हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अ
नांदेड (जिमाका) दि. 3 :- नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना सन 2021-22 अंतर्गत प्रतिकुल हवामान परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसुचना लागु केली. जिल्ह्यातील काही भागात पावसाच्या पडलेल्या खंडामुळे सोयाबीनच्या फुलांची गळ तर शेंगा परिपक्व न झाल्याने पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसुन आले आहे. अशास्थितीत जिल्हयातील पिक विमाधारक शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीच्या 25 टक्के आगाऊ रक्कम मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ अधिसूचना काढण्याबाबत पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी सूचना दिल्या होत्या. विमाधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी ही अधिसुचना लागु केली आहे.
नांदेड जिल्हयात 26 जुलै ते 16 ऑगस्ट या 21 दिवसाच्या कालावधीत पावसाचा खंड पडल्याने काही भागात सोयाबीनचे नुकसान दिसून आले. जिल्हयामध्ये समितीमार्फत याबाबत सर्वेक्षण करण्यात आले असून जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादकतेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयानुसार हंगाम कालावधीत प्रतिकुल परिस्थिती जसे पुर, पावसातील खंड, दुष्काळ आदी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पन्नामध्ये सरासरी उत्पन्नाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर नुकसान भरपाईच्या प्रमाणात विमा धारक शेतकऱ्यांना 25 टक्के मर्यादेपर्यंत आगाऊ रक्कम देण्याची तरतुद आहे.
समितीच्या सर्वेक्षण अहवालानुसार नांदेड जिल्हयातील सर्व तालुक्यांमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये 50 टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षीत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सोयाबीन, कापुस, तुर व ख. ज्वारी या पिकांसाठी हंगामातील प्रतिकुल परिस्थिती (Mid-Season Adversity) अधिसूचना लागु केली आहे. सर्व पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विहीत मुदतीत नुकसान भरपाई आगाऊ रक्कम अदा करणेबाबत विमा कपंनीस निर्देश दिले.
तालुकानिहाय सायोबिन उत्पादकतेत घट :
नांदेड तालुका 62.33, अर्धापुर 55.00, मुदखेड 61.67, बिलोली 61.98, धर्माबाद 61.74, नायगाव 60.00, मुखेड 60.37, कंधार 61.69, लोहा 64.00, हदगाव 59.75, हिमायतनगर 66.65, भोकर 64.73, उमरी 60.27, देगलूर 60.72, किनवट 68.79, माहूर 67.19 याप्रमाणे सरासरी उत्पादकतेच्या तुलनेत अपेक्षित उत्पादकतेत येणारी घट टक्केवारी मध्ये आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली आहे.
0000