
4)    पाड लागल्यावर झेल्याच्या सहाय्याने इजा न करता फळाची काढणी देठासहीत सकाळी किंवा सायंकाळी करावी.
5)    फळे काढल्यानंतर बागेत जास्त वेळ न ठेवता पॅकिंग हाऊसमध्ये आणावित.
6)    थंड पाण्यात ठेवून फळांचे पूर्वशितकरण करावे व फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवावीत.
7)    द्रावणात काढून द्रावण सुकल्यावर फळे वायूविजन असलेल्या सीएमबी पेटयामध्ये किंवा क्रेटमध्ये ठेवून, 10-12 अंश सेल्सीयस तापमानास व 85-90 टक्के आद्रतेत शीतगृहात एका महिन्यापर्यंत साठविता येतात.
8)    कच्चा आंब्यापासून लोणेच, आमचूर व पन्हे तयार करता येते.
9)    पिकलेल्या आंब्यापासून आंबापोळी व गर (पल्स) काढून वर्षभर साठवून ठेवता येतो.
चिक्कू :-
1)      काढणीस तयार झालेली फळे झेल्याच्या सहाय्याने इजा न करता सकाळी किंवा सायंकाळी काढवीत.
2)      फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत.
3)      फळे थंड झाल्यावर क्रेटमध्ये किंवा 0-2 टक्के वायूविजन असलेल्या 150 गेजच्या पॅालिथीनच्या पिशविमध्ये भरावीत.
4)      पिशव्या बंद करुन 18-20 अंश सेल्सीयस तापमानास ठेवल्यास 15 दिवसापर्यंत उत्तमरित्या साठविता येतात.
5)      पिकण्यास सुरुवात झालेल्या चिक्कु पासून कॅन्डी व गोड चटणी करता येते व पिकलेल्या चिक्कुपासून पावडर तयार करता येते.

कागदी लिंबू :-
1)  काळी माशीच्या नियंत्रणासाठी 15 ग्रॅम असिफेट 75 % पाण्यात मिसळाणारी पावडर प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2)    फळे पोपटी रंगाची असताना इजा न करता सकाळी  किंवा सायंकाळी काढावीत.
3)    काढलेली फळे सावलीत आणून पसरुन ठेवावीत.
4)    फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बाबीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.
5)    द्रावणातून काढून द्रावण सुकल्यावर फळे एक किलो क्षमतेच्या 0-2 टक्के वायूविजन असलेल्या 150 गेजच्या पॅालिथीनच्या पिशविमध्ये भरावीत किंवा क्रेटमध्ये भरावीत.
6)    या पिशव्या 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आद्र्रता असलेल्या शीतगृहात 40-45 दिवस ठेवता येईल.
7)    कागदी लिंबापासून लोणचे, गोड चटणी, कॉर्डियल सिरप इ. पदार्थ तयार करता येतात.
मोसंबी :-
1)    फळांना पिवळसर रंग दिसू लागल्यावर इजा न करता, देठ ठेवून सकाळी किंवा सायंकाळी काढावीत.
2)    फळे पिरगाळून काढू नयेत.
3)    फळे सावलित आणल्यानंतर हवेशीर व मोकळया जागेत पसरुन ठेवावीत.
4)    कागदी लिंबाप्रमाणेच फळे 6 टक्के मेण + 0.1 टक्के बावीस्टीनच्या द्रावणात एक मिनिट बुडवून ठेवाव्यात.
5)    द्रावणातुन काढून द्रावण सुकल्यावर फळे क्रेटमध्ये भरावीत.
6)    क्रेट 8-10 अंश सेल्सीयस तापमान व 85-90 टक्के आद्र्रता असलेल्या शीतगृहात एक महिन्यापर्यंत ठेवता येतात.
7)    मोसंबी फोडी काढून फ्रोजन करता येतात तसेच मार्मालेड, रस, सिरप व कार्बेानेटेड शीत पेय तयार करता येतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेत पिकाचे शेतमाल कापणी, काढणी, साठवणूक काढणी पश्चा व विपणन नियोजन :
1.    धान्य पिके शेतातून काढल्यानंतर साफ व स्वच्छ करुन धान्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के पर्यंत कमी होईपर्यंत सूर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.
2.    बीज उत्पादनासाठी धान्याचा वापर करावयाचा असले तर अशा धान्य पिकांची काढणी वेगळी करुन साफ व स्वच्छ करुन धान्यातील ओलाव्याचे प्रमाण 10 ते 12 टक्के पर्यंत कमी होईपर्यंत सुर्यप्रकाशात वाळवून साठवावीत.
3.    राज्यात काही जिल्ह्यांमध्ये गहू,मोहरी,मका यासारख्या पिकांच्या काढणी /कापणीची कामे सुरु आहेत. सदर कामांसाठी कम्बाईन हार्वेस्टर, ट्रॅक्टर किवां इंजिन ऑपरेटेड हार्वेस्टर यासारख्या यंत्रांचा वापर करण्यात येतो. तसेच ज्या ठिकाणी अशा स्वरुपाची यंत्रे उपलब्ध नाहीत अशा ठिकाणी मजुरांचे सहाय्याने कापणी करून थ्रेशर द्वारे मळणी करण्यात येते सदर यंत्रांच्या गावांतर्गत/ तालुक्यांतर्गत/ जिल्ह्यांतर्गत वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र यासाठी वैयक्तीक व सामाजिक सुरक्षेच्या सर्व उपाय योजना करणे आवश्यक आहे.
4.    शेतमालाची काढणी करण्यासाठी शक्य असल्यास यंत्रांचा वापर करण्यात यावा.तसेच यंत्र हाताळण्यासाठी आवश्यक कामगार उपस्थितीत राहतील असे पहावे.
5.    काढणी यंत्रांचा वापर केल्यास सदर यंत्रे, शेतमाल साठवून ठेवायच्या गोण्या व इतर साहित्य   वापरण्यापूर्वी निर्जंतुक करून घेणे आवश्यक आहे. यंत्राचा वापर झाल्यानंतरहि निर्जंतुक करून ठेवावे.
6.    मका व भूईमूग पिकाची काढणी करताना सामायिक यंत्र असल्या कारणाने काढणी यंत्राची स्वच्छता व निर्जंतुकीकरण करून मगच काढणी करावी.
7.    श्वसनमार्गाचा संसर्ग, एरोसोल आणि धूळ कणांपासून बचाव करण्यासाठी काढणी, मळणी, सुकवणी, मालाची प्रतवारी करताना व पॅकेजिंग करताना सर्व शेतकरी/ कामगारांनी चेहऱ्याला मास्क लावणे आवश्यक आहे.
8.    शेतात / घरात कापणी केलेले धान्य, ज्वारी/बाजरी, डाळींच्या साठवण करण्या अगोदर योग्य वाळवून  घ्या आणि किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील हंगामात ज्या ज्यूट पिशव्याचा वापर केला आहे त्या  पुन्हा वापर करू नका . ५ टक्के  कडुनिंब द्रावणात साठवणुकीच्या पिशव्या निर्जंतुक करून घ्याव्यात.
9.    शेतकऱ्यांच्या शेतमालास योग्य भाव मिळेपर्यंत साठवणूक करण्यासाठी पुरेश्या प्रमाणात ज्यूट पिशव्यांची उपलब्धता व त्याचबरोबर शेतमाल साठवण्यासाठी गोदाम, शीतगृह व वेअर हाउसची सोय असावी.
10. शेतमालाची काढणी केल्यानंतर शेतमालाची हाताळणी, वाहतूक करताना तसेच प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेत भाग घेताना वैयक्तिक व सामाजिक स्वच्छता व एकमेकांमध्ये ४-५ फूट अंतर राहील याची दक्षता घ्यावी.
11. बियाणे उत्पादन करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांनी बियाणांचा पुरवठा बियाणे कंपनीला करताना आवश्यक ती सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत.
12. टोमॅटो, कारली, हिरव्या पालेभाज्या, काकडी,कोबी आदी भाज्यांचे थेट विपणन/पुरवठा करताना वरील प्रमाणे खबरदारी घ्यावी.
13. तृणधान्य पिकापासून वेगवेगळे पदार्थ जसे पीठ,रवा, नाचणी सत्व, कुरडया, पापड, चकली, बिस्कीटे इ. तयारी करुन बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करुन पुरवठा करावा.
14. कडधान्य पिकापासून डाळी, पीठ इत्यादी सारखे उपपदार्थ इत्यादी तयार करुन बाजारपेठेच्या आवश्यकतेनुसार वेष्टण करुन पुरवठा करावा.
15. तेल बियांपासून तेल घाणीचा वापर करुन बाजारपेठेच्या मागणीनुसार तेल काढून वेष्टण करुन पुरवठा करावा.
16. कांदा काढणीसाठी आला असल्यास काढणी करुन 3 ते दिवस सुकवावा नंतर पात कापून 2 ते 3 आठवडे सावलीत सुकवून प्रतवारी करुन कांदा चाळीमध्ये हवेशीर साठवावा.
17. लसून काढणी झाल्यानंतर व्यवस्थित सुकवून जुडया बांधुन हवेशीर निवा­याला बांधून ठेवाव्यात.
18. कोरोनाच्या परिस्थितीमुळे फळे व भाजीपालांना बाजार पेठेच्या मागणी नुसार कमीत कमी हाताळणी करुन, वेष्टण करुन पुरवठा करण्यात यावा.
19. फळांची काढणी योग्य परीपक्वतेला करुन योग्य त्या तापमानाला व आर्द्रतेला व्यवस्थित साठवावीत.
20. काही फळांचे बाजार पेठेच्या आवश्यकते नुसार लगदा, रस, सिरप, स्क्वॅश इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ हवाबंद डब्यामध्ये किंवा बाटल्यामध्ये साठवून पुरवठा करावा.
21. काही फळांपासून लोणची, कॅण्डी, वाळविलेले तुकडे किंवा फळांची भुकटी करुन व्यवस्थित साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
22. आंबा पिकापासून आमचूर, लोणचे,मुरंब्बा, आंबा गर, आंबा पोळी इत्यादी प्रक्रिया युक्त पदार्थ बनवून साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
23. द्राक्षांपासून बेदाणा तयार करुन शीत कक्षामध्ये साठवावीत.
24. बटाटा व केळी सारख्या पिकांपासून चीप्स/वेफर्स तयार करुन वाळवून साठवावीत.
25. काही फळभाज्यांचे तुकडे करुन वाळवावीत, भुकटी करावी व साठवून बाजार पेठेच्या आवश्यकतेनुसार पुरवठा करावा.
26. भाजीपाला तसेच मेथी, कडीपत्ता, पालक, कोथंबीर इत्यादी वाळवून हवाबंद साठवावीत.
27. लाल मिरची व्यवस्थित सुकवून साठवावीत.
28. आवळा, शतावरी, गवती चहा, श्वागंधा, हिरडा, बेहडा इत्यादी वाळवून त्यांची पावडर करुन साठवावी.
29. हळद काढणीला आली असल्यास शिजवून, वाळवून, पॉलीश करुन साठवून ठेवावीत.
30. करोनाच्या परिस्थितीमुळे शहरामध्ये फळे व भाजीपाल्यांचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्या परिस्थितीमध्ये शेतक­यांनी एकत्र येवून सोशल माध्यमांचा जसे व्हॉटस्अॅप, फेसबुक इत्यादीचा वापर करुन लोकांच्या आवश्यकतेनुसार विविध फळे व भाजीपाल्यांच्या टोपल्या बनवून लोकांपर्यंत पोहचावीत.
31. फळे व भाजीपाल्यांपासून व्यापारी दृष्टया बनविण्यात येणारे प्रक्रियायुक्त पदार्थ खालीलप्रमाणे -
अ.क्र.
फळांचे नाव
व्यापारीदृष्टया महत्वाचे पदार्थ
1
आंबा
कच्चा आंब्यापासून निरनिराळया प्रकाराचे लोणाचे, आंब्याच्या फोडी खारवुन टिकवणे, चटणी, आंबोशी, आमकुट, पन्हे, स्क्वॅ, सरबत आणि पिकलेल्या आंब्यापासून आंबा पोळी (पापड) बर्फी, जॅम, नेक्टर, आंबापाक, टॉफी, हवाबंदडण्यातील आमरस, हबाबंद डब्यातील फोडी, गोठवलेल्या आंबा फोडी.
2
केळी
सुकेळी, भुकटी, वेफर्स, केळीचा पल्स, गोड वेपर्स इ.
3
लिंबु
लोणाची, स्क्वॅ, सरबत, लिंबुपाक, कॉर्डियल
4
अंजीर
सुके अंजीर, जॅम, अंजीर फळांचे हवाबंद डबे (कॅनिंग),अंजीर फळे पाकवीणे (कॅन्डी)
5
आवळा
चवनप्रा, मोरावळा, लोणची, आवळा सुपारी, कॅन्डी, सरबत, पल्स, आवळा चहा.
6
चिंच
कार्बोनेटेड पेय, जेली, चिंचोका काढूण वाळवलेला गर, चिंचेचा पल्स
7
डाळिंब
जेली, रस, सरबत, नेक्टर, डाळिंब पाक, आनारदाना, चुर्ण, फ्रोजपदाणे, डाळींबाच्या सालींची वाळवलेली भुकटी
8
पेरु
सरबत, पेरुगर, जेली, चॉकलेट (टॉफी) पेरु वडी
9
चिकू
कच्चा चिकूपासून लोणचे, मध्यमे पिकविलेल्या चिकुपासून मुरांबा आणि कॅन्डी, पिकलेल्या चिकु फळांपासून सरबत, स्क्वॅ, जॅम, चटणी वाळविलेल्या फोडी, चिकु भुकटी, मिल्क शेक
10
जांभुळ
सरबत, रस, स्क्वॅ, जॅम,बियांची भुकटी
11
पपई
कच्चा पपईपासून टुटीफुटी, पिकलेल्या पपईपासून जॅम, सरबत पेपेन.
12
बोर
बोर खजुर, सुकविलेली फळे, बोरकुट, लोणचे, मुरब्बा, सरबत, जॅम सिरप
13
संत्रा
सरबत, मार्मालेड, जेली, जॅम, सिरप, संत्रा फोडी डबाबंद करणे, संत्राच्या सालीपासून वाळवलेली भुकटी
14
द्राक्ष
किसमीस, मनुका, रस, सरबत, सिरप
15
स्ट्रॉबेरी
जॅम डोली सरबत सिरप
16
मोसंबी
रस, सरबत, सिरप
17
सिताफळ
पल्प काढून कमी तापमानाला साठवणे,आईस्क्रीम,मिल्कशे
18
टोमॅटो
केचप, सॉस, पेय, चटणी, पल्प भुकटी, पेस्ट
19
मिरर्च (लाल)
वाळवलेली मिरची, लालमिरची पावडर,सॉस, लोणचे,चटणी
20
मिरर्च (हिरवी)
पावडर,लोणाचे सॉस चटणी
21
कोथंबीर
वाळवेली कोथंबीर, भुकटी
22
पालक
वाळवलेली पालक, भुकर्टीं
23
मेथी
वाळवलेली मेथी
24
बटाटा
वेगवेगळे वेफर्स, पावडर, वाळवलेले बटाटा फोडी
25
वांगे
वाळवेल्या बारीक फोडी
26
कांदा
पेस्ट,पावडर, वाळलेल्या चकल्या
27
आले
पेस्ट, सुंठ, पावडर, लोणचे
28
कोबीवफलॉवर
वाळवलेले तुकडे/चकल्या
29
कढीपत्ता
वाळलेला काढीपत्ता, पावडर
30
गाजर
हलवा, वाळलेले बारीक तुकडे
31
वटाणा
गोठवलेला वटाणा, वाळलेला वटाणा
32
कारली
लोणची, भुकटी, रस
33
भोपळा
पावडर, रस, हलवा

कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी तसेच प्रसार रोखण्यासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात याव्यात :-
v  खरीप हंगाम लक्षात घेता शेतकऱ्यांना आवश्यक व उपलब्ध बियाण्यांचा, सूक्ष्ममूलद्रव्ये,जैविक खते,सेंद्रीय खते यांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विविध कृषि सेवा केंद्र, बियाणे व खते पुरवठा करणाऱ्या संस्था,बियाणे प्रमाणीकरण संस्था, वाहतूक करणाऱ्या यंत्रणा, संबधित अधिकारी व कर्मचारी यांना परवानगी पत्र /पास जिल्हाधिकारी /जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांचे मार्फत देण्यात यावे.
v  कृषि क्षेत्रात विविध पातळीवर काम करणाऱ्या कामगार वर्गास, शेतकऱ्यांना,तंत्रज्ञ, मदतनीस, वाहन चालक यांचे कोविड-१९ पासून संरक्षण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत घडिपत्रिका, पत्रके, माहिती पुस्तिका याद्वारे प्रतिबंधात्मक उपायोजना व काळजी कशी घ्यावी यांची मोठयाप्रमाणवर जनजागृती करण्यात यावी.
v  खते,बियाणे व इतर कृषि साहित्य यांची वाहतूक इतर राज्यातून आपल्या राज्यात/जिल्ह्यात होत असेल तर संबधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी त्या साहित्याची पडताळणी करावी.
v  पिक कापणी प्रयोगासाठी उपस्थित राहणाऱ्या सर्व अधिकारी ,कर्मचारी, विमा कंपनीचे प्रतिनिधी,शेतकरी  यांना सदर कामासाठी परवानगी पत्र/पास देण्यात यावेत. पिक कापणी प्रयोगाची सर्व माहिती भरण्यासाठी मोबाईल अँप वापरणे बंधनकारक आहे.
v  अतिवृष्टी, गारपीट,दुष्काळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीचे,शेतमालाच्या नुकसानाची माहिती शासनास सादर करणे अनिवार्य राहील.
v  शेतमाल काढणीनंतर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेत मालाची आवक-जावक करताना संबधित शेतकऱ्यांना, वाहन चालकांना, कामगारांना पास देण्यात यावा तसेच कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात यावी.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थितीत शेतमाल वाहतूक, साठवणूक आणि विपनाचे नियोजन -
            सध्या लॉकडाउनच्या काळामध्ये भाजीपाला, फळे, दुध, अन्नधान्ये व किरणा या बाबींची जनतेस नितांत गरज आहे. पैकी किराणा आणि अन्नधान्याचे चांगल्याप्रकारे नियोजन होत असून ग्राहकांना गरजेपुरती उपलब्धता आहे. परंतु नाशवंत शेती उत्पादनांच्या बाबतीत मागणी व पुरवठा समिकरण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे. दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासनास कठारे निर्बध लागु करावे लागत आहेत.याचे विपरीत परिणाम ग्राहक आणि शेतकरी यांना भोगावे लागत आहेत. या समस्यांवर निराकरणासाठी खालील बाबींचा नियोजनात अंतर्भाव करण्यात यावा.
1.    शेत मालाची काढणी व विक्री नियोजन :-
सद्यस्थितीमध्ये शेतमालाच्या काढणी आणि विपणनाचे नियोजन हे गाव पातळीवर करणे आवश्यक आहे. सदर शेतमालाचे कमी वजनाचे पॅकिंग करुन आवश्यकतेनुसार वाहतूक करणे सोयीस्कर होईल.
2.    शेतकरी उत्पादक संघ/गटामार्फत विक्री :-
केंद्राच्या धतींवर राज्य शासनाचेही शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ/गटामार्फत शेतमालाची विक्री ई नाम द्वारे करण्यासाठी परवानगी देण्यात यावी. तसेच ग्राहकसेवेसाठी व्हाटसअॅप इ. साधनांचा वार करावा यासाठी शहर आणि गाव पातळीवर तरुण स्वयंसेवक, बिगर शासकीय संस्था, सामाजिक संस्था याचा समावेश करण्यात यावा. सामाजिक साधनांच्या संदर्भात प्रसार आणि जागृतीसाठी आकशवाणी, एफ.एम, दुरचित्रवाणी यांचा प्रभावीपणे उपयोग होईल.
   ज्या उत्पादनासाठी (उदा.पीठ, दाळी, तेल इ) शेतमालावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे त्यासाठी कमीत कमी मनुष्यबळ वापरुन जिल्हा पातळीवर नियोजन केल्यास उत्पादन आणि वाटप करणे शक्य होईल. शेतकरी उत्पादक कंपनी, उत्पादक संघ/ गटांच्या सबळीकरणाची आवश्यकता आहे.
3.    शेतमाल वाहतुकीचे नियोजन :-
शेतमाल बाजार समित्यांमधील अतिरिक्त गर्दी आणि आपत्ती कायद्याचे उल्लंघन टाळण्यासाठी अशा ठिकाणी पोहचणा­या वाहनांस पुर्व आरक्षण आणि ई पासेस प्रणालीद्वारे नियोजीत केले जावू शकते. यामुळे बाजार समितीमध्ये येणा­या वाहनांच्या संख्येवर नियंत्रण राखता येवू शकेल. त्याचप्रमाणे बाजार समिती त्यांच्या कार्यक्षेत्रात विविध भागांसाठी  प्रवेशाची वेळ निश्चित केल्यानेही मोठया प्रमाणात गर्दी नियंत्रणात येवू शकते. सदर नियोजन प्रत्येक बाजार समितीमार्फत करण्यात यावे.
4.    निविष्ठांच्या उपलब्धतेचे नियोजन :-
आगामी खरीप हंगामाच्या पुर्वतयारीसाठी उपरोक्त उल्लेख केल्याप्रमाणे वाहतूक पुर्व आरक्षण आणि ई पासेस प्रणालीद्वारे नियोजीत केली जावू शकते. यामुळे पुरेशी उपलब्धता आणि काळा बाजार रोखणे शक्य होईल.

5.    पीक कर्जाची उपलब्धता :-
आगामी खरीप हंगामात शेतक­यांना शेती पुर्ण क्षमतेने करण्यासाठी कर्जाची खुप मोठया प्रमाणात आवश्यकता असणार आहे. या व्यतिरिक्त सध्या त्यांच्यावर असलेल्या कर्जाबाबतीत योग्य व्यवस्थापन करणेही महत्वाचे आहे. जिल्हा पातळीवर सर्व गोदामे शासन अखत्यारित आणल्यास सदर मालाची योग्य साठवणूक करता येईल.त्याचप्रमाणे शेतक­यांना या गोदामात ठेवलेल्या मालाच्या पावती आधारे कर्ज उपलब्ध करवून दिले जावू शकते, याबाबत शेतक­यांमध्ये जागृकता वाढविण्याची नितांत आवश्यकता आहे.

पाळीव जनावरे (गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्या इत्यादी)
1)      जनावरांच्या गोठ्यात स्वच्छता राखावी.
2)      बाहेरुन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवूनच गोठ्यात जावे.
3)      गोठ्यात चुना भुरभुरावा.
4)      जनावरांना दिवसभर पिण्याचे पाणी हवे तेव्हा मिळेल याची सोय करावी.
5)      चा-याचा तुटवडा भासू नये, यासाठी शेतातील दुय्यम पदार्थ जसे गव्हाचे काड, हरभरा,तुर इ.चा भुसा साठवून ठेवावा. तसेच मुरघास तयार करुन ठेवावा.
6)      दुपारच्या वेळी जनावरांना हिरवा मका, चवळी, कडवळ, लसुन घास यासारखी पोषक वैरण द्यावी.
7)      जंताच्या व विविध आजारांच्या नियंत्रणासाठी पशु वैद्यकाच्या सहाय्याने जंतनाशक जनावरांना पाजावे/ लसी टोचून घ्याव्यात.
8)      पशु वैद्यकाच्या सल्ल्यानुसार शेळ्यांना स्ट्रॅंगाईल (गोलकृमी) या जंताच्या निर्मुलनासाठी एप्रिल महिन्यामध्ये फेनबेन्डाझोल हे जंतनाशक द्यावे.
9)      उन्हाळ्याच्या सुरवातीस एप्रिल महिन्यामध्ये मेंढ्यांना देवी या रोगाची प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.

 टेबल (केवळ खाण्यासाठी) द्राक्षापासून मनुके (बेदाणे) बनविणे
      कोरोना विषाणू संसर्गाच्या सध्याच्या परिस्थितीत देशांतर्गत बाजारातील कृषीमाल पुरवठा साखळीवर वाईट परिणाम झाला आहे. भारतात कोरोना विषाणूचा शिरकाव होण्यापूर्वीच द्राक्ष निर्यात थांबवण्यात आली होती. नाशिक हे टेबल द्राक्ष उत्पादनासाठी ओळखले जाते, तर सांगली व सोलापूर जिल्हा मनुका तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात मनुका बनविण्याच्या सोयी सुविधा आवश्यक आहेत. प्रामुख्याने देशांतर्गत किवा निर्यातक्षम बाजारात टेबल द्राक्ष पुरवण्यासाठी द्राक्ष पिकविल्या  जाणाऱ्या प्रदेशात मनुका शेडची सुविधा नसते. सद्यस्थितीत खालील पद्धतीचा अवलंब करून टेबल (केवळ खाण्यासाठी) द्राक्षापासून मनुके (बेदाणे) तयार करता येऊ शकतात.
(संदर्भ- आयसीएआर –राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र यांचे कडून प्राप्त सल्ला)
१.   वेलीवर द्राक्ष सुकविणे –
·      द्राक्ष घड असलेली वेल(काडी) आधारासाठी म्हणून वापरात असलेल्या तारांसह बांधावी.
·      द्राक्ष घड असलेली वेल जेथून फुटलेली आहे तेथून २ ते ३ डोळे ठेवून वेल कट करावी.
·      १.५  टक्के तीव्रतेचे इथाएल ओलीएट आणि २.५ टक्के तीव्रतेचे पोटँशियम कार्बोनेटचे द्रावण तयार करावे.याकरिता  १ लिटर पाण्यामध्ये १५ मिली इथाएल ओलीएट आणि २५ ग्रम पोटँशियम कार्बोनेट मिसळावे. या द्रावणाचा सामू १०-११ चे दरम्यान असावा.
·      द्राक्ष घडावर तयार द्रावणाची फवारणी करावी.
·       १ लिटर पाण्यामध्ये ११ मिली इथाएल ओलीएट आणि २५ ग्रम पोटँशियम कार्बोनेट मिसळून  द्रावण तयार करावे.पहिल्या फवारणीनंतर ३ ते ४ दिवसांनी या द्रावणाची  द्राक्ष घडावर फवारणी करावी.
·      साधारणतः १२ ते १५  दिवसात मनुके (बेदाणे) तयार होतील.
·      जेव्हा मनुक्यांमध्ये १४ – १६ टक्के एवढी आद्रता असेल,तेव्हा वेल (काडी) तारांपासून वेगळी करावी.
·      वेलीपासून मनुके वेगळे करावे.
·      साफसफाई आणि ग्रेडिंग नंतर १० अंश सेल्सिअस तापमानात मनुके साठवावेत.
फवारणीकरिता रसायनांची आवश्यकता - जर द्राक्ष वेलींची लागवड १०*६ फूट अंतरावर असेल आणि एका झाडावर (वेलीवर) ४० ते ५० घड ठेवलेले असतील तर-
प्रथम फवारणी  : आवश्यक द्रावण : एका एकरसाठी १५० लिटर (जेव्हा फवारणीसाठी गन वापरली जाते.)
१५० लिटर द्रावण बनविण्यासाठी  २.२५ लिटर  इथाएल ओलीएट आणि ३.७५ किलोग्रॅम पोटँशियम कार्बोनेट आवश्यकता असेल.
दुसरी फवारणी : आवश्यक द्रावण : एका एकरसाठी १५० लिटर(जेव्हा फवारणीसाठी गन वापरली जाते.)
१५० लिटर द्रावण बनविण्यासाठी १.६५ लिटर  इथाएल ओलीएट आणि २.७० किलोग्रॅम पोटँशियम कार्बोनेट आवश्यकता असेल.
२.      पीक काढणीनंतर घड सुकणे :
·      कापणीनंतर क्रेटमध्ये  द्राक्षांचे घड गोळा करा.
·      १.५ टक्के तीव्रतेचे इथाएल ओलीएट आणि २.५ टक्के तीव्रतेचे पोटँशियम कार्बोनेटचे द्रावण तयार करावे. याकरिता १ लिटर पाण्यामध्ये १५ मिली इथाएल ओलीएट आणि २५ ग्रॅम पोटँशियम कार्बोनेट मिसळावे. या द्रावणाचा सामू १०-११ चे दरम्यान असावा.
·      या द्रावणात द्राक्षांचे घड ३ मिनिटे बुडवा.
·      ७०-८० किलो द्रक्षांसाठी १० लिटर द्रावण आवश्यक आहे. या द्रावणात द्राक्षांचे घड बुडवल्यानंतर,द्रावणाची तीव्रता आणि प्रभाव कमी होतो.
·      द्रावणात बुडवलेले द्राक्षांचे घड काढून जमिनीवर पसरवलेल्या पोलीथिनवर एकाच थरात ठेवा.
·      द्राक्ष बागेतील २ ओळीच्या मधील जागेचा उपयोग सुकवण्याच्या उद्देशाने केला जाऊ शकतो.
·      द्राक्ष घडातील प्रत्येक मण्याला सुकण्याची समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी हे घड दररोज हलवा.
·      द्राक्ष घड सुकवण्याच्या काळात तिसऱ्या आणि सहाव्या दिवशी या प्रमाणे दोनदा द्रावणाची फवारणी करा.
·      जेव्हा मनुक्याची आद्रतेचे प्रमाण १५ -१६ टक्के पर्यंत कमी होते तेव्हा वाळलेली द्राक्षे गोळा करा.
·      वाळलेल्या देठापासून मनुका वेगळा करा.
·      स्वच्छता आणि ग्रेडिंग नंतर मनुका १० अंश सेल्सिअस तापमानात साठवावेत.
रसायनांची आवश्यकता :
एक टन द्राक्ष सुकविण्यासाठी आवश्यक असलेल्या रसायनांचा तपशील खालीलप्रमाणे –
द्राक्षे बुडविण्यासाठी  : १ टन द्राक्षे बुडविण्यासाठी १२५ लिटर द्रावण आवश्यक आहे. याकरिता १.९० लिटर इथाएल ओलीएट आणि ३.१ किलोग्रॅम पोटँशियम कार्बोनेट आवश्यकता आहे.
प्रथम फवारणी : जर फवारणीसाठी गन वापरली गेली असेल तर एकूण २५ लिटर द्रावण आवश्यक आहे. यासाठी ३०० मिली इथाएल ओलीएट आणि ४५० ग्रॅम पोटँशियम कार्बोनेट आवश्यकता आहे.
दुसरी फवारणी : जर फवारणीसाठी गन वापरली गेली असेल तर एकूण २५ लिटर द्रावण आवश्यक आहे. यासाठी २०० मिली इथाएल ओलीएट आणि ३२५ ग्रॅम पोटँशियम कार्बोनेट आवश्यकता आहे.


।-।-।-।-।-।-।-।-।

  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...