Tuesday, November 23, 2021

 गहू, ज्वारी, हरभरा पिकासाठी पिक विमा भरण्याचे आवाहन 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- प्रधानमंत्री पिक विमा योजना महाराष्ट्र राज्यात रब्बी हंगाम सन 2021-22 मध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार असुन, रब्बी हंगामातील पिकांसाठी 1.5 टक्के असा मर्यादीत आहे. पिक पेरणीपासुन काढणीपर्यतचा कालावधी नैसर्गिक आग, विज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पुर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इ. बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान इ. जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. नांदेड जिल्हयातील गहु (बा), ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागु आहे. 

या योजनेअंतर्गत विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे. पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर व शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी तर विमा लागु असलेले तालुके व पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख पुढील प्रमाणे आहे. 

गहु (बा.) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 38 हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी 570.00 आहे. विमा लागु असलेले तालुके नांदेड, अर्धापुर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, नायगाव, धर्माबाद, किनवट, हिमायतनगर, भोकर, हे हदगाव आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2021 राहिल. 

ज्वारी (जि) या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 28 हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी 420.00 आहे. विमा लागु असलेले तालुके नांदेड, देगलूर, नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, किनवट, हदगाव हे आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2021 राहिल. 

हरभरा या पिकासाठी पिक विमा संरक्षित रक्कम रु./ हेक्टर 35 हजार रुपये. शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता रुपये / हेक्टरी 525.00 आहे. विमा लागु असलेले तालुके नांदेड, अर्धापूर, मुदखेड, बिलोली, लोहा, कंधार, देगलूर, नायगाव, धर्माबाद, मुखेड, किनवट, माहूर, हिमायतनगर, भोकर, हदगाव, उमरी ही आहेत. पिक विमा ऑनलाईन करण्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर 2021 राहिल. 

ही योजना इफको टोकीयो जनरल इंशुरन्स कंपनीमार्फत राबविण्यात येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पिक विमा उतरवण्याची अंतिम तारीख या ज्वारी जि. पिकासाठी 30 नोव्हेबर 2021 असुन गहु बा. व हरभरा पिकासाठी 15 डिसेंबर 2021 ही आहे. अधिकच्या माहितीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

00000

 ग्रामपंचायतीच्या रिक्तपदासाठी पोटनिवडणूक जाहीर 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- महाराष्ट्र राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य / कारणामुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपारिक पद्धतीने राबविण्यात यावयाचा प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 

या निवडणुकीचे टप्पे व दिनांक पुढीलप्रमाणे आहेत. नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाची अतिरिक्त ठरलेली रिक्त जागा सर्वसाधारण जागा म्हणुन अधिसुचित करण्यापुर्वी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द केलेल्या अंतिम प्रभाग रचनेच्या अधिसुचनेमध्ये सुधारणा करण्याचा व तहसिलदार यांनी निवडणूकीची नोटीस 22 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे.   

नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ-अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) मंगळवार 30 नोव्हेंबर ते सोमवार 6 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी 4 व 5 डिसेंबर 2021 रोजी नामनिर्देशनपत्र स्विकारली जाणार नाहीत. नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ-अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) मंगळवार 7 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजेपासून छाननी संपेपर्यंत राहिल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ-अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत राहिल. निवडणूक चिन्ह नेमुन देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक व वेळ गुरुवार 9 डिसेंबर 2021 रोजी  दुपारी 3 वाजेनंतर राहिल. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक मंगळवार 21 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 7.30 वाजेपासून ते सायं. 5.30 वाजेपर्यंत राहिल. तर मतमोजणी बुधवार 22 डिसेंबर 2021 रोजी होईल. 

सन 2020 चा महाराष्ट्र् अधिनियम क्रमांक 4, दिनांक 11 मार्च 2021 अन्वये जात वैधताप्रमाणपत्र सादर करण्याचे हमी देण्याचा मुभा कालावधी संपुष्टात आल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम सन 1959 चा अधिनियम क्र. 3 च्या कलम 10-अ मधील तरतुदीनुसार नामनिर्देशनपत्रासोबत सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जातीचे प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमापत्र सादर करणे आवश्यक आहे. 

या पोटनिवडणुकांसाठी राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. (जात पडताळणी समितीस प्रस्ताव सादर केल्याची पावती ग्राह्य धरण्यात येणार नाही यांची सर्व संबधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.

000000

 नांदेड जिल्ह्यात 1 व्यक्ती कोरोना बाधित

तर 1 कोरोना बाधित झाला बरा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 660 अहवालापैकी 1 अहवाल कोरोना बाधित आला आहे. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 1 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 468 एवढी झाली असून यातील 87 हजार 789 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 26 रुग्ण उपचार घेत असून 2 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 653 एवढी आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड ग्रामीण 1 बाधित आढळले. आज जिल्ह्यातील 1 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 1 व्यक्तीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. 

आज 26 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरण 2,नांदेड मनपा अंतर्गंत गृह विलगीकरण 18, खाजगी रुग्णालयात 4 व्यक्ती उपचार घेत आहेत.  

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 7 लाख 69 हजार 971

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 6 लाख 66 हजार 77

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 90 हजार 468

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 87 हजार 789

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 653

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.3 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-निरंक

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-26

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-2. 

कोविड विषाणू विरुद्धची लस सुरक्षित असून कोरोनाची लाट पुनः येण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी कोविड-19 लसीकरण दिर्घकाळ आणि प्रभावी उपाय आहे. मिशन कवच कुंडल अंतर्गत 18 वर्षावरील सर्व व्यक्तींनी कोविड लसीकरण करून घ्यावे आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. ज्या नागरिकांनी कोविडच्या पहिल्या लसीचा डोस घेतला आहे त्यांनी ठराविक कालावधी नंतर दुसऱ्या लसीचा डोस आवश्य घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

00000

 जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 29 नोव्हेंबरला 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- नांदेड जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा सोमवार 29 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी 1 वा. कै. यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन सचिव तथा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) यांनी केले आहे.

0000

तांडा-वस्ती सुधार, मुक्त वसाहत योजनेच्या 

जिल्हास्तरीय समितीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  

नांदेड (जिमाका) दि. 23 :- वसंतराव नाईक तांडा / वस्ती सुधार व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी जिल्हास्तरी समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. या प्रस्तावासोबत अर्जदारानी केलेले सामाजिक कार्य, सामाजिक कार्याचे वर्तमानपत्रातील कात्रणे व इतर अनुषंगिक कागदपत्रे जोडून प्रस्ताव 30 नोव्हेंबरपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण नांदेड कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे. 

शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गतची कामासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीस कामे सुचविण्यासाठी बंजारा बहुल 11 जिल्ह्यांमध्ये समिती स्थापन करण्यात येत आहे. शासन निर्णयानुसार समितीच्या अध्यक्ष व सदस्य पदासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. समितीच्या अध्यक्ष पदासाठी जिल्ह्यातील बंजारा समाजातील व्यक्ती, सदस्य म्हणून विमुक्त जाती प्रवर्गातील 1 व्यक्ती, भटक्या जामाती प्रवर्गातील 1 व्यक्ती आणि विमुक्ती जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील 1 महिला सदस्याकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

0000


 आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी ऑनलाईन भरती मेळावा 

नांदेड (जिमाका) दि. 23 :- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्यावतीने 25 नोव्हेंबर 2021 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे (भरती मेळावा) आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आयटी आय उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता उपस्थित रहावे, असे आवाहन प्राचार्य सुभाष सिताराम परघणे यांनी केले आहे. 

या मेळाव्यासाठी आवश्यक अर्हता, पात्रता, तात्पुरत्या उमेदवारासाठी वेतन आणि शिकाऊ उमेदवारासाठी मानधन व आवश्यक व्यवसाय याचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे. अर्हता आयटीआय उत्तीर्ण (तात्पुरत्या आणि शिकाऊ उमेदवारासाठी) आयटीआय अधिक एनसीव्हीटी अधिक किमान 6 महिन्याचा अनुभव ट्रेनी / तात्पुरत्या कालावधीसाठी अनुभव अनिवार्य आहे. वय 18 ते 28 वर्ष (पेंटर जनरल ट्रेडसाठी 30 वर्ष ) मुलींसाठी 18 ते 24 वर्षे, वेतन 16 हजार रुपये, वेतन, कॅन्टीन, युनिफॉर्म व बसची सुविधा, व्यवसाय-वेल्डर, पेंटर, फिटर, मोटर मेकॅनि, डिझेल मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन, शिट मेटल, इलेक्ट्रानिक्स मॅकॅनिक, टॅक्ट्रर मेकॅनिक याप्रमाणे तपशिल आहे.

000000

 जिल्ह्यातील प्रत्येक गावात आज

कोविड-19 लसीकरणाची विशेष मोहिम

 

·         शासनातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी लसीकरणासाठी आपआपल्या गावी  

नांदेड (जिमाका) दि. 23 :- नांदेड जिल्ह्यात अनेक नागरिकांनी कोविड-19 च्या लसीकरणाबाबत अनस्था दाखवून लस घेण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आले आहे. कोविड-19 चा धोका अजूनही तसूभरही कमी झाला नसून संभाव्य धोक्यापासून बचावासाठी लसीकरण करुन घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनात अनेक अधिकारी व कर्मचारी हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून समाजाप्रती व आपल्या गावाप्रती उत्तरदायीत्व म्हणून याचबरोबर राष्ट्रसेवेचा एक भाग म्हणून आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी आपआपल्या गावात लसीकरण साक्षरतेसाठी व लोकांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी गावात हजर राहणार आहेत. नांदेड जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण वाढावे या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी या अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. नांदेड जिल्ह्यातील नागरिक या अभिनव उपक्रमाच्या माध्यमातून लसीकरण करुन घेऊन आपले कर्तव्य बजावतील अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

आपल्या शासकीय सेवेसमवेत ज्या गावात आपण जन्मलो त्या गावाची सेवा करण्याची संधी या अभिनव उपक्रमाद्वारे उपलब्ध झाल्याने सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. लसीकरणाच्या मोहिमेसाठी आपले योगदान देतांना आम्हाला अधिक आनंद असल्याची भावना अनेकांनी बोलून दाखविली. पोटनिवडणूक असलेली गावे वगळून जिल्ह्यातील प्रत्येक गाव उद्या या लसीकरणाची अनुभूती घेणार आहे.

00000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...