Thursday, August 15, 2024

मला मिळालेले तीन हजार तीन लाखासारखे
 
मुख्यमंत्री ‘सर’ नाही तर ‘भाऊ’ असा आवाज देणार...

मुख्यमंत्र्यांची बहीण म्हणून कुटुंबात आता माझी नव्याने ओळख...

मुख्यमंत्री ‘भावा’शी राज्यातील लाडक्या बहिणींचा मनमोकळा संवाद

बहिणींना रक्षाबंधनापूर्वी ओवाळणी जमा झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले समाधान

मुंबई, दि. 15: ‘मी आता तुम्हाला मुख्यमंत्री सर म्हणणार नाही तर भाऊ म्हणेन..’, ‘घरखर्चासाठी आता नवऱ्याकडे रोज हात पसरणार नाही.. सख्खा भाऊ मला विचारत नाही..पण मुख्यमंत्री साहेब माझ्या पाठीशी सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहीले’, ‘मला मिळालेल्या तीन हजाराची किंमत ही तीन लाखा एवढी आहे..’, ‘माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त लवकर पैसे माझ्या खात्यात जमा झाले. रक्षाबंधनापूर्वी मला ओवाळणी मिळाली…!’ राज्यभरातील भगिनींनी आपल्या मुख्यमंत्री भावाकडे व्यक्त केलेल्या या भावना आहेत.  या भावनांनी मुख्यमंत्रीही हेलावले आणि तुमच्या लाखो भगिनींचं आशीर्वादाचं बळ माझ्या पाठिशी आहे.. अशा शब्दांत त्यांनीही भगिनींच्या प्रेमाचा स्वीकार केला.


कालपासून (दि. १४ ऑगस्ट) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांची एकत्रित रक्कम (तीन हजार रुपये) भगिनींच्या खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत सुमारे ८० लाख भगिनींच्या खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झाले असून आज या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रातिनिधीक स्वरूपात संवाद साधला. त्यावेळी लाभार्थी भगिनींनी आपल्या भावना व्यक्त करताना, मी आता मुख्यमंत्र्यांची बहीण आहे.. अशी नवीन ओळख निर्माण झाल्याचे सांगत मनमोकळेपणाने आपल्या मुख्यमंत्री भावाशी संवाद साधला.

राज्यभरातील भगिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटल्याचे सांगत ही योजना केवळ निवडणुकीपुरती नाही ती कायम आहे. योजनेकरिता या आर्थिक वर्षासाठी पूर्णपणे तरतुद करण्यात आली असून तुम्हाला योजनेचा लाभ मिळत राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आपल्या राज्यभरातील बहिणींना दिली.

‍मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे पैसे भगिनींच्या बँक खात्यात जमा झाल्याचा आनंद होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, भावाने बहिणीला दिलेला हा माहेरचा आहेर आहे. तुमचा भाऊ आज मुख्यमंत्री आहे. तो खंबीरपणे तुमच्या पाठिशी आहे. लाडक्या बहिणींना दिलेली ही मदत फक्त त्यांच्या पुरती मर्यादीत नाही तर त्यांच्या कुटुंबासाठीही मोलाची अशी ही भेट आहे. यामुळे तुम्हाला कोणाकडे हात पसरावा लागणार नाही. मुलांच्या शालेय साहित्यासाठी, तुमच्या औषधांसाठी, तसेच तुमचा सुरु असेलेला छोटा, मोठा व्यवसाय वाढवण्यासाठी या पैशांचा तुम्हाला उपयोग होणार आहे. घर कसे सांभाळावे हे महिलांना चांगले ठाऊक असते. त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून त्यांच्या हाताला बळ देण्याचे काम शासनाने केले आहे. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय वाढवालच त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही बळ मिळणार आहे. त्यातून तुम्ही नोकरी देणारे व्हा. त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होतील. महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासन कटीबद्ध आहे. महिलांसाठी शासनाने 108 योजना सुरु केल्या आहेत. या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ बहिणींनी घ्यावा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आज या योजनेच्या माध्यमातून बहिणींसोबत एक जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. सर्वसामान्य, दुर्बल, गरीब, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, युवक - युवती, कामगार यांच्यासाठी सरकार शक्य ते सर्व करत आहे. या सर्वांसाठी राबवण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळाला की केलेल्या कामाचे सार्थक झाले असे वाटते. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उमेदच्या माध्यमातून बचतगट सक्षम करण्याचे काम सरकार करत आहे. पुर्वी बचत गटांसाठी असलेली कर्ज मर्यादा वाढवून 20 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. आता त्यामध्ये 50 लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शिक्षणापासून मुली वंचित राहू नयेत, शैक्षणिक फीसाठी त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी मुलींना शिक्षणामध्ये 100 टक्के फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

            मुख्यमंत्री श्री. शिंदे पुढे म्हणाले, युवक – युवतींच्या हाताला काम मिळावे यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यात येत आहे. याचा फायदा उद्योगांनाही होणार आहे. राज्यात सध्या मोठ्या प्रमाणावर उद्योग उभारले जात आहेत. त्या उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत दिली आहे. त्यामुळे एसटी फायद्यातच आली आहे. याशिवाय वारकऱ्यांना शासन मदत करत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी वयोश्री योजना, मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना अशा अनेक लोककल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. फक्त रस्ते, पुल बांधणे, दळण वळण उभारणे महत्वाचे नाही तर लोककल्याणकारी योजना राबवणेही महत्वाचे आहे. यासाठी शासन कटीबद्ध असून राज्यातील प्रत्येक घटकासाठी शासन योजना राबवत आहे.

            शेतकऱ्यांचे कृषी पंपाचे वीज बील माफ करण्यात आले आहे. 45 लाख कृषी पंप धारकांना याचा लाभ झाला आहे. तसेच नमो सन्मान योजनेमध्ये केंद्राच्या 6 हजार रुपयांव्यतिरिक्त राज्य शासनाचे 6 हजार रुपये आणखी भर घालून आता 12 हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत.

            एखादी योजना सुरु करणे सोपे काम नाही. तसेच ती एका दिवसातही तयार होत नाही. लाडकी बहीण योजना तयार करण्याचे काम 1 वर्षापासून सुरु होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्यासह सर्व विभागांचे अपर मुख्य सचिव, सचिव  यांच्या परिश्रमामुळे ही योजना यशस्वी झाली आहे. गडचिरोली सारख्या जिल्ह्यापर्यंत योजना पोहचवल्याबद्दल सर्व अधिकारी वर्गाचे मी अभिनंदन करतो.

            महिलांना सक्षम  व आत्मनिर्भर बनवणे हा शासनाचा उद्देश आहे. त्यासाठी शासन व प्रशासन अहोरात्र काम करत असल्याचेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले.

            यावेळी महिला व बाल कल्याण विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्यासह राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि लाभार्थी महिला दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होत्या.
00000






 #नांदेड भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७७ वा वर्धापन दिन समारंभ आज सर्वत्र साजरा होत आहे. शहिदांच्या ,स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाला आठवण करतानाच आपल्या कर्तव्याप्रती जागृत राहण्याचा आजचा दिवस... स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा ! #स्वातंत्र्यदिन२०२४ #HarGharTiranga2024



 राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा #नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नांदेड जिल्ह्यातील समस्त नागरिकांसाठी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा संदेश पाठविला. गिरीश महाजन यांनी धुळे येथे आज ध्वजवंदन केले. #स्वातंत्र्यदिन२०२४ #HarGharTiranga2024







बातमी क्र. 723


सजली धरणे, इमारती आणि घराघरावर तिरंगा

 

·   नांदेडमध्ये हर घर तिरंगा अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नांदेड दि. 15 ऑगस्ट :- केंद्र व राज्य शासनाच्या हर घर तिरंगा अभियानाला नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. शहराच्या छतावर तिरंग्याचे राज्य तर वाहने, इमारती, धरणे, प्रकल्प, सभागृह सगळ्यांच्या शिरपेचात तिरंग्याने गेली तीन दिवस आपले स्थान निश्चित केले होते.

 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हर घर तिरंगा अभियान घराघरात मनामनात राबविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्येक घरावर या काळात तिरंगा अभिमानाने फडकत होता. ध्वजसंहितेमध्ये शिथिलता आणल्यानंतर अनेक घरांमध्ये, कार्यालयामध्ये तिरंग्याच्या 3 रंगांमध्ये सजावट करण्यात आली.

 

15 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य समारोहामध्ये प्रवेशद्वारावरील भव्य रांगोळी लक्ष वेधून घेत होती. तर जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्या 2 दिवसांपासून तिरंगी प्रकाशझोताने सजविण्यात आले होते. रात्री या इमारतीच्या सौंदर्यात अप्रतिम भर पडली. नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय इमारती अशाच प्रकारे सजविण्यात आल्या आहेत. पाटबंधारे विभागाने आपले महत्त्वपूर्ण प्रकल्प 3 रंगाच्या प्रकाशझोतात झळकविले आहे. नांदेड येथील विष्णुपूरी येथील अंतर्गत उपसा जलसिंचन प्रकल्प स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंधेला आकर्षनाचे केंद्र बनला होता. पाटबंधारे विभागाने जिल्ह्यातील अशा महत्त्वपूर्ण प्रकल्पांना हर घर तिरंगा अभियानांतर्गत आकर्षक पद्धतीने सजविले आहे. नांदेडचे हुजूर साहिब रेल्वेस्थानक, जिल्हा परिषद आदी इमारतींवरील रोशनाई लक्षवेधी ठरल्या आहेत.

0000

0000























मुख्य बातमी क्र. 722  

भारतीय स्वातंत्र्याच्या 77 व्या वर्धापन दिनाला जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून शुभेच्छा संदेश  

नांदेड दि. 15 ऑगस्ट:- भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. स्वातंत्र्यसैनिक व विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत सकाळी 9.05 वाजता हर्षोल्हासात त्यांनी ध्वजवंदन केले. यावेळी जिल्हावासियांना त्यांनी शुभेच्छा दिल्या तसेच विविध क्षेत्रातील उल्लेखनिय कार्यासाठी अनेकांना पुरस्कार बहाल केले. राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज धुळे येथे ध्वजवंदन केले. तथापि, स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर नांदेड जिल्ह्यातील तमाम नागरिकांना त्यांनी शुभेच्छा संदेश दिला आहे. 

त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय मधील या सोहळ्याला आज ध्वजवंदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. भारतीय स्वातंत्र्याचे 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या समारंभास विशेष पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

ध्वजवंदनानंतर सलामी देण्यात आली.  परेड कमांडर पोलीस निरीक्षक अविनाश धोंडगे यांनी सलामी पथकाचे नेतृत्व केले. पोलीस दलाच्या सलामीनंतर राष्ट्रगीत, राज्यगीत नंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी उपस्थित मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटूंबिय यांची त्यांनी आस्थेने विचारपूस केली. वीरमाता, वीरभगीनी यांच्यासह या विशेष कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, माजी विधान परिषद सदस्य अमर राजूरकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार बी.आर. देशमुख, माजी आमदार गंगाधर पटणे आणि स्वातंत्र्य सैनिकांचे वारस आदीची उपस्थिती होती.

 

विशेष कामगिरीचा गौरव

हैद्राबाद इनामे व रोख अनुदान रद्द करण्याबाबत अधिनियम 1954 मधील तरतुदी व शासन राजपत्रानुसार गठीत करण्यात आलेल्या अभ्यास समितीचे सदस्य म्हणून अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी काम केले. याबाबत अपर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, साऊथ आफ्रिका येथील मॅरेथान स्पर्धेत सहभाग नोंदवून विहित वेळेत अंतर पूर्ण केल्याबाबत उपजिल्हाधिकारी रोहयोचे ललीतकुमार वऱ्हाडे यांचा गौरव करण्यात आला. लोकसेवा हक्क अधिनियम 2015 अंतर्गत विहित कालमर्यादेत काम करणाऱ्या अर्धापूरचे नायब तहसिलदार शिवाजी बाळाजी जोगदंड यांचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.

 

पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांनी नक्षलग्रस्त भागात उत्कृष्ट कर्तव्य बजावलेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना विशेष सेवा पदक जाहिर केले. याबाबत पोलीस उप निरीक्षक सागर सुभाषराव झाडे, वैशाली निवृत्ती कांबळे, नारायण मारोती शिंदे, प्रियंका पवार, राजेश मारोती नंद, निजाम मुसा सय्यद, नरेश केशव वाडेवाले, सचिन मुकुंदराव आरमळ, उमेश किसनराव कदम, पोलीस नायक आशिष प्रभु माने यांना पुरस्कार प्रदान केले.

 

जिल्हा युवा पुरस्काराचे वितरण

यावेळी जिल्हा युवा पुरस्कार 2020-21 मध्ये युवक गटात खान इमरान मुजीब पाशा रा. बिलोली जि. नांदेड यांना  10 हजार रुपयांचा धनादेश व जिल्हा युवा पुरस्कार 2021-22 युवक यामध्ये अमोल उध्दवराव सरोदे यांचा रोख रक्कम 10 हजार रुपयांचा धनादेश व शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देवून सत्कार केला. संस्था या गटात अल इम्रान प्रतिष्ठान, बिलोली, जि. नांदेड यांना रोख रक्कम 50 हजार रुपये आणि जिल्हा युवा पुरस्कार 2022-23 युवक या गटात अमरदीप दिगंबर गोधने हाडको नवीन नांदेड यांना रोख रक्कम 10 हजार रुपयांचा धनादेश व शाल, श्रीफळ व सन्माचिन्ह, सन्मानपत्र देवून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 

विद्यार्थ्यांना पुरस्काराचे वितरण

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी सन 2023 सीबीएसई विभाग इयत्ता पाचवीतील 5 विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले. यात शाश्वत संतोष केसराळे, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा, पार्थ लिंगेश्वर सोनटक्के, नारायणा ई-टेक्नो स्कूल वाडी, बु नांदेड, सोहम उत्तम मोरे, ग्यानमाता विद्या विहार कामठा रोड, नरसतपूर, प्रज्वल सुंदर धवन, पोदार इंटरनॅशनल स्कूल, पूर्णा रोड नांदेड, सान्वी बाबाराव दारकू, ग्यानमाता विद्या विहार कामठा रोड, नरसतपूर यांचा समावेश आहे. याशिवाय पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी सन 2023 मध्ये ग्रामीणमध्ये शाकुंतल फॉर एक्सलंसचा मारोती शिवराज कुरुंदकर, ज्ञानभारती विद्या मंदिर पुयनीचा अद्वैत नरहरी भोसले, समृध्दी नागनाथ भुरे, कल्याण पद्यनजय कोनाळे यांना तर माध्यमिक शहरी विभागातून राजर्षी शाहू विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज, वसंत नगर, नांदेडचा दयासागर गंगाधर चिंचणे, केंब्रिज माध्यमिक विद्यालय, शिवाजीनगर, नांदेडचा श्रीयश रावसाहेब झांबरे यांचा सत्कार करण्यात आला. याशिवाय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सीबीएसई विभाग आठवीचे ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड येथील प्राची पंढरीनाथ जाधव, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा येथील विघ्नेश बालाजी राजे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड ओमसाई धर्मवीर ठाकूर, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा मयुरेश उमाकांत वाग्शेट्टे, अभिजीत संतोष मोरे, दिव्या राम अनकाडे, शाकुंतल फॉर एक्सलंस अथर्व संग्राम झुपडे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड स्नेहा देविदास जमदाडे, श्रेयस प्रभू दुगाळे पाटील, पिनॅकल इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल काकांडी तर्फे पासदगाव सोहम निलेश कोटगिरे, शाकुंतल फॉर एक्सलन्स रोहन गोविंद कौसल्ये, पिनॅकल इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल काकांडी तर्फे पासदगाव श्रुतिका गोविंद येळगे, नागार्जुना पब्लिक स्कूल, कौठा श्रीकर विक्रम महुरकर, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल वाडी बु. नांदेड सोहम गंगाधर मंत्रे, श्रीकांत शिवाजी मिरासे, पोदार इंटरनॅशनल स्कूल पूर्णा रोड तनिष्क दिनेशकुमार धुत यांचा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला. यानंतर नांदेड येथील अवयवदान केलेल्या ढोके यांच्या परिवाराचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रलोभ कुलकर्णी व अक्षय रोडे यांनी केले.

00000







 

योजना सर्व स्पर्शी...गतिमान आणि पारदर्शी !


  ​   वृत्त क्र. 88 राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे नांदेड विमानतळावर आगमन  दीक्षांत समारंभासाठी परभणीकडे प्रस्थान नांदेड दि. २३ जानेवारी :...