Wednesday, August 10, 2016

किनवट, माहूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या
मतदान, मतमोजणी केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश   
नांदेड, दि. 10 किनवट  तालुक्यातील सक्रू नाईक तांडा, निराळा तांडा व माहूर तालुक्यातील गोकूळनगर या ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान बुधवार 24 ऑगस्ट 2016 रोजी तर  मतमोजणी शुक्रवार 26 ऑगस्ट 2016 रोजी होणार आहे. त्यासाठी अशा मतदान केंद्राच्या मतदान सुरु झाल्यापासून मतदान संपेपर्यंत व  मतमोजणी केंद्राच्‍या  हद्दीपर्यंत  सकाळी  6 वाजेपासून  ते  मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू  राहील, असे आदेश नांदेड जिल्‍हादंडाधिकारी कार्यालयाकडून काढण्यात आले आहेत. 
या ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान व मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित रहावी यादृष्‍टीने फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्‍वये जिल्‍हादंडाधिकारी सुरेश काकाणी यांनी प्राप्‍त अधिकाराचा वापर करुन बुधवार 24 ऑगस्ट रोजी मतदान व  शुक्रवार 26 ऑगस्ट रोजी मतमोजणीच्‍या  दिवशी  मतदान व  मतमोजणी  केंद्रापासून 200 मीटर परिसरातील मंडपे, सर्व दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वारलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले  व  इतर  इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या  कामाव्‍यतीरिक्‍त  खाजगी  वाहन, चिन्‍हांचे प्रदर्शन व निवडणुकीच्‍या कामाव्‍यतिरिक्‍त  व्‍यक्‍तीस  प्रवेश  करण्‍याकरीता प्रतिबंधीत करण्‍यात आले आहे.

00000000
शिक्षकांच्या वैयक्तीक मान्यता प्रस्तावाबाबत
लातूर येथे 18 ते 25 ऑगस्ट रोजी कार्यशाळा  
   नांदेड, दि. 10 :-  जिल्ह्यातील अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत  तत्वावरील उच्च माध्यमिक , कनिष्ठ माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांच्या वैयक्तीक मान्यता प्रस्तावास मान्यता देण्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर येथे 18 ते 25 ऑगस्ट 2016 या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात आले असून संबंधित मुख्याध्यापक व प्राचार्यांनी  शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषद माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनी  केले आहे.  
जिल्ह्यातील सर्व अनुदानीत, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत तत्वावरील उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ माध्यमिक विद्यालयाच्या  मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शासन निर्णयान्वये पुर्वी नियुक्त केलेल्या व त्रुटी पुर्ततेकरीता प्रलंबीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे तसेच पूर्व परवानगी घेऊन नवीन नियुक्त केलेल्या शिक्षकांच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी वैयक्तीक मान्यता शिबीर गुरुवार 18 ते 25 ऑगस्ट 2016 या कालावधीत विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर येथे आयोजित केले आहे. त्यामुळे उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापक, प्राचार्यांनी प्रस्ताव दाखल केलेला असल्यास त्रुटी पुर्ततेसह शिबिरास उपस्थित रहावे, असेही आवाहन त्यांनी एका पत्राकन्वये केले आहे.  

0000000
आयटीआय शिकाऊ उमेदवारांसाठी
आज भरती मेळाव्याचे आयोजन
   नांदेड, दि. 10 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेड येथे व्हरक इंजिनिअरींग पा्र. लि. औरंगाबाद या कंपनीने आज 11 ऑगस्ट 2016 रोजी सकाळी 11 वा. सभागृहामध्ये शिकाऊ उमेदवारांसाठी भरती मेळावा आयोजित केला आहे.
आयटीआय पास इलेक्ट्रॉनिक्स, फिटर, इलेक्ट्रीशीयन, वेल्डर, आयटीइएसएम, कोपा. वायरमन, डॉस्मन मेकॅनिक, सीओई, प्लंम्बर या व्यवसायातील मुलांनी उपस्थित रहावे. त्यांना विद्यावेतन 7 हजार 300 रुपये प्रती महिना देण्यात येणार आहे, असे कंपनीच्या प्रतिनिधीने कळविले आहे. उमेदवारांनी मेळाव्यात जास्तीतजास्त  संख्येने  उपस्थित  रहावे, असे आवाहन संस्थेचे प्राचार्य क. श. विसाळे यांनी केले आहे.

0000000
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियान उपक्रमास
 तालुकास्तरापर्यंत नेणार - जिल्हाधिकारी काकाणी

   नांदेड, दि. 10 :- स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिरास मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही याचा अधिकाधिक लाभ व्हावा म्हणून दुसऱ्या टप्प्यात तालुकास्तरावरही अशा शिबिराचे आयोजन करण्याचा मानस जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी व्यक्त केला. जिल्हा प्रशासन व यशवंत महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने अयोजित स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन शिबिरात अध्यक्षपदावरुन जिल्हाधिकारी श्री. काकाणी बोलत होते. यशवंत महाविद्यालयातील ग्रंथालय सभागृहात मंगळवारी शिबिर संपन्न झाले. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. ए. एन. जाधव, उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील हुसे, समन्वयक डॉ. व्ही. सी. बोरकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. काकाणी म्हणाले की , विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेत उज्ज्वल यश संपादन करता यावे यासाठी पहिल्या टप्प्यामध्ये विविध तज्ज्ञांची मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली होती. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाल्याने दुसऱ्या टप्प्यात शहरातील विविध महाविद्यालयांशी समन्वय साधून दर महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी स्पर्धा परिक्षेसंदर्भात मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात. या उपक्रमाला प्रतिसाद मिळत असून विशेषत: ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना या मार्गदर्शनाचा अधिकाधिक लाभ मिळावा, म्हणून तालुकास्तरावरही अशी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचे विचाराधिन आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:मध्ये आत्मविश्वास निर्माण करुन अध्यानाच्या कक्षा रुंदावल्या तर उज्ज्वल नांदेडचे स्वप्न साकार होऊ शकेल अशा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
उपजिल्हाधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी सी-सॅट या विषयावर विद्यार्थ्यांना सखोल असे मार्गदर्शन करुन युपीएससी, एमपीएससी, परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप, उत्तर देण्याच्या  पध्दती  याविषयी माहिती दिली.
प्राचार्य डॉ. जाधव यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी सुत्रसंचलन केले तर समन्‍वयक डॉ. बोरकर यांनी आभार मानले. शिबिरास  विद्यार्थ्यांनी  मोठ्या  संख्येने उपस्थित राहून उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.

00000
सुदृढ बालक जन्माला येण्यासाठी जिल्हयात
छोटा भीम योजना हा अभिनव उपक्रम सुरु
                                   - अभिमन्यु काळे
          नांदेड, दि. 10 : डासमुक्त गाव अभियानासोबतच जिल्हयात जन्माला येणारे बालक हे 3 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाचे जन्मास यावे, यासाठी गरोदर मातांना देण्यात येणाऱ्या सेवांचे निकटचे संनियंत्रण आरोग्य विभागामार्फत करण्यात येत असून, जिल्हयात या मोहिमेच्या अनुषंगाने छोटा भीम ही योजना गावपातळीवर राबविण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिली.
ग्रामीण भागामध्ये गरोदर मातेच्या आरोग्य विषयक तपासणी, प्रयोगशाळेतील तपासण्या, लसीकरण, औषधोपचार करणे, संस्थेत प्रसुतीसाठी प्रवृत्त करुन घेणे, जननी सुरक्षा योजनेंतर्गत आर्थिक लाभ देणे, जननी शिशु सुरक्षा योजना कार्यक्रमातून संदर्भ सेवांची उपलब्धता समजावून सांगणे, गरोदर मातेची सर्वागीण काळजी घेऊन जन्माला येणारे बाळ हे 3 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाचे होईल याकडे लक्ष देण्यासाठी  जानेवारी, 2016 पासून जिल्हयात ही योजना राबविण्यात येत आहे.
छोटा भीम या योजनेंतर्गत जिल्हयातील एएनएम, आशा/आंगणवाडी कार्यकर्त्यांमार्फत गरोदर मातांना प्रत्येक सोमवार, बुधवार व शुक्रवारी गृहभेटी देण्यात येवून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्य, आहार, पोषण व विश्रांती याबाबत समुपदेशन व आरोग्य शिक्षण देण्यात येत आहे. त्यांच्या वजनवाढीवर देखरेख करणे, जोखमीच्या व अतिजोखमीच्या गरोदर मातांना दर बुधवारी आयोजित  मातृत्व संवर्धन दिनात तसेच प्रधानमंत्री मातृत्व सुरक्षित अभियानांतर्गत दर महिन्याच्या 9 तारखेस प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये संदर्भ सेवा देऊन, त्यांची तपासणी, उपचार करणे या सेवा देण्यात येत आहेत. तसेच एएनएम मार्फत जोखमीच्या व अतिजोखमीच्या मातांना दरमहा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेऊन त्यांची तपासणी, उपचार व इतर समस्येवर समुपदेशन करण्यात येत आहे. मातेची प्रसुती ही दवाखान्यातच झाली पाहिजे हे सांगण्यात येत आहे. यासोबतच जन्माला येणारे बालक सुदृढ व 3 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाचे जन्मास येण्याचे फायदे याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
 या योजनेंतर्गत जानेवारी ते जून, 2016 अखेर एकुण 11296 बालकांचा जन्म झाला असून त्यापैकी 3 कि.मी. पेक्षा जास्त वजनाची 5292 (47 टक्केपेक्षा जास्त) बालके जन्माला आली, 5320 बालके 2.5 ते 3 कि.ग्रॅ. मध्ये (47 टक्के) व उर्वरित 684 (6 टक्के) बालके 2.5 कि.ग्रॅ. पेक्षा कमी वजनाची जन्मली आहेत.
जिल्हयातील ग्रामीण भागातील गरोदर मातांच्या कुटुंबियांना, जन्मत: बाळाचे वजन 3 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त असणेबाबत गरोदर मातेची नोंदणी 12 आठवड्यांच्या आत करुन घ्यावी, गरोदरपणाच्या काळात प्रतिमाह किमान 1 किलो किंवा त्यापेक्षा जास्त वजन वाढले पाहीजे याकडे लक्ष द्यावे, आंगणवाडी/आशा कार्यकर्त्यांमार्फत दिल्या जाणाऱ्या नियमित आठवडी गृहभेटी मध्ये पोषण आहाराबाबत दिलेल्या सल्ल्याचे पालन करावे, तसेच एएनएम मार्फत  तपासणी करुन आवश्यक त्या तपासण्या, औषधोपचार, लसीकरण या सेवा नियमीत घ्याव्यात.
गरोदर मातेची वजनवाढ व्यवस्थित होत नसल्यास व इतर काही जोखमीची लक्षणे दिसून आल्यास नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करुन घ्यावी. जिल्हयात जन्माला येणारी प्रत्येक बालके 3 कि.ग्रॅ. पेक्षा जास्त वजनाची असावीत या करीता सर्वांनी सहकार्य करावे असे अवाहन ही श्री. काळे यांनी केले आहे. 

0000000

वृत्त क्र.   93 दहावी परीक्षेच्या ऑनलाईन प्रवेशपत्राबाबत सूचना   नांदेड दि. 23 जानेवारी :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्ष...