Thursday, April 20, 2023

 लेख                                                                                              दि. 20 एप्रिल 2023

समता पर्वाने दिले योजनांच्या अंमलबजावणीला बळ !

सामाजिक न्याय विभागातर्गत संपूर्ण राज्यात 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. समाज कल्याण विभागाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यत पोहोचविण्यावर यात भर दिला जात आहे. समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी राज्यातील सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाना या अभियानात विविध उपक्रम राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत.

 

प्रत्येक जिल्ह्यात जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सामाजिक न्याय पर्वाचे उदघाटन करण्यात आले आहे. या अभियानात अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या वस्तींना भेटी देवून योजनांची जनजागृती करणे, जात प्रमाणपत्र व जातीचे वैधता प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी विशेष मोहिमचे आयोजन करणे असे उपक्रम हाती घेतले आहेत. शिक्षण विभागाशी समन्वय साधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शाळेत जात प्रमाणपत्र देणे, सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनाची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यत पोहोचविणे, महाविद्यालय, आश्रमशाळा, निवासी शाळा व शासकीय वसतीगृहांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबरोबर इतरही महापुरुषांच्या विचारांवर आधारित वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा व पथनाटय तसेच इतर कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात येत आहे.

 

तालुका व जिल्हास्तरावर स्वाधार शिष्यवृत्ती, मिनी ट्रॅक्टर लाभार्थी, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे लाभार्थी यांना प्रातिनिधीक स्तरावर साहित्य वाटप करणे व योजनाची माहिती देणे, समता दुत याच्या मार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाट्य नाटकाद्वारे जनतेला सामाजिक योजनांची माहिती देणे व सामाजिक प्रबोधनाचे कार्य या मोहिमेअंतर्गत केले जात आहे. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी कार्यशाळा आयोजित करणे, जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, जेष्ठ नागरिक, तृतीयपंथी, ऊसतोड कामगार यांच्यासाठी आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी जनजागृती व नागरिकांचे मेळावे घेणे, सफाई कामगार व त्यांचे पुनवर्सन कायदा 2013 अंतर्गत जनजागृती करणे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेच्या लाभार्थ्यांची कार्यशाळा घेणे, ऊसतोड कामगारांची नाव नोंदणी व ओळखपत्र वाटप तसेच ऊसतोड कामगारांसाठी पुर्नगामन शिबिर आयोजित करणे, त्यामध्ये आरोग्य तपासणी व धान्य महोत्सव यांचा समावेश आहे.

 

याचबरोबर ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जाती वस्त्यांमध्ये स्वच्छता करणे, संविधान जनजागृती कार्यक्रम तसेच प्रत्येक तालुक्यात एक आदर्श वस्ती निर्माण करणे, नवउद्योजकता शिबिर आयोजित करणे, समान संधी केंद्रमार्फत नशा मुक्त भारत अभियानअंतर्गत व्यसनमुक्त व शिष्यवृत्ती योजनांची जनजागृती करणे, तृतीयपंथी व्यक्तीसाठी शिबिर आयोजित करणे व ओळखपत्र वाटप करणे आदी उपक्रम या कालावधीत घेण्यात येणार आहेत.

 

अंधश्रध्दा निर्मूलन कायद्याबाबत जनजागृती करणे, शासकीय वसतीगृह, निवासी शाळेतील विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधणे, महाराष्ट्र दिन साजरा करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पुर्वसंध्येला समता रजनी कार्यक्रमाचे आयोजन करणे, दिव्यांग बांधवाना व जेष्ठ नागरिकांना सामाजिक सुरक्षा योजना उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करणे अशा विविध उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांना योजनाची माहिती व प्रत्यक्ष लाभ देण्याची कार्यवाही या समता पर्वानिमित्त समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

 

अलका पाटील

उपसंपादक, 

जिल्हा माहिती कार्यालय,

नांदेड

00000  

मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा योजनेत पात्र बचतगटासाठी 27 एप्रिल रोजी कार्यशाळा

 मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने पुरवठा योजनेत

पात्र बचतगटासाठी 27 एप्रिल रोजी कार्यशाळा

नांदेड (जिमाका) दि. 20 :- अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने याचा पुरवठा करणेबाबत योजना सुरु आहे. या योजनेअंतर्गत  सन 2022-23 या वर्षासाठी जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांना ऑनलाईन अर्ज करण्याबाबत समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले होते. त्यानुसार या योजनेत एकूण 279 बचत गटांनी अर्ज सादर केले आहेत. त्यापैकी 231 बचत गटांचे अर्ज छाननी अंती पात्र ठरले आहेत. या योजनेत पात्र ठरलेल्या बचत गटांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात गुरुवार 27 एप्रिल रोजी दुपारी 12 वा. आयोजित केली आहे. या  कार्यशाळेस या योजनेतील पात्र बचतगटांनी उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. तेजस माळवदकर यांनी केले आहे.  

00000 

नारायणा ई-टेस्को ही शाळा अनधिकृत विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे शिक्षणाधिकारी बनसोडे यांचे आवाहन

 नारायणा ई-टेस्को ही शाळा अनधिकृत

विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेण्याचे

शिक्षणाधिकारी बनसोडे यांचे आवाहन

नांदेड (जिमाका) दि. 20 :- नांदेड येथील नारायणा ई-टेक्नो स्कूल नावाने इंग्रजी माध्यमाची अनधिकृत शाळा शासनाची म्हणजेच शिक्षण विभागाची कुठलीही परवानगी न घेता सुरु आहे. या शाळेवर कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरु असून या अनधिकृत शाळेत कोणत्याही पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश देवू नये, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी नागराज बनसोडे यांनी केले आहे.

नांदेड शहरातील डीमार्ट परिसरातील वाडी बु येथे नारायणा ई-टेक्नो शाळा परवानगी न घेता सुरु असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी यापुर्वीच जाहिर केले आहे. या अनाधिकृत शाळेत पालकांनी आपल्या पाल्यास प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित पालक जबाबदार राहतील, असे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती नांदेड यांनी कळविले आहे.

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

 महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त

पूर्व परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश

नांदेड (जिमाका) दि. 20 :- महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा-202 रविवार 30 एप्रिल 2023 रोजी नांदेड जिल्ह्यातील 83  परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. या परीक्षा केंद्र परिसरात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे.

जिल्ह्यातील विविध 83 केंद्रावर सकाळी  11 ते दुपारी 12 या कालावधीत परीक्षा होणार आहे. त्यासाठी 21 हजार 288 उमेदवारांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेचे कामकाज सुरळीत व शांततेत पार पडावे यासाठी परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच्या कालावधीत परीक्षार्थी व परीक्षेच्या कामाशी संबंधित असलेले अधिकारी-कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. या वेळेत परीक्षा केंद्राच्या परिसरात 100 मीटर पर्यंतची सर्व सार्वजनिक टेलिफोन्स, एसटीडी, आयएसडी, भ्रमणध्वनी, फॅक्स, झेरॉक्स आणि ध्वनिक्षेपक चालू ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे, असेही आदेशात जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

00000

समता पर्वनिमित्त शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


 समता पर्वनिमित्त शासकीय निवासी शाळा व वसतिगृहात

रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

 

नांदेड (जिमाका) दि. 20 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्गंत समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने 1 एप्रिल ते 1 मे 2023 या कालावधीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता पर्व अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानातर्गंत सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना थेट जनतेपर्यत पोहोचविण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

समता पर्वानिमित्त 19 एप्रिल रोजी जिल्ह्यात समाज कल्याण कार्यालयाच्या अधिनस्त कार्यरत मुला-मुलींचे अनु. जाती शासकीय निवासी शाळा व मुला-मुलींचे शासकीय वसतिगृह येथे रक्तदान व आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात माहूर येथील अनु. जाती व नवबौध्द मुलीचे शासकीय निवासी शाळेतील मुख्याध्यापक एस.आर.जोशी, सहशिक्षक शिंदे यांनी प्रथम रक्तदान केले. या शिबिरात कर्मचारी व नागरिकांची रक्तदान व आरोग्य तपासणी करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वसतीगृह शाखेचे समाज कल्याण निरीक्षक पी.जी. खानसोळे यांनी सर्वाचे आभार मानले.  

00000

    वृत्त क्रमांक 107 'युवा उमेद'ने युवकांना रोजगाराची संधी मिळेलः ना. अतुल सावे २२ फेब्रुवारीला अर्धापूरला भव्य रोजगार मेळावा नांदे...