Tuesday, December 10, 2024

वृत्त क्र. 1176

कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे : सुरेखा कोसमकर
जिल्हयात वेठबिगारीला थारा नाही : जिल्हाधिकारी
असंघटीत कामगारांसाठी विशेष सेलचे उपस्थिती कार्ड
नांदेड, दि. 10 डिसेंबर :- असंघटीत कामगांराना त्यांच्या हक्काची माहिती व्हावी, त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याची माहिती ज्ञात होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात येतात. हे कार्य खूप मोलाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा प्रमुख न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांनी केले.
शोषित,असंघटित कामगारांना समस्या सोडविण्यासाठी व त्यांचे जीवन सन्मानपूर्वक जगण्यास मदत करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण देशपातळीपासून प्रत्येक घरा-घरापर्यंत पोहचले आहे. या हे विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य आपल्या जिल्ह्यात आणखी बळकट करण्यात येणार आहे या माध्यमातून कामगारांना न्याय मिळणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आज तुलसी कम्फर्ट नांदेड येथे मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कायदेविषयक शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर जज, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, ॲड .ब्रिटो मायकल आदींची उपस्थिती होती.
यावेळी इंटरनॅशल जस्टीस मिशन यांच्या सहकार्याने स्पेशल सेल, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या संयुक्त विद्यमाने असंघटीत कामगारांसाठी पुस्तक प्रकाशन करण्यात आले. असंघटीत कामगारासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने उपस्थिती कार्ड तयार केले आहे . यामध्ये कामगारांची सर्व माहितीची नोंद असणार आहे.
नांदेड जिल्हा वेठबिगारी मुक्त करणार : जिल्हाधिकारी
नांदेड जिल्ह्यात वेठबिगारीचा प्रश्न मोठया प्रमाणात आहेत. कामगारांनी केलेल्या कामाचा त्यांना योग्य मोबदला कायद्यानुसार मिळाला पाहिजे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना असू शकतात. आपणही समाज म्हणून त्यांच्याकडे डोळसपणे पाहिले पाहिजे. आपल्या राज्यातील मजूर इतर राज्यात आहेत. तर बाहेर राज्यातील मजूर आपल्याकडे कामाला आहेत. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून आपण अशा घटनांवर लक्ष ठेवून असले पाहिजे.
यासाठी सर्व संबंधित यंत्रणाचा सहभाग आवश्यक असून सर्व यंत्रणानी सर्तक राहून काम केल्यास त्यांच्यावर अन्याय होणार नाही. तसेच असंघटीत कामगार, शोषित याना त्यांचे हक्क माहिती होवून ते जागरुक होतील. यासाठी आपल्याला वेठबिगारी निमूर्लन करुन नांदेड जिल्हा वेठबिगारी मुक्त करायचा असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.
शोषण करणाऱ्यांविरुद्ध कडक कार्यवाही-जिल्हा पोलीस अधीक्षक
जिल्ह्यात असंघटीत कामगारांवर अन्याय करणाऱ्यांवर पोलीस विभागाची करडी नजर असून कामगारांनी त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाची माहिती देण्यास पुढे यावे. तसेच पोलीस प्रशासनातर्फे कामगारांच्या कामाच्या ठिकाणी जावून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जातील. तसेच त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी असलेल्या त्यांच्या मानवी हक्काच्या कायद्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. तसेच असंघटीत कामगारासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने जे उपस्थिती कार्ड तयार केले आहे त्याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अभिनंदन केले आहे.
जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांसाठी व कामगारासाठी शासनाच्या विविध योजना : मिनगिरे
जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांसाठी शासनाच्या विविध योजना जिल्हा प्रशासनामार्फत राबविण्यात येतात. ऊसतोड कामगारांसाठी राशन, आरोग्य सेवा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये यासाठी जिल्ह्यात ६ हॉस्टेल उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच कामगारांना कसा न्याय मिळाला पाहिजे, ओळखपत्र, अन्याय झाला तर कुठले कलम आहेत, नाविण्यापूर्ण उपक्रम काय आहेत याबाबत विविध कार्यक्रमाचे आयोजन समाज कल्याण कार्यालयामार्फत करण्यात येते अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिली.
यावेळी धाराशिव जिल्ह्यात मारोती जटावकर या असंघटीत कामगारावर अन्याय झाला. झालेल्या अन्यायाबाबतची माहिती त्यांनी यावेळी दिली.
0000


























No comments:

Post a Comment

12.1.2025

 संचालनालय लेखा व कोषागारे कल्याण समिती विभागीय क्रीडा स्पर्धा २०२५ सायन्स कॉलेज च्या संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेच्या विजेत्या खेळाडू ...