Monday, September 10, 2018


गणेश मंडळांनी वर्गणी गोळा
करण्यासाठी परवानगी घ्यावी
नांदेड, दि. 10 :-  गणेश मंडळांना वर्गणी गोळा करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने परवानगी देणे चालू आहे. गणेश मंडळांना परवानगी मिळण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
सर्व सभासदांचे आधार कार्ड व पॅन कार्ड, ई-मेल आयडी, मोबाईल आयडी, जागा मालकांची संमती, पोलीस स्टेशनचे नाहरकत पत्र. गणेश मंडळांच्या स्थापनेबाबतचा ठराव. मागील वर्षाचा हिशोब. सर्व गणेश मंडळांनी ऑनलाईन किंवा ऑफलाईन परवानगी घेऊनच वर्गणी गोळा करावी, असे आवाहन धर्मादाय उपआयुक्त सौ. प्रणिता श्रीनीवार यांनी केले आहे.
000000


गणेशोत्सव, मोहरम सण शांततामय वातावरणात
उत्साहात साजरा करु या - जिल्हाधिकारी डोंगरे
नांदेड, दि. 10 :- येत्या काळातील गणेशोत्सव, मोहरम हे सण शांततामय वातावरणात व उत्सवात साजरे करण्याच्यादृष्टीने सर्वजण प्रयत्न करु या, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले.  
गणपती, मोहरम व इतर सण उत्सव काळात करावयाची कार्यवाही व उपाययोजना अनुषंगाने शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बचत भवन येथे आज संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर शिलाताई भवरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, मनपा आयुक्त लहूराज माळी, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांच्यासह समिती सदस्यांची उपस्थित होत.
जिल्हाधिकारी श्री. डोंगरे म्हणाले, येत्या 13 सप्टेंबर रोजी श्री ची स्थापना होऊन गणपती उत्सवास सुरुवात होत आहे. पुढे 23 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दर्शी रोजी श्री विसर्जन होणार आहे. तसेच येत्या 11 ते 20 सप्टेंबर या कालावधीत मोहरम हे सण दरवर्षी जिल्ह्यात उत्साहाने साजरा करण्यात येतात. या उत्सवाचे महत्व लक्षात घेता हे सण उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत आहे.
श्री. डोंगरे पुढे म्हणाले, समाजाची बांधिलकी लक्षात घेऊन गणेश मंडळांनी धुम्रपान रोखणे, प्लॅस्टिक बंदी, मतदार नोंदणीबाबतचे संदेश, देखावे उभारुन नागरिकांमध्ये जनजागृती करावी. यातून एक सकारात्मक संदेश समाजात जाईल. चांगले देखावे उभारणाऱ्या गणेशमंडळांना प्रोत्साहन दयावे. उत्सवात एकोप्याने एकत्र येवून काम करावे. अवैद्य वीजचोरी होणार नाही यासाठी महावितरणने कार्यवाही करावी, असेही श्री. डोंगरे यांनी सांगितले.  
पोलीस अधीक्षक श्री. पाटील म्हणाले, डिजेला कुठल्याही प्रकारे परवानगी दिली जाणार नाही. कुठल्याही नियमाचं उल्लंघन करण्यात येवू नये. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. तसेच गणेशोत्वादरम्यान गणेश मंडळांनी आपली वाहने तपासून घ्यावीत. नागरिकांना नवीन संदेश द्यावा. व्हॉट्सअपचा तसेच अन्य सोशल मिडीयाचा संवेदनशिलतेने वापर करण्यात यावा, असेही श्री. पाटील यांनी आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. काकडे म्हणाले गणेश मंडळांना "एक वार्ड एक गणपती" यासाठी प्रयत्न करावेत. तसेच "एक गाव एक गणपती" ही संकल्पना गणेश मंडळांनी राबविली तर गणेशोत्सव चांगल्या पध्दतीने साजरा करण्यास मदत होऊ शकेल.
बैठकीत विविध समाज घटकांचे प्रतिनिधी आदीनी मत मांडून महत्वपूर्ण सूचना केल्या. निवासी उपजिल्हाधिकारी श्री. वेणीकर यांनी बैठकीचे संयोजन केले .
000000


मराठवाडा विकास मंडळाची 11 सप्टेंबरची 
जिल्हास्तरीय बैठक पुढे ढकलण्यात आली
नांदेड दि. 10 :- औरंगाबाद मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड (कॅबिनेट मंत्री दर्जा) यांचे अध्यक्षतेखाली मराठवाडा विभागातील विकास कामांना गती देण्यासाठी मंगळवार 11 सप्टेंबर 2018 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आलेली बैठक काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आली आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेड जिल्हा नियोजन समिती, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात यांनी केले आहे.  
00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...