Saturday, August 10, 2024

#मुख्यमंत्रीमाझीलाडकीबहीण

 वृत्त क्र.  692

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात पाच लक्ष अर्ज पात्र

17 ऑगस्टला डीबीटीद्वारे लाभ जमा होणा

नांदेड दि. 10 ऑगस्ट : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यातील महिलांचे पाच लक्ष अर्ज पात्र ठरले आहेत. या सर्वांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी दोन महिन्यांचा अर्थात तीन हजार रुपये जमा होणार आहे.

महिला व बालकल्याण विभागाने जारी केलेल्या एका पत्रकामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. पाच लक्ष अर्ज मंजूर झाले तरी ज्यांच्या खात्याशी आधार कार्ड संलग्न आहेत अशाच खात्यांमध्ये हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे आपले आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटशी जोडले गेले आहे की नाही याची खातरजमा करण्याचे आवाहनही विभागामार्फत करण्यात आले आहे.

आपण अर्जात नमूद केलेले बँक खाते हे आधार सिडेट आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. बँक खात्याला आधार सीडींग केलेले नसल्यास तात्काळ आपले खाते ज्या बँकेत आहे, अशा बँकेत जाऊन आधार जोडणी करून घ्यावी. डीबीटीद्वारे थेट लाभ हस्तांतरणासाठी सदरची बाब आवश्यक आणि अनिवार्य आहे. 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत आहे. 31 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज केला तरी सर्व पात्र लाभार्थ्यांना जुलै 2024 पासून दरमहा पंधराशे रुपये लाभ मिळणार आहे.

एक जुलै ते 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज केलेल्या पात्र लाभार्थींना 17 ऑगस्ट रोजी थेट डीबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जुलै व ऑगस्ट असे दोन महिन्याचा लाभ जमा होणार आहे. एक ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान प्राप्त अर्जाची छाननी होऊन दुसऱ्या टप्प्यात लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अंगणवाडी सेविका व कर्मचाऱ्यांना सूचना

नागरिकांना आवाहन करतानाच जिल्हा प्रशासनाने या कार्यात सहभागी असणाऱ्या समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, गृहिणी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू बालवाडी सेविका, आशा सेविका, पर्यवेक्षिका, मदत कक्ष प्रमुख, या सर्वांना आवाहन केले आहे की, त्यांनी देखील ज्यांचे अर्ज नामंजूर असतील त्या सर्व लाभार्थ्यांची संपर्क करावा. त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्राची पूर्तता करावी. पुन्हा ऑनलाईन जमा करावेत. ज्यामुळे लाभार्थ्यांना लाभ मिळेल. त्यामुळे ज्यांच्या त्रुटी असतील त्यांच्याशी संपर्क साधून त्रुटी दूर करण्यात यावी, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0000

वृत्त क्र. 691

विधानसभेसाठी आज विशेष मतदार नोंदणी अभियान
 
नांदेड, दि. 10 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीमध्ये आपण मतदार आहोत अथवा नाही याची खातरजमा करून घेण्यासाठी व नसेल तर आपले नाव यादीत घालण्यासाठी उद्या विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. मतदान केंद्रावर जाऊन याबाबतची खात्री करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

 रविवार 11 ऑगस्ट रोजी विशेष मतदार नोंदणी अभियान संपूर्ण जिल्ह्यात राबविले जात आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. आपल्या जवळच्या मतदान केंद्रावर जाऊन बीएलओकडे नाव वगळणे, कमी करणे, समाविष्ट करणे,तपासणी करणे ,ही प्रक्रिया करता येणार आहे.

जिल्ह्यामध्ये मतदार प्रारूप यादीचे दुसरे पुननिरीक्षण अभियान 6 ऑगस्ट पासून सुरू झाले आहे.उद्या दिनांक 11 ऑगस्ट रोजीही मतदान पुनरिक्षण राबविण्यात येणार आहे. याशिवाय पुढच्या आठवड्यात दिनांक 17 व 18 ऑगस्ट रोजी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

000000

वृत्त क्र. 690

मोटार सायकल वाहनासाठी नविन मालिका 

पसंती क्रमांकासाठी अर्ज करण्याचे आवाहन 

नांदेड दि. 10 ऑगस्ट : परिवहन्नेतर संवर्गातील मोटार सायकल वाहनांसाठी MH26- CQ ही नविन मालिका मंगळवार 13 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. ज्या अर्जदारांना पसंती क्रमांक घ्यावयाचा आहे त्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मोबाईलनंबर व ईमेलसह अर्ज 12 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2.30 पर्यंत स्विकारण्यात येणार आहेत. त्यानंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत.

ज्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास 12 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता Text message/ दूरध्वनीद्वारे संबंधीत अर्जदारास कळविण्यात येईल. सर्वांनी याबाबतची नोंद घ्यावी असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

0000

सुधारित वृत्त क्र. 689 

मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध : शंभूराज देसाई

'आर्टी 'ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्यस्तरीय मातंग समाजाच्या मेळाव्यात शासनाचे आभार

ना. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने समाज बांधवांतर्फे स्वीकारला सत्कार 

नांदेड दि. 10 ऑगस्ट : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी )ची स्थापना झाली आहे. आरक्षणाचाही प्रश्न लवकरच निकाली निघेल.राज्य शासन मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले. मुखेड येथे कै. गोविंदराव राठोड सभागृह क्रीडा संकुल येथे या कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आले होते. 

आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात राज्यातील समस्त मातंग समाजाच्यावतीने राज्यस्तरीय समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये राज्य शासनाने 'आर्टी 'ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाचे मातंग समाजाच्या धुरीनांकडून जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी समाजाकडून जाहीर सत्कार स्वीकारला. 

या कृतज्ञता सोहळ्याला मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आ.डॉ. तुषार राठोड,आ.बालाजी कल्याणकरमाजी खासदार हेमंत पाटीलमाजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळेमाजी आ. सुभाष साबणेमाजी आ. अविनाश घाटेमाजी आ. राम पाटील रातोळीकरमा.मुख्यमंत्री महोदयाचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,आयोजक नारायणराव गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील मातंग समाज संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

1 ऑगस्टला  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती  महोत्सवानिमित्त अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)या संस्थेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले. 

 राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिकशैक्षणिक व आर्थिकविकास करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करण्याची मागणी मातंग समाजाची होती. आझाद मैदानामध्ये यासाठी आंदोलनही झाले होते.ही मागणी पूर्ण झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव गायकवाड यांच्या पुढाकारात समस्त मातंग समाज बांधवाकडून  महाराष्ट्र सरकारचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.   

यावेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी राज्य शासन मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सकारात्मक  असल्याचे सांगितले. मातंग समाजाने आझाद मैदान येथे ज्या ज्या प्रमुख मागण्या मागितल्या होत्या. त्या मागण्या जवळपास पूर्ण झाल्या असून अन्य मागण्याही कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.   

आझाद मैदान येथील मातंग समाजाच्या आंदोलनातील आपल्या आश्वासनानंतर व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना झाली असून गोवंडी ( मुंबई ) येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अंतर्गत आरक्षण अबकड गटाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीला अभ्यास गट गठीत करून ज्या राज्यामध्ये हे आरक्षण देण्यात आले होते. तेथील अभ्यास करण्यात आला. आरक्षण विषयक अंतर्गत वर्गवारी न्यायालयाच्या निर्देशानंतर पूर्ण केल्या जाईल असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी या विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी 'आर्टी 'साठी आपण सभागृहात बोललो होतो. त्याची पूर्तता झाल्याचे समाधान आहेअसे सांगितले. मुखेड एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. तसेच लेंडी नदीवरील प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबतही पाठपुरावा करण्याची विनंती केली. 

मुखेड -देगलूर परिसरातील भूमिपुत्र आणि मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी 'आर्टी 'च्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील यावेळी समाजाने आपला शैक्षणिक आलेख वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. माजी खासदार हेमंत पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. तसेच समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.या कृतज्ञता सोहळ्याला राज्यभरातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका कोमल पोटाळे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

0000

सुधारित वृत्त क्र. 689 

मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन वचनबद्ध : शंभूराज देसाई

'आर्टी 'ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्यस्तरीय मातंग समाजाच्या मेळाव्यात शासनाचे आभार

ना. देसाई यांनी मुख्यमंत्र्यांच्यावतीने समाज बांधवांतर्फे स्वीकारला सत्कार 

नांदेड दि. 10 ऑगस्ट : अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थे (आर्टी )ची स्थापना झाली आहे. आरक्षणाचाही प्रश्न लवकरच निकाली निघेल.राज्य शासन मातंग समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यास वचनबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे केले. मुखेड येथे कै. गोविंदराव राठोड सभागृह क्रीडा संकुल येथे या कार्यक्रमाचे आयोजण करण्यात आले होते. 

आज नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात राज्यातील समस्त मातंग समाजाच्यावतीने राज्यस्तरीय समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये राज्य शासनाने 'आर्टी 'ची मागणी पूर्ण केल्याबद्दल राज्य शासनाचे मातंग समाजाच्या धुरीनांकडून जाहीर आभार व्यक्त करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी समाजाकडून जाहीर सत्कार स्वीकारला. 

या कृतज्ञता सोहळ्याला मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह आ.डॉ. तुषार राठोड,आ.बालाजी कल्याणकर, माजी खासदार हेमंत पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी आ. सुभाष साबणे, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. राम पाटील रातोळीकर, मा.मुख्यमंत्री महोदयाचे खासगी सचिव बालाजी पाटील खतगावकर,आयोजक नारायणराव गायकवाड यांच्यासह महाराष्ट्रातील मातंग समाज संघटनेचे राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

1 ऑगस्टला  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंती  महोत्सवानिमित्त अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)या संस्थेचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते झाले. 

 राज्यातील मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक, विकास करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना करण्याची मागणी मातंग समाजाची होती. आझाद मैदानामध्ये यासाठी आंदोलनही झाले होते.ही मागणी पूर्ण झाल्यामुळे नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील सामाजिक कार्यकर्ते नारायणराव गायकवाड यांच्या पुढाकारात समस्त मातंग समाज बांधवाकडून  महाराष्ट्र सरकारचे जाहीर आभार व्यक्त करण्यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई उपस्थित होते.   

यावेळी बोलताना शंभूराज देसाई यांनी राज्य शासन मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्यासाठी सकारात्मक  असल्याचे सांगितले. मातंग समाजाने आझाद मैदान येथे ज्या ज्या प्रमुख मागण्या मागितल्या होत्या. त्या मागण्या जवळपास पूर्ण झाल्या असून अन्य मागण्याही कायद्याच्या चौकटीत राहून पूर्ण करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात शासन कटीबद्ध असल्याचे सांगितले.   

आझाद मैदान येथील मातंग समाजाच्या आंदोलनातील आपल्या आश्वासनानंतर व त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या झालेल्या बैठकीमध्ये राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो शब्द दिला होता तो पूर्ण केला आहे.अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी)ची स्थापना झाली असून गोवंडी ( मुंबई ) येथे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. अंतर्गत आरक्षण अबकड गटाचा प्रश्न सोडविण्यासाठी सुरुवातीला अभ्यास गट गठीत करून ज्या राज्यामध्ये हे आरक्षण देण्यात आले होते. तेथील अभ्यास करण्यात आला. आरक्षण विषयक अंतर्गत वर्गवारी न्यायालयाच्या निर्देशानंतर पूर्ण केल्या जाईल असेही त्यांनी सांगितले. 

यावेळी या विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.तुषार राठोड यांनी 'आर्टी 'साठी आपण सभागृहात बोललो होतो. त्याची पूर्तता झाल्याचे समाधान आहे, असे सांगितले. मुखेड एमआयडीसीचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली. तसेच लेंडी नदीवरील प्रकल्प पूर्णत्वास नेण्याबाबतही पाठपुरावा करण्याची विनंती केली. 

मुखेड -देगलूर परिसरातील भूमिपुत्र आणि मुख्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी 'आर्टी 'च्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी देखील यावेळी समाजाने आपला शैक्षणिक आलेख वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. माजी खासदार हेमंत पाटील यांनीही यावेळी संबोधित केले. तसेच समाजाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.या कृतज्ञता सोहळ्याला राज्यभरातील विविध जिल्ह्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रसिद्ध गायिका कोमल पोटाळे यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला.

0000

महत्वाचे / संदर्भासाठी  विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या संपूर्ण माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आपल्या विधान सभा क्षेत्रातील उमेदवारा...