Friday, April 25, 2025

 विशेष लेख -:

‘वेव्हज 2025’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

देशातील माध्यम व मनोरंजन (Media & Entertainment) क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या ‘WAVES 2025’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. 1 मे रोजी, प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री श्री. अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

1 ते 4 मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

महाराष्ट्र – ‘ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमी’कडे वाटचाल

बॉलीवूड, टीव्ही आणि ओटीटी इंडस्ट्री यांचे केंद्रस्थान असलेली मुंबई भारताच्या मनोरंजन क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता याच मुंबईला आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर 'क्रिएटर हब' म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ‘WAVES 2025’ च्या माध्यमातून होतो आहे. ऑस्कर, कान्स आणि दावोससारख्या जागतिक परिषदेच्या धर्तीवर प्रथमच भारतात अशी परिषद आयोजित होत असून, जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला दिशा देणारा मंच

‘WAVES 2025’ ही परिषद केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक माध्यम व मनोरंजन (M&E)  उद्योगाला एकत्र आणणारा, नवसृजनास चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडणारा एक महत्त्वाचा मंच आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि प्रतिभेचा संगम या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे.


या परिषदेतील एक विशेष आकर्षण 'WAVES बाजार’*

 ‘WAVES बाजार’ – एक इंटरॅक्टिव्ह व्यावसायिक व्यासपीठ असून जिथे खरेदीदार आणि विक्रेते थेट संवाद साधू शकतात. नव्या प्रकल्पांची ओळख, सर्जनशील कल्पना, आणि गुंतवणुकीच्या संधी येथे उपलब्ध होतील. विशेषतः, श्रेणीआधारित शोध प्रणाली आणि सुरक्षित मेसेजिंग सुविधांमुळे व्यवहार अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठरतील.

परिषदेत काय असणार?

१. परिषद सत्रे – जागतिक उद्योग नेते, विचारवंत आणि नवोन्मेषक विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

२. मीडिया मार्केटप्लेस – भारताच्या माध्यम व मनोरंजन (M&E) क्षेत्रातील वैविध्य, क्षमता आणि नवकल्पनांचे आकर्षक प्रदर्शन.

३. तंत्रज्ञान प्रदर्शन – नवीन तंत्रज्ञान आणि सर्जनशील प्रकल्पांचे लाईव्ह डेमो.

४. सांस्कृतिक कार्यक्रम – भारताच्या समृद्ध कलासंपदेची झलक दाखवणारे बहारदार कार्यक्रम.


'WAVES 2025’ : उद्योगाला बळकटी देणारी संजीवनी'

माध्यम आणि मनोरंजन उद्योग सध्या मोठ्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर आहे. ‘WAVES 2025’ ही परिषद नव्या कल्पनांना दिशा देऊन, भारताला जागतिक M&E सुपरपॉवर बनवण्याचा पाया रचणार आहे. सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक भागीदारी यांचा मेळ घालून, भारताला ‘ग्लोबल कंटेंट डेस्टिनेशन’ बनवण्याचे स्वप्न या मंचाद्वारे प्रत्यक्षात उतरणार आहे. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणारी ही परिषद भारताच्या सृजनशील भविष्यासाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे.

वर्षा फडके-आंधळे, उपसंचालक (वृत्त)

००००



 वृत्त क्रमांक 434    

 वृत्त क्रमांक 433    

लोकशाही दिनाचे 5 मे रोजी आयोजन 

नांदेड दि. 25 एप्रिल  :- सामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी न्याय व तत्परतेने सोडविण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. जिल्हा प्रशासनाच्यावतीने लोकशाही दिन सोमवार 5 मे 2025 रोजी दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे आयोजित केला आहे. 

या दिवशी महसूल,  गृह,  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि विभाग व जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी इत्यादी जिल्हा स्तरावरील प्रमुख अधिकारी व ज्या कार्यालयाचे लोकशाही दिनात प्रलंबीत प्रकरणे आहेत असे अधिकारी बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपस्थित राहतील. सकाळी 12 वाजेपासून निवेदनाची नोंदणी सुरु होणार आहे. त्यानंतर लगेचच प्राप्त झालेल्या अर्जावर, निवेदनावर म्हणणे ऐकून घेण्याच्या कामास सुरुवात करण्यात येईल. 

लोकशाही दिनाच्या दिवशी प्राप्त होणाऱ्या जनतेच्या तक्रारी, अडचणी एकत्रीतरीत्या समजावून घेऊन त्या शक्य तितक्या लवकर सोडविण्यात येतील, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर  यांनी दिली आहे.

00000

 वृत्त क्रमांक 432    

केंद्र सरकार पुरस्कृत परदेशी शिष्यवृत्ती

योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन  

नांदेड दि. 25 एप्रिल : केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय नवी दिल्ली पुरस्कृत राष्ट्रीय परदेशी शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 या वर्षाकरिता www.nosmsje.gov.in या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्युत्तर परीक्षेत किमान 60 टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला जातो. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाची प्रक्रिया सुरु झाली असून विद्यार्थ्यांकडून या योजनेचे अर्ज मागविण्यात आली आहेत.   

या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी.साठी अद्यावत (QX World University Ranking) 500 च्या आतील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येते. त्यासंबंधीची जाहिरात केंद्र शासनाच्या www.nosmsje.gov.in या संकेतस्थळावर 17 पानांची  पीडीएफ स्वरुपात विस्तृत प्रसिद्ध करण्यात आली आहे. 

सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी परदेशात पदव्युत्तर पदवी व पी.एच.डी. अभ्यासक्रमासाठी केंद्र सरकार पुरस्कृत National Overseas Scholarship या परदेश शिष्यवृत्ती योजनेकरिता सदरील संकेतस्थळावर सांगितल्याप्रमाणे अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरीया यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 431    

माध्यमिक आश्रमशाळा वाघाळाची मान्यता रद्य 

विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन   

नांदेड दि. 25 एप्रिल : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत चालविण्यात येत असलेल्या माताजी शिक्षण संस्था नांदेड वाघाळा संचलित माध्यमिक आश्रमशाळा वाघाळा ता. जि. नांदेड या आश्रमशाळेची मान्यता 21 एप्रिल 2025 रोजी रद्य करण्यात आली आहे. याबाबत संचालक इतर मागास बहुजन कल्याण पुणे यांनी पत्र निर्गमित केले आहे. 

या आश्रमशाळेत शैक्षणिक वर्ष 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये. प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित पालक जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 430    

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अन्वेषण प्रस्ताव 5 मे पर्यंत सादर करण्याची अंतिम मुदत 

नांदेड दि. 25 एप्रिल : सन 2011-12 ते 2017-18 तसेच महाडीबीटी प्रणालीवरील सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीचे अन्वेषण प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करण्यास 5 मे 2025 ही अंतिम मुदत आहे. यानंतर नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयांचे प्रलंबित अन्वेषण प्रमाणपत्र प्रस्ताव निकाली काढण्यात येणार नाहीत. तसेच महाविद्यालयातील एकही मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची राहील, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे. 

सन 2011-12 ते 2017-18 तसेच महाडीबीटी प्रणालीवरील सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्तीचे अन्वेषण 15.10.2024 च्या शासन निर्णयानुसार कळविण्यात आले होते. त्यानुसार महाडीबीटी प्रणाली मार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असली तरी पोर्टलवर अर्ज करतांना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत अर्ज भरूनही अर्ज Auto Reject होणे, एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा अथवा पुरवणी परीक्षेचा निकाल विहित वेळेत न लागल्याने अर्ज भरता न येणे अथवा अर्ज भरूनही पुढच्या वर्षीचा अर्ज नुतनीकरण करण्यास अडचण येणे. अशा बऱ्याच अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. 

सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्जाची नोंदणी करण्यास अथवा नोंदणीकृत अर्ज मंजूर होण्यास अडचणी आल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना शासन निर्णयान्वये शिष्यवृत्ती ऑफलाईन पद्धतीने मंजूर करून अदा करण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी अन्वेषण प्रमाणपत्र प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड येथे सादर केले होते. परंतु आर्थिक वर्ष 2024-25 संपून नवीन आर्थिक वर्ष 2025-26 सुरु झालेले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रलंबित शिष्यवृत्तीचे अन्वेषण प्रमाणपत्र प्रस्ताव 5 मे 2025 पर्यत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 429    

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता 

हवामानशास्त्र केंद्राने दिल्या सूचना 

नांदेड दि. 25 एप्रिल :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी आज दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी दिनांक 2526 एप्रिल हे दोन दिवस येलो अलर्ट जारी केलेला आहे. 25 एप्रिल रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 30 ते 40 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसेच तुरळक ठिकाणी वातावरण उष्ण व दमट राहण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. 

शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी तुरळक ठिकाणी ताशी 50 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची, विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह गारपीट होण्याची अधिक शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी. नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून पुढील प्रमाणे काळजी घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे. 

या गोष्टी करा

विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा. आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका. आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा. पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा. 

या गोष्टी करु नका

आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली अंघोळ करू नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाइन यांना स्पर्श करू नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका. धातूंच्या उंच मनोऱ्याजवळ उभे टाकू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी केले आहे.

00000

 वृत्त क्रमांक 428    

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा 

नांदेड दि. 25 एप्रिल :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील. 

शनिवार 26 एप्रिल 2025 रोजी पुणे विमानतळ येथून विमानाने सकाळी 8 वा. श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. त्यानंतर मोटारीने श्रीक्षेत्र नृसिंह मंदिर पोखर्णी ता. जिल्हा परभणी येथे प्रयाण करतील. रात्री 9 वा. वसमत येथून मोटारीने श्री गुरू गोविंद सिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन व रात्री 9.05 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

0000  

वृत्त क्रमांक   513 मौजे ब्रम्हपुरी गोदावरी नदीच्या पात्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश नांदेड दि. 19 मे :- मौजे ब्रम्हपुरी येथील गोदावरी नद...