Wednesday, May 6, 2020


स्थानिक गुन्हे शाखेने 34 लाख रुपयाचा गुटखा पकडला

 नांदेड दि. 6 :-  एका ट्रकमध्ये कर्नाटक राज्यातील हूमनाबाद येथून हिमायतनगर येथे गुटखा विक्रीसाठी जाणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक व्दारकादास चिखलीकर त्यांचे टिमने बुधवार 6 मे रोजी सकाळी 5.30 ते 6 यादरम्यान दुध डेअरी वसरणी चौक येथे सापळा रचला होता. सापळया दरम्यान ट्रक क्रमांक एमएच 26 बीई 4064 या ट्रकला पकडून तपासणी केली असता या ट्रकमध्ये पोलीसांची दिशाभूल करण्यासाठी वरील बाजूस कांदा भरुन त्याखाली गुटखा लपविण्यात आला होता. या ट्रकमध्ये सागर पान मसाला कंपनीचा 34 लाख रुपयाचा 60 बोरीगुटखा 12 लाख रुपये किंमतीच ट्रक अस एकूण 46 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
लॉकडाऊन काळात कोणीही चोरटया मार्गाने अथवा इतर मार्गाने कोणत्याही प्रकारची मद्य विक्री गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार ही कार्यवाही पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्यासह सपोउपनि चव्हाण, पोहेकॉ / भानुदास वडजे, दशरथ जांभळीकर, पदमा कांबळे, तानाजी येळगे, बालाजी मुंडे बजरंग बोडके यांनी पार पाडली आहे.
राज्यात मोठया प्रमाणात कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रसार होत आहे. त्यासाठी शासनामार्फत विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा (कोविड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात दिनांक 14 मार्च, 2020 पासून साथरोग प्रतिबंध अधिनियम ,1897 लागू करण्यात आलेला आहे. दिनांक 14 मार्च, 2020 च्या अधिसूचनेन्वये यासंदर्भातील नियमावली प्रसिध्द करण्यात आली असून दिनांक 17 एप्रिल 2020 च्या आदेशान्वये एकत्रित सुधारीत मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्यात मार्च महिन्यापासून शासनाने लॉकडाऊन घोषीत केलेला आहे. सदर लॉकडाऊन काळात देशी, विदेशी दारु विक्रीचे दुकानांना  विक्री करण्यास प्रतिबंध केलेला आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलीस अधीक्षक नांदेड कार्यालयाने दिली आहे.
000000


कोरोना : 1 हजार 291 स्वॅब निगेटिव्ह
तर 32 स्वॅबचा अहवाल प्रलंबित
नांदेड, (जिमाका) दि. 6 :- कोरोना विषाणु संदर्भात बुधवार 6 मे 2020 रोजी सायं. 5 वाजेपर्यंत एकुण घेण्यात आलेले 1 हजार 382 स्वॅब पैकी 1 हजार 291 निगेटिव्ह असून 32 स्वॅबचा अहवाल प्रलंबित आहे. आतापर्यंत पाच स्वॅब तपासणीची आवश्यकता नसल्याचा निर्वाळा दिला आहे. यापैकी 34 रुग्णांचा स्वॅब पॉझिटिव्ह आहे. यातील तीन रुग्णांचा औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे मृत्यू झाला आहे. 
बुधवार 6 मे रोजी प्राप्त 53 स्वॅब तपासणीच्या अहवालानुसार सदर खाजगी रुग्णालयातील उर्वरित सर्व 21 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. तसेच मंगळवार 5 मे रोजी घेण्यात आलेल्या भोकर येथील 9 व्यक्तींचा अहवाल देखील निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. उर्वरीत व्यक्तींचा अहवाल देखील निगेटिव्ह आहे. बाधित असलेल्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड आणि पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
जनतेने कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये तसेच जनतेने मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नांदेड यांनी केले आहे.
000000


महिला व बाल विकास आयुक्तालयाच्या
उज्वला पाटील यांनी मुलांशी साधला संवाद
नांदेड, (जिमाका) दि. 6 :- बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) 2015 अधिनियमांतर्गत नांदेड जिल्ह्यात कार्यरत स्वयंसेवी बालगृह व शिशुगृहामध्ये दाखल असलेल्या काळजी व संरक्षणाच्या मुलांना व्हिडीओ काँफरन्सच्या माध्यमातून महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे येथील श्रीमती उज्वला पाटील यांनी मुलांशी संवाद साधला.
या दरम्यान मुलांचे दररोजचे वेळापत्रक, मुलांना संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या सोई-सुविधा याबाबत प्रत्यक्ष माहिती घेतली. तसेच अडचणीबाबत संस्थेचे अधीक्षक व मुलांशी चर्चा करुन मुलांच्या आरोग्याबाबतही माहिती घेतली.
यावेळी श्रीमती पाटील यांनी कोविड-19 या आजाराबाबत संस्थेच्या अधीक्षकांनी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत याबाबत माहिती घेतली. बालगृहातील मुलांशी संवाद साधतांना समाधान व्यक्त केले. जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती आर. पी. कळम, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा प्रा. डॉ. निरंजन कौर सरदार, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती विद्या आळणे, बालगृह व शिशुगृहातील अधीक्षक व कर्मचारी यांच्याशी संवाद साधून योग्य त्या समन्वयाबाबत आयुक्तालयाच्या श्रीमती उज्वला पाटील यांनी समाधान व्यक्त केले.  
000000

  वृत्त क्र.   1226 माळेगाव यात्रा पूर्व तयारीसाठी  २५ डिसेंबरला खासदारद्वयांची बैठक   नांदेड दि. 23 डिसेंबर :- श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा प...