Friday, April 20, 2018


शेतकऱ्यांनी मान्यता प्राप्तच कापूस बियाणे खरेदी करावे

नांदेड, दि. 20:- गत वर्षीच्या खरीप हंगामात यवतमाळसह राज्यात मोठया प्रमाणावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. त्यामागील कारणांचा वेध घेतेवेळी एच.टी. बी.टी. कापूस बियाण्यांची अवैधरित्या मोठया क्षेत्रावर लागवड झाल्याची बाब समोर आली होती. आंध्राप्रदेश, तेलंगाना तसेच गुजरात राज्यातून या बियाण्याचा पुरवठा झाल्याचेही उघडकीस आले होते. या पार्श्वभुमिवर हंगामात एच.टी. बियाणे अवैधरित्या शेतकऱ्यापर्यंत पोहचणार नाही, या करीता कृषि विभागामार्फत जिल्हा स्तरावर 01 तालुका स्तरावर 16 असे एकूण 17 भरारी पथकांची स्थापना केली आहे. क्षेत्रिय कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जागृती अभियान राबविले जात आहे. तसेच शेतकऱ्यांनी अवैध पर्यावरण विरोधी एच.टी. बी.टी. कापूस बियाणे खरेदी करु नये लागवड करु नये. जर एच.टी. बी.टी. कापूस बियाण्यांची विक्री, साठवणूक, बुकींग बाबत माहिती प्राप्त झाल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ तसे कृषि विभागातील अधिकाऱ्यांशी पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क  करावा.

खरीप हंगाम 2018 मध्ये बियाणे, रासायनिक खते, किटकनाशक औषधी खरेदी करतांना शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी :- गुणवत्ता दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावे. बनावट/भेसळयुक्त बियाणे, खते, किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्यांकडून पक्या पावतीसह खरेदी करा. पावतीवर शेतकऱ्याची विक्रेत्याची स्वाक्षरी मोबाईल नंबरची नोंद करुन पिक निघेपर्यंत पावती संभाळून ठेवा. खरेदी केलेल्या बियाणेचे वेष्टन /पिशवी, टॅग, खरेदीची पावती त्यातील थोडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे. भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाणेची पॉकिटे सिलबंद/ मोहोरबंद असल्याची खात्री करा. बियाणे उगवणीच्या खात्रीसाठी पॉकिटावरची अंतीम मुद्दत पाहून घ्या. कमी वजनाच्या निविष्ठा तसेच छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषि विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा. किटकनाशके अंतीम मुदतीचे आतील असल्याची खात्री करा. आपल्या तक्रारी विषयी माहिती प्रत्यक्ष/ दुरध्वनी/ ई-मेल/ एस.एम.एस./ इत्यादी द्वारे देवून शासनाच्या गतीमान गुणनियंत्रण अभियानात सहभागी व्हा. कृषि निविष्ठांविषयी असलेल्या अडचणी/ तक्रारी सोडविण्यासाठी/ मार्गदर्शनासाठी कृषि विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800 233 4000 वर संपर्क साधावा. विक्री केंद्रावर भरारी पथकाचे फोन नंबर दिलेले आहेत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड कार्यालय फोन नंबर 02462-284252 कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद नांदेड कार्यालय फोन नं. 02462-234767 या क्रमांकावर संपर्क साधावा.

शेतकऱ्यांनी कोणत्याही भुलथापांना बळी पडू नये संभाव्य नुकसान टाळण्याकीरता मान्यता प्राप्तच कापूस बियाणे खरेदी करावे असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे सभापती कृषि पशुसंवर्धन समिती रेड्डी दत्तात्रय लक्ष्मण रेड्डी यांनी केले आहे.

****

तालुका स्तरीय जलदुत यांची निवड जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीकडे
  जलाशी निगडीत कामे करणाऱ्या स्वयंसेवकांची नावे 24 एप्रिलपर्यंत सादर करावीत
 
          नांदेड, दि. 20:- राज्यातील वापरायोग्य पाण्याची उपलब्धता मर्यादीत असून गरजेपेक्षा कमी आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग व अनियमित पर्जन्यमान यामुळे भविष्यात उपलब्ध पाण्यावरील ताण आणखी वाढणार आहे. उपलब्ध पाणी सर्व वापर कर्त्याना त्यांच्या गरजेच्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा वापर अत्यंत काटकसरीने  व नियोजन पुर्वक करण्याची आवश्यकता आहे.
         यासाठी समाजात जलजागृती व जलसाक्षरता निर्माण होण्याची गरज असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने जलसाक्षरता केंद्राची स्थापना  यशदा पूणे येथे केली आहे. याशिवाय उपकेंद्र वाल्मी (औरंगाबाद), अमरावती व चंद्रपूर या ठिकाणी स्थापन केले आहे. जलसाक्षरता अभियान यशस्वीपणे राबविण्या करीता  राज्यस्तरावर जलयोद्धा,  जिल्हास्तरावर जलनायक, तालुकास्तरावर जलदुत व ग्रामस्तरावर जलसेवक यांची  निवड करुन त्यांच्या मार्फत जलसाक्षरतेचे कार्य करण्याची संकल्पना आहे. सद्य:स्थितीत राज्यस्तरीय जलयोद्धा यांची यशदा, पुणे यांच्यामार्फत व जिल्हास्तरीय जलनायक यांची निवड विभागीय आयुक्त यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. तालुका स्तरीय जलदुत यांची निवड जिल्हास्तरीय जलसाक्षरता समिती मार्फत होणार असुन त्या करीता जलाशी निगडीत कामे करणा-या स्वयंसेवकांची नावे दिनांक. 24 एप्रिल, 2018 पर्यंत कार्यकारी अभियंता, नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर) नांदेड या कार्यालयाकडे सादर करावीत  किंवा सौ. यु. व्ही. होटकर  यांना 9970711273 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करुन माहिती सादर करावी.
या अभियानात जलसंपदा विभाग बरोबरच पाण्याच्या क्षेत्रात कार्यरत असलेले शासनाचे विविध विभाग उदा. वन, जलसंधारण ,ग्रामणविकास , पाणी पुरवठा व स्वच्छता ,रोजगार हमी योजना, कृषी, नगर विकास , उद्योग, पर्यावरण इ. द्वारे जलसाक्षरते संबंधी धोरणात्मक मार्गदशन केले जाणार आहे. तसेच जलसाक्षरता अभियाना अंतर्गत कार्य करणारे जलयोद्धा, जलनायक, जलदुत व जलसेवक यांना प्रशिक्षण कालावधीत प्रवास भत्ता व दैनिक भत्ता अनुज्ञेय राहणार आहे.
जलदूत निवडीचे निकष :- जलनायक (तालुकास्तर) जलदुत हा संबंधीत तालुक्यात राहणारा सज्ञान असावा. शक्यतो 12 वी किंवा पदविका उत्तीर्ण. संगणकीय संपर्काचे ज्ञान आवश्यक. सुक्ष्म निरीक्षण व निरीक्षणचे विश्लेषण तसेच निष्कर्षात्मक मांडणी करण्याची आवड व कौशल्य. जलविषयक शासकीय, अशासकीय/ समाजसेवी संस्थांशी संबंधीत प्रशिक्षक असल्यास प्राधान्य. जलसंधारणबाबत पुरेसे ज्ञान, सिंचन प्रकल्पची रचना, धरण व कालव्याचे संरक्षण या बाबत ज्ञान. निवडीमध्ये महिलांना प्राधान्य. जलक्षेत्रातील कामकाजाचा अनुभव.चांगले चारित्र्य.
जलदूत यांचे कार्य :- जलसेवकांच्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये (पायाभुत आणि उजळणी ) प्रशिक्षक म्हणुन काम करणे, तसेच इतर प्रशिक्षक वर्गामध्ये योगदान देणे. तालुकांतर्गत समन्वय ठेवणे प्रसंगी जलसेवकांना सर्वप्रकारचे पाठबळ देणे. राज्य शासनाच्या विविध विभागाकडील जल व्यवस्थापनाशी संबंधित योजना कार्यक्रम एकात्मिक पद्धतीने लाभार्थी पर्यंत पोहचविण्यासाठी विभागांना आवश्येतेनुसार सहकार्य (जसे जलयुक्त शिवार, जल जागृती, मनरेगा, पाणी पुरवठा व स्वच्छता इत्यादी). भुजलाचा व कालव्याच्या पाण्याचा संयुक्त वापर, विविध बंधा-याचे व्यवस्थापन, पारंपारिक प्रवाही सिंचनामध्ये पाण्याची बचत करण्याचे उपाय, उपलब्ध पाण्यामध्ये घ्यावयाची विविध पिके, पिकाची पाण्याची गरच, ग्रामीण व नागरी भागात पाणी वापरात बचतीचे उपाय, पाणीपुरवठा योजनांचे महत्व, पाणी टंचाई भागात पाणी पुरविठयाची व्यवस्था , नैसर्गिक प्रवाहाचे प्रदुषण रोखण्याचे उपाय, जलपुर्नभरण या बाबत साक्षर करणे. तालुका स्तरीय समितीस सहकार्य करणे.
जलसाक्षरता अभियानात जलप्रेमी, जलतंज्ञ, अभ्यासक, समाजसेवक, पर्यावर प्रेमी, अनुभवी शेतकरी, आधिकारी, सेवापुर्ण झालेले कर्मचारी, प्राध्यापक, शिक्षक, महाविद्यालयातील एन.एस.एस. चे विध्यार्थी यांना विनंती करण्यात येते की, या अभियानात सहभागी होऊन जलसाक्षरता  वाढविण्याकरिता व  येणाऱ्या काळात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्याकरिता सर्वांनी कार्य करुया. नांदेड जिल्यातील  जलसाक्षरता अभियानांतर्गत जलदुत निवड प्रक्रीया व शासन आदेशाची सविस्तर माहिती  दि. १८ एप्रिल, २०१८ रोजी दुपारी १२:००  वाजता नांदेड पाटबंधारे विभाग (उत्तर), जंगमवाडी नांदेड येथे श्री. आर. एम. देशमुख, कार्यकारी अभियंता व जलदूत प्रा. डॉ. परमेश्वर पौळ यांनी आयोजीत प्रेस कॉन्फरन्स मध्ये उपस्थित पत्रकार बांधवांना देण्यात आली आहे, असे नांदेड जिल्हास्तरीय जलसाक्षरता समिती, नांदेड पाटबंधारे विभाग (उ), सदस्य सचिव तथा कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
****
 
 
 

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...