समाजमनाला दिलासा देण्याच्यादृष्टीने
लोकअदालत उपक्रम महत्त्वपुर्ण - न्या. बारणे
राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन संपन्न
नांदेड, दि. 12 :- समाजाची घडी बसविण्याच्यादृष्टीने, समाजमनाला
दिलासा देण्याच्यादृष्टीने राष्ट्रीय लोक अदालतीचा उपक्रम महत्त्वपुर्ण असल्याचे
प्रतिपादन , प्रमुख जिल्हा न्यायाधीश सविता टी. बारणे यांनी आज येथे केले. जिल्हा
विधी सेवा प्राधीकरणाच्यावतीने आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन न्या. बारणे
यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा न्यायालयाच्या प्रांगणात
झालेल्या उद्घाटन समारंभासाठी व्यासपीठावर जिल्हाधिकारी सुरेश काकाणी,
महानगरपालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे, पोलीस अधीक्षक संजय येनपुरे, जिल्हा विधी
सेवा प्राधीकरणाचे सचिव ए. आर. कुरेशी, नांदेड अभियोक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.
मिलिंद एकताटे, जिल्हा सरकारी वकील ॲड. अमरिकसिंघ वासरीकर, उपजिल्हा निवडणूक
अधिकारी अंकुश पिनाटे यांची उपस्थिती होती.
समारंभास जिल्हा
न्यायाधीश ए. एल. यावलकर, न्या. व्ही. के. मांडे, न्या. श्रीमती एस. एस. तोडकर,
न्या. जी. बी. गुरव, न्या. ए. एस. सय्यद, न्या. जी. ओ. अग्रवाल, न्या. डी. टी.
वसावे, मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस. एन. सचदेव, एम. के. सोरटे, जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक पी. एस. तुप्तेवार,
जिल्हाधिकारी कार्यालयाचे विधी अधिकारी ॲड. आनंद माळाकोळीकर, ज्येष्ठ विधीज्ज्ञ
आदींची उपस्थिती होती.
लोकअदालतीसाठी आठ पॅनल
स्थापन करण्यात आली असून, याठिकाणी पॅनेल अध्यक्ष तसेच विधीज्ज्ञ व पक्षकारांच्या
उपस्थितीत विविध प्रकरणांबाबत कार्यवाही करण्यास सुरवात झाली.
उद्घाटनपर भाषणात न्या.
बारणे म्हणाल्या की, राष्ट्रीय लोक अदालत हा महत्त्वपुर्ण उपक्रम सर्वोच्च
न्यायालयाच्या निर्देशानुसार आयोजित करण्यात येतो. या उपक्रमामुळे सलोख्याने, समेटाने
प्रकरणे निकाली निघत असल्याने न्यायालयीन व्यवस्थेवरील ताण कमी होतो. नांदेड
जिल्ह्यातील न्यायाधीश, विधीज्ज्ञ आणि पक्षकारांच्या सहकार्यामुळे आतापर्यंत हजारो
प्रकरणे निकाली काढण्यात यश आले आहे. यामुळे विविध घटकांच्यावेळेचा आणि पैश्याचा
अपव्यय टाळण्यात यश येते. त्याशिवाय पक्षकारांच्या जीवनात सुख-समाधानही येते. प्रकरणे प्रलंबित राहण्यामुळे पक्षकारातील
अन्याय्य झाल्याची भावनाही कमी होते. सामंजस्यांने प्रकरणे निकाली निघण्याने, अन्य
महत्त्वपुर्ण आणि ज्यांना खरोखरच चांगला वेळ द्यावा लागणार आहे, अशा प्रकरणांवर लक्ष
केंद्रीत करणे शक्य होते. विविध घटकांनी एकत्र येऊन लोकअदालतीचे आयोजन करण्याने
समाजमनालाही मोठा दिलासा मिळतो.
जिल्हाधिकारी श्री.
काकाणी म्हणाले की, आपल्या राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वातच सकारात्मकतेचा
अंतर्भाव आहे. त्यामुळे मनुष्यबळ, उत्पन्नाचा वाटा अनावश्यक वादांमध्ये खर्च होऊ
नये यासाठी राष्ट्रीय लोक अदालत महत्त्वपुर्ण आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक
श्री. येनपुरे, मनपा आयुक्त श्री. उन्हाळे, अभियोक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. एकताटे,
जिल्हा सरकारी वकील ॲड. वासरीकर यांचीही समयोचित भाषणे झाली.
सुरवातीला मान्यवरांच्या
हस्ते दिपप्रज्वलनाने समारंभाचा प्रारंभ झाला. विधी सेवा प्राधीकरणाचे सचिव न्या.
कुरेशी यांनी प्रास्ताविकात या लोकअदालीतीत सुमारे 4 हजार 136 प्रकरणे सामंजस्याने
निकाली काढण्यासाठी ठेवण्यात आल्याची माहिती दिली. ॲड. विजय गोणारकर यांनी
सुत्रसंचालन केले. ॲड. प्रवीण आयचित यांनी आभार मानले.
00000000