Thursday, May 11, 2017

'एमएचटी-सीईटी- 2017' परीक्षा
नांदेड केंद्रांतर्गत सुरळीत संपन्न   
नांदेड, दि. 11 :- राज्यातील अभियांत्रीकी आणि औषधनिर्माण अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाच्या सामाईक प्रवेश परीक्षा कक्षांतर्फे घेण्यात येणारी 'एमएचटी-सीईटी -2017' परीक्षा आज येथे सुरळीत पार पडली. परीक्षेसाठी नांदेड केंद्रांतर्गत 27 परीक्षा उपकेंद्रावर व्यवस्था करण्यात आली होती. नांदेड केंद्रांतर्गत 8 हजार 42 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. ही परीक्षा कोणताही अनुचित प्रकार न घडता शांततेत व सुव्यवस्थेत संपन्न झाल्याची माहिती परीक्षा संयोजक समितीच्यावतीने देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालय व शासकीय तंत्रनिकेतन नांदेड यांच्यावतीने परीक्षेचे संयोजन करण्यात आले.
नांदेडसाठी जिल्हा केंद्र प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संपर्क अधिकारी म्हणून शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य पी. डी. पोपळे काम पाहीले. प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, अप्पर कोषागार अधिकारी एन. पी. पाचंगे, तहसिलदार ज्योती पवार यांनी परीक्षा सुरळीत संपन्न होण्याच्या दृष्टिने संयोजन केले. परीक्षेसाठी उपकेंद्र प्रमुख - 30, समवेक्षक - 370, पर्यवेक्षक - 90, उपसंपर्क अधिकारी - 7, सुक्ष्म निरीक्षक - 5 यांच्यासह वीस वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

'एमएचटी-सीईटी 2017' ही अभियांत्रिकी व औषध निर्माण शास्त्र (फार्मसी) व फार्म.डी या अभ्यासक्रमासाठी सामायिक प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षा केंद्राची विभागणी 'एमएम', 'एमबी', 'बीबी' अशी करण्यात आली आहे. परीक्षेसाठी शहरातील 27 परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आली होती. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी महात्मा फुले हायस्कूल, केंब्रिज माध्यमिक विद्यालय आणि शारदा भवन हायस्कूल या केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेसाठी उपस्थित विद्यार्थी संख्या पुढील प्रमाणे (कंसात नोंदणी केलेली एकूण विद्यार्थी संख्या )- 'एमएम' केंद्र (4 हजार 647 ) 4 हजार 496, 'एमबी' केंद्र (8 हजार 42) 7 हजार 773, 'बीबी' केंद्र (5 हजार 159) 4 हजार 938.   
प्रशासनाने परीक्षेसाठी सातत्यपूर्ण संपर्क व समन्वय ठेवून परीक्षा केंद्रांवरील सुविधांबाबत वेळीच खबरदारी घेतली. यामध्ये पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा, अखंडीत वीज पुरवठा व अनुषंगीक पोलीस बंदोबस्त याबाबत सुनियोजन करण्यात आले.   नांदेडसह लातूर, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांसाठी विभागीय प्राधिकारी म्हणून तथा गुरु गोबिंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक डॉ. एल. एम. वाघमारे काम पाहत आहेत. या परीक्षेचा निकाल 4 जून 2017 रोजी किंवा त्यापुर्वीही जाहीर होऊ शकतो, असे सामायीक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

000000
टपाल खात्याच्या भरतीसाठी
अर्ज भरण्यास मुदतवाढ
नांदेड, दि. 11 :-  भारतीय टपाल खात्यांतर्गत जिल्ह्यात 106 ग्रामीण डाक सेवक भरती करण्यात येणार आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत रविवार 21 मे 2017 पर्यंत वाढविण्यात आल्याचे नांदेड डाक विभागाचे डाक अधीक्षक यांनी कळविले आहे.
यापुर्वी या पदासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 6 मे 2017 पर्यंत मुदत देण्यात आली होती. तथापी तांत्रिक अडचणीमुळे आणि ऑनलाईन अर्ज प्रणालीवर आलेल्या अतिरिक्त भारामुळे अर्ज भरण्याबाबत अडचणी उद्भवू लागल्या होत्या. त्या पार्श्वभुमीवर या पदांसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आल्याची नोंद घ्यावी, असे आवाहन  नांदेड डाक विभागाचे डाक अधीक्षक यांनी केले आहे.रतीबाबतचे पात्रता निकष तसेच पदांबाबतची माहिती संबंधित संकेतस्थळावर https://indianpaost.gov.in किंवा https://appost.in/gdsonline उपलब्ध असल्याचेही या निवेदनात म्हटलेले आहे.

0000000
व्यसनमुक्ती पुरस्कारासाठी
संस्थांना अर्ज करण्याचे आवाहन
नांदेड, दि. 11 :- सामाजिक न्याय विभागातर्फे व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्थांना त्यांच्या कार्यासाठी पुरस्कार देण्यात येतात. त्यासाठी अशा पात्र व इच्छुक संस्थांनी अर्ज गुरुवार 25 मे 2017 पर्यंत दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने केले आहे.
सामाजिक न्याय विभागामार्फत सन 2017-18 या आर्थिक वर्षासाठी महात्मा गांधी व्यसनमुक्ती सल्ला, उपचार व पूनर्वसन केंद्र योजनेंतर्गत नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहनात्मक अनुदान या योजनेअंतर्गत संस्थांना त्यांचे व्यसनमुक्ती क्षेत्रातील कार्य लक्षात घेऊन 12 संस्थांना ( प्रत्येक महसूल विभागातून दोन संस्था प्रत्येकी ) 11 लाख प्रमाणे प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी पात्र संस्थांनी त्यांचे प्रस्ताव गुरुवार 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषदे यांचेकडे सादर करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करण्यात येणार नाही. अधिक माहितीसाठी सामाजिक न्याय विभागाच्या  https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेट दयावी.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...