Sunday, May 2, 2021

जेंव्हा जिल्ह्यातील 15 मुक कर्णबधिरांना बोलता व ऐकता यायला लागते

 

जेंव्हा जिल्ह्यातील 15 मुक कर्णबधिरांना 

बोलता व ऐकता यायला लागते




नांदेड (जिमाका) दि.
 1:-आजचा काळ हा कोरोनाच्या दृष्टिने शासकीय आरोग्य विभागासाठी अत्यंत आव्हानात्मक जरी असला तरी नागरिकांच्या इतर आजारांकडे शासनाला दुर्लक्ष करता येत नाही. ग्रामीण भागातील माता बाल स्वास्थ्य कार्यक्रम असेल, क्षयरोग निर्मुलन अभियान असेल, कुष्ठरोग निवारण अभियान या साऱ्या नागरिकांच्या आरोग्य विषयक विविध उपक्रमांची जबाबदारी आरोग्य विभागातर्फे अत्यंत समर्थपणे सुरु आहे. यातील अशाच एका महत्वाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यातील 15 मुक कर्णबधिरांची निवड करुन त्यांच्यावर शस्त्रक्रिया व बोलता येण्यासाठी स्पीच थेरपीचा उपचार करुन त्यांना बोलता येण्यासह ऐकण्याच्या दृष्टिनेही समर्थ केले.


नांदेड जिल्ह्यात
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील बालकांची आरोग्य पथकामार्फत तपासणी केली जाते. या तपासणीतून गंभीर आजार असल्यास अथवा कुण्या बालकांमध्ये व्यंग असल्यास त्याचेही मोफत उपचार व शस्त्रक्रीया केल्या जातात. या उपक्रमातंर्गत वैद्यकीय पथकाकडून शोध घेतलेल्या 90 मुक कर्णबधीर बालकांची तपासणी व उपचाराबाबत जिल्हा रुग्णालय नांदेड येथे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरात कान नाक घसा तज्ञ डॉ.सुधीर कदम व त्यांची टिम कडून तपासणी करून त्यामधून 30 बालकांची बेरा तपासणी केली असता 15 बालकांना कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रीया करण्याची अत्यंत आवश्यकता असल्याचे निष्पण झाले होते. या 15 बालकांचे कॉकलेअर इम्प्लांट शस्त्रक्रीया करण्यापूर्वी CT, MRI, ECG, 2D Echo आणि रक्ताच्या सर्व चाचण्या ह्या ग्रामिण/उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय येथे मोफत करण्यात आल्या. या 15 बालकांमध्ये नांदेडमधील 2, नायगावमधील 4, लोहा 2, कंधार 1, किनवट 2, भोकर 1, हिमायतनगर 2, उमरी 1 या बालकांचा समावेश आहे.

शस्त्रक्रीया करण्यासाठी लागणाऱ्या 78 लक्ष रुपये खर्चाची तरतुद आवश्यक होती. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडे सदरील अनुदान उपलब्ध नव्हते. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे यांनी आरोग्य कुटूंब कल्याण कार्यालय पुणे येथे पाठपुरावा करुन मंजूर करुन घेतले.

या सर्व बालकांच्या शस्त्रक्रीया करण्यासाठी सामजस्य करार करण्यात आलेल्या यशश्री ENT हॉस्पिटल मिरज-सांगली येथे या 15 बालकांची अत्यंत गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रीया यशस्वीपणे पार पडली. सदर शस्त्रक्रीया पार पाडण्यासाठी 78 लक्ष रुपये खर्च शासनाने केला. त्या बालकांचे बहिरेपण दूर झाले असुन पालकांनी निशुल्क वैद्यकीय सेवेबाबत समाधान व्यक्त केले आहे.

जिल्हयातील कार्यरत राष्ट्रीय बाल स्वाथ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक अनिल कांबळे, वैद्यकीय आरोग्य पथकातील वैद्यकीय अधिकारी, औषध निर्माण अधिकारी व ANM यांनी सध्याच्या करोना महामारी  काळात सुद्धा बालकांच्या पालकांचे यशस्वी समुपदेशन करून शस्त्रक्रीया केल्यामुळे त्यांचे कौतुक केले जात आहे.

0000

कोरोनाला रोखण्यासाठी लोकसहकार्याची नितांत गरज ! महाराष्ट्र दिनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

 

कोरोनाला रोखण्यासाठी लोकसहकार्याची नितांत गरज !

महाराष्ट्र दिनी पालकमंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

 

नांदेड (जिमाका) दि. 1:- लोकसहकार्याशिवाय कोरोनाला रोखणे शक्य नाही. राज्याचे प्रशासन मागील वर्षभरापासून कोरोनाविरूद्ध लढते आहे. डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि संपूर्ण आरोग्य यंत्रणा अहोरात्र काम करते आहे. त्यांच्या प्रयत्नांना लवकरात लवकर यशस्वी करायचे असेल तर नागरिकांनी प्रशासनाचे निर्देश आणि खबरदारीच्या उपायांचे काटेकोर पालन करून सहकार्य करण्याची नितांत गरज असल्याचे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

शनिवारी महाराष्ट्र दिन सोहळा संपन्न झाल्यानंतर जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांना शुभेच्छा देताना ते बोलत होते. महाराष्ट्र ही शुरविरांची भूमि आहे. अनेक मोठ-मोठी संकटे महाराष्ट्राने परतवून लावली आहेत. यापूर्वी आपण प्लेग, देवी, टीबी सारख्या अनेक आजारांचा मुकाबला केला आहे. त्यामुळे कोरोनावरही आपण नक्कीच मात करू, असा विश्वास पालकमंत्री चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. मागील काही वर्षात आपण पूर्वीच्या तुलनेत आरोग्य सुविधा अधिक सक्षम केल्या. परंतु, कोरोनाचा जोर इतका प्रचंड आहे की, संपूर्ण देशभरात आज सुविधा तोकड्या पडू लागल्या आहेत. अशा परिस्थितीत संयम न सोडता नियोजनपूर्वक आणि सामुदायिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रशासन आणि नागरिकांनी हातात हात घालून काम केले तर कोरोनाला रोखणे सोपे होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या संकल्पनेप्रमाणे राज्य हे रयतेचे असावे, हेच एकमेव उदिद्ष्ट डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचे सरकार काम करते आहे, असे सांगून पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सुविधा व इतर विकासात्मक कामांची थोडक्यात माहिती दिली. महाराष्ट्र दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमाला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगराणी अंबुलगेकर, आ. अमर राजूरकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. माधवराव पाटील जवळगावकर, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आदी मान्यवर उपस्थित होते. आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदा हा कार्यक्रम अगदीच मोजक्या अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

0000  

कोणतीही कमतरता पडू देणार नाही - पालकमंत्री अशोक चव्हाण, ग्रामीण आरोग्य सुविधेत आता 52 रुग्णवाहिकेची भर , राज्य आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधी उपलब्धता

 

जिल्ह्याच्या ग्रामीण आरोग्यासाठी

कोणतीही कमतरता पडू देणार नाही

-         पालकमंत्री अशोक चव्हाण

 

ग्रामीण आरोग्य सुविधेत

आता 52 रुग्णवाहिकेची भर

 

                          राज्य आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निधी उपलब्धता 


नांदेड (जिमाका) दि.
 1:- नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे वेळोवेळी प्रयत्नांची शर्त केली जात आहे. जिल्ह्याचा भव्य विस्तार व 38 लाखाच्या जवळपास असेलेली लोकसंख्या विचारात घेवून जिल्ह्यात 12 ग्रामीण रुग्णालय, 68 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 377 आरोग्य उपकेंद्रे उभारुन आपण आरोग्य सुविधेचे जाळे भक्कम केले आहे. या व्यतिरिक्त चार उपजिल्हा रुग्णालय, एक शासकीय वैद्यकिय महाविद्यालय, एक आयुर्वेदिक महाविद्यालय, एक जिल्हा रुग्णालय, एक स्त्री रुग्णालय याची सक्षम यंत्रणा आपल्याकडे आहे.  या सर्व आरोग्य सुविधेचा विचार करुन ही सेवा अधिक भक्कम होण्यासाठी आता जिल्ह्यात 52 रुग्णवाहिका उपलब्ध करुन देत असतांना स्वाभाविकच आनंद होत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली.

          


महाराष्ट्र दिनानिमित्त या रुग्णवाहिकेच्या लोकार्पणाचा छोटेखानी समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.  याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. मंगाराणी अंबुलगेकर, विधान परिषदेचे सदस्य आमदार अमर राजूरकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार माधवराव पाटील जवळगावकर
, महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.


सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कोविड -19 च्या रुग्णांसह जननी शिशु सुरक्षा कार्यक्रमांमध्ये रेफरल ट्रान्सफोर्ट कार्यालयामार्फत माता मृत्यू व बाल मृत्यू कमी करण्यासाठी गरोदर माता आणि आजारी बालकांना मोफत वाहन संदर्भ सेवा आता या ॲम्बुलन्स उपलब्धतेमुळे आणखी चांगल्या प्रकारे होणार आहे. याचबरोबर गरोदर मातांची मोफत तपासणीसाठी, लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, जिल्ह्यातील सर्व केंद्रापर्यंत अत्यंत कमी कालावधीत लसीकरणाचा साठा पोहचविणे, ग्रामीण भागातील, दुर्गम व पहाडी परिसरात तसेच जंगल परिसरात विविध सर्वेक्षण करण्यासाठी तात्काळ वैद्यकिय सेवा उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून शासकीय रुग्णवाहिका उपयोगात आणली जात आहे. जिल्ह्यात यापुर्वी जी काही वाहने उपलब्ध होती ती अनेक वर्षांपासून उपयोगात असल्याने त्याची वारंवार दुरुस्ती करावी लागत होती. यामुळे सदर जुने वाहने निर्लेखन केल्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अंतर्गत या ॲम्बुलन्स नांदेड जिल्ह्यासाठी घेणे शक्य झाले.

0000




 

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण

नांदेड (जिमाका) दि. 1:- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. मंगराणी अंबुलगेकर, आ. अमर राजूरकर, आ. श्यामसुंदर शिंदे, आ. माधवराव पाटील जवळगावकर,                           महापौर सौ. मोहिनी येवनकर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने आदी मान्यवर उपस्थित होते.

0000

 लक्षवेध :नांदेड जिल्ह्यातील विधानसभा निहाय मतदानाची अंदाजीत अंतिम आकडेवारी लक्षवेध : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीतील अंदाजीत अंतिम आकडेवारी वि...