Thursday, October 24, 2024

आजचे महत्वाचे वृत्त क्र. 974 

21 उमेदवारांचे विधानसभेसाठी अर्ज दाखल

लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकूण तीन अर्ज 

नांदेड, दि. 24 ऑक्टोबर :- विधानसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्यच्या तिसऱ्या दिवशी 18 उमेदवारांनी 20 अर्ज 9 मतदारसंघात दाखल केले आहेत. त्यामुळे 24 ऑक्टोबर पर्यंत 21 उमेदवारांचे 24 अर्ज दाखल झाले आहेत. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी आणखी दोन अर्ज दाखल झाले असून आतापर्यंत एकूण 3 अर्ज दाखल झाले आहेत. 

आज राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाचे तसेच सध्याच्या विधानसभा व विधानपरिषद सदस्य असलेल्यांपैकी  83-किनवट मतदारसंघात एका उमेदवाराने एक नामनिर्देशनपत्र दाखल केले. आतापर्यंत दोन उमेदवारांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये भाजपचे आमदार भिमराव रामजी केराम (एबी फॉर्म अप्राप्त) यांचा समावेश आहे. 84-हदगावमध्ये आज कॉग्रेसचे आमदार माधव निवृत्तीराव पवार यांनी अर्ज दाखल केला. 88-लोहा मतदारसंघात आज माजी खासदार प्रतापराव गोविंदराव चिखलीकर यांनी अर्ज दाखल केला. 89-नायगाव येथे भाजपचे आमदार राजेश संभाजीराव पवार यांनी अर्ज दाखल केला. 91-मुखेड येथे कॉग्रेसचे पाटील हनमंतराव व्यंकटराव (एबी फॉर्म अप्राप्त), भाजपचे आमदार तुषार गोविंदराव राठोड (एबी फॉर्म अप्राप्त), शिवसेना उबाठाचे दशरथ मंगाजी लोहबंदे (एबी फॉर्म अप्राप्त)  यांनी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय अपक्ष म्हणून भास्कर बालाजी हंबर्डे, संजय शिवाजीराव भोगरे, नय्यर जहा मोहमंद फेरोज हुसेन यांनी 87-नांदेड दक्षिण मधून तर लोहामधून अपक्ष मनोहर बाबाराव धोंडे यांनी अर्ज दाखल केला.  

आज दिवसभरात किनवटमधून 14, हदगावमधून 28, भोकरमधून 56, नांदेड उत्तरमध्ये 30, नांदेड दक्षिणमध्ये 18, लोहामध्ये 8, नायगावमध्ये 20, देगलूरमध्ये 37, मुखेडमध्ये 33 असे एकूण 240 अर्ज इच्छूकांनी प्राप्त केले आहेत. आतापर्यंत 1 हजार 68 अर्ज इच्छुकांनी प्राप्त केले आहेत.

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज ज्ञानेश्वर बाबूराव कोंडामंगले व रविंद्र वसंतराव चव्हाण यांनी अर्ज दाखल केले आहेत. याठिकाणी एकुण 3 अर्ज दाखल झाले आहेत. 

0000

 वृत्त क्र. 973

प्रचाराचे व्हिडिओ बनविताना उमेदवारांनी धार्मिक स्थळांचा,चिन्हांचा,वापर करू नये 

जाहिरात,व्हीडीओ बनवतांना घ्या काळजी 

नांदेड दि. २४ ऑक्टोंबर : निवडणुकांमध्ये प्रचारासाठी हल्ली उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वाचा अहवाल देणारा व्हिडिओ तयार करण्याची सर्वमान्य प्रक्रीया आहे. मात्र ही प्रक्रिया किचकट असते. त्याला वेळ लागतो. त्यामुळे हा व्हिडिओ बनवतानाच भारत निवडणूक आयोगाने केलेल्या सूचनांचे पालन केल्यास याची मान्यता तातडीने मिळण्यास मदत होईल, त्यामुळे आयोगाला अमान्य असणाऱ्या गोष्टी टाळण्याच्या आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

उमेदवारांसाठी तयार करण्यात येणाऱ्या प्रिंट माध्यमांसाठीच्या जाहिराती, प्रचार रथांवरील व्हीडीओ ,समाज माध्यमांसाठी रिळ, रेडिओ सार्वजनिक तसेच खाजगी एफएम चॅनल बलके एसएमएस रेकॉर्ड केलेले व्हॉइस मेसेजेस सोशल मीडिया इंटरनेट संकेतस्थळे यावर द्यावयाच्या जाहिराती यामध्ये हे व्हिडिओ व रीळ प्रामुख्याने वापरले जातात.

निवडणुकीच्या उमेदवारांचे हे सर्व व्हिडिओ माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण कक्षाकडून मान्यताप्राप्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे मान्यतेला देण्यापूर्वीच या व्हिडिओमध्ये काय असावे व काय असू नये हे जाणून घेणे आवश्यक आहे. वृत्तपत्रांच्या अर्थात प्रिंट मीडियाच्या जाहिराती संदर्भात शेवटचे दोन दिवस परवानगी घेणे आवश्यक आहे.

कार्यक्रम संहितेनुसार व्हिडिओमध्ये अभिरुचीहीन किंवा सभ्यतेविरुद्ध प्रसारण, मित्र देशांवर टीका,धार्मिक किंवा जातीय तेढ निर्माण करणारे दृश्य, किंवा शब्दांचा समावेश असलेले चित्रण,अश्लील, बदनामीकारक,जाणीवपूर्वक, चुकीचे किंवा अर्धसत्य माहिती, प्रसारण, हिंसेला प्रोत्साहन, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारे किंवा राष्ट्रविरोधी व्यक्तींना उत्तेजन देणारे चित्र, न्यायालयाचा अवमान, राष्ट्रपती आणि न्यायपालिकेच्या सचोटीविरुद्ध आक्षेप व्यक्त करणारे प्रसारण,राष्ट्रीय ऐक्यास बाधा आणणारे प्रसारण,नैतिक जीवन मलीन करणारी टीका,अंधश्रद्धा किंवा भोंदूगिरीस खतपाणी घालणारे चित्रण, महिलांचे विकृतीकरण दर्शवणारे चित्रण, बालसंहितेविरुद्ध प्रसारण, विशिष्ट भाषिक आणि प्रादेशिक घटकांच्या संदर्भात उपरोधिक आणि निंदनीय वृत्ती दर्शविणारे दृश्य किंवा शब्द असणारे प्रसारण या शिवाय सीनेमेट्रोग्राफ कायदा 1952 च्या तरतुदीचे उल्लंघन करणारे प्रसारण दाखवण्यात येऊ नये.

तसेच जाहिरात संहितेनुसार पुढील प्रकारच्या जाहिरातीस प्रतिबंध आहे. कोणत्याही वंश, जात, वर्ण, पंथ, आणि राष्ट्रीयत्वाचा उपहास करणे, भारतीय राज्यघटनेचा अवमान करणे, गुन्हा करण्यास प्रवृत्त करणे, हिंसाचार करणे किंवा कायद्याचे उल्लंघन करणे किंवा अश्लील त्याचे उदातीकरण करणे, गुन्हेगारी योग्य असल्याचे सादर करणे, राज्यमुद्रा किंवा राज्यघटनेच्या कोणत्याही भागाची किंवा राष्ट्रीय नेत्याचे किंवा राज्याच्या व्यक्तीचे किंवा व्यक्तिमत्त्वाच्या स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणे, स्त्रियांचे चुकीचे चित्रण करणे, विशेषतः महिलांची बदनामी करणाऱ्या कोणत्याही दृष्याला परवानगी दिली जाणार नाही.   सिगारेट तंबाखूजन्य किंवा नशा आणणाऱ्या पदार्थांच्या जाहिरातींना प्रतिबंध करण्यात आला आहे.

व्हीडीओत काय नसावे... 

भारत निवडणूक आयोगाने माध्यमांसंदर्भातील दिलेल्या निर्देशानुसार

१. मंदिर, मशिद, गुरुद्वारा व अन्य कोणत्याही धार्मिक स्थळांचे दृश्य वापरू नये

२. दुसऱ्या पक्षांवर आरोप नसावे. स्वतः काय केले ते सांगावे.

३. परस्परांच्या खाजगी आयुष्यावरील आरोप नसावे. सभ्यता सोडून भाषा, आरोप नसावे

४. विरोधी पक्षांवर टीका टिपणी नसावी, हेतू आरोप नसावे

५. सैन्याचे फोटो, सैन्य अधिकाऱ्यांचे फोटो याचा वापर नसावा

६. अन्य कुठल्याही देशावर आरोप नसावे

७. विशिष्ट जात, धर्म,पंथ यावर आरोप नसावे

८. कुणाचीही मानहेलना,अवहेलना नसावी

९. न्यायालयाचा अवमान नसावा

१o. देशाच्या सार्वभौमत्वाचा अपमान नसावा

११. कोणत्याही व्यक्तीचे नाव घेऊन हेतूआरोप, अपमान नसावा.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...