Monday, December 5, 2016

जिल्हा वार्षिक योजनाचा निधी वेळेत खर्च करावा
– जिल्हाधिकारी काकाणी
नांदेड, दि. 5 :-  जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ), अनुसूचित जाती उपयोजना, आदिवासी उपयोजनांचा सन 2016-17 या आर्थिक वर्षातील निधी सर्व संबंधित विभागाने वेळेत खर्च करावा , असे निर्देश जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी येथील डॉ. शंकरराव चव्हाण नियोजन भवनात घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.  
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त समीर उन्हाळे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा नियोजन अधिकारी एस. बी. थोरात, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना सन 2016-17 करीता नोव्हेंबर 2016 अखेर योजनानिहाय मंजूर तरतूद, उपलब्ध करुन देण्यात आलेला निधी, झालेला खर्च व होणारी बचत आणि अपूर्ण व नवीन कामांच्या प्रगतीचा आढावा घेवून जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी सध्या नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणूक आचारसंहिता शहराच्या कार्यक्षेत्रापुरती मर्यादीत आहे. आगामी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आचार संहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विकास योजनेची कामे पूर्ण करुन निधी खर्च करण्यास कालावधी कमी मिळणार आहे. म्हणून प्रत्येक विभागाने तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निधी उपलब्ध करुन घेणे आदींबाबत कार्यवाही वेळेत करावी, अशाही सूचना जिल्हाधिकारी श्री. काकाणी यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीनंतर कॅसलेस व्यवहारांसाठी उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या सोई-सुविधांची सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. सादरीकरणातून दैनंदिन व्यवहारात डिजिटल पद्धतीने आर्थिक देवाण-घेवाणही करण्याच्या सुलभ पद्धतीची माहिती देण्यात आली. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. काकाणी म्हणाले की, शासकीय अधिकारी  व कर्मचाऱ्यांनी या कॅसलेस बँकिंग व्यवहाराचा वापर आपल्या दैनंदिन व्यवहारात करावा. नागरिकांनाही या व्यवहाराचे महत्व पटवून देवून त्यांनाही प्रेरित करावे , असे त्यांनी आवाहन केले.

000000
धर्माबाद नगरपरिषद निवडणुकीच्या
      दुसऱ्या प्रशिक्षणाचे मंगळवारी आयोजन

नांदेड, दि. 5 :- धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान रविवार 18 डिसेंबर 2016 रोजी असून त्‍यानुषंगाने क्षेत्रिय अधिकारी, केंद्राध्‍यक्ष व मतदान अधिकारी यांचे दुसरे प्रशिक्षण मंगळवार 6 डिसेंबर 2016 रोजी दुपारी 3 वा. नगरपरिषद सभागृह धर्माबाद येथे आयोजित केले आहे. संबंधितांनी प्रशिक्षणास उपस्थित रहावे, असे आवाहन नगरपरिषद धर्माबाद निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ यांनी केले आहे. 
धर्माबाद नगरपरिषद निवडणूक
मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन
नांदेड दि. 5 :-  धर्माबाद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2016 च्‍या अनुषंगाने मतदान निर्भय व मुक्‍त वातावरणामध्‍ये पार पाडण्‍यासाठी, लोकशाही दृढ होण्‍याकरीता मतदार जनजागृती अभियान निमित्ताने  मंगळवार 6 डिसेंबर 2016 रोजी मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्‍यात आले आहे. रॅली सकाळी 9 वा. नगरपरिषद धर्माबाद येथून निघणार आहे.
            तसेच बुधवार 7 डिसेंबर रोजी निबंध स्पर्धा, गुरुवार 8 डिसेंबर रोजी रांगोळी स्‍पर्धा आयोजन, शुक्रवार 9 डिसेंबर रोजी घोष वाक्‍यस्‍पर्धा अशा विविध स्‍पर्धेचे आयोजन मतदार जनजागृती अभियानांतर्गत करण्‍यात आले आहे. जनजागृती रॅलीस उपस्थित राहण्‍याचे आवाहन नगरपरिषद धर्माबाद निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन खल्‍लाळ यांनी केले आहे.   

0000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...