Wednesday, October 21, 2020

 

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) आढावा बैठक संपन्न 

नांदेड (जिमाका) दि. 21 : जिल्ह्यातील विविध विकास योजना, तसेच विकास कामांबाबत जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठकीत सर्वंकष आढावा घेण्यात आला. योजना, उद्दीष्टांच्या अंमलबजावणीसाठी विविध विभागांकडून काटेकोर नियोजन करण्यात यावेत, असे निर्देश बैठकीत देण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रताप पाटील चिखलीकर व सहअध्यक्ष खासदार हेमंत पाटील हे होते. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणातील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवन येथे आज ही बैठक संपन्न झाली. 

या बैठकीस आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार भिमराव केराम, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर, मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी आदींची उपस्थिती होती. 

बैठकीत सुरवातील 15 जुलै 2017 रोजी झालेल्या सभेच्या इतिवृत्ताचे वाचन व त्यास मान्यता देण्यात आली. यावेळी जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या योजनेच्या कामाचा विस्तृत आढावा घेण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, मनुष्यआदिन निर्मिती उद्दिष्ट व साध्य (2020 21) सेल्फवरील (मंजूर) कामे, मजूर उपस्थिती, सार्वजनिक पाणी पुरवठा विहिरी, वैयक्तिक सिंचन विहिरी, दिनदयाळ अंत्योदय योजना, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम, प्रधानमंत्री आवास योजना शहरी व ग्रामीण, स्वच्छ भारत मिशन शहरी व ग्रामीण, राष्ट्रीय ग्रामीण पाणी पुरवठा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना, राष्ट्रीय भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम, दिनदयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, अमृत योजना, महावितरणची उज्ज्वल योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, राष्ट्रीय आरोग्य मिशन, सर्व शिक्षा अभियान, शालेय व पोषण आहार योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, डिजिटल इंडियाअंतर्गत ग्रामपंचायत इंटरनेट सुविधा, रेल्वे, भारत संचार निगम लिमीटेड, राष्ट्रीय महामार्ग या योजनांच्या प्रगतीचा आढावाही घेण्यात आला. अध्यक्ष खासदार प्रताप पाटील चिखलीकर व सहअध्यक्ष खा. हेमंत पाटील यांनी विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावाणीसाठी संबंधित यंत्रणेने त्वरीत कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले. 

जिल्ह्यात ग्रामस्तरावर काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे तिथे विद्युत सुरळीत होण्याबाबत व भारत संचार निगम लिमीटेड अंतर्गतचे नेटवर्क अडचणीवर तात्काळ उपाययोजना कराव्यात. तसेच अशा अडचणी भविष्यात होणार नाहीत याची काळजी घ्यावी. बँकानी शेतकऱ्यांना पिक विमा संदर्भात व वैयक्तीक लाभार्थ्यांना लाभ मिळण्याबाबत योग्य सहकार्य करावे अशाही सूचना यावेळी संबंधित विभागांना दिल्या.

बैठकीत अनुषंगीक योजना तसेच त्यातील कामाबाबत अहवाल संबंधीत यंत्रणांनी सादर केला. त्यावर उपस्थित समिती सदस्यांनी विविध मुद्यांवर चर्चा करुन उपयुक्त सूचना केल्या. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले व शेवटी आभार मानले.

0000




 202 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी

103 बाधितांची भर तर दोघांचा मृत्यू

 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- बुधवार 21 ऑक्टोंबर 2020 रोजी सायं. 5.30 वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात 202 कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर 103 व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 45 तर ॲटिजेन किट्स तपासणीद्वारे 58 बाधित आले. 

आजच्या एकुण 1 हजार 380 अहवालापैकी 1 हजार 254 अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 18 हजार 394 एवढी झाली असून यातील 16 हजार 503 बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण 1 हजार 277 बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील 45 बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे. 

या अहवालात दोघाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. मंगळवार 20 ऑक्टोंबर रोजी बिलोली तालुक्यातील आरळी येथील 40 वर्षाचा एका महिलेचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे तर बुधवार 21 ऑक्टोंबर रोजी इतवारा नांदेड येथील 57 वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 492 झाली आहे. 

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 5, अर्धापूर कोविड केंअर सेंटर 5, किनवट कोविड केंअर सेंटर 11, धर्माबाद कोविड केंअर सेंटर 9, मुदखेड कोविड केंअर सेंटर 4, मुखेड कोविड केंअर सेंटर 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 5, बिलोली कोविड केंअर सेंटर 3, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन 106, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर 4, लोहा कोविड केंअर सेंटर 2, खाजगी रुग्णालय 40 असे 202 बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.81 टक्के आहे. 

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 32, भोकर तालुक्यात 1, मुखेड 1,  धर्माबाद 1, परभणी 2, नांदेड ग्रामीण 3, किनवट 2, नायगाव 2, हिंगोली 1 असे एकुण 45 बाधित आढळले. 

तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र 31, अर्धापूर तालुक्यात 3,  माहूर 6, बिलोली 2, कंधार 3, धर्माबाद 1, यवतमाळ 1, नांदेड ग्रामीण 1, किनवट 2, हदगाव 1, नायगाव 1, मुखेड 4, उमरी असे एकूण 58 बाधित आढळले. 

जिल्ह्यात 1 हजार 277 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 162, एनआरआय व पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन एकत्रित 694, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 42, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) येथे 47, हदगाव कोविड केअर सेंटर 11, नायगाव कोविड केअर सेंटर येथे 27, बिलोली कोविड केअर सेंटर येथे 18, मुखेड कोविड केअर सेंटर येथे 3, मांडवी कोविड केअर सेंटर 7, देगलूर जैनब कोविड केअर सेंटर येथे 6, लोहा कोविड केअर सेंटर येथे 8, बारड कोविड केअर सेंटर 2, मुदखेड कोविड केअर सेटर 4, माहूर कोविड केअर सेंटर 21, किनवट कोविड केअर सेंटर येथे 34, धर्माबाद कोविड केअर सेंटर 15, उमरी कोविड केअर सेंटर 11, कंधार कोविड केअर सेंटर येथे 9, अर्धापूर कोविड केअर सेंटर 14, भोकर कोविड केअर सेंटर 11, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, खाजगी रुग्णालयात दाखल 127, लातूर येथे संदर्भीत 1, हैद्रबाद येथे संदर्भीत 2 झाले आहेत. 

बुधवार 21 ऑक्टोंबर रोजी 5.30 वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे 74, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे 90, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे 79 एवढी आहे. 

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती

एकुण घेतलेले स्वॅब- 1 लाख 1 हजार 867

निगेटिव्ह स्वॅब- 80 हजार 316

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 18 हजार 394

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 16 हजार 503

एकूण मृत्यू संख्या- 492

उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण 92.81

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-5,

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या- निरंक,

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- 272,

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 277,

आज रोजी अती गंभीर प्रकृती असलेले बाधित- 45. 

कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करुन घ्यावा जेणे करुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास हे ॲप सतर्क करेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.

0000

 

येसगी पुलावरुन अवजड वाहनांना प्रतिबंध 

नांदेड (जिमाका) दि. 21 :- सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अखत्‍यारितील राष्‍ट्रीय महामार्ग क्र.63 (पुर्वीचा प्ररामा-2) वरील येसगी पुलावरील वाहनभार मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या पुलावरुन अवजड वाहनांना मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 115 मधील तरतुदीनुसार जिल्‍हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अधिसूचनेद्वारे प्रतिबंधीत केले आहे.  

या अधिसूचनेनुसार संबंधित विभागांनी उपाययोजना करुन 5 नोव्हेंबर 2020 पासून 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत (दोन वर्षासाठी) राष्‍ट्रीय महामार्ग क्र. 63 (पुर्वीचा प्ररामा-2) वरील येसगी पूल क्षतीग्रस्‍त झाल्‍याने व पूलाचे काम करण्‍यासाठी या पुलावरुन केवळ कार, जीप, हलके मालवाहू वाहन (LCV) इत्‍यादी ज्‍याची उंची 2.80 मीटर पेक्षा कमी आहे अशीच वाहने सोडणे व इतर जडवाहतूक बाजुच्‍या जुन्‍या पुलावरुन वळविण्‍यास मान्‍यता दिली आहे. 

संबंधित विभागाने वळन रस्‍त्‍यासाठी वापरण्‍यात येणारा जुना पुल हा अरुंद असल्‍याने या पुलावरुन एकावेळेस एकच अवजड वाहन ये-जा करेल याबाबतची दक्षता घ्‍यावी. रस्‍त्‍याच्‍या आजूबाजूस असलेली काटेरी झुडपाची कापनी करावी. पुलाच्‍या दोन्‍ही बाजूस सिग्‍नल यंत्रणा / वाकीटॉकीचा वापर करावा. सुरक्षीततेच्‍या दृष्‍टीकोणातून पुलाचे अलीकडील बाजुस व पलीकडील बाजुस पोलीस चौकी उभारुन त्‍यात आवश्‍यक तो पोलीस बंदोबस्‍त ठेवावा. पुलाच्‍या दोन्‍ही बाजूस वाहन क्षमता मर्यादेचे फलक, तसेच अधीक्षक अभियंता, संकल्‍प चित्र मंडळ, मुंबई यांनी त्‍यांचे अहवालात शिफारस केल्‍या नुसार पुलाच्‍या दोन्‍ही बाजूस उंची बाबतचे फलक व  हेवी डयुटी गॅन्‍ट्री लावण्‍यात यावे. पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 116 नुसार अधिसूचना जारी करुन बांधकाम विभागामार्फत आवश्‍यक ते वाहतूक चिन्‍हाचे फलक, वाहन चालकाच्‍या माहितीसाठी पुलाच्‍या दोन्‍ही बाजूस व आवश्‍यक त्या ठिकाणी लावणे बंधनकारक राहिल. या अधिसुचनेबाबतची माहितीबाबत लगतच्‍या सर्व जिल्‍हा प्रशासन, पोलीस प्रशासन, प्रादेशिक परिवहन विभाग व इतर आवश्‍यक सर्व संबंधित विभागास अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांनी द्यावी. ही अधिसुचना अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नांदेड यांचे कार्यालयामार्फत महाराष्‍ट्र शासन राजपत्रात प्रसिध्‍दीची कार्यवाही करुन स्‍थानिक मराठी, हिन्‍दी, इंग्रजी व ऊर्दु वर्तमानपत्रात सुध्‍दा प्रसिध्‍दी द्यावी, असेही अधिसूचनेत जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी नमूद केले आहे.

00000

  वृत्त क्र. 87 25 जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिन  राबविण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश  नांदेड दि. 22 जानेवारी :- राष्ट्रीय मतदार दिन कार्...