Wednesday, January 3, 2018

   जनतेने शांतता व संयम ठेवावा
पालकमंत्री खोतकर यांचे आवाहन
नांदेड, दि. 3 :- नांदेड जिल्ह्यातील जनतेने शांतता व संयम ठेवून कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेवू नये, सामंजस्याचे वातावरण निर्माण करुन सलोखा निर्माण करावा, असे आवाहन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे.  
भीमा-कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभुमीवर नांदेड शहरात घडलेल्या हिंसक प्रकारानंतर आजही तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यासर्व घटनांचा आपण आढावा घेत असून, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी संपर्कात आहोत. जनतेने कायदा हातात न घेता शांतता व संयम ठेवून सलोखा निर्माण करावा, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याचीही काळजी घ्यावी. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री श्री. खोतकर यांनी केले आहे.  

00000
संयम ठेवून कायदा-सुव्यवस्था पाळा
अफवांवर विश्वास ठेवू नका
- जिल्हाधिकारी अरुण डोंगरे
नांदेड, दि. 3 :- जिल्ह्यातील नागरिकांनी शांतता, संयम तसेच कायदा व सुव्यवस्था पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले. जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठकीच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील बचत भवन येथे बैठक आज संपन्न झाली.
बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार, महापौर श्रीमती शिलाताई भवरे, आ. डी. पी. सावंत, आ. हेमंत पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, अप्पर जिल्हाधिकारी संतोष पाटील, मनपा आयुक्त गणेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी जयराज कारभारी, भदन्त पय्याबोधी, उपविभागीय अधिकारी प्रदिप कुलकर्णी, तहसिलदार किरण अंबेकर तसेच महावितरण, सार्वजनिक बांधकाम आदी विभागाचे अधिकारी, समिती सदस्य यांच्यासह या बैठकीस सर्व धर्मीय नागरिक आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.  
श्री. डोंगरे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथील घटनेच्‍या अनुषंगाने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. कायदा सुव्यवस्था सुदृढ करण्यासाठी आपण सर्वांनी शांतता आणि संयम पाळावा. सर्वांनी शांततादूत म्हणून काम करावे, असेही आवाहन श्री. डोंगरे यांनी केले आहे.   

00000
नागरिकांनी संयम, शांतता राखावी
जिल्हाधिकारी डोंगरे यांचे आवाहन
           
नांदेड, दि. 3 :- पुणे जिल्ह्यातील भिमा कोरेगाव येथील घटनेच्‍या अनुषंगाने नागरिकांनी अफवा किंवा भुलथापांना बळी न पडता जिल्ह्यात कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राहील यादृ‍ष्‍टीने समजूतदारपणे संयम आणि शांतता राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी केले आहे. 
फेसबुक, व्‍हाटस्अॅप, टिव्टर अशा सोशल माध्यमावरील आक्षेपार्ह मजकूर तयार करणे, संग्रहीत करणे, प्रसारित करणे हा दखल पात्र स्‍वरुपाचा अपराध आहे. याप्रकारे  कोणत्‍याही प्रकारची अफवा शहरात पसरवत असल्‍याची माहिती प्राप्‍त झाल्‍यास तात्‍काळ पोलीस नियंत्रण कक्ष 02462-234720 या क्रमांकावर संपर्क साधावा.  अशा व्‍यक्तविरुद्ध कायदेशर कार्यवाही करण्‍यात येईल. यासंदर्भात कुठलीही बातमी व अफवावर विश्‍वास ठेऊ नये जिल्ह्यात सर्वांनी शांतता ठेवावी, असेही आवाहन जिल्हाधिकारी श्री. डोंगरे यांनी केले आहे.
00000


इतर मागासवर्गीय महामंडळाच्या
थकीत व्याज रक्कमेवर सवलत
            नांदेड, दि. 3 :- महाराष्‍ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने थकीत व्याज रक्कमेवर लाभार्थ्यांना 2 टक्के सवलत शनिवार 31 मार्च 2018 पर्यंत देण्याचे जाहीर केले आहे. त्याचा लाभ घेऊन संबंधीत लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरक्कमी जमा करुन कर्ज खाते बंद करावे, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नांदेड यांनी केले आहे.
जिल्ह्यात महामंडळाने विविध कर्ज योजनेंतर्गत इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदराने कर्ज वितरण केले असून 38 लाख रुपये कर्ज थकीत आहेत.  थकीत वसुलीबाबत या विभागाचे सचिव यांनी नुकतील आढावा बैठक घेतली.  थकीत रक्कमेबाबत संबंधीत लाभार्थी, त्यांचे जामीनदार हमीपत्र / पगारपत्रक धारकांच्या वेतनातून कपात, गहाणखत (कर्ज बेजा नोंद उतारे) इत्यादीचे आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा 1966 मधील तरतुदीनुसार आर.आर.सी. आदी अंतर्गत कार्यवाही करुन वसुली करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यानुसार महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून कायदेशीर कार्यवाही करण्याचे कामकाज चालू आहे. त्याअनुषंगाने नांदेड जिल्ह्यातील थकीत लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरक्कमी भरुन कर्ज खाते बंद करुन कर्ज मुक्त व्हावे, असेही आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक नांदेड यांनी केले आहे.  

000000 
होमगार्ड सदस्य नोंदणीचा कार्यक्रम रद्द   
नांदेड, दि. 3 :- भिमा कोरेगाव येथील घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेता होमगार्ड सदस्य नाव नोंदणीचा कार्यक्रम पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आला आहे. सुधारीत नाव नोंदणीचा कार्यक्रम वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करण्यात येईल, असे जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी कळविले आहे.

000000
केळी पिक संरक्षणासाठी कृषि संदेश
नांदेड, दि. 3 :- उपविभागीय कृषि अधिकारी नांदेड अंतर्गत मुदखेड व अर्धापूर या तालुक्यात केळी पिकासाठी किड व रोग सर्वेक्षण हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. केळी पिक संरक्षणासाठी पुढीलप्रमाणे संदेश देण्यात आला आहे.
केळीच्या पानावर रोगाचा प्रादुर्भाव आकाराने जास्त असेल तर त्याचा परिणाम प्रकाश संश्लेषणावर होतो. पानाचा प्रादुर्भावग्रस्‍त भाग काढून टाकावा. कार्बेन्डॅझिम 0.5 टक्के ( 0.5 मि.ली.) मिनरल ऑईल एक टक्के ( 10 मि.ली.) मिनरल ऑईल टाकून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी, नांदेड यांनी केले आहे.

000000
केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री
नितीन गडकरी यांचा दौरा
नांदेड, दि. 3 :- केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग, नौकानयन व जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्री नितीन गडकरी हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहील.
शुक्रवार 5 जानेवारी 2018 रोजी नागपूरहून विशेष विमानाने सकाळी 11.30 वा. नांदेड विमानतळावर आगमन व राखीव. दुपारी 11.45 वा. नांदेडहून हेलिकॉप्टरने लोहाकडे प्रयाण. दुपारी 12 वा. लोहा येथे आगमन व लोहा येथील राष्ट्रीय महामार्गाचे कोनशिला अनावरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 1.30 वा. लोहा येथून हेलिकॉप्टरने अंबेजोगाईकडे प्रयाण करतील.  

000000
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2017
भाग घेण्याचे आवाहन
       
नांदेड, दि. 3 :- राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन आणि उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार, सोशल मीडिया पुरस्कार, स्वच्छ महाराष्ट्र जनजागृती पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. 2017 या कॅलेंडर वर्षा करीता दि. 1 जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2017 पर्यंतच्या कालावधीसाठी प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख 31 जानेवारी 2018 अशी आहे. या स्पर्धेचे माहिती पत्रक, अर्जाचे नमुने www.maharashtra.gov.in, www.dgipr.maharashtra.gov.in  तसेच www.mahanews.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
            तरी वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्यांमधील पत्रकार, छायाचित्रकार यांनी मोठ्या संख्येने  या स्पर्धेत भाग घ्यावा, असे आवाहन संचालक (माहिती) मराठवाडा विभाग यांनी केले आहे.
000000


  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...