Tuesday, December 10, 2024

 वृत्त क्र. 1181 

माळेगाव यात्रेतील भाविकांना सर्व सोयी-सुविधा

मिळण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी नियोजन करावे

- आमदार प्रताप पाटील चिखलीकर  

·  माळेगाव यात्रेच्या तयारीसाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज

·  माळेगाव यात्रेच्या यशस्वीतेसाठी स्थानिक ग्रामस्थांचे सहकार्य आवश्यक

· आमदार प्रताप पाटील चिखलीकरांनी सर्व विभागांचा घेतला आढावा 

नांदेड, दि. 10 डिसेंबर :- नांदेड जिल्ह्यासह आपल्या शेजारील राज्य व जिल्ह्यातील अनेक भाविक दर्शनासाठी माळेगाव येथे दरवर्षी येतात. दक्षिण भारतातील माळेगाव येथे सर्वात मोठी यात्रा दरवर्षी भरते. असंख्य लोकांचे माळेगाव येथील श्री खंडोबा कुलदैवत असून  येथील जत्रा ही मागील अनेक वर्षांपासून भक्तांचे श्रद्धास्थान आहे. यात्रेत येणाऱ्या प्रत्येक भाविकांला सर्व सोयी-सुविधा प्राप्त होतील यादृष्टीने संबंधित यंत्रणानी सूक्ष्म नियोजन करावे , असे प्रतिपादन आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. माळेगाव येथे आमदार प्रताप पाटील चिखलीकराच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. 

श्री क्षेत्र माळेगाव येथील यात्रेच्या पूर्वतयारीसाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेवून नियोजनाच्या दृष्टीने आज माळेगाव येथे आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, माळेगावचे सरपंच हनमंत धुळगंडे, प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजूषा कापसे, पशुवैद्यकिय विभागाचे उपायुक्त डॉ. घुले व वरिष्ठ अधिकारी व माध्यम प्रतिनिधी तसेच मोठया प्रमाणात ग्रामस्थांची उपस्थिती होती. 

यात्रेच्या परंपरेप्रमाणे येथील पशुप्रदर्शन, शंकरपट याकडे भाविकांचा अधिक ओढा आहे यासाठी जिल्हा परिषद प्रशासनामार्फत यांचे आयोजन करण्यात येणार आहे. पशुधनाच्या व कृषि विभागाच्या विविध स्टॉलसह विविध स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहेत. यात्रेत सीसीटीव्ही, फिरते शौचालय, सुरक्षा व्यवस्था, शालेय मुलांसाठी माळेगाव येथे सहलीचे आयोजन करण्यात यावे, वाहन व्यवस्था तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी वाहन व्यवस्था करण्यात यावी याबाबत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी प्रशासनाला सूचना दिल्या.  यात्रेसाठी आवश्यक अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितले. 

यात्रेतील भाविकांसह सर्वांना पिण्याचे पाणी, बाजारात विकल्या जाणाऱ्या अन्न पदार्थांची तपासणी करण्याबाबत अन्न व औषध पुरवठा विभागाला सूचना दिल्या. यात्रेतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षतेच्यादृष्टिने सीसीटीव्ही लावले जाणार आहेत. यात्रेतील सामाजिक सलोखा, शांतता याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यात्रेत कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, पोलीस विभाग दक्ष आहे. याचबरोबर माळेगावच्या ग्रामस्थही अधिक दक्षता घेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले. 

29 डिसेंबर 2024 ते 3 जानेवारी 2025 या कालावधीत विविध महोत्सव व उपक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. यावेळी महावितरण, पाणी पुरवठा, राज्य परिवहन महामंडळ, शिक्षण विभाग, बीएसएनएल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, पोलीस प्रशासन, पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, समाज कल्याण, महिला व बालविकास विभाग, बांधकाम विभाग आदी विभागांनी करावयाच्या कार्यवाहीचा आढावा यावेळी घेण्यात आला.

00000









 वृत्त क्र. 1180 

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष

ॲड निलेश हेलोंडे पाटील यांचा नांदेड दौरा 

नांदेड, दि. 10 डिसेंबर :- कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) ॲड निलेश हेलोंडे पाटील हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

बुधवार 11 डिसेंबर 2024 रोजी हिंगोली येथून सायं. 6 वा. विश्रामगृह नांदेड येथे आगमन व मुक्काम. गुरुवार 12 डिसेंबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बैठक. दुपारी 1 वा. विश्रामगृह नांदेड येथे राखीव. दुपारी 1.30 वा. विश्रामगृह नांदेड येथून परभणीकडे प्रयाण करतील.

00000

 वृत्त क्र. 1179

मोटार सायकल नोंदणीसाठी नविन मालिका सुरू 

नांदेड, दि. 10 डिसेंबर :- परिवहन्नेत्तर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी एम एच 26-सीएस ही नविन मालिका दिनांक 12 डिसेंबर 2024 पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे (आधार कार्ड, पॅन कार्ड, मोबाईल नंबर व ईमेलसह) अर्ज दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाही. त्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास दिनांक 11 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत Text message / दूरध्वनीद्वारे संबंधित अर्जदारास कळविण्यात येईल. सर्वानी याबाबतची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले. 

0000

वृत्त क्र. 1178

जमिनीत जैविक सूक्ष्म जीवाचा 
अधिवास वाढवण्याची गरज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कळसाईत

 

·   जागतिक मृदा दिन पोखर्णी येथे संपन्न

 

नांदेड दि. 10 डिसेंबर : जमिनीतील रासायनिक खतांचा होणारा अतिवापर टाळून जमिनीमध्ये जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी केले.

 

जागतिक मृदा दिनानिमित्त जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालय व कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथे मृदा दिन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच डिसेंबर रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत तर प्रमुख मार्गदशक म्हणून तालुका कृषी अधिकारी चातरमल, कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. देविकांत देशमुख, डॉ. महेश अंभोरे, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड यांची उपस्थिती होती.

 

जैविक संघ ट्रायकोडर्मा, मेटज्ञराझियम, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क आदी सूक्ष्म जीव व जैविक घटकांचा वापर करावा असे सांगितले. जमिनीचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी एकात्मीक अन्न द्रव्य व्यवस्थापन, मिश्र पीक पद्धती विषयी माहिती दिली. शेतकऱ्यांनी जमिनीशी असलेली आपली नाळ घट्ट करावी असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. आर. कळसाईत यांनी सांगितले.

 

डॉ. देविकांत देशमुख यांनी शेतकऱ्यांना आपल्या प्रमुख मार्गदर्शनातुन मृदेचे मानवाच्या जीवनातील अनन्य साधारण महत्त्व विशद करुन शेतकऱ्यांनी रासायनिक खते व औषधे यांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करावा. मृदेचे आरोग्य व जैवविविधता जोपासावे असे सांगितले. कृषि विज्ञान केंद्र पोखर्णी येथील शास्त्रज्ञ प्रा. संदीप जायभाये यांनी शेतकऱ्यांनी मृदा परीक्षण अहवालाप्रमाणे पिकांना खतांच्या मात्रा द्याव्यात तसेच मृदेचा सामु, सेंद्रिय कर्ब यांची माहिती सोप्या भाषेत सांगितली. तसेच मृदा चाचणीतुन शेतीमध्ये सकारात्मक बदल होत असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. पवळे मॅडम यांनी मृदेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी मृद परीक्षण करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले व त्याचे महत्त्व सांगितले.

 

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कळसाईत यांच्या हस्ते गावातील शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. तसेच कृषि विज्ञान केंद्र येथील प्रशिक्षित घेतलेल्या प्रशिक्षणार्थी यांचा प्रमाणपत्र सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. महेश अंभोरे यांनी केले तर जि.मृ.स.मृ चा अधिकारी पी. पी. पल्लेवाड यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

 

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी प्रकाश पल्लेवाड कार्यालयातील कृषी पर्यवेक्षीका जे.सी. शिंदे, कृषि सहाय्यक एस.एस. सोनवणे, गुप्ता मॅडम, दत्तत्रय चिंतावार, गजानन पडलवार, राहुल जाधव, जावेद शेख, मोहन बेरजे, सुनील कराळे, एम.ए. पठाण आदींनी परिश्रम घेतले.

00000

वृत्त क्र. 1176

कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे : सुरेखा कोसमकर
जिल्हयात वेठबिगारीला थारा नाही : जिल्हाधिकारी
असंघटीत कामगारांसाठी विशेष सेलचे उपस्थिती कार्ड
नांदेड, दि. 10 डिसेंबर :- असंघटीत कामगांराना त्यांच्या हक्काची माहिती व्हावी, त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याची माहिती ज्ञात होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात येतात. हे कार्य खूप मोलाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा प्रमुख न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांनी केले.
शोषित,असंघटित कामगारांना समस्या सोडविण्यासाठी व त्यांचे जीवन सन्मानपूर्वक जगण्यास मदत करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण देशपातळीपासून प्रत्येक घरा-घरापर्यंत पोहचले आहे. या हे विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य आपल्या जिल्ह्यात आणखी बळकट करण्यात येणार आहे या माध्यमातून कामगारांना न्याय मिळणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आज तुलसी कम्फर्ट नांदेड येथे मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कायदेविषयक शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, ॲड .ब्रिटो मायकल आदींची उपस्थिती होती.
यावेळी इंटरनॅशल जस्टीस मिशन यांच्या सहकार्याने स्पेशल सेल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने असंघटीत कामगारांसाठी पुस्तक प्रकाशन करण्यात आले. असंघटीत कामगारासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने उपस्थिती कार्ड तयार केले आहे . यामध्ये कामगारांची सर्व माहितीची नोंद असणार आहे.
नांदेड जिल्हा वेठबिगारी मुक्त करणार : जिल्हाधिकारी
नांदेड जिल्ह्यात वेठबिगारीचा प्रश्न मोठया प्रमाणात आहेत. कामगारांनी केलेल्या कामाचा त्यांना योग्य मोबदला कायद्यानुसार मिळाला पाहिजे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना असू शकतात. आपणही समाज म्हणून त्यांच्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. आपल्या राज्यातील मजूर इतर राज्यात आहेत. तर बाहेर राज्यातील मजूर आपल्याकडे कामाला आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आपण अशा घटनांवर लक्ष ठेवून असले पाहिजे.
यासाठी सर्व संबंधित यंत्रणाचा सहभाग आवश्यक असून सर्व यंत्रणानी सर्तक राहून काम केल्यास त्यांच्यावर अन्याय होणार नाही. तसेच असंघटीत कामगार, शोषित याना त्यांचे हक्क माहिती होवून ते जागरुक होतील. यासाठी आपल्याला वेठबिगारी निमूर्लन करुन नांदेड जिल्हा वेठबिगारी मुक्त करायचा असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
शोषण करणाऱ्यांविरुद्ध कडक कार्यवाही-जिल्हा पोलीस अधीक्षक
जिल्ह्यात असंघटीत कामगारांवर अन्याय करणाऱ्यांवर पोलीस विभागाची करडी नजर असून कामगारांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची माहिती देण्यास पुढे यावे. तसेच पोलीस प्रशासनातर्फे कामगारांच्या कामाच्या ठिकाणी जावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. तसेच त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी असलेल्या त्यांच्या मानवी हक्काच्या कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. तसेच असंघटीत कामगारासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जे उपस्थिती कार्ड तयार केले आहे त्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांसाठी व कामगारासाठी शासनाच्या विविध योजना : मिनगिरे
जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येतात. ऊसतोड कामगारांसाठी राशन, आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी जिल्ह्यात ६ हॉस्टेल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच कामगारांना कसा न्याय मिळाला पाहिजे, ओळखपत्र, अन्याय झाला तर कुठले कलम आहेत, नाविण्यापूर्ण उपक्रम काय आहेत याबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येते अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली.
यावेळी धाराशिव जिल्ह्यात मारोती जटावकर या असंघटीत कामगारावर अन्याय झाला. झालेल्या अन्यायाबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली.
0000


























9.12.2024

 वृत्त क्र. 1174

राज्यस्तर युवा महोत्सवाची नांदेडमध्ये जय्यत तयारी 

नांदेड- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड व राष्ट्रीय सेवा योजना, स्वा.रा.ती.मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व नेहरु युवा केंद्र, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तर युवा महोत्सव सन 2024-25 चे आयोजन 12 ते 14 डिसेंबर,2024 या कालावधीत कुसुम सभागृह, व्ही.आय.पी.रोड, नांदेड  या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.

​युवा महोत्सव म्हणजे युवकांचा सर्वांगिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागणे यासाठी प्रतिवर्षी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकारमार्फत आयोजन करण्यात येते. 

सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन 12 ते 16 जानेवारी,2025 या कालावधीत दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय युवा महोत्‍सव- विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग (Viksit Bharat Young Leaders Dilogue ) –​युवांच्या  भारत निर्माणासाठी नवीन संकल्पना विचारात घेवून युवांना राष्ट्र निर्माणमध्ये सहभागी करुन त्यांची दुरदृष्टीता विचारात घेणे आवश्यक आहे. त्यानुषंगाने राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग अंतर्गत पुढीलप्रमाणे संकल्पना संदर्भांकित पत्राद्वारे निश्चित करण्यात आलेल्या आहेत.

1) Tech for Viksit Bharat,   2) Vikas Bhi Virasat Bhi,  3) Empowering Youth for Viksit Bharat, 4) Making India the Vishwaguru, 5) Making India the Startup capital of the World,  6) FIT India- A means to Viksit Bharat, 7) Making India the Global Manufacturing Powerhouse,  8) Making India Energy Efficient,  9) Building the Infrastructure for the Future, 10) Empowering Women and Improving Social Indicators  

युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांचे निर्देशान्वये राष्ट्रीय युवा महोत्सव- विकसित भारत यंग लिडर्स डायलॉग (Viksit Bharat Young Leaders Dilogue ) या अंतर्गत ऑनलाईन स्पर्धा प्रथम टप्पा- Viksit bharat Quiz, द्वितीय टप्पा – निबंध लेखन स्पर्धा (Essays), तृतिय टप्पा- Viksit Bharat PPT Challenge या स्पर्धेबाबत मुदत वाढविण्यात आलेली असून सुचना/ निर्देश पुढीलप्रमाणे आहेत.

ऑनलाईन स्पर्धा प्रथम टप्पा- Viksit Bharat Quiz सहभाग नोंदविणेसाठी 10 डिसेंबर,2024 पर्यंत मुदत वाढविण्यात आलेली आहे. द्वितीय टप्पा- निबंध लेखन स्पर्धा ऑन लाईन पध्दतीने 12 डिसेंबर,2024 पर्यं माय भारत पोर्टलवर (my bharat portal) अपलोड करता येतील. या स्पर्धेसाठी केंद्र शासन युवक कार्यक्रम मंत्रालय यांचे ऑनलाईन पध्दतीने प्राप्त होणा-या निबंधाची छाननी विषयानरुप करण्यात येणार आहे. त्यांचेकडून प्रथम टप्यात 12/12/2024 रोजी छाननी केलेले निबंध राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी पाठविण्यात येणार आहेत. तसेच यामधील दुस-या टप्यामध्ये 17/12/2024 रोजी छाननी केलेले निबंध पाठविण्यात येणार आहेत. याचा निकाल 20/12/2024 पर्यंत घोषित करण्यात येईल.

​या राज्यस्तर युवा महोत्सवमधुन महाराष्ट्र राज्याचा संघ राष्ट्रीय युवा महोत्सवकरीता निवडण्यात येणार आहे. त्याकरीता नांदेड जिल्हयातील जास्तीत-जास्त युवक-युवतींनी व नांदेडकरांनी मोठया संख्येन उपस्थित राहुन या राज्यस्तरीय युवा महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे यांनी केले आहे.

००००

9.12.2024

‘मॅट’च्या ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन

सेवा विषयक १३८ प्रकरणे तडजोडीने निकाली

तीन प्रकरणांमध्ये १२६ अर्जदारांना शासकीय नोकरीचा लाभ

मुंबई, दि. ९ : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या (मॅट) इतिहासात ३३ वर्षात प्रथमच लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीत ५४२ सेवा विषयक प्रकरणांपैकी १३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.  

न्यायाधिकरणाच्या अध्यक्ष न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभिनव उपक्रम यशस्वी करण्यात आला. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण आणि मुंबई उच्च न्यायालय विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लोक अदालतीसाठी तीन पॅनल आयोजित करण्यात आले होते. पॅनल प्रमुख म्हणून न्यायमूर्ती विनय जोशी, सेवानिवृत्त सदस्य (न्या) ए. पी. कुऱ्हेकर, आर. बी. मलिक यांनी काम पाहिले. नितिन गद्रे (नागपूर), विजयकुमार (औरंगाबाद), विजया चौहान, संदेश तडवी, आर. एम. कोलगे आणि एम.बी. कदम यांनी सदस्य म्हणून काम पाहिले. अदालतीत बरीच वर्षे प्रलंबित असलेल्या प्रकरणांची मुख्य सादरकर्ता अधिकारी स्वाती मणचेकर यांनी तपासणी केली. या लोक अदालतीमध्ये नागपूर, मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर या तिन्ही खंडपीठातील ५४२ प्रकरणांपैकी १३८ निकाली निघाली. यामध्ये मुंबई खंडपीठाच्या- २३८ प्रकरणांपैकी ३९ तर नागपूर- खंडपीठाच्या १५० पैकी ६३ आणि छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या १५४ प्रकरणांपैकी ३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

तीन प्रकरणांमध्ये १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी

लोक अदालतीत तीन प्रकरणात तडजोड झाल्याने १२६ अर्जदारांना शासकीय नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जलसंधारण विभागाच्या १७१ आणि कृषि विभागाच्या २१८ जागा माजी सैनिकांसाठी आरक्षित होत्या. यामध्ये सर्व जागांसाठी माजी सैनिक उमेदवार मिळू शकले नाही. त्यामुळे लोक अदालतीत तडजोडीनंतर उर्वरीत रिक्त जागा इतर उमेदवारांना उपलब्ध करुन देण्यात आल्या. या निर्णयामुळे १२६ उमेदवारांना शासकीय नोकरी मिळू शकणार आहे. या निर्णयामुळे माजी सैनिकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही.

लोक अदालत यशस्वी करण्यासाठी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विभागातील सचिव यांच्यासह न्यायाधिकरणामधील सर्व अधिकारी, कर्मचारी, मुख्य सादरकर्ता अधिकारी, न्यायाधिकरण बार असोसिएशनमधील सर्व वकील, शासनाचे सर्व नोडल अधिकारी यांनी सहकार्य केले.  

0000




8.12.2024

 वृत्त क्र. 1168

EVM व VVPAT एकाही मताचा फरक नाही ; नांदेड लोकसभा,विधानसभेच्या ७५ केंद्रावर VVPAT पडताळणी 

आयोगाच्या सूचनेप्रमाणे नियमित प्रक्रिया पूर्ण 

नांदेड दि. ८ डिसेंबर : मतमोजणी प्रक्रिये दरम्यान भारत निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील पाच केंद्राच्या ईव्हीएम मशीन वरील उमेदवार निहाय प्राप्त मतांची आकडेवारी ही व्हीव्हीपॅटशी जुळते का, याची तपासणी केली जाते. लॉटरी पद्धतीने ही केंद्राची निवड असते. जिल्ह्यातील लोकसभेच्या 30 व विधानसभेच्या 45 अशा एकूण 75 केंद्राची मतमोजणी बिनचूक असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे.

लॉटरी पद्धतीनुसार केंद्राची निवड सर्व उमेदवारांच्या प्रतिनिधींच्या समक्ष चिठ्ठी काढून केली जाते. तर मोजणीची प्रक्रिया निवडणूक निरीक्षकांच्या पुढे केली जाते. हे निवडणूक निरीक्षक वेगवेगळ्या राज्यातील वरिष्ठ सनदी अधिकारी असतात. प्रत्येक वेळी निवडणूक संपल्यानंतर ही प्रक्रिया पार पाडली जाते. नांदेडमध्ये देखील ही प्रक्रिया पार पाडली गेली आहे.या प्रक्रियेमागील उद्देश हा सर्व ठिकाणच्या ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मधील उमेदवार निहाय प्राप्त मतदानाची आकडेवारी अचूक असल्याची खात्री पटविण्यासाठी खातरजमा प्रक्रिया म्हणून केली जाते.

 मतमोजणी दरम्यान, प्रत्येक विधानसभा मतदारसंघ क्षेत्र निहाय ५ व्हीव्हीपॅट ( VVPAT ) मधील चिठ्ठया (slips ) प्रत्यक्ष मोजल्या जातात. त्यांची झ्हीएम ( EVM ) मधील मतांसोबत पडताळणी केली जाते.

या 5 केंद्रांची निवड लॉटरी पद्धतीने सर्व उमेदवार मतमोजणी प्रतिनिधी यांचे समक्ष चिठ्ठी काढून होते. ही प्रक्रिया निवडणूक निरीक्षक यांचे समोर होते. त्यानंतर व्हीव्हीपॅट चिठठी (VVPAT slips ) मतमोजणी प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत मोजल्या जातात.

     सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदार संघातील प्रत्येकी 5 प्रमाणे 45 मतदान केंद्रांची व्हीव्हीपॅट (VVPAT ) पडताळणी करण्यात आली असून सर्व 45 ठिकाणी व्हीव्हीपॅट(VVPAT ) व इव्हीएम कंट्रोल युनिट (EVM CU) यातील उमेदवार निहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे. 

     तसेच लोकसभा पोट निवडणुकीसाठी लोकसभेतील 6 विधानसभा क्षेत्रातील प्रत्येकी 5 प्रमाणे 30 मतदान केंद्रांसाठी व्हीव्हीपॅट(VVPAT ) पडताळणी करण्यात आली असून सर्व 30 ठिकाणी व्हीव्हीपॅट(VVPAT ) व इव्हीएम कंट्रोल युनिट (EVM CU) यातील उमेदवार निहाय मतांची आकडेवारी पूर्णतः जुळली आहे.

विधानसभा मतदारसंघातील ज्या ठिकाणी ईव्हीएम वरील इलेक्ट्रॉनिक काउंटिंग आणि व्हीव्हीपॅट मधील चिठ्ठ्या यांची मतदान संख्या तपासण्यात आली आहे ती केंद्र पुढीलप्रमाणे आहे.

 विधानसभा क्षेत्र 

किनवट मधील केंद्र क्रमांक 151 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निचपुर, 258 धानोरा, 13वासरामटंडा, 174 मारेगाव खालचे,  112 मोहडा या केंद्रांचा समावेश आहे.

हदगाव विधानसभा क्षेत्रातील 28 वरुला, 117 पळसा, 128 वाटेगाव, 219 कंजरा, 337 (बु ),रोडगी येथील मतदान केंद्रांचा समावेश आहे .

भोकर विधानसभा क्षेत्रातील 139 पाणीपुरवठा विभाग नवीन समाज मंदिर, 137  जवाहर भवन हे भोकर शहरातील, तर 300 नांदा बुद्रुक,295खडकी, 82 रेनापुर, आदी पाच केंद्रांचा समावेश आहे.  

नांदेड उत्तरमध्ये 47 पिंपरी महिपाल, 217 किशोर नगर येथील विद्या विकास पब्लिक स्कूल मतदान केंद्र, 225 ब्रह्मसिंग नगर, इमरान कॉलनीतील इकरा उर्दू हायस्कूल,317 हैदरबागमधील एन एस डब्ल्यू स्कूलचा325 समावेश आहे.

नांदेड दक्षिणमध्ये 20 सफा उर्दू प्रायमरी स्कूल, 33 शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय,99 गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय, 157 जिल्हा परिषद प्रायमरी शाळा पुणे गाव, 247 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुपा आदी केंद्रांचा समावेश आहे.

लोहा मतदार संघामध्ये 292 धानोरा कवठा, लोहा येथील 135  जिल्हा परिषद सी पी एस मुलींची शाळा,248 कटकळबा, 64 आलेगाव या केंद्रांचा समावेश आहे.

नायगाव मधील 107 हातनी, 97 बारबदा,25 बिटनाळ, 207 रत्नाळी, 162 इकलीमाल या केंद्रांचा समावेश आहे.

देगलूर मध्ये 0 5 तोरणा, 0 37 बेलकुनी बुद्रुक, 291 वलग,302 मारखेल, 325 हनेगाव या मतदान केंद्राचा समावेश आहे.

मुखेड मध्ये 72 खैर कवाडी 87 बेटमोगरा 166 गुरुदेव विद्या मंदिर मुखेड 262 झेडपी प्रायमरी स्कूल किसान तांडा 310 झेडपी प्रायमरी स्कूल वाळंकी आदी मतदान केंद्रांचा समावेश आहे.

 लोकसभा क्षेत्र

तर लोकसभा मतदारसंघासाठी विधानसभा क्षेत्र निहाय पुढील मतदान केंद्राची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये भोकर मतदार संघातील अर्धापूर येथील केंद्र क्रमांक 41, नागापूर येथील केंद्र क्रमांक 161 मुखेड येथील केंद्र क्रमांक 239 दौर येथील केंद्र क्रमांक 287 वाडी मुक्ताजी येथील केंद्र क्रमांक 321 चा समावेश आहे.

नांदेड उत्तर मधील राष्ट्रमाता स्कूल केंद्र क्रमांक 35 हेरिटेज इंग्लिश स्कूल केंद्र क्रमांक 118 ऑक्सफर्ड इंटरनॅशनल केंद्र क्रमांक 164 उर्दू शाळा क्रमांक 320 कुडवाई नगर येथील माध्यमिक मुलांची शाळा 346 आदींचा समावेश आहे .

नांदेड दक्षिण मधील वॉटर सप्लाय ऑफिस केंद्र क्रमांक 90 तिला रोड येथील शाळा क्रमांक 145 जिल्हा परिषद प्रायमरी शाळा वासरानी केंद्र क्रमांक 190 कुसुमताई शाळा केंद्र क्रमांक 207 सोनखेड येथील केंद्र क्रमांक 293 चा समावेश आहे.

नायगाव येथील बेताब बिलोली केंद्र क्रमांक 298 गोरेगाव केंद्र क्रमांक 292 इलेगाव केंद्र क्रमांक 58 कुंटूर येथील केंद्र क्रमांक 176 सिंधी येथील केंद्र क्रमांक 12 आदींचा समावेश आहे.

देगलूर मतदारसंघांमध्ये टाकळी येथील केंद्र क्रमांक 298 इब्राहिम पूर येथील केंद्र क्रमांक 174 कुंडलवाडी येथील केंद्र क्रमांक 18 देगलूर सेंटर मधील केंद्र क्रमांक 250 देवपूर येथील केंद्र क्रमांक 296 चा समावेश आहे.

मुखेड मतदार संघातील श्रीरंगवाडी केंद्र क्रमांक 42 उमरगा येथील केंद्र क्रमांक 107 कुरुला येथील केंद्र क्रमांक 54 घुबड वाडी येथील केंद्र क्रमांक 102 डोरनाली येथील केंद्र क्रमांक 3O9 चा समावेश आहे

7.12.2024

  वृत्त क्र. 1167

सामाजिक न्याय विभागाच्या योजनांबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यासोबत बैठक संपन्न

नांदेड, दि. ७ डिसेंबर :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समाज कल्याण कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मेट्रिकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना, व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणा-या विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवता शिष्यवृत्ती तसेच स्वाधार योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित/ विनाअनुदानीत/कायमविना अनुदानित महाविद्यालयाचे प्राचार्याशी आढावा बैठक नुकतीच समाजकल्याण नांदेड येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. 

या बैठकीत भारत सरकार शिष्यवृती योजनेचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयस्तरावरील प्रलंबित अर्ज तात्काळ निकाली काढणे, स्वाधार योजनेच्या ग्रामिण विद्याथ्यांची उपस्थिती तपासून सादर करणे, महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर योजनाबाबत नोटीस लावणे, भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेचे अंतर्गत लेखापरीक्षण अहवाल तात्काळ सादर करणे, तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृ‌ती योजनेचे अर्ज तात्काळ निकाली काढणे. तसेच भारतीय संविधानास ७५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त घर घर संविधान कार्यक्रम साजरा करणे याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याचा सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्याथ्यांमध्ये उपरोक्त योजनांची जनजागृती करावी , असे आवाहन सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

००००००



7.12.2024

 वृत्त क्र. 1166

समाज कल्याण कार्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

​नांदेड, ७ डिसेंबर:- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात सकाळी ११ वाजता श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव ता.जि. नांदेड येथील भन्ते, कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्याच्या उपस्थितीत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच  समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनिस्त असलेले सर्व शासकीय वसतिगृह व शासकीय निवासी शाळा येथे महामानवास विनम्र अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 या कार्यक्रमास श्रामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव ता.जी.नांदेड येथील भन्ते श्रद्धानंद, भन्ते शील धम्मा,भन्ते सुयश,भन्ते सुनंद, भन्ते सारीपुत उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.त्यानंतर उपस्थित भन्ते यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिशरण,पंचशील गाथा व भीमस्मरण सामुहिकरित्या घेण्यात आले.तदनंतर भन्ते श्रद्धानंद यांनी उपस्थित अधिकारी व  कर्मचाऱ्याना मार्गदर्शन केले  त्यानंतर सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले.

​या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय नांदेड, जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालय नांदेड, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय नांदेड व सामाजिक न्याय भवनातील सर्व महामंडळे येथील कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

०००००

 १०० दिवसीय क्षयरोग मोहिमेचे उद्घाटन संपन्न 

नांदेड, दि. ७ डिसेंबर:-संपूर्ण भारतात आज रोजी निवडक ३४७ जिल्ह्यांमध्ये १०० दिवसीय क्षयरोग मोहिमेस सुरुवात झाली आहे. यात नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील या कार्यक्रमाचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा प्राथमिक आरोग्य केंद्र तुप्पा येथे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी सरपंच सौ .मंदाकिनी  यन्नावार उपसरपंच दत्ता कदम, पोलीस पाटील वसंत पल्लेवाड आदी मान्यवर उपस्थित होते .

या मोहिमेची सुरुवात ७ डिसेंबर २०२४ पासून झालेली असून २४ मार्च २०२५ रोजी याची सांगता होणार आहे.

या मोहिमेच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षय रुग्ण शोधून त्यांना उपचारावर आणणे ,क्षय रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे , नवीन क्षय रुग्णांचे प्रमाण कमी करणे ,वंचित व अति जोखमीच्या घटकापर्यंत पोहोचून आरोग्य सेवा पुरविणे , क्षयरोगाविषयी जनजागृती करणे समाजातील क्षयरोगा विषयी असलेल्या गैरसमजुती दूर करणे आदी असून शासकीय निमशासकीय स्वयंसेवी संस्था यांच्या मदतीने ही मोहीम हाती घेण्यात आलेली आहे.

उद्घाटनाप्रसंगी क्षय रुग्णांच्या संपर्कातील व प्राथमिक आरोग्य केंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी आशा व एएनएम यांनीही सी वाय टेस्ट ची तपासणी करून घेऊन प्रत्यक्ष रूपाने कार्यक्रमास सुरुवात केली .

या कार्यक्रमास जिल्हा क्षयरोग केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ .गणपत मिरदुडे ,डॉ.अमृत चव्हाणडॉ ज्ञानोबा जोगदंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ प्रवीण मुंडे वैद्यकीय अधिकारी डॉ राठोड ,डॉ मुदीराज , डॉ गुडपे ,डॉ खाजा मोईनुद्दीन आणि आरोग्य कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

या शंभर दिवसीय क्षयरोग मोहिमेत सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सतीश कोपुरवाड यांनी केले आहे .

०००००



वृत्त क्र. 1185 सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी 812 कोटी नुकसान भरपाई मंजूर डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार शेतकऱ्यांनी ईक...